बदली

Submitted by पराग र. लोणकर on 3 May, 2021 - 02:39

बदली

नेहमीचा तो विशिष्ट आवाज करून एसटीचा तो लाल डबा थांबला. बरेचसे प्रवासी आधीच्या थांब्यांवर उतरले होते, त्यामुळे या शेवटच्या थांब्यावर उतरणारी आम्ही पाच-सहाच मंडळी होतो. नुकतीच माझी कोकणातील या गावी बदली झाली होती. नेहमीप्रमाणे इतर प्रवासी उतरल्यानंतर मी शांतपणे उतरलो. शहरामध्ये न रमणारा मी खाली उतरल्यावर आजूबाजूला नजर टाकताच कमालीचा सुखावलो.

माझी या गावी बदली झाल्याचे समजताच तसा मी आनंदलो होतोच. मी माझ्यातच रमणारा माणूस होतो. अविवाहित, थोडंफार लेखन करणारा लेखक. दहा ते सहा नोकरी केल्यानंतर उरलेल्या वेळेत आणि रविवारच्या सुट्टीत मला इथे मनसोक्त लेखन करता येणार होतं.

माझं लेखन तसं स्वान्तसुखायच होतं. तशी फारशी प्रतिभाही माझ्यात नसावी. कारण वर्षभरात तीस-पस्तीस कथा उतरत. त्यातील पंधरा-वीस मी दिवाळी अंकांना पाठवत असे आणि त्यातील चार-पाचच छापून येत. अर्थात छापून आलेल्या आणि छापून न आलेल्या; सर्वच कथा मला अतिशय प्रिय होत्या, ज्याप्रमाणे आई-वडलांना आपली सर्वच मुलं प्रिय असतात तश्या... मी कथाही त्यातल्या त्यात प्रसिद्ध नसलेल्या अंकांनाच पाठवत असे. नावाजलेल्या अंकात आपल्या कथांना प्रसिद्धी मिळणे अशक्य, याची मला प्रामाणिक जाणीव होती.

मी बसमधून उतरलो आणि खिशातील खरे गुरुजींचा पत्ता काढला. तिथे माझी भाड्याने रहायची सोय होती. लहानसं गाव असलं तरी रिक्षाची सोय होती. मी त्यात बसलो. रिक्षावाल्याला पत्ता दाखवला. त्यानं पाच-एक मिनिटात मला खरे गुरुजींच्या वाड्यासमोर पोहोचवलं.

मी दरवाजा सताड उघडा असलेल्या वाड्यात पाऊल टाकलं. समोर कुणी नसल्याने दाराची खुंटी वाजवली तसे धोतर नेसलेले, साधारण साठीचे खरे गुरुजी समोर आले.

``प्रभाकर देशपांडे?`` त्यांनी मला विचारलं.

``हो... हो... नमस्कार खरे गुरुजी...`` मी म्हणालो.

``या... आधी तुमची खोली तुम्हाला दाखवतो...`` असं म्हणून खरे गुरुजी मला माझ्या खोलीकडे घेऊन गेले.

``तुम्ही आता जरा आराम करा. मी चहा पाठवून देतो. आजचं रात्रीचं जेवण आपण एकत्रच घेऊ. उद्यापासून संपतच्या खानावळीशी तुमची ओळख करून देतो.``

खरे गुरुजी गेले आणि मी त्या माझ्या खोलीवरून एक नजर टाकली. आता मला पुढील किमान दोन-तीन वर्ष इथेच रहायचं होतं. मला ती खोली पाहताक्षणीच आवडली. मला हवा असलेला शांतपणा मला तिथे मिळणार होता. मी वाड्याच्या मागील बाजूस उघडणारी खिडकी उघडली. नारळीच्या बागेत उघडणारी ती खिडकी मला आणखीनच सुखावून गेली.

रात्री खरे गुरुजींनी बोलावल्यावर मी त्यांच्याकडे जेवावयास गेलो.

``या या देशपांडे साहेब, या... बसा...`` आमची जेवणं आणि गप्पा एकत्रच सुरु झाल्या.

``तुम्ही लेखक आहात असं कळलं. तुमच्या खोलीत राहणारे तुम्ही दुसरे साहित्यिक हो... माधवशास्त्री जोशींचे नाव तुम्ही ऐकलेच असेल. अनेक दशकांपूर्वी ते राहत होते तिथे. त्यांच्या साऱ्या कथा आणि कादंबऱ्या इथेच कागदावर उतरल्यात हो... ते गेले आणि ती खोली गेले कित्येक वर्ष, खरं तर दशकं बंदच ठेवली आम्ही खरे कुटुंबीयांनी... आत्ता आत्ताच ती उघडून स्वच्छ केली. भाड्यानं द्यायची ठरवली आणि तुम्हाला मिळाली...``

माधवशास्त्री जोशी!!! मी हे नाव ऐकताच दचकलो, चक्रावलो. एके काळचे अतिशय प्रसिद्ध लेखक होते ते. साहित्य क्षेत्रात या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकाचे नाव ऐकले नाही असा माणूसच मिळणे अशक्य होते. त्यांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या खोलीत मी राहणार होतो, या विचारानेच मी कमालीचा भारावलो. जेवण कसंबसं आटोपलं आणि घाईनं मी माझ्या खोलीत परतलो, त्याच भारावलेल्या मन:स्थितीत.

आता त्या खोलीतील प्रत्येक गोष्ट मला वेगळीच भासू लागली, वंदनीय भासू लागली. ते टेबल; ज्यावर माधवशास्त्रींनी आपलं लेखन केलं असेल, ती खुर्ची- ज्यावर ते लेखन करताना बसले असतील, तो बिछाना, ज्यावर पडून त्यांनी कल्पनाविस्तार केला असेल...

आता मला त्या खुर्चीवर बसण्याचाही संकोच वाटू लागला. ज्या खुर्चीवर इतका मोठा साहित्यिक बसला आहे, त्यावर आपण बसायचं?

अर्थात, इथे रहायचं, लेखन, वाचन करायचं म्हणजे मला या सगळ्या गोष्टी वापरणं भाग होतं. त्या खुर्चीवर बसणंही भागच होतं. बऱ्याच वेळानंतर मी शेवटी ते धाडस केलं. प्रथम मी त्या टेबल-खुर्चीला अगदी वाकून नमस्कार केला आणि नंतर मी त्या खुर्चीवर स्थानापन्न झालो. आज इथल्या पहिल्याच दिवशी, रात्री झोपण्यापूर्वी, बसमध्ये बसलेलो असताना डोक्यात आलेल्या एका कल्पनेला कथारूप द्यायचं मी बसमध्ये असतानाच ठरवलं होतं.

त्याप्रमाणे, मी कागद-पेन घेतलं आणि बसमध्ये सुचलेली ती कथा लिहावयास सुरुवात केली खरी, पण त्या कथेचा कल्पनाविस्तार काही केल्या मला जमेना. अचानक एक वेगळीच कल्पना मला सुचली, आणि मी त्यावर लिहायला सुरुवात केली आणि अगदी अर्धा तासात ती कथा पूर्णही केली. माझे मलाच आश्चर्य वाटले. इतक्या वेगाने माझी कथा कधीच पूर्ण झाली नव्हती. पूर्वी कथा लिहिल्यावर मला ती किमान दोन-तीनदा वाचून त्यात अनेक बदल करावेसे वाटत. असे बदल करून झाल्यावरच मला ती जरा; तेही जरा... बरी वाटत असे. आज मात्र लिहिलेली कथा पुन्हा वाचताना मला त्यात एकही बदल करण्याची आवश्यकता वाटली नाही.

मग हा अनुभव जवळपास रोजच येऊ लागला. पुढील महिना-दीड महिन्यातच माझ्या पंचवीसएक कथा लिहून झाल्या. मला त्या कथांमध्ये कादंबरीची बीजं दिसू लागली. मग मी कादंबरी लिहिण्याचा पहिला प्रयत्न केला, जो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. उतरलेली कादंबरीही मला कमालीची आवडली. हळूहळू (आमच्या सरकारी) ऑफिसातले माझे काम थोडे वाढले, काही कामं मला घरी येऊनही करावी लागली आणि माझ्या लेखनाचा वेग थोडासा मंदावला. तरी देखील दिवाळी अंकांना कथा पाठवायची वेळ येईपर्यंत माझ्याकडे कथांचा ढीग तयार झाला होता. काही कादंबऱ्याही लिहून झाल्या होत्या. या वर्षी मी माझ्या कथा नेहमीच्या अंकांच्या बरोबरच अनेक नामवंत अंकांनाही पाठवल्या. माझ्याच कथा वाचून मला आता तेवढा आत्मविश्वास आला होता. काही अंकांना कादंबऱ्याही पाठवल्या.

दिवाळी जवळ आली तशी आमच्या वाड्याकडे पोस्टमनच्या फेऱ्या वाढल्या. इतकी वर्षे या काळात पोस्टमन, माझ्या कथांचा समावेश असलेले चार-पाच दिवाळी अंक, काही संपादकांकडून परत आलेल्या कथा, कथा प्रसिद्ध करणे शक्य नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारी काही संपादकांची पत्रे अशा प्रकारे घेऊन येण्याची मला सवय होती, मात्र यावेळी पोस्टमनच्या प्रत्येक फेरीबरोबर धडाधड दिवाळी अंक माझ्याकडे येऊन पडत होते. प्रत्येकात माझ्या कथा होत्या. अनेकांत मानधनाचे चेकही होते.

टेबलावर या अंकांचे गठ्ठे ठेऊन मी बसलो होतो. यापूर्वी मोजक्या अंकात आलेल्या माझ्या कथा पाहूनही मला कमालीचा आनंद होत होता, पोस्टमनने एक जरी अंक आणलेला दिसला तरी मोहरून जाण्याइतका मी आनंदी होत होतो; पण आज इतक्या अंकात माझ्या कथा प्रकाशित होऊनही, माझ्या लेखनास मिळालेली एवढी मोठी प्रसिद्धीही मला काडीचाही आनंद, समाधान मिळवून देत नव्हती, असं माझं मलाच जाणवलं.

मी विचारात पडलो. खूप विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. या वास्तूत आल्यानंतरच्या माझ्या कथा माझ्या नव्हत्याच. जे काही उतरलं होतं, ते या वास्तूतील त्या महान लेखकाच्या जादूनं भारलेलं काहीतरी होतं. हा एक चमत्कारच होता, ज्याचं शास्त्रशुद्ध कारण मला सांगता येत नव्हतं, पण माझ्याकडून जे काही कागदावर उतरलं होतं ते माझं नव्हतं एव्हढी मात्र माझी खात्री झाली होती.

मी मला लेखनातून मिळणारा आनंदच हरवून बसलो होतो. जणू कुणीतरी माझ्या कानात मजकूर सांगत होतं, आणि मी फक्त तो कागदावर उतरवत एका लेखनिकाचं काम करत होतो.

असं जगणं मला शक्यच नव्हतं. लेखनाचा माझा छंद माझ्यासाठी सर्वकाही होता. त्यातूनच आनंद मिळत नसेल तर जगण्यात मजाच नव्हती. मी ताबडतोब माझ्या बदलीसाठी प्रयत्न सुरु केले. गावाकडचे हवामान मला मानवत नसल्याचं मी कळवलं. सुदैवानं अश्या काही बाबी जुळून आल्या की माझी पुढील दोन-तीन महिन्यातच पुन्हा शहरात बदली करणे आमच्या खात्याला शक्य झाले आणि मी परत माझ्या मूळ शहरी परतलो.

शहरात येऊन सात-आठ महिने गेले. या सात-आठ महिन्यात लिहिल्या गेलेल्या कथा मी नेहमीप्रमाणे दिवाळी अंकांना पाठवल्या. या दिवाळीला पूर्वीच्या काळातील माझ्या अनुभवाप्रमाणे चार-पाच दिवाळी अंकात माझ्या कथांची वर्णी लागली. पंधराएक कथा परत आल्या. ज्या दिवाळी अंकांत कथा आल्या, ते अंक मानधन देणारे नव्हते. ते अंक त्यांनी पाठवले हेच मोठे उपकार होते, अशी परिस्थिती होती.

आणि असं असूनही त्या प्रसिद्ध झालेल्या कथा आणि न स्वीकारलेल्या गेलेल्या परंतु मला लिहिताना खूप आनंद देऊन गेलेल्या कथा समोरच्या टेबलावर ठेऊन त्यांच्याकडे पाहताना मला अतीव समाधान मिळत होतं...

कारण हे जे काही होतं ते माझं होतं, फक्त माझं.....

**

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान साधी सरळ कथा आहे . पण तुमच्या मागच्या काही कथा यापेक्षा छान होत्या. मला चार ओळीही लिहिता येत नाहीत त्यामुळं मी हे सांगणं उचित नसेल . पण लेखकाचं नाव वाचून जी अपेक्षा असते ती सांगितली . गैरसमज नको. Happy

अभिप्रायांसाठी सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!

च्रप्स - बादवे या कथेसंदर्भातला प्रश्न कळला नाही. बादवे नावाची कथा मी लिहिलेली नाही.

वर्णिता:- आपल्या अभिप्रायासाठीही धन्यवाद! एखादी कथा लिहिताना, येथे टाकण्यापूर्वी त्याचे संपादन करताना ती वाचकांना आवडावी, किमान त्यांचा वाचण्यातील वेळ वाया गेल्यासारखे वाटू नये, वाचकाचा अपेक्षाभंग होऊ नये असा माझा नक्की प्रयत्न असतो. पण...

अहो , ते बादवे म्हणजे बाय द वे असावं.
पराग, मी ही सहजच सांगितलं. कथा वाचायला आवडतात म्हणून.
ही सुद्धा छानच आहे.
पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत .

ही कथा तुम्ही बदली आधी लिहिली की नंतर असा प्रतिसाद होता तो..
मला कथा प्रचंड आवडली आणि इतकी सुंदर झालीय म्हणून विचारले की त्या माधवशास्त्री यांच्या खोलीमध्ये तर नाही ना लिहिली ..