माझा उत्तरकाळ की दुसरी इनिंग्ज

Submitted by रेव्यु on 7 September, 2019 - 10:32

माझ्या कडे जी वर्षे उरली आहेत तो माझा बोनस आहे असे माझे प्रांजळ मत आहे म्हणूनच आजचा दिवस माझा अन आजवरचा सर्वात आनंदी दिवस आहे असे म्हणत मी सकाळी डोळे उघडतो. वीस एक मिनिटे स्तब्धता ऐकतो. चहा बनवतो व अर्धांगीबरोबर तो चहा घेतो . पुढची चाळीस एक मिनिटे फिरायला जातो अन फिरतांना वॉक पेक्षा जास्त म्हणजे सभोवतालचा परिसर, जो रोजच नवीन दिसतो, फुले नवी असतात, माणसे नवीन असतात, मुले शाळेला जाणारी अगदी ताज्या कळ्यांगत दिसतात, त्यांना पाहतो. लोकांना विश करतांना खूप आनंद होतो. मग परतीच्या वाटेवर, साधारण आठाच्या सुमारास गणपती बाप्पाचे दर्शन घेत परत येतो. बाप्पा रोज आशिर्वाद देतो. मला काहीही मागायचे नसते कारण त्याने सर्वकाही भरभरून दिले आहे.
घरी आल्यावर पेपर वाचन झाल्यावर आंघोळ अन पूजा. मग कॉलेजात जातो. जाताना ३० मिनिटांच्या प्रवासात सुंदर शास्त्रीय संगीत ऐकतो. कधी कधी कंटाळा आल्यावर नवीन हिंदी गाणी, कधी पॉप कधी इन्स्ट्रुमेंटल... सर्व काही ऐकतो अन मग ड्रायव्हिंगचा शीण भासत नाही. परतीच्या प्रवासात सुध्दा हेच करतो.
माझे लेक्चर असते. मी मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या डिग्रीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. हा व्यवसाय मी स्वेच्छेने निवृत्तीनंतर घेतला आणि उमलत्या फुलासारखा या चाफ्याचा गंध दरवळतच गेला. रोज अनेक प्रसन्न चेहरे पाहतो. शिकवण्याचे नवनवीन प्रकार शिकतो. मुलांना माझ्या औद्योगिक कारकीर्दीतले उपयोगी किस्से सुनवतो, खूप प्रेम आहे माझ्या विद्यार्थ्यांवर. काही अवखळ असतात,काही वांड असतात काही अभ्यासू तर काही वेगळी. मी त्यांना त्यांची स्वभाववैशिष्ट्ये सकारात्मकपणे कशी जपायची हे शेअर करायचा प्रयत्न करतो. वर्गात कधी क्रिकेट, संगीत, नाटक अशा विषयांवर आम्ही गप्पा मारतो.... रोज मजा येते.
साडेबाराच्या सुमारास घरी येतो, सुग्रास जेवतो अन मग मॅनेजमेंट कॉलेजात लेक्चर द्यायला जातो. तिथेही सकाळसारखीच मजा येते.
चारच्या सुमारास घरी येतो अन मग भाषांतराची कामे सुरू करतो. रोज २ ते ३ तासांचे काम असते. अनेकदा नैपुण्य पणास लागते पण माझ्या मते सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला संपूर्ण दस्तावेज वाचावा लागतो, त्याचा आशय समजून घ्यावा लागतो अन या मुळे जगात काय चाललय... अगदी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स पासून ते डाटा प्रायव्हसी ॲक्ट पर्यंत अन गूगल व फेसबुक वर काय नवीन फीचर्स येत आहेत त्याची कुणकूण आधीच लागते. बरोबरच संगणातील नैपुण्य वाढीस लागत.
माझी बँकेची ,रिझर्व्हेशनची, इन्कम टॅक्सची सर्व कामे घरबसल्या कंप्युट्रवर करतो.
संध्याकाळी अनेकदा नेटप्लिक्स अन अ‍ॅमेझ्~ओन प्राईमवर पिक्चर पाह्तो.
आम्ही दोघे फिल्म क्लबचे सदस्य आहोत त्या मुळे देश विदेशातील अनेक पिक्चर पाहतो जे आम्ही नोकरीएच्या काळात पाहणे शक्य झाले नवह्ते.
संध्याकाळी मग थोडे हिंडून आल्यावर आणखी वाचन करतो. अगदी टुकार सिरियल्स सुध्दा पाहतो... मला आणि सौ ला आवडतात. साडेदहा –अकराला झोपतो अन मला उत्तम झोप लागते.
माझी पत्नी अंधांना त्यांच्या शाळेत जाऊन शिकवते,ब्रेलमध्ये पुस्तके लिहिते, घरी दुपारी ३ ते ६ पर्यंत शिकवते. शिवण,क्रोशे, भरतकाम इत्यादीत प्रचंड नैपुण्य आहे.
मी तसा मूळचा बेळगावचा. ही कन्नड भाषिक अन मी मराठी.
लग्नानंतर आम्ही एकेमेकांच्या भाषा शिकून घेतल्या आणि दोन्ही भाषातील थोर साहित्याची आम्हाला जाण व आवड आहे.
इंजिनियरिंगची पदवी घेऊन बर्‍याच ख्यातनाम कंपन्यात वरीष्ठ पदांवर काम केले. दोन वर्षे आधी निवृत्ती घेतली अन थोडे आत झाकून पाहिले. मला शिकवायला आवडते अन त्या बरोबरच हिंदी, मराठी अन इंग्रजी भाषांवर बरेच प्रभुत्व अन आवड होती... मग शिकवणे आणि हौशी अन मग व्यावसायिक अनुवादकाचे काम सुरू केले. सुरुवातीस ग्राहक मिळवण्यास खूप वेळ( २ ते ३ वर्षे) लागली. कामात दर्जा आणि वक्तशीरपणा ग्राहकांना दिसून आल्यावर खूप काम येऊ लागले. १२ पेक्षा जास्त अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली अन त्या कम्युनिटीत आता नाव कमावले. आजपावेतो हजाराहून अधिक विद्यार्थी माझ्याकडे शिकले. त्यातील अनेक औडी,बी एम डब्ल्यु,टी सी एस , जीएम सारख्या कंपन्यात उत्तम नाव कमावत आहेत अन तेच माझी पुंजी आहेत. कधी मधी कुठेही, विमानतळावर, थियेटरवर भेटतात .... पाया पडतात अन मला संकोचून सोडतात. मलाही कृतज्ञ वाटते.
आम्ही दोघेही दर वर्ष्शी चेक अप करून घेतो. थोडीशी कुरकुर होते तब्येतीची . ... कधी कधी..
माझ्या दोन्ही मुली परदेशी सुस्थितीत आहेत अन त्यांच्या क्षेत्रात उत्तम नाव कमावत आहेत.. त्यांची भेट स्काईप वर होते अन तंत्रज्ञानाने आम्हाला भावनिक बंध दृढ करण्यात मदत केली आहे. आम्ही समधानी आहोत अन मुले परदेशी आहेत म्हणून खंत नाही,अपेक्षा नाही.
माझ्या मते आपल्यातील सूप्त खुब्या वा गुण साधारण निवृत्तीच्या आधी ओळखणे व त्यांचा निवृत्तीनंतर पाठपुरावा करणे हे निवृत्ती पश्चात सुखाचे इंगित आहे.
आम्ही वर्ष्षातून दोनदा जगभर हिंडतो अन या सहली आमच्या मित्रांबरोबर करतो.
हे सर्व लिहिण्याचा पंक्तीप्रपंच प्रौढी मिरवणे हा नाही. एक मनोगत आहे हे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्तं!
तुम्ही दोघांनी स्वतःला किती छान बिझी ठेवलं आहे. मस्तं रुटीन आहे.
तुमचा पुढचा काळही असाच मजेत जावो या शुभेच्छा!!! +1

माझ्या मते आपल्यातील सूप्त खुब्या वा गुण साधारण निवृत्तीच्या आधी ओळखणे व त्यांचा निवृत्तीनंतर पाठपुरावा करणे हे निवृत्ती पश्चात सुखाचे इंगित आहे.>> मी आता ह्या फेज मध्ये आहे.

किती मस्त लाइफ. वाचून खूप हुरूप आला.

छान लिहिले आहे.
कौतुक आहे तुम्हां दोघांचे ही.
स्वतःच्या आवडत्या गोष्टींमध्ये खूप छान गुंतवुन ठेवले आहे .
तुमच्या लेखात खूप काही शिकण्यासारखे असते.

किती छान काका! मस्त वाटले वाचून!

बोरिंग पीपल गेट बोअर्ड.. इन्टरेस्टिंग लोकांना बोअर व्हायला वेळ नसतो ...

खूप सकारात्मक विचार. .भाषांतर करताना आलेले अनुभव वाचायला आवडतील. तसेच निवृत्तीनंतर (पेन्शन नसेल तर ) वित्त व्यवस्था कशी सांभाळता हे पण वाचायला आवडेल. त्यामुळे आधीच कसे financial planning करायला हवे याचे मार्गदर्शन मिळेल. ..

रेव्यू खूपच सुंदर लिहिलंय.
मला देखील माझ्या दोन सरांची आणि शाळेतल्या ताईंची आठवण आली हे सगळं वाचताना.
बरच काही विचारायचा मोह होतोय... पण नको; इथे अवांतर होईल. शास्त्रीय संगीत ऐकताय हे उत्तमच आहे.
मला शोभा गुर्टू प्रचंड आवडतात. त्यांच्या ठुमरी ऐकणे म्हणजे विलक्षण योग! (आत्ता आत्ता प्रभा अत्रे यांच्या देखील ठुमरी ऐकतोय) तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडतील व्यंकटेश सर Happy
ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देवो _/\_

आजच वाचलं. खूप छान वाटलं वाचून आणि खूपच छान लाईफ सुरू आहे तुमची. मी जेव्हा इंजिनिअरिंग करत असताना सुट्टीत घरी जायचो त्या दिवसांची आठवण आली. सकाळी 6 ला उठायचं ते थेट स्वीमिंग पूल गाठायचं. कितीही थंडी असू दे. नन्तर घरी आल्यावर नाष्टा करून एखादं पुस्तक वाचायचं, कधीतरी क्वचित pc वर सर्फिंग करायचं. नन्तर दुपारी जेऊन मस्त दीड दोन तास झोप काढायची. साडेचार पाचला जिमला जायचं तिथून सात वाजेपर्यंत घरी यायचं. रात्री घरच्यांसोबत कुठल्यातरी डेली सोपं बघायच्या. शनिवारी रविवारी कुठेतरी फिरायला जायचं. मस्त दिवस होते ते. नन्तर जॉबला लागलो आणि फरफट सुरू झाली.

>>>माझ्या कडे जी वर्षे उरली आहेत तो माझा बोनस आहे असे माझे प्रांजळ मत आहे

माझे बाबाही अगदी हेच म्हणतात.

मनोगत आवडले. ज्याअर्थी सर्वार्थाने समृद्ध जीवनाचा उपभोग तुम्ही घेत आहात त्याअर्थी तुम्ही गतायुष्यात पूरक आणि अचूक निर्णय घेतले असणारच. त्या निर्णयांबद्दल वाचायला आणि त्यातून धडा घ्यायला खूप आवडेल.