ओळख वेदांची - भाग ४ - अथर्ववेद

Submitted by शीतल उवाच on 12 March, 2021 - 21:42

हिरण्यवर्णाः शुचयः पावका यासु जातः सविता यास्वग्निः ।
या अग्निं गर्भं दधिरे सुवर्णास्ता न आपः शं स्योना भवन्तु ॥ अथर्ववेद १, ३३।।

सोन्यासारख्याच रंगाने प्रकाशणारे (पावसाचे) पाणी, शुद्धीदायक होवो, ज्यामधून सविता देव आणि अग्निदेव यांचा जन्म होतो. सोन्यासारखी (झालर) असणारे म्हणजे जणु अग्निगर्भ. ते पाणी आपल्या सर्व समस्या दूर करो आणि आपल्याला आनंद आणि शांती प्रदान करो.

पावसाळ्याचे दिवस आहेत तर अथर्ववेदातीलच आप(जल)सूक्तापासूनच लेखाची सुरुवात करु यात. (लेख लिहिला तेव्हा पावसाळा होता!)

अथर्ववेद….

चार वेदातील अंतिम परंतु विषयांच्या विविधतेत ऋग्वेदाच्या तोडीचा वेद म्हणजे अथर्ववेद. रचनेच्या दृष्टीकोनातून आणि भाषिक वैशिष्ट्यांवरून अथर्ववेदाचा काळ आणि स्थान याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते अथर्ववेदाचे संकलन जरी ऋग्वेदोत्तर काळातील वाटले तरी त्यातली मंत्र ऋग्वेद काळापासून रचनेत होते असेही मानले जाते.

असाही एक विचारप्रवाह आहे जो असे मानतो की अथर्ववेद हा वेदच नाही. कारण अथर्ववेदातील यज्ञ सोडून इतर अनेक विषय जसे यातु विद्या किंवा अभिचार मंत्र हे वैदिक धर्म, परंपरा किंवा संस्कारांचा भाग नाहीत. यासाठी इतर काही ग्रंथातील दाखले दिले जातात जसे ‘त्रयोवेदा अजायन्त’ (ऐतरेय ब्राह्मण) , ‘वेद शून्यैस्त्रिभिरेति सूर्यः’ (तैत्तिरिय ब्राह्मण) किंवा ‘यम् ऋषयस्त्रयी विदो विदुः ऋचः सामानि यजुष’ (तैत्तिरिय ब्राह्मण). आपण अर्थातच त्या वादात पडण्याचे कारण नाही कारण त्याचे खंडन अनेक थोर विद्वानांनी केले आहे. आज अथर्ववेदाचे स्वरुप आणि त्याचे भारतीय ज्ञानशाखातील योगदान पाहता अथर्ववेद हा वेदच होता यात शंकाच उरत नाही.

अथर्व …..

‘थर्व’ या धातूपासून ‘थर्वन्’ हा शब्द तयार होतो. निरुक्तात याचा अर्थ गतीशील असा होतो. म्हणून अथर्वन् म्हणजेच – गतिहीन, निश्चल किंवा स्थिर. अथर्ववेद म्हणजे अढळ ज्ञान देणारा अशा अर्थाने हा शब्द येतो. अथर्वन् आणि अंगिरस ऋषींनी रचलेला म्हणून ‘अथर्वांगिरस’ असेही या वेदाचे नाव आहे. अथर्वन् ऋषीकुलाने यज्ञादी कर्मे तर अगिरसांनी अभिचारादि मंत्राची रचना केली असे मानतात. याशिवाय ब्रह्मवेद, छन्दोवेद, भैषज्यवेद, क्षत्रवेद अशी अनेक नावे अथर्ववेदाला दिली जातात.

एकाच वेदाची इतकी नावे येण्याचे मुख्य कारण म्हणजे या वेदात अंतर्भूत असलेले विषय. चारही वेदात सर्वात जास्त विविधता असलेला वेद म्हणजे अथर्ववेद. ब्रह्मज्ञानापासून ते शापापर्यंत, आयुष्यवर्धक मंत्रांपासून ते शत्रुनाशक सूक्तांपर्यंत, औषधी उपचारांपासून ते जादुटोण्यापर्यंत, शेती पासून ते राज्यकर्मापर्यंतचे आणि भूगोलापासून ते खगोलापर्यंत अनेकविध विषय अथर्ववेदात येतात. म्हणूनच तर एकाच वेळी आयुर्वेद, अर्थशास्त्र (राजनीती) आणि शिल्पशास्त्र असे तीन सर्वस्वी भिन्न विषय अथर्ववेदाला आपले उगमस्थान मानतात.

रचना….

अथर्ववेद हा वेदवाङ्मयातील एक असला तरी त्याची रचना ऋग्वेदाइतकी काटेकोर नाही. अथर्ववेदात अध्यायाऐवजी रामायणासारखा कांड हा शब्द वापरलाय. एकूण २० कांडे मिळून ७३१ सूक्ते आहेत, ज्यात साधारण ५९८७ मंत्र आहेत. यातील जवळपास १२०० मंत्र ऋग्वेदातले आहेत. अथर्ववेदात काव्य आणि गद्य अशा दोन्ही स्वरूपात विवेचन आढळते हे त्याचे अजून वैशिष्ट्य आहे.

काय आहे अथर्ववेदात…

एकदा अथर्ववेदातील विषयांची नुसती सुची पाहिली तरी अथर्ववेदात काय नाही असे म्हणावे लागेल! वैदिक कालखंडातील जनजीवनाचा विश्वकोश म्हणजे अथर्ववेद आहे. त्याकाळातील तत्त्वज्ञान, समाजव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, राज्यतंत्र, शेती, तंत्रज्ञान आणि वैद्यक या सर्वविषयांवर सविस्तर भाष्य अथर्ववेदात येते. अथर्ववेदातील विषयांची सूक्तवार लहानशी सूची पाहूयात म्हणजे अथर्ववेदाची व्याप्ती समजून येईल.

भैषज्यसूक्ते – अथर्ववेदातील या सूक्तात निरनिराळ्या ८९ रोगांची माहिती आणि त्यांची चिकित्सा सांगितली आहे. या मंत्रात औषधे, औषधी वनस्पती आणि पाण्याचे वर्णन आणि प्रशंसा आढळते. कौशिक सूक्तात या मंत्रांच्या सहाय्याने केल्या जाणा-या जादूटोण्याचे वर्णन आहे. दन्तपीडा (दातदुखी), अतिसार, कुष्ठरोग, यक्ष्मा (क्षय) असे असंख्य आणि आजही आपल्याला माहिती असणारे रोग यात येतात. भैषज्यसूक्तात अनेक किटक, किटाणु, भूत, राक्षस यांचीही वर्णने आहेत.

आपल्या माहितीतले सांगायचे तर आजच्या भाषेत ज्याला ‘ओपन फ्रॅक्चर’ (Open Fracture) म्हणतात त्याचीही चिकित्सा अथर्ववेदात आढळते२. रोहीणी वनस्पतीच्या सहाय्याने ती जखम कशी बांधावी याचे साद्यंत वर्णन त्या सूक्तात आढळते.

आयुर्वेदाचे मुळ अथर्ववेदात आहे असे का म्हणतात ते आपल्याला यातून उमगते. केवळ उपचारच नव्हेत तर अनेक वनस्पतींचे औषधी उपयोग आणि त्यावरील मंत्रांवरून त्याकाळी वनस्पतीशास्त्र(Botany) हे ही अभ्यासाचा भाग होते हे लक्षात येते.

पौष्टिक सूक्त – सुखसमृद्धिसाठी करण्यात येणा-या प्रार्थना या सूक्तातून व्यक्त होतात. घर बांधताना, हंगामाच्या सरुवातीला शेतात नांगर धरताना, पेरणीच्या वेळी तसेच उत्तम पीक आणि त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या समृद्धीसाठीच्या प्रार्थना या सूक्तात येतात.

आयुष्य सूक्त – स्वास्थ्य आणि दीर्घायुषी जीवनासंबंधित अनेक सूक्ते अथर्ववेदात येतात. या मंत्रातून निरोगी आणि शतायुषी जीवनाची प्रार्थना केली जात असे.

प्रायश्चित्त सूक्त – पाप किंवा अपराधाच्या क्षमापनार्थ करण्यात येणा-या प्रायश्चित्तांशी संबंधित मंत्र या सूक्तात येतात. केवळ पापच नव्हे तर यज्ञ करताना जर चूक झाली तर त्यावरील प्रायश्चित्त विधानेही या मंत्रात येतात. ग्रह किंवा नक्षत्रांना शांत करण्याचे मंत्रही या सूक्तात येतात.

स्त्रीकर्माणि सूक्त – विवाह संस्कार, त्याचे विधी तसेच पती पत्नीच्या परस्परप्रेमाची वाढ या विषयांवरील सूक्ताना स्त्रीकर्माणि सूक्ते म्हणता येईल. या मंत्राद्वारे वर किंवा वधू प्राप्त करता येईल असा विचार असे. याच सूक्तात असे अनेक मंत्र आहेत जे इन्द्रजाल, शाप, अभिशाप किंवा वशीकरण अशा विषयांशी संबंधित आहेत.

**(एकता कपूर किंवा झी मराठीच्या टि.व्ही सिरियलना उपयोगी पडतील असे पुरुष वशीकरण, सवतीचा नाश करणे, स्त्री-दुर्लक्षण निवारण अशा विषयांवरचे मंत्रही या सूक्तात येतात!!!)

राजकर्माणि सूक्ते – राजाच्या आणि राज्याच्या व्यवहारासंबंधी मंत्र या सूक्तात येतात. शत्रुवर विजय मिळविण्याची प्रार्थना करणारे, अस्त्र आणि शस्त्रांची माहिती देणारे मंत्रही यात आहेत.

अभिचारात्मक सूक्ते– अभिचार म्हणजे जादू. शत्रुचा नाश करणे, शत्रुने केलेली जादू परतावून लावणे, शत्रुच्या जादूटोण्यापासून स्वतःचे रक्षण करणे, शत्रुपक्षात रोगाच्या साथी पसरवणे अशा अनेक विषयांवरचे मंत्र या सूक्तात येतात.

याच बरोबर पृथ्वीसूक्तासारखे मातृभूमीचे प्रेम दर्शवणारे नितांतसुंदर सूक्तही यात येते.

यज्ञिक सूक्त – दैनंदिन जीवनात केल्या जाणऱ्या पूजाअर्चा, उत्सवात केले जाणारे होम आणि इतर काही यज्ञांचे विधी या सूक्तांत येतात.

कुंताप सूक्त – अथर्ववेदाच्या २० व्या कांडात अनेक कूट आणि गूढ सूक्ते आहेत. अनेक कोडी आणि त्यांची उत्तरे, गूढ अर्थाचे मंत्र या सूक्तात येतात. ऋग्वेदातील अस्यवामीय किंवा नासदीयसूक्ताच्या तोडीची काही सूक्ते येथे आढळतात.

दार्शनिक सूक्त – ईश्वर, प्रजापति, ब्रह्म, मन, प्राण इ. वर भाष्य असणारे मंत्र या सूक्तांत येतात. गायीच्या रुपात केलेले ईश्वराचे वर्णनही या सूक्तात येते.

अशा प्रकारे अनेक रंजक, गुढ आणि अभ्यासपूर्ण विषयांचे उगमस्थान असणारा अथर्ववेद हा तत्कालिन समाजाचे चित्रण आणि आजच्या समाजाला मार्गदर्शन असे दोन्ही हेतू साध्य करतो.

उपसंहार

चारही वेदांच्या ओळख करून घेतल्यावर आपल्या लक्षात येते की केवळ चार धार्मिक पुस्तके इतकी संकुचित ओळख वेदांची नाही. समृद्ध, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी भारताची ओळख वेदांतूनच जगाला होते. वेद हे भारतीय संस्कृती आणि उपखंडतील ज्ञानाचे उगमस्थान आहेत. परमात्म्याचे तत्त्वज्ञान असो की आयुर्वेदाचे विज्ञान…… लौकीक आणि पारलौकीक जीवनाकडे अत्यंत जिज्ञासु वृत्तीने पहायला वेद शिकवतात. आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापत्य, शिल्प, पानक अशा अनेक शास्त्रांचा पाया वेदच रचतात. ऋग्वेदातले ऋषी आयुष्य निखळ आनंदाने जगतात, त्याचबरोबर त्याचे रहस्यही मांडतात. तर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आपल्यालाही ते आयुष्य कसे जगता येईल ते समजावून सांगतात. रंग, रस, गंध, नाद आणि स्पर्श या सर्व अनुभुतीतून आयुष्याला आकार द्यायला वेद शिकवतात. जीवनाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पहात त्याचा आनंद घेण्याचे तात्त्विक आणि शास्त्रीय ज्ञान वेदातून प्राप्त होते म्हणूनच हजारो वर्षानंतरही आज अनेक भारतीय आणि अभारतीय विद्वान वेदांचा अभ्यास करतात. वेदांच्या या ज्ञानशाखांबद्दल पुढील भागात……..

तळटिप –

१. “अथर्वाणोsथर्वणवन्तः। थर्वतिश्चरतिकर्मा, तत्प्रतिषेधः।” (निरुक्तः–११.१८)
२. सं मज्जा मज्ज्ञा भवतु समु ते पुरुषा परुः। अथर्ववेद पै. – ४/१५
३. मूळ लेख - https://sheetaluwach.com/ved4m/

Copyright https://sheetaluwach.com/ 2020 ©
https://sheetaluwach.com/ved4m/ - मूळ लेखाची नवीन लिंक

Group content visibility: 
Use group defaults

अगदी आटोपशीरपणे वेदांची ओळख करून देत आहात, आभार.

शिल्पशास्त्राबद्दल अथर्ववेदात काय सांगितले असावे याचे कौतुहल आहे, शक्य झाल्यास त्याबद्दल पुढे लिहावे.

@अनिंद्य धन्यवाद, अथर्ववेदावर अधिक लिहायची इच्छा आहेच. प्रयत्न करतो.

छान माहिती मिळते,प्रत्येक लेखातून
जनरेशन नेक्स्ट मध्ये असा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती(अध्यात्मिक,म्हणजे बोअर) फार कमी पहायला मिळते असं वाटतं