या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)
३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण (https://www.maayboli.com/node/77437)
...........
( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797)
....................................................................................................................................
31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.
या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.
ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.
गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.
दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.
कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.
अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.
लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:
“लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).
यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्क्यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.
लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.
करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.
इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:
१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.
लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.
२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.
३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.
४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.
वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.
महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.
....
तर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………
चर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :
३०/३/२१ :
या विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.
आता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.
..................................
३१/३/२१
बालदमा आणि कोविड
या विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.
मुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.
....................................
१/४/२०२१
कोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी
समजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,
१. नॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.
२. CT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.
............................................
२/४/२१
कोविड व चव संवेदना
या आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.
एक थिअरी अशी आहे.
विषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.
बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.
........................................
५/४/२१
विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.
एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.
आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :
१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.
३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.
..........................................
६/४/२१
ACE2 चे कार्य :
हे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.
आता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.
.......................................................
८/४/२१
क्षयरोग आणि कोविड
या संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.
महत्त्वाचे मुद्दे
१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.
२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.
३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.
.......................
९/४/२१
“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”
जर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.
..........................
१०/४/२१
गेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.
अशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.
...................................
१२ /४/२१
आपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :
सौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.
मध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.
तीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.
गंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.
...........................................................................
१६/४/२१
Remdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :
* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते
* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.
...............................................
१७/४/२१
भारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.
या लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय ?
या प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :
१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).
२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.
३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.
..............................
१९/४/२१
सुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :
१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा
२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने
३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता
वरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.
..............................................
२०/४/२१
गरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का?
या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.
भारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.
...................................................................................................................
२२/४/२१
जेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).
अशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.
.........................................................................
२४/४/२१
डी-डायमर हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.
सध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.
मात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :
• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य
• मोठ्या शल्यक्रियेनंतर
• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया
• कर्करोग
• यकृत आणि हृदयविकार
.......................................................................
२५/४/२१
विराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :
जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.
हेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.
.........................................................................
कुमार सर ivermectin tablet 12
कुमार सर/कामा ivermectin tablet 12 mg व doxycycline 100mg दोन गोळ्या करोना लक्षणे दिसू लागतातच घेतल्या तर चालतील का....?? ह्यावर थोडा प्रकाश टाकावा
महेश ivermectin संबंधी मूळ
महेश,
ivermectin संबंधी मूळ लेखात मी लिहिलेच आहे. अन्य औषध काही तसे या आजारासाठी मान्यताप्राप्त नाही; किंबहुना ते अनावश्यक आहे.
मुख्य म्हणजे स्वतःच्या वापरासाठी कुठलेही औषध तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचे नाही. इथली माहिती ही निव्वळ आरोग्य विषयक सामान्यज्ञान आहे.
मुख्य म्हणजे स्वतःच्या
मुख्य म्हणजे स्वतःच्या वापरासाठी कुठलेही औषध तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचे नाही <<+१००
एक सामान्य माहिती म्हणून
एक सामान्य माहिती म्हणून सांगते आहे, मलाही कालच समजलं
.
Tcs, cognizent ह्या it कंपन्या special covid leaves देतात. तुम्ही (employee ) स्वतः किंवा तुमचे dependent covid positive असतील तर quarntine leaves मिळतात. त्यासाठी hr ला request mail करावी लागते.
१०ते बारा दिवस paid leave मिळू शकते.
Rt pcr report द्यावा लागतो.
.
इतर कोणत्या कंपनी अशी सोय देत असतील तर माहिती नाही.
तसेच पुणे आणि मुंबई सारख्या शहरात, जिथे it ofc आहेत, त्यांनी त्यांच्या ofc मध्ये basic islolation सेन्टर्स उपलब्ध करून दिली आहेत, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि कुटुंबासाठी
तिथे dr व नर्सेस तसेच basic सुविधा उपलब्ध आहेत.
(Tcs चं असं cinfirm आहे )
पुण्याची परीस्थिती खुप बिकट
पुण्याची परीस्थिती खुप बिकट झाली आहे.रोज परिचित लोकांच्या पॉझिटिव झाल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या आठवड्यात दोन नातेवाइकांचे निधन वृत्त ऐकले. घरी राहुन दु:ख करण्याशिवाय काहीही करु शकलो नाही.भेटायला, आधार द्यायला जाता येत नाही. त्या कुटूंबाची परीस्थिती किती भयानक असेल असा फक्त अंदाज बांधु शकतो. ४७-४८ वर्षांचा घरचा कर्ता पुरुष गेला तर कोणत्या शब्दात सांत्वन करणार
य सगळ्या परीस्थितीत रोज आजाराचे राजकारण करणार्या लोकांचा भयानक राग येउ लागलाय. वोट देणारे आपण मुर्ख होतो ही जाणीव प्रकर्षाने होते आहे.
मतदानाच्या वेळी अगदी घरी येउन मतदान स्लीप ई वाटुन जातात हे लोक. यांच्याकडे व्यवस्थित याद्या आहेत त्या त्या वार्ड च्या लोकांच्या. मग ही तत्परता लसिकरणासाठी का नाही करता येत ? ज्याप्रमाणे मतदानासाठी व्यवस्थित बूथ वगैरे उभारुन सिस्टीमॅटीक कामे होतात तसे लसिकरणासाठी सीस्टीम उभारणे का जमु नये ?
मान्य आहे की त्यामधे लिमिटेशन आहे पण तरी अशक्य असेल असे वाटत नाही.
आजच एका डॉक्टरांचे मत वाचले की लसिकरण हॉस्पिटल्स मधे न घेता शाळांमधे घ्यावे त्यामुळे क्रॉस इन्फेक्शन चे चन्सेस कमी होतील. हे कितपत शक्य आहे माहित नाही. पण गेल्या आठवड्यात एका लसिकरण केंद्रात जायचा योग आला तिथे फ्रीज वगैरे काही दिसला नाही. कोल्ड स्टोरेज बॉक्स मधे बर्फाच्या पिशव्यांमधे वायल्स ठेवलेल्या दिसल्या. हे योग्य की अयोग्य माहित नाही. पण जर सगळीकडे असे असेल तर शाळांमधे लसिकरण केंद्रे करुन जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर लसी देणे अवघड नसावे. डॉक्टर अधिक प्रकाश टाकु शकतील यावर.
इतके सगळे पगारी मंत्री, आणि शिकलेले अधिकारी असुनही नुसतचं एकमेकांवर आरोप करण्यात काय धन्यता वाटते यांना ? इतक्या बैठका घेउन त्यात काहीच अॅक्शन प्लॅन नाही म्हणजे काय म्हणायचं ?
पुढच्या इलेक्शन मधे वोट न देण्याचा निर्णय घ्यावासा वाटु लागलाय.
जेष्ठ नागरिकाना कोविड19 झाला
जेष्ठ नागरिकाना कोविड19 झाला असेल आणी asymptomatic असेल तर remedicivir चे injection घेणे आवश्यक असते का?
जेष्ठ नागरिकाना कोविड19 झाला
जेष्ठ नागरिकाना कोविड19 झाला असेल आणी asymptomatic असेल तर remdesivir ची अजिबात आवश्यकता नाही.
ते आजाराच्या मध्यम अवस्थेनंतर ( स्टेज २ बी) व त्यापुढे द्यायचे औषध आहे.
कुमार सर, मला कोविड झाला
कुमार सर, मला कोविड झाला होता व आता ठीक आहे. १४ दिवसांचे विलगी करण झाल्यावर परत आर्टी पीसी आर करणे गरजेचे आहे का? किट्स चे शॉर्टेज आहे असे वाचनात आले.
अमा
अमा
महाराष्ट्र कोविड वैद्यक कृती दलाच्या शिफारसीनुसार :
सौम्य व मध्यम आजार असणारी व्यक्ती पूर्ण बरी झाली असेल ( म्हणजे ताप, दम इत्यादि कुठलीही लक्षणे राहिलेली नाहीत ) तर rt-pcr चाचणी करायची आवश्यकता नाही.
अर्थात एवढ्यात जनसंपर्कात येऊ नका.
शुभेच्छा
धन्यवाद डॉक्टर कुमार. स्टेज
धन्यवाद डॉक्टर कुमार. स्टेज 2 B म्हणजे काय?
एकंदरीत माध्यमांमधल्या
एकंदरीत माध्यमांमधल्या बातम्यांमुळे Remedesivir बद्दल बराच गैरसमज पसरलेला दिसतोय.
Recommendation for Emergency
Recommendation for Emergency Use Authorisation granted to SPUTNIK V. India to get third vaccine against COVID19
अमुपरी,
अमुपरी,
पान ७ वरील हा प्रतिसाद वाचा :
Submitted by कुमार१ on 7 April, 2021 - 10:18
त्यातील 'मध्यम' मध्ये २- ए ,बी अशा स्टेजेस असतात.
Ok धन्यवाद डॉक्टर.
Ok धन्यवाद डॉक्टर.
लहान लसीकरण केंद्रात फ्रीज
लहान लसीकरण केंद्रात फ्रीज नसतात
तिथे आईस पॅक असतात , म्हणजे ते डबे,
सकाळचे डबे वितळले की त्यांना दुपारी नवीन मिळतात
किंवा जवळ कुणाच्या तरी घरी फ्रीज मध्ये ते डबे परत बर्फ व्हायला ठेवतात.
As per the 'COVID-19 Vaccine Operational Guidelines’, all measures should be taken to avoid exposing the vaccine carrier, vaccine vials or ice packs to direct sunlight, the document stated.
Vaccines and diluents should be kept inside the vaccine carrier with the lid closed until a beneficiary comes to the centre for vaccination.
"There may not be vaccine vial monitors (VVM) and Date of Expiry on the label of COVID-19 vaccine, this should not discourage vaccinators from using the vaccine. At the end of the session, the vaccine carrier with all ice packs and unopened vaccine vials should be sent back to the distributing cold chain point," the guidelines said.
https://www.livemint.com/news/india/29-000-cold-chain-points-41-000-deep...
<<<जेष्ठ नागरिकाना कोविड19
<<<जेष्ठ नागरिकाना कोविड19 झाला असेल आणी asymptomatic असेल तर remdesivir ची अजिबात आवश्यकता नाही.
ते आजाराच्या मध्यम अवस्थेनंतर ( स्टेज २ बी) व त्यापुढे द्यायचे औषध आहे.
Submitted by कुमार१ on 12 April, >>> डॉक्टर, पण माझ्या मम्मी पप्पांना जेव्हा जानेवारीत कोव्हीड झाला होता तेव्हा त्यांना ह्याच कारणासाठी हे इंजेक्शन दिले होते, मम्मी तर ज्ये ना पण नाहीये पण तिला बिपी अन थायरॉईड चा त्रास आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे होती, HRCT इंडेक्स मम्मी 16 व पप्पा 10 होते.
आणि अजून एक विचाराचे होते की अजूनही कधी कधी तिला नीट वास येत नाही तर हे जुन्या आजारामुळे असेल की कोव्हीड पूर्ण बरा झाला नसेल की नवीन लागण तर नाही ना?
व्ही बी,
व्ही बी,
remdes याबद्दलची माहिती महाराष्ट्र कोविड दलाच्या पुस्तिकेतून घेतलेली आहे. अगदी आंतरराष्ट्रीय संदर्भ पाहिले तरीही "ज्या कोविड रुग्णांना रुग्णालयात ठेवायची वेळ येते त्यांच्यासाठीच हे औषध", असे स्पष्ट म्हटले आहे .इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा. अमुपरी यांनी विचारलेल्या प्रश्नात लक्षणविरहित हा महत्त्वाचा शब्द आहे. तुमच्या पालकांच्या बाबतीत सौम्य आजार झालेला होता. सौम्य/ मध्यम यांच्या सीमारेषा पुसट होऊ शकतात. आणि इतर काही रिपोर्ट पाहून संबंधित डॉक्टरांचा निर्णय अनुभवानुसार वेगवेगळा असू शकतो.
शेवटी तारतम्याने निर्णय घेतला जातो.
( एका मर्यादेपलीकडे औषधोपचार या विषयावर तपशीलात चर्चा इथे करु नये असे माझे मत आहे).
वास आणि चव याबद्दल म्हणाल तर मागील एका प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा लोकांची ती संवेदना परत आलेली नाही. त्यासाठी थांबणे आणि वाट पाहणे हाच पर्याय आहे.
Ok
Ok, थँक्स डॉक्टर
कुमार सर, परिस्थिती अगदी
कुमार सर, परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली आहे का हो? म्हणजे आता हर्ड इम्युनिटी शिवाय सुटकाच नाही का? कारण लस पूर्ण व्हायला किमान 18 महिने लागतील, लोक तरी सुधारण्याची लक्षणे नाहीत, पॉलिटिकल फोकस अन इच्छाशक्ती दिसत नाही... निराशाजनक पण वस्तुस्थिती आहे
रोग झाल्यानंतर उपचारावर हमखास अशी काही प्रगती झाली आहे का?
आता ज्या बद्दल खूप चर्चा चालू आहे तो म्यूटंट खूप लवकर पसरतोय म्हणून एवढा फोफावलाय का?
खूप प्रश्न विचारले, क्षमस्व सर!
सर्वप्रथम सर्वांना
सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
रेव्यु,
सभोवताली जरी सर्व निराशाजनक दिसत असले तरीही आपल्या मनातली सकारात्मकता जागृत ठेवूया इतके मी म्हणू शकतो. परिस्थिती का बिघडली वगैरे मुद्द्यांवर सर्वत्र बराच उहापोह झाला आहे. त्यावर अधिक बोलण्यासारखे काही नाही. तरीसुद्धा डॉ. रेड्डी यांची ही मुलाखत पुन्हा एकदा वाचायला हरकत नाही :
https://www.indiaspend.com/covid-19/mistaken-notion-of-herd-immunity-led...
ते म्हणतात त्याप्रमाणे हा लढा (सामना) म्हणजे संथपणे व शांतपणे खेळायची दीर्घ कसोटी आहे.
शेवटी असं बघायचं....
मानवजातीचा इतिहास युद्धांनी/ दुःखांनी भरलेला आहे. याहूनही अनेक जागतिक कठीण प्रसंगातून मानवजात तरून गेलेली आहे. तसेच यावेळीही जाईल. फक्त धीर धरायला हवा.
बस इतकेच
हा प्रश्न कदचित इथल्या चर्चे
हा प्रश्न कदचित इथल्या चर्चे शी संबधित नाहीये पण कुठे विचारावा कळत नसल्याने ईकडे लिह्ते.
Government हॉस्पिटल माध्ये rt pcr test केल्यावर
Sample collection आणी नंतर report चा जो msg येतो तो फक्त android फोन वर च येऊ शकतो का ? साध्या फोन वर येत नाही का ?
म्हणजे स्मार्टफोन नाही साध्या
म्हणजे स्मार्टफोन नाही साध्या फोनवर म्हणायचे आहे का?
त्या फोनवर SMS सुविधा असेल तर येईल मेसेज.
Han स्मार्ट फोन नाही साधा
Han स्मार्ट फोन नाही साधा calling वाला फोन. Sms सुविधा आहे पण दोन्ही msg नाही आले फोन वर. Actually बाबा पॉजिटिव आले म्हणून हॉस्पिटल मधुन लोक येउन आमचा swab घेउन गेली. माझा आई चा काकांचा एकत्र घेउन गेली. मला सैंपल collection आणी report दोन्ही चे msg आले. पण त्या दोघांना कोणताही msg आला नाही. सो कळत नाही आहे चौकशी कुठे करु. घाई आणी टेंशन मध्ये त्या आलेल्या लोकांचा नंबर ही घेतला नाही.
त्यांनी नंबर नोंद करून घेताना
त्यांनी नंबर नोंद करून घेताना कदाचित चूक झाली असेल.
तिकडे कुठे चौकशी करावी याबद्दल मला काहीच माहिती नाही. तुमच्या भागात जवळचे शासकीय चाचणी केंद्र कोणते तिथं जाऊन चौकशी करावी लागेल कदाचित.
अजून एक, त्यांचे सिमकार्ड तुमच्या स्मार्टफोनमध्ये घालून पहा एकदा . पण यात त्यांचे सिमकार्ड मोठे / मायक्रो असेल, तुमचे नॅनो, तर त्यांच्या सिमकार्ड मधून नॅनो भाग काढून बघणे, आणि परत त्या साध्या फोन मध्ये टाकताना आधी सारखे करून टाकणे असे करावे लागेल. फार कठीण काम नाही, पण जरा दक्षतेने करावे लागेल.
करोना संसर्गाच्या दुसऱ्या
करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लागण होण्याचे प्रमाण ३१ ते ४० वयोगटामध्ये सर्वाधिक दिसून आले आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/most-of-youth-in-th...
मानव मी पहिले सिमकार्ड घालुन
मानव मी पहिले सिमकार्ड घालुन स्मार्ट फोन माध्ये पण कोणता msg नाही आला. आता केंद्रात जाऊन चौकशी करयला हवी.
आरोग्य सेतु अॅप मधून कळू
आरोग्य सेतु अॅप मधून कळू शकेल का?
Ivermectin संदर्भाने, Ziverdo
Ivermectin संदर्भाने, Ziverdo kit ह्या औषधाबद्दल माहिती देऊ शकाल का डॉक्टर?
मंजूताई,
मंजूडी
या संचामध्ये एकूण चार औषधे एकत्रित दिलेली आहेत :
ड जीवनसत्व , जस्त, Iverm आणि Doxycycline.
Doxycycline. हे खरे तर प्रतिजैविक असून जिवाणू विरोधक आहे. निव्वळ हे औषध कोविडमध्ये अनावश्यक ठरवले गेले आहे.
सौम्य ते माध्यम कोविडमध्ये या संचाची उपयुक्तता काहीजणांच्या मते आहे.महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या शिफारसीनुसार ड जीवनसत्व , जस्त, Iverm ही तीन औषधे उपयुक्त आहेतच. परंतु Doxycycline याचा काही उल्लेख नाही.
एवढेच म्हणेन की व्यक्तिगत डॉक्टरच्या सल्य्यानुसार हे औषध संबंधित रुग्णाने घ्यायचे का ते ठरवता येईल.
मनापासून धन्यवाद डॉक्टर.
मनापासून धन्यवाद डॉक्टर.
माझ्या बाबांचा मलेरिया पॉझिटिव्ह आणि rtpcr निगेटिव्ह आला. मलेरिया ट्रीटमेंट सुरू होती पण एकदा सौम्य ताप आणि ठसका/ खोकला, सर्दी वाहणे असे झाले, म्हणून त्यांच्या डॉक्टरनी हे औषध सुरू केले. आता बाबा पूर्ण बरे आहेत, अजिबात खाली उतरायचं नाही अशी त्यांना तंबी देऊन ठेवली आहे.
Pages