लक्ष्मीबाई धुरंधर यांचे " गृहिणीमित्र किंवा हजार पाककृती " असे पुस्तक माझ्या आईकडे होते. त्या पुस्तकाच्या
लेखिका लक्ष्मीबाई धुरंधरच होत्या का ते मला खात्रीने सांगता येणार नाही पण त्या पुस्तकात त्यांचा फोटो होता,
आणि आमच्या घरात त्या पुस्तकाचा उल्लेख तसाच होत असे.
या पुस्तकाचा प्रकाशनकालही मला आठवत नाही. आमच्याकडची प्रतही फारच जीर्ण होती. पण ते दुसर्या
महायुद्धाच्या काळात लिहिलेले असावे. कारण " आजकाल लढाईमूळे बदाम महाग झाले आहेत. " असा उल्लेख
त्यात होता.
त्या पुस्तकाची किंमत रुपये..आणे..पैसे अशी होती. आतल्या पानावर डोंगरे बालामृत आणि जाई काजळ
या जाहीराती होत्या. लेखिकेच्या कुटुंबियांचा त्यात फोटो होता. टिपीकल पुर्वीचे फॅमिली फोटो असत तसा.
म्हणजे खुर्चीवर नऊवारीतली बाई बसलेली, शेजारी कोट घातलेला रुबाबदार पुरुष, कडेवर गोंडस बाळ, शेजारी टेबल, टेबलावर फुलदाणी, शिवाय मागे वर्तुळात काही फोटो.. वगैरे. शिवाय ती पहिली आवृत्ती नव्हती.
कारण त्यात काही अभिप्रायही छापलेले होते. बडोद्याच्या सयाजीराव गायकवडांच्या तर्फे आलेला एक अभिप्राय
शिवाय काही प्रतींची मागणी होती.
काही काही पाककृतीत काही खास उपकरणांचे उल्लेख होते, पण त्याचे चित्र "चित्रपटा"त पहा असे लिहिले होते.
त्याचा अर्थ मला कळला नाही. पुस्तकात बाकी चित्रे नव्हती किंवा कदाचित ती वेगळी दिली जात असावीत.
पण हे पुस्तक लिहिण्यामागे लेखिकेने भरपूर कष्ट घेतले होते हे मात्र खरे. त्यातली माहिती मिळवण्यासाठी
पण ( त्या काळातली संपर्क साधने बघता ) त्यांना भरपूर वेळ द्यावा लागला असणार.
त्यात एक प्रकरण ब्रिटीश टेबल मॅनर्स वर होते. स्वतः कसे खायचे हे तर होतेच पण वाढताना कसे वाढावे
हे पण लिहिले होते. गडीमाणसे निरक्षर असणार हे गृहीत धरून, नॅपकिन्स वर भरतकाम करून चित्रे
काढावीत व ती त्यांना समजून द्यावीत, असे लिहिले होते.
हे करून पहा... मधे नेहमीचा मजकूर तर होताच पण एकाचा उल्लेख इथे केल्याशिवाय रहावत नाही.
"बगळ्याचे हाडाची पूड करून ती माश्याच्या आतील भागास चोळल्यास, काटे विरघळतात असे ऐकून आहोत.
पण अनुभव घेता आला नाही. तरी आमच्या शिकारीबंधूनी अनुभव घेऊन आम्हास जरूर कळवावे" असे एक
वाक्य होते.
दशमान पद्धत यायच्या पुर्वीचे हे लेखन होते त्यामूळे तोळा, मासा, शेर, पायली अशीच मापे होती. या मापांचे
कोष्टकही होते. पदार्थाचे प्रमाण सहज मोठ्या कुटुंबाला पुरेल असेच होते.
मसाल्यांमधे गोज्वारांचा मसाला, घाटी मसाला, करी पावडर असे सगळे प्रकार होते. पण आपण आजकाल
ज्याला सांबार मसाला म्हणतो त्यापेक्षा त्यातला सांबारे चा मसाला वेगळा होता. सांबार म्हणजे सम + भार
अशी फोडही दिली होती.. अनेक नावांच्या अशा फोडी होत्या. अन्न + आरसे , गौ + आहारी, शर्करा + पाळे
वगैरे.
भाज्यांमधे वांग्याच्याच भाजीचे अनेकानेक प्रकार होते. अनेक पाककृती वेगळ्याच होत्या. त्यांची नावे पण खास
होती. पुरणाची वांगी, ग्वाल्हेरी भरली वांगी, सगळाले बटाटे.. त्या काळातही क्वचित मिळत असणार्या
मॅरो वगैरे भाज्यांच्या कृती होत्या. रानभाज्याही होत्या. शेवळांचे अनेक प्रकार होते आणि टाकळा, पोफळाच
नव्हे तर आजही डेलिकसी मानली जाणारी कोरलाची भाजी पण होती ( आपट्याच्या पानासारखी पाने
असणारी ही भाजी, पावसाळ्यातच मिळते. खुप चवदार असते. या भाजीची फुलपुडी सारखी पुडी बांधून विकायला
आणतात. )
लेखिकेचे वास्तव्य बहुतेक हैद्राबाद भागातले असावे. काही तेलंगी ( तेलुगु ) पदार्थ त्यात होते. त्यांनी एका
पानांचा उल्लेख केला होता. ( नाव बहुतेक केनी ) त्या पानांची भजी केली असता, ती पाने तळताना फुगतात
असे लिहिले होते. ती पाने कसली ते मला अजून कळलेले नाही. महाळूंगाचे पण अनेक पदार्थ होते.
ते लिंबू वर्गातले फळ असावे.
मटणाचे आणि कोंबडीचे अनेक प्रकार होते. ( आई त्यातले अनेक प्रकार करत असे. ) माश्यांची भुजणी होती.
काही काही पदार्थ तर थेट संस्थानीच होते. हरणाची लेग नावाचा पदार्थ होता. एका पदार्थाचे नाव चक्क "शिकार"
होते. त्याचे साहित्य " दोन तित्तर, चार लाव्हे... " असे काहीसे होते.
आजही क्वचित कुठल्या पुस्तकात असेल असे घरगुति पदार्थ त्यात होते. घरच्याघरी व्हीनीगर ( उसाच्या
रसापासून ) व्हॅनिला इसेन्स ( व्हॅनिलाच्या शेंगा वापरून ) बेकिंग पावडर कसे करायचे ते सविस्तर लिहिलेले
होते.
द्राक्षासव ची पण सविस्तर कृती होती. त्यातला एक घटक " धायटीची फुले" मला या पुस्तकामूळेच कळला
( महाराष्ट्राच्या घाटात ही लाल फुले मुबलक फुलतात. चवीला गोड लागतात. फर्मेंट करण्यासाठी वापरतात.
महागही असतात, तोळ्यावर विकत असत. ) त्या कृतीतील शेवटचे वाक्य, मजेशीर होते. " यातला गाळ
गडीमाणसांना द्यावा. ते तो भक्तीने पितात. ... "
गुलकंदासारखास "भेंडेकंद" असा प्रकारही होता त्यात. चक्क भेंडीचा गोड प्रकार.
बेकिंगचेही बरेच प्रकार होते. भट्टी कितपत तापली आहे हे बघण्यासाठी कागदाचा कपटा कसा वापरायचा ते पण
लिहिले होते. आता तयार मिळणारी पफ पेस्ट्री घरी कशी करायची, ते पण लिहिले होते. त्यासाठी लार्ड किंवा
बोकडाची चरबी वापरायची असे सुचवले होते.
त्या काळातील एखाद्या अभ्यासक्रमासाठी ( कदाचित गृहितगामा ) हे पुस्तक अभ्यासाला लावलेले असावे. कारण काही पदार्थांवर हायर लेवल, लोअर लेवल असे मार्क्स होते. त्यापैकी एका पदार्थावर तर " हा पदार्थ
करण्यासाठी थोड्याफार कौशल्याची गरज आहे " असा शेरा होता. ( लेखिकेचाच ) तो पदार्थ माझ्या आठवणी
प्रमाणे "मधमाश्याचे पोळे" हा होता. साधारण केक सारखा प्रकार होता पण त्यानंतर त्यावर षटकोनी सळीने
छिद्रे पाडून, वरून सिरप टाकायचा होता.
आईसक्रीम पॉट मधे करायच्या आईसक्रीमचे अनेक प्रकार होते. इराणी आईस्क्रीम नावाच्या प्रकारात नारळाचे
दूध वापरले होते.
घरच्याघरी आइसिंग कसे करायचे ते पण लिहिले होते. आइसिंग करण्यासाठी हस्तिदंती किंवा चांदीची सुरी
वापरावी असे सुचवले होते. त्यातले रंग पण कसे करायचे ते लिहिले होते. पिवळ्या रंगासाठी केशर, लाल रंगासाठी
बीट व हिरव्या रंगासाठी गुलाबाची पाने वाटून घ्यायला सुवचले होते. त्यावेळी उपलब्ध असलेली कोचिनेल
नावाचा रंगही वापरायला सुचवला होता. ( हा रंग निवडुंगावरील किड्यांपासून मिळवत असत आणि त्याच्या
फळापासून डोंगरे बालामृत बनत असे. महाराष्ट्रातील निवडुंगांचा नायनाट झाल्यामूळे ही दोन्ही उत्पादने
आता बंद पडली आहेत असे मी वाचले होते )
आपण कॉपीराईटस बद्दल आता जागृत आहोत पण त्या अधिकाराची जाणीव लेखिकेला होती. तिने पदार्थांच्या
नावातच त्याची सोय केली होती. उदा: "काशीताई किर्लोस्करांचे चिरोटे", "सोकरीबाई यांची बदामाची थाळी", "लिबिग साहेबाचे कच्चे मासांचे सूप" अशी नावे होती. हे लिबिग साहेबाचे सूप तर विलक्षणच होते. त्यात खिमा
भरपूर पाण्यात घालून ढवळायचा आणि मग त्यात हायड्रोक्लोरीक आम्लाचे दोन थेंब टाकायचे असे सुचवले होते.
इतकेच नव्हे तर घटक घेतानाही, "तारकर कंपनीचा रवा" किंवा "कासवजी पटेल यांचे आंबे" घ्यावेत असे सुचवले
होते.
इतकी वर्षे वापरल्याने ते पुस्तक खुपच जीर्ण झाले होते आणि शेवटी २००५ च्या पावसात ते नष्ट झाले. त्याच्या
काही रीप्रिंट्स मी नंतर बघितल्या.. पण का कुणास ठाऊक नाही घेतल्या. माझ्या आईने त्यातले अनेक
पदार्थ केलेच पण काही मासिकांनी आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेत यातले पदार्थ लिहुन स्पर्धकांनी
बक्षीसे मिळवलेली पण मी बघितली ( अर्थात या पुस्तकाचा उल्लेख नव्हता. )
पण एवढे सगळे लिहून मी वरच्या फोटोचा आणि लक्ष्मीबाईंचा काय संबंध ते लिहिलेलेच नाही... तर ते पुढच्या भागात.
मला माझ्या आईच्या दारी
मला माझ्या आईच्या दारी उगवलेली आठवताय्त पण माहीत नव्हतं कि ही खातात. ती पाकृ पाहील्यावरच समजलं. जागूकडे उगवत असावीत बहुतेक...
मनी, पाने ओळखीची वाटताहेत खरी
मनी, पाने ओळखीची वाटताहेत खरी पण जाणकारांनी ओळख पटवल्याशिवाय खाऊ नयेत, असे वाटतेय. ( हे मला स्वतःला बजावायला पाहिजे ! )
छान परिचय. वाचताना मजा आली.
छान परिचय. वाचताना मजा आली.
बगळ्याच्या हाडाची पूड? हे
बगळ्याच्या हाडाची पूड? हे काहितरी नविनच.
हो मा. पो. त्या पुस्तकात आहे
हो मा. पो. त्या पुस्तकात आहे ते ! नंतर मी कुठेही वाचले नाही.
जबरदस्त माहिती.. कधी न
जबरदस्त माहिती.. कधी न वाचलेली आणि बघीतलेली..
हे पुस्तक पाहिलेले आणि
हे पुस्तक पाहिलेले आणि वाचलेले आहे. ते पहिल्या महायुद्धाअखेरीस लिहिले गेले असावे. सयाजीराव महाराज (तिसरे) हे फेब. १९३९ साली वारले. दुसर्या महायुद्धाची अधिकृत सुरुवात सप्टेंबर १९३९ मध्ये झाली. त्याआधी चीन-जपानची आपापसातली लढाई १९३७ पासून सुरू होती. पण ह्या अतिपूर्वेतल्या कुरबुरींमुळे भारतातल्या बदामपुरवठ्यावर गदा येण्याचे तितकेसे कारण नव्हते. त्यामुळे हे पुस्तक १९१७ साली संपलेल्या पहिल्या महायुद्धादरम्यान लिहिले गेले असावे. शिवाय, 'रुचिरा'वरच्या अभिप्रायांचे संदर्भ (बहुधा 'स्त्री'चे जुने अंक) चाळताना 'गेली पन्नास-साठ वर्षे मराठीमध्ये पाकशास्त्रावरचे गृहिणीमित्र हे एकच पुस्तक उपलब्ध होते, रुचिराने ही तूट भरून काढली आहे' असे काहीसे वाचल्याचे आठवते. (संदर्भ स्पष्ट नाहीत, क्षमस्व.)
यामुळे हे पुस्तक बरेच जुने, प्रथम महायुद्धकालीन असावे असा तर्क करण्यास जागा आहे.
त्या काळात पुस्तकात पाहून स्वयंपाक करणे हा कमीपणाचा आणि थटटेचा विषय होता असणार. कारण त्या वेळच्या साहित्यातून याचे प्रतिबिंब उमटले आहे. १००१ पाकक्रिया या शीर्षकाचीही विडंबने झाली. १००१ रात्री या अरेबियन नाइट्स च्या नावाशी साम्य दाखवीत विडंबन केलेले वाचल्याचे आठवते.
पुस्तक परिचय जबरदस्त आवडला. (इतर अनेक लेखांप्रमाणेच.)
हीरा, पुस्तकात वाचून पदार्थ
हीरा, पुस्तकात वाचून पदार्थ करणे हा थट्टेचा विषय माझ्या लहानपणी पण होता. माहेरीच लग्नापुर्वी मुलीने सगळे शिकावे अशी अपेक्षा होती.. कायस्थांच्या मधे तर मुलीला बघायला आल्यावर तिने केलेल्या खाज्याच्या कानवल्यात, वरुन टाकलेला रुपया अडकला तर मुलीला तिथल्या तिथे कुंकु लावून लग्न ठरवत असत.
आमच्या घरी वेगळीच कथा होती... वडिलांच्या मालवणचे भरपूर ओले खोबरे घातलेले पदार्थ आणि आईच्या कोल्हापूरच्या माहेरचे तिखट पदार्थ, आमच्या मुंबईच्या घरात आवडण्यासारखे नव्हते. शिवाय आईचे माहेरचे कुणीच नातेवाईक मुंबईत नव्हते. त्यामूळे तिला या पुस्तकाचा आधार होता. त्याकाळी गावाला वेगवेगळे घटक पदार्थ मिळतही नसते आणि नेहमीच्या पदार्थाशिवाय वेगळे पदार्थ करायचीही पद्धत नव्हती.
आईला मात्र वेगवेगळ्या शेजारणी आणि मैत्रिणींमूळे नवनवे पदार्थ शिकता आले. शिकवताही आले.
दिनेश, मस्त लेख. वरचा फोटो पण
दिनेश, मस्त लेख. वरचा फोटो पण कातील आलाय.
तुमच्या लेखाने मन जवळ जवळ
तुमच्या लेखाने मन जवळ जवळ ३०-३५ वर्ष झरकन मागे गेले. हे लक्ष्मीबाईंचे पुस्तक मी माझ्या आजी कडेच पाहीले होते. या पुस्तकात पातेल्यासाठी टोप हा शब्द वापरलेला आहे.जो मला तोपर्यंत माहीत नव्हता. तो मुखप्रुश्ठावरचा फोटोही लख्ख आठवला. ह्या पुस्तकातली “दुधपोहे” ही रेसिपी मला फार आवडली होती. ती थोडक्यात म्हणजे बासुंदीत भीजवलेले पोहे आशी होती.
आणि हो ते पुस्तकही आज्जीकडे बडोद्याहुनच आले होते. माझी आक्का आज्जी म्हणजे आजीची सख्खी बहीण बडोद्याच्या राणीसाहेबांकडे कामाला होती.तीने आज्जीला ते पुस्तक दिले होते. अक्का आज्जी बालविधवा होती. पण त्या जुन्या काळातही राणीसाहेबांनी तीला फार मानाने आणि प्रेमाने वागवले. तुमचे लिखाण वाचताना ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद दिनेश.
आणी हो फसवी अंडी मस्तच. किंडरजॉयची कल्पना अफलातुन.
पुस्तकाचा परिचय आवडला.
पुस्तकाचा परिचय आवडला.
गेल्या काही दशकांत आहारात कसकसे बदल झालेत याचा काहीसा अंदाज येतो आहे या पुस्तकातून.
मस्त लेख दिनेश, बगळ्याच्या
मस्त लेख दिनेश, बगळ्याच्या हाडांचा चुरा ..:) वरून एक आठवण झाली, आमच्याकडे असंच एक रसचंद्रिका नावाचं पुस्तक होतं , सारस्वत समाजातल्या पाककृती,बहुधा अंबाबाई संशी यांनी लिहिलेलं , त्यात 'कोंबडीचं एक लहान पिलू घ्यावं आणि सोलावं ' असं वाचल्याचं आठवतं ..
ह्या पुस्तकाचा परिचय करुन
ह्या पुस्तकाचा परिचय करुन दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद दिनेशदा
उत्सुकता चाळवली म्हणून नेटवर शोधून पाहिले तर चक्क बुकगंगावर दिसले. सध्या 'आऊट ऑफ प्रिंट' असे स्टेटस दाखवत आहेत त्याचे पण बुकगंगा पहिली काही पानं चाळायला देत असल्याने पुस्तकातल्या भाषेचा, धाटणीचा अंदाज येतोय. एकदम इंटरेस्टिंग ! अर्थात ही विसावी आवृत्ती आहे आणि काळाप्रमाणे त्यात काही फेरफार केल्याचे उल्लेख आहेत. तसे न करता मूळ स्वरुपात हे पुस्तक वाचायला मिळायला हवे होते असे फार वाटले.
सुरुवातीला झुरळे, माश्या मारण्याच्या औषधाची कृती आहे ती वाचून मजा वाटली.
तसेच त्या थोड्याफार पानांत दिलेल्या सजावटीच्या कल्पना आणि बटाटा- वांग्याच्या भाज्यांच्या नावांपासूनच पाककृतींच्या वैविध्याची कल्पना येतेय. बटाट्याच्या भाजीचा एखादा तरी प्रकार नक्की घडणार येत्या आठवड्यात.
*प्रस्तावनेनुसार पुस्तकाची पहिली आवृत्ती १९१० साली प्रसिद्ध झाली. हीरा ह्यांचा तर्क अचूक आहे. कदाचित नंतरच्या आवृत्तीत युद्धाचा उल्लेख घातलेला असावा.
तुम्ही लिहिलेल्या भाग २ ची
तुम्ही लिहिलेल्या भाग २ ची लिंक ह्या लेखाच्या शेवटी दिली तर पटकन पुढचा भाग वाचणे सोपे जाईल
मला पण हवंय पुस्तक. मलाही
मला पण हवंय पुस्तक. मलाही लक्ष्मीबाई धुरंधर व्हायचंय.
मी २-३ वर्षापूर्वी घेतलं हे
मी २-३ वर्षापूर्वी घेतलं हे पुस्तक एका प्रदर्शनात.ती त्यांच्या सुनबाईने काढलेली आवृत्ती आहे बहुतेक. प्रस्तावनेत वाचल्याचं आठवतं. त्यातले काही पदार्थ आता एक्झॉटिक वाटतात.
कसलं क्युट असेल हे पुस्तक.
कसलं क्युट असेल हे पुस्तक.
मी मिळवून वाचणार आहे.
मस्त! लेख पूर्वी वाचला होता.
मस्त! लेख पूर्वी वाचला होता. प्रतिसाद द्यायचा राहिला होता.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/49748
भाग 2 लिंक. महान कृती आहे
फेसबुक वर पण पोस्ट केली आहे
फेसबुक वर पण पोस्ट केली आहे त्यांनी. त्यामुळेच दिनेशदा फेसबुकवर सापडले.
Pages