या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)
३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण (https://www.maayboli.com/node/77437)
...........
( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797)
....................................................................................................................................
31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.
या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.
ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.
गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.
दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.
कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.
अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.
लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:
“लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).
यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्क्यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.
लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.
करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी ५ हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.
इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:
१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.
लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.
२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.
३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.
४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.
वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.
महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.
....
तर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………
चर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :
३०/३/२१ :
या विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.
आता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.
..................................
३१/३/२१
बालदमा आणि कोविड
या विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.
मुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.
....................................
१/४/२०२१
कोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी
समजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,
१. नॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.
२. CT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.
............................................
२/४/२१
कोविड व चव संवेदना
या आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.
एक थिअरी अशी आहे.
विषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.
बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.
........................................
५/४/२१
विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.
एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.
आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :
१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.
३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.
..........................................
६/४/२१
ACE2 चे कार्य :
हे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.
आता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.
.......................................................
८/४/२१
क्षयरोग आणि कोविड
या संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.
महत्त्वाचे मुद्दे
१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.
२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.
३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.
.......................
९/४/२१
“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”
जर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.
..........................
१०/४/२१
गेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.
अशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.
...................................
१२ /४/२१
आपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :
सौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.
मध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.
तीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.
गंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.
...........................................................................
१६/४/२१
Remdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :
* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते
* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.
...............................................
१७/४/२१
भारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.
या लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय ?
या प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :
१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).
२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.
३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.
..............................
१९/४/२१
सुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :
१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा
२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने
३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता
वरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.
..............................................
२०/४/२१
गरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का?
या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.
भारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.
...................................................................................................................
२२/४/२१
जेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).
अशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.
.........................................................................
२४/४/२१
डी-डायमर हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.
सध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.
मात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :
• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य
• मोठ्या शल्यक्रियेनंतर
• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया
• कर्करोग
• यकृत आणि हृदयविकार
.......................................................................
२५/४/२१
विराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :
जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.
हेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.
.........................................................................
ज्या मनोरुग्णांवर बराच काळ
ज्या मनोरुग्णांवर बराच काळ उपाय चालू आहेत त्यांना होणारा कोविड सौम्य असतो हे खरे आहे का?
मनोरुग्णांना होणारा कोविड
मनोरुग्णांना होणारा कोविड
>>
या विषयावर काही संशोधन चालू आहे पण ते अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. मनोविकारांवरच्या काही औषधांना या विषाणूविरोधी गुणधर्म आहेत अशी एक थिअरी आहे. ही औषधे पेशींत विशिष्ट प्रथिनांचे प्रमाण कमी करतात आणि त्यामुळे या विषाणूला शरीरात पाय रोवण्यास प्रतिबंध होतो.
कालांतराने अधिक संशोधनाअंती यावर माहिती मिळेल.
प्रत्येक वर्षी होळीनंतर ही
प्रत्येक वर्षी होळीनंतर ही रोगराई पसरणार आहे काय?
डॉक्टर, मला एक विचारायचे आहे,
डॉक्टर, मला एक विचारायचे आहे, मी 13 मार्च ला कोविड ची लस घेतली होती. मला आज सर्दीचा खूप त्रास होत आहे तर मी नॉर्मल cetrizine ची टॅबलेट घेऊ शकते का? की लशीनंतर अशा गोळ्या घेऊ नयेत? कृपया मला सांगा.
सान्वी, घेउ शकता.
सान्वी, घेउ शकता.
सॉरी डॉक्टर 13 एप्रिल रोजी लस
सॉरी डॉक्टर 13 एप्रिल रोजी लस घेतली होती, 3 दिवसांपूर्वी
सान्वी,
सान्वी,
जर तुम्हाला पूर्वी हे औषध घ्यायची सवय असेल आणि त्याने काही त्रास झालेला नसेल तर घेऊ शकता.
याच्या पुष्ट्यर्थ डॉक्टर राहुल पंडित, सदस्य महाराष्ट्र कोविड कृती दल यांचे मत इथे आहे :
https://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/health-new...
त्यानुसार हे औषध सुरक्षित आहे. तरी मनात काही शंका असल्यास नेहमीच्या कुटुंबवैद्यांना जरूर विचारून घ्या. (इथली चर्चा हा सल्ला नव्हे ही पुन्हा एकदा सूचना).
ओके धन्यवाद डॉक्टर..
ओके धन्यवाद डॉक्टर..
इकडे remdesivir वर बरीच चर्चा
इकडे remdesivir वर बरीच चर्चा होत आहे. माझा वैयक्तिक अनुभव. बाबांना १० व्या दिवशी अचानक चक्कर यायला लागली, oxygen ८८ पर्यंत गेला. डॉक म्हणाले लगेच ऍडमिट व्हा . ऍडमिट झाल्या झाल्या HRCT केला गेला. जो कि १६/२५ होता आणि निमोनिया पण होता. म्हणजे ६०% lungs infected होते अंदाजे. डॉक म्हणाले remdesivir चा ५ दिवसाचा कोर्स त्या बरोबरच Sterioid injections द्यायला लागतील. पहिल्या दिवशी २ इंजेकशन्स दिली आणि लगेच दुसऱ्या दिवशी oxygen ९२ ला आले आणि तिसऱ्या दिवशी ९४. ५ व्या दिवशी ९६ आला , सगळे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले आणि त्यांना ६ व्या दिवशी discharge मिळाला. ह्या गोष्टीला २ आठवडे होऊन गेले आहेत आणि तब्येत ठीक आहे.
तरीही माझ्या ह्या वरच्या experience नुसार remdesivir चा नक्कीच फायदा झाला.
अवांतर - ह्या बरोबरच फॅबिफ्लू ह्या गोळ्यांचा पण आम्हाला बाकीच्यांना फायदा झाला असे वाटते. बाबांना ह्या गोळ्या नव्हत्या , आम्हाला पण थोड्या उशिरा म्हणजे ६ व्या दिवशी मिळाल्या आणि आईला ८ व्या दिवशी. बाकी कोणालाच काही त्रास झाला नाही, त्यामुळे मला असे वाटते कि बाबांना पण पहिल्या दिवसापासून ह्या गोळ्या मिळाल्या असत्या तर फायदा झाला असता .
इथे फायझर आणि मॉडर्ना दोन्हि
इथे फायझर आणि मॉडर्ना दोन्हि कंपन्या तिसरा बूस्टर डोस टेस्ट करत आहेत. बहुतेक यावर्षीच फॉल मधे घ्यावा लागेत. थोडक्यात, फ्लु शॉट सारखीच आता सवय करुन घ्यावी कागणार का, डॉक्टरसाहेब?
योगेश,
योगेश,
तुम्ही लिहिलेत हे चांगले झाले.
या औषधाचा सुयोग्य वापर कसा आणि कधी करायचा हे आपल्या तज्ञांनी इथे सांगितलेच आहे :
डॉ राहुल पंडित म्हणाले, मॉडरेट ते गंभीरतेकडे जाणार्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यास त्याचा उपयोग होतो असे दिसून आले आहे. एकूण पाच दिवसांचा हा कोर्स असून सहा रेमडेसिवीरपेक्षा जास्त रेमडेसिवीर देऊ नयेत असेही डॉ. पंडित यांनी सांगितले. याबाबत राज्य कृती दलाची मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध असून त्याचा वापर करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बंधनकारक आहे.
राज्य कृती दलाचे मृत्यू कारणमिमांसा विश्लेषण प्रमुख व हिंदुजा रुग्णालयाचे प्रमुख डॉ अविनाश सुपे म्हणाले, रुग्णाला पहिल्या दहा दिवसांच्या आत रेमडेसिवीर दिल्यास त्याचा नक्की फायदा होतो. मात्र रेमडेसिवीर मृत्यूदर कमी करता नाही. अर्थात याचा वापर करताना रुग्णाची ऑक्सिजन पातळी, एचआर सिटी अहवाल व अन्य बाबी विचारात घेणे अपेक्षित आहे. रेमडेसिवीरचा उपयोग व्हायरल लोड कमी करण्यासाठी होतो
(https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-doctor-rahul-pandit-say...)
...
या औषधाला मर्यादा आहेत. विषाणूप्रतिकार गटातील
याहून सुयोग्य औषध सध्या उपलब्ध नसल्याने त्याचा गरजेनुसार वापर होत आहे. शेवटी WHO व अनेक देशांच्या अन्य वैद्यकीय संघटना यांच्यात अनेक बाबींवर वैज्ञानिक मतभेद आहेत. औषध प्रशासनाने पूर्ण मान्यता दिलेले औषध परिस्थिती पाहून वापरण्यात काही गैर नाही.
..
(रेमडेसिवीर या मुद्द्यावरील हा माझा शेवटचा प्र).
राज फ्लु शॉट सारखीच आता सवय
राज
फ्लु शॉट सारखीच आता सवय करुन घ्यावी कागणार का, डॉक्टरसाहेब? >>>
अशी दाट शक्यता वाटते !
बघूया.....
भारतातील सध्याच्या लाटेची
भारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.
या लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय ?
या प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :
१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).
२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.
३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.
कुमार सर, हा हवेतून सुध्दा
कुमार सर, हा हवेतून सुध्दा प्रासारित होतो असे आज वाचले... लॅन्सेटचे निरिक्षण आणि अभ्यास कोट केला आहे.
मग तर हे आणखी धोकादायक ठरेल
आपले काय मत आहे सर?
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/lancet-report-covid...
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_NSLK_20210417_9_10
तो Lancet अहवाल वाचला. तूर्त
तो Lancet अहवाल वाचला. तूर्त त्या संशोधकांचा तसा दावा आहे. आता त्यावर अन्य तज्ञांची चर्चा होईल. तसेही हा विषय गेल्या वर्षीपासून चर्चेत आहेच.
थोडे थांबून दुसऱ्या बाजूची मते बघूया.
रेव्यु
रेव्यु
या विषयावरील एक लेख ब्रिटिश मेडिकल जर्नलच्या 14 एप्रिलच्या अंकात वाचला. त्याचा सारांश :
सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :
१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा
२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने
३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता
वरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.
प्रतिबंधात्मक उपाय = नेहमीची त्रिसूत्री + निकट संपर्काच्या काळात खोलीतली हवा मोकळी व खेळती ठेवणे.
कुमार सर, धन्यवाद
कुमार सर, धन्यवाद
>>३. क्रमांक 1 मधील अंतर 1 मीटरहून अधिक असल्यासही शक्यता>>> हे मात्र खूप कठीण आहे.
ही शक्यता नसावी एवढीच प्रार्थना
करोनाचा नवा स्ट्रेन दक्षिण
करोनाचा नवा स्ट्रेन दक्षिण आफ्रिका, युके आणि ब्राझील या प्रकारांचे हायब्रीड आहे.
महाराष्ट्रातील 61 टक्के केसेस त्याच्यामुळे झा ल्या आहेत
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/is-desi-mutant-vari...
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/india-has-a-double-mutant-covid-variant-should-we-worry/articleshow/82120030.cms
ह्या बातमी मध्ये खाली "Do vaccine work aginst it?" ह्या मथळ्याखाली जे लिहिले आहे ते खरच धक्कादायक आहे. माझं इंग्रजी कच्चं आहे पण जेवढं मला समजलं आहे त्यातून असं दिसतंय की लसीकरण मोहिमेवर फार मोठ्ठा प्रश्नचिन्ह आहे? experts थोडा प्रकाश टाकत का?
झ दा,
झ दा,
या विषयावर उलट-सुलट बरेच वाचायला मिळेल.
निरनिराळ्या लसींमध्ये अद्यतन करणेही एकीकडे चालू आहे.
दरम्यान भारताच्या एन आय इ मध्ये या उपप्रकारावर सखोल अभ्यास चालू आहे.
त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष काय येतात त्याची वाट बघू या.
>>निरनिराळ्या लसींमध्ये
>>निरनिराळ्या लसींमध्ये अद्यतन करणेही एकीकडे चालू आहे>>>> सध्या देण्यात येणार्^या लशीत काहीतरी प्रतिरोधक असावे अशी आशा करण्यापलिकडे आपल्या हातात तरी काय आहे... अमचे तर २ घेऊन झाले
एका माणसाला पहिला डोस
एका माणसाला पहिला डोस कोवाक्स्सीन नंतर दुसरा डोस चुकीने कोविशिल्ड दिला गेलाय
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/up-man-given-covaxi...
उपचार म्हणून क व ड
उपचार म्हणून क व ड जीवनसत्त्वे आणि जस्ताची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. >>>>
हेच उपचार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरता येतील काय? यामुळे नंतर झालेल्या कोविड आजाराची तीव्रता कमी राहू शकेल काय? कारण क व ड जीवनसत्त्वेच्या गोळ्या सर्वांना सहज घेता येतील. ह्या मुद्द्यावर पूर्वी चर्चा झाली असल्यास क्षमस्व.
माबो वाचक
माबो वाचक
तेच उपचार प्रतिबंधात्मक म्हणून वापरून खरंच कोविड प्रतिबंध होतो का, हा वादाचा मुद्दा आहे.
अद्याप तरी तसा पुरेसा विदा उपलब्ध नाही.
बरोबर एक वर्षापूर्वी या लेखमालेच्या बहुतेक दुसऱ्या भागात त्यावर एक सविस्तर प्रतिसाद मी लिहीला आहे. तो बघता येईल.
.............
या औषधी गोळ्या घेण्याऐवजी आहारामध्ये लिंबू / आवळा आणि उत्तम दर्जाची प्रथिने घेतल्यास नैसर्गिकरित्या आपल्याला फायदा होऊ शकतो.
आमच्या इथे ज्येष्ठ नागरिकांना
आमच्या इथे ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस कोव्हक्सीन चा मिळाला, दुसरा तुटवडा असल्याने कोव्हीशिल्ड मिळतोय
अपवादात्मक आणि नाईलाज परिस्थितीत हे चालत असावे.
या औषधी गोळ्या घेण्याऐवजी
या औषधी गोळ्या घेण्याऐवजी आहारामध्ये लिंबू / आवळा आणि उत्तम दर्जाची प्रथिने घेतल्यास नैसर्गिकरित्या आपल्याला फायदा होऊ शकतो. >>>>>
खूप खूप धन्यवाद कुमार सर.
साद , अनु :
साद , अनु :
बरोबर. वेळप्रसंगी ते नाइलाज म्हणून चालले.
पण त्याचबरोबर याला दुसरीही बाजू आहे.
मागे एका प्रतिसादात लिहिलंच आहे, की परदेशात आत्ता दोन ठिकाणी असे लस मिश्रणाचे अधिकृत प्रयोग सुरू आहेत.
अशा मिश्रणातून कदाचित फायदा होईल असे गृहीतक मांडले गेले आहे.
त्यामुळे आत्ता त्यांच्या बाबतीत इथे असं काही घडतंय, त्यांना त्यापासून नुकसान होणार नाही असे दिसते.
आमच्याकडे कोव्हीशील्डचा
आमच्याकडे कोव्हीशील्डचा तुटवडा आहे.
ऑन लाईन घेतलेल्या अपॉइंटमेंट्स रद्द करण्यात येत आहेत, दुसऱ्या आणि पहिल्या डोस घेणाऱ्यांच्याही.
आमच्या सर्वांच्या दुसऱ्या अपॉइंटमेंट्स रद्द झाल्या.
आणि नविन अपॉइंटमेंट कुठे मिळत नाहीय.
इस्रायलने ‘करुन दाखवलं’!…
इस्रायलने ‘करुन दाखवलं’!… मास्क घालण्यावरील निर्बंध उठवले
https://www.loksatta.com/desh-videsh-news/israel-lift-wearing-mask-in-pu...
माझा उद्या फायजरचा पहिला डोस
माझा उद्या फायजरचा पहिला डोस आहे (वाॅलग्रीन्स)
नंतरच्या परिणामांसाठी (ताप इ.आल्यास) Tylenol आणून ठेवू का? अजून काय आवश्यक आहे? लस देणारे सांगतील का?
Pages