सांजभयीच्या छाया - ४

Submitted by रानभुली on 2 May, 2021 - 03:53

मागील (तिस-या) भागासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारावी
https://www.maayboli.com/node/78753

४.

मला खरं तर अनामिका मामीला बरेच प्रश्न विचारायचे होते.

कुणीतरी कोलकाता - दिल्ली आणि दिल्ली कुलू अशी विमानाची तिकीटं काढायचं म्हणत होतं. मला हावरा कालका मेल आणि तिथून पुढे मग शिमल्याची छोटी ट्रेन आवडलं असतं. फार तर दिल्लीपर्यंत विमानाने. मग दिल्ली कालका शताब्दी आणि पुढे टॉय ट्रेन पण चाललं असतं.

पण हावरा कोलकाता असं जमलं तर ट्रेनमधे दोन रात्री निघणार होत्या.
निवांत बोलता आलं असतं.
इथेही खूप माणसात बोलता येत नाही.
कदाचित तिकडे मुखर्जींच्या घरी रहावं लागेल. मग तिथेही मनमोकळेपणाने बरेच प्रश्न विचारता येणार नाहीत. विश्वजीत अंकलना काय वाटेल याचा विचार करत रहावा लागणार होता.

मार्केट मधे थंडीसाठी लागणारे कपडे, रोजच्या लागणा-या वस्तू आणि बरंचसं सटरफटर जे तिथे गेल्यावर मिळेल कि नाही याची खात्री नसलेलं घेतलं होतं. त्या बरोबर अनावश्यक शॉपिंग पण झाली. मामीने दोघींसाठी सुंदर इअर रिंग्ज घेतल्या होत्या. आशीला घ्यायचं तिच्या मनात होतं पण इअर रिंग्ज तिला विचारूनच तिकडे घेऊन असं ठरलं.

काली मातेचं मंदीर छोटं असलं तरी देखणं आणि टुमदार आहे.
कारमधे सगळं सामान ठेवून चालतच मंदीरात गेलो. देवी बंगाली पद्धतीची आहे. इकडे दुर्गेचं रूप हेच आहे. टिपीकल बंगाली चेहरा.
बघत रहावंसं वाटावं अशी मूर्ती आहे.
दर्शन घेऊन आता निघायचं असं वाटलं होतं.

पण मामी मंदीराच्या मागच्या भागात निघाली.
इथे प्रशस्त जागा आहे. कंपाऊंड आहे. काही साधू इथे राहतात.
त्यांना बघूनच कसंसंच झालं. केसाच्या जटा, स्नान कित्येक दिवसात केलेलं नाही.
अंगावर भस्म !
चिलीम ओढत बसलेले तसेच अन्य काही साधू तिथे राहत होते.
त्यातल्या एका साधूने धुनी पेटवलेली होती.
मामी त्याच्या पुढ्यात बसलेली होती.

अच्छा ! तर हे काम होतं मामीचं !!
मामी एकतर्फी विचार करत होती. तिच्याकडून काही समजलंच तर त्यात तिचा स्वतःचा दृष्टीकोण हा अंधश्रद्धांनी दूषित असेल असं वाटत राहीलं.
आपल्याला नीट समजायला हवं.

पार्थोचा फोन आला होता. व्हिडीओ अल्बम बनवत होता. मी इथे आलेय असं समजल्यावर त्याने रेकॉर्डिंगसाठी विचारले.
पण मी शिमल्याला जाणार आहे असं सांगितल्यानंतर त्याने ते इतकं महत्वाचं आहे का असं विचारलं . मग थोडक्यात त्याला कल्पना दिली. आपला ग्रुप असता तर छान झालं असतं असं मी म्हणाले तर तो म्हणाला की, "ऋतु आहे तिथे. त्याला भेट. गरज लागली तर त्याची मदत घे."

पण त्याच्याशी बोलायचं कसं ?
गेल्या वेळेला मीच भांडले होते.
त्याच्यावर नाही नाही ते संशय घेऊन त्याला टोचेल असं बोलून निघून आले होते. तो खूप दुखावला गेला होता. पण मी रागात होते. त्या वेळी विचारच केला नाही.

पुण्याला आल्यावर राग ओसरला. मग हळूहळू पश्चात्ताप होऊ लागला.
आपण समजतो तसं काहीही नसेल. उगीचच आपण संशय घेतो.
पण एक मन सांगायचं "तुला जे जाणवतं ते आजवर खोटं नाही ठरलेंलं. सावध रहा "
दोन्हीकडून विचार करता करता एक दिवस मन ऋतुच्या बाजूने झालं.
आपलं चुकलंच या निष्कर्षाला आले होते.
पण आता माफी तरी कशी मागायची ?
ज्यांना चटकन माफी मागता येते त्यांचं आयुष्य किती सुंदर असतं. माझ्यासारखीला ते कधीच जमलं नाही. मनातून तर संबंध सुरळीत व्हावे असं वाततं पण आपण कमीपणा घ्यायचं नाही अशा पेचात काही मैत्रिणीही दुरावल्या.

मन असं भरकटत असताना मामी आली.
सगळी तयारी झाली होती.

मामाचा फोन येत होता.
कोलकाता एअरपोर्ट दुरूस्तीसाठी आठ दिवस बंद राहणार असल्याने हावरा कालका ट्रेनची तिकीटं काढली होती. उद्याच निघायचं होतं.
मी मनातच आनंदाने चित्कारले .

बघता बघता रात्रही सरली आणि दुसरा दिवसही भराभरा संपू लागला.
कोलकत्यात काम असल्याने ट्रेन हावरा स्टेशनमधेच पकडावी असे ठरले होते. दुर्गापूरला दोन मिनिटांचा थांबा. कधी कधी ट्रेन थांबत नाहीत इथे.
सकाळी सहालाच निघून दीड तासात कोलकाता गाठले. मुखर्जींचं गेस्ट हाऊस होतं. तिथून हावरा स्टेशन हाकेच्या अंतरावर होते.
मामाचं काम होतं. तो बाहेर गेला
तीन वाजले आणि निघायची तयारी सुरू झाली. शेवटचं म्हणजे खाण्यापिण्याचे जिन्नस घेतले.
दोन गडी रेल्वेस्टेशनवर बॅगा घेऊन गेले होते. संध्याकाळी सात चाळीसला ट्रेन सुटत होती.
आम्ही सहा वाजताच हजर झालो.

फलाटावर ट्रेन लागलेली होती.
पुढे गेलेल्या दोन माणसांनी टीसीशी ओळख काढून फर्स्ट एसीचा कोच शोधून दरवाजे उघडून बर्थवर सामान ठेवले होते. साफसफाई झाली कि सामान लावले जाणार होते.
भरपूर वेळ होता. चहा पाणी चालू होते.
दहा वेळा निरोप घेऊन झाला.
तसा घर सोडताना तो आधीच झालेला होता.

सव्वा सात वाजले म्हणून मग मामानेच घाई केली. आमच्या जागेवर आणून बसवले.
ट्रेनमधे पहिल्यांदाच केबीन मधे बसले होते.
ट्रेन हलली तसे सगळे उतरले.

आता आम्ही दोघीच होतो.
मामी वॉश घ्यायला गेली होती.
एसीच्या भल्या मोठ्या काचेच्या खिडकीतून मागे पळणारी घरं, झाडं पाहणं हे ट्रेनच्या प्रवासाचं आकर्षण असतं. अगदी लहानपणापासून. थोडा वेळ आम्ही बाहेर बघत राहिलो.
मामीला लगेच खाण्याचे जिन्नस बाहेर काढायची घाई झाली.
इतक्यात वेटर ऑर्डर साठी येऊन गेला.

बाहेर अंधार होऊ लागला.
आता गप्पा निघू लागल्या.

मामीला हळू हळू बोलतं करत राहीले. बरेच प्रश्न होते.

मामी सांगत होती. माझ्या प्रश्नांना उत्तरं देत होती.

***************************************************************

अगदी लहान असताना पाळण्याला बांधलेल्या बाहुल्या, जोकर यामुळे आशी लवकर झोपून जायची.
मग दोघे नवरा बायको भांडत बसत.
झरना आंटी रोज रडायच्या.
त्यांच्या भांडणाचा आवाज इतकाही मोठा नसेल की इतक्या लांब आशीची झोपमोड होईल.
पण ती अकरा वाजल्यानंतर या खोलीत यायची.
तिला तिच्या दादाकडे जायचं असायचं. पण तो दारूचा वास तिला आवडत नसे.
मग झरना आंटी तिला ओरडत.

पण त्या दिवशी ती आंटीला सांगत होती,
" तिथे कुणी तरी आहे "
आंटी काळजी आली. तिने सगळी खोली शोधली. मग घर शोधलं. बाहेर जाऊन शोधलं.
पण कुणीच नव्हतं.
मग ती आशीला रागावली.
" आशी, असं खोट़ं बोलायचं नाही "
" पण मा, तिथे कुणी तरी होतं "
" कोण होतं ?"
" बाई होती "
" अगं कुणीच नाही इथे. इथे कोण कशाला येईल ?"
" मा, ती हसते "
" हे बघ वेडेपणा नकोस करू "

झरना आंटीने मग आशीला रागे भरले.
छोटी आशी निमूट ऐकत होती. तिचे म्हणणे कुणी ऐकून घेत नव्हते.
त्या रात्री आशी किंचाळत उठली
आंटी पण उठल्या
आशी अंधारात बोट दाखवत होती
" मा ऐक ना तिचा आवाज "
" मला काही ऐकू येत नाही बेटा "
" मा ऐक ना, ती हसतेय बघ कशी. मला भीती वाटते "

झरना आंटीने अंधारात पहायचा प्रयत्न केला पण काहीच दिसलं नाही. मग त्यांनी दिवे लावले.
कुणीच नव्हतं.

विश्वजीत अंकलला सांगून उपयोग नव्हता. त्यांचं शास्त्रीय विश्लेषण सुरू झालं असतं.

**************************************************************

दोन दिवस शांततेत गेले. आशी छान झोपली होती.
बस फक्त अकरा वाजता न चुकता येणं चालूच होतं.
पण रात्री उठली नाही.

पण दोन दिवसांनी ती किंचाळत उठली.
कुणीतरी खोलीत पळत होतं. पायातले पैंजणाचे आवाज येत होते. त्या आवाजाने आशी जागी झाली.
तिने झरना आंटीला उठवले.
आंटी काय झालं म्हणून विचारणा करत होत्या.
त्यांना पैंजणाचे आवाज ऐकू आले नाहीत.
" स्वप्न पडलं असेला, झोप चल "
त्या आवाजात जरब आणून बोलल्या.

"नाही अजून आहे पैंजणाचा आवाज. मा ती माझ्याकडे बघून हसतेय"
" कोण ती "
" विच "
" म्हणजे ?"
" मां. विच म्हणजे विच "

***************************************************************

झरना आंटी आता काळजीत पडल्या होत्या.
आता बिश्वजीत अंकलना सारे सांगणे गरजेचे होते. पण अपेक्षेप्रमाणे त्यांनी ते उडवून लावले.

"तिला चेटकीण , हडळ अशी कॉमिक्स बघायला दिलीस ना ? लक्ष ठेवलं नाहीस. सतत कार्टून लावून बसते. त्यात भूताखेताच्या मालिकाही असतात. त्यातलं एखादं कॅरेक्टर तिच्या डोक्यात बसलं असेल "
" पण एकदा तरी आपण बाहेरचे उपाय करायला काय हरकत आहे ?"
" या अशा उपायांनी ती अजून बिथरेल. तिला जे माहीत नाही ते माहीत करून द्यायचं नाही. झालं एव्हढं पुरे आहे . मी करतो काय करायचं ते "

झरना आंटीच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागलेली होती.
त्या रात्री अनेक दिवसांनी दोघे न भांडता झोपी गेले.
म्हणजे झरना आंटी झोपल्या.
विश्वजीत अंकल आशीच्या विचारात उशीरपर्यंत पीत राहीले.

क्रमशः

( पाचवा भाग वाचण्यासाठी कृपया खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती)
https://www.maayboli.com/node/78797

Group content visibility: 
Public - accessible to all site users