कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इच्छा नसताना नाईलाजाने मुलगी पाहायला जायचा हा प्रसंग.

मी एमबीबीएस उत्तीर्ण होऊन इंटर्नशिप करत होतो. मनात अर्थातच लग्नाचे बिलकुल विचार नव्हते. अशात आमच्या मूळ गावाकडचे एक पाहुणे घरी आले. तिकडे गावाकडे त्यांच्या नात्यात एक मुलगी लग्नाची होती. तिच्यासाठी डॉक्टर गटवायचा याच उद्देशाने ते आमच्याकडे आले होते. त्यांनी तो विषय काढतात मी त्यांना अक्षरशः ‘हड’ केले. स्वतःच्या पायावर उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याने मी लग्नाचा विचार करणे शक्यच नव्हते.

पण हे महाशय पडले गळेपडू. दोन दिवस आमच्याकडे राहिले आणि सारखे तेच पालुपद लावत होते. त्यांनी मला मधाचे बोट लावण्याचा एक प्रयत्न केला. म्हणाले, अरे तुझा पुढचं शिक्षण काय ते होत राहील. त्या मुलीचे वडील धनाढ्य आहेत. ते सुद्धा तुला मदत करतील. हे ऐकल्यावर तर मी उखडलोच. त्यांना म्हणालो, “असले प्रस्ताव घेऊन दुसरीकडे जा, मी त्यातला अजिबात नाही.”

शेवटी त्यांनी एक युक्ती केली. मला म्हटले, “अरे तू पूर्ण शहरातच वाढलास. आपल्या गावी सुद्धा कधी आलेला नाहीस. तर माझी इच्छा म्हणून गाव बघायला म्हणून तरी चल आणि सहज त्या मुलीवर एक नजर टाक ! तू नको 'पाहू' तिला पण तिच्या घरचे लोक तुला पाहतील”.

शेवटी नाईलाज म्हणून त्यांच्या बरोबर गावी गेलो. पुढे त्यांनी जेवणाचा कार्यक्रम त्या मुलीसह ठेवला होता. त्या मुलीला पाहताक्षणीच माझ्या लक्षात आले की ती आणि मी कुठल्याच बाबतीत अनुरूप नाही आहोत. काहीसा धक्काच बसला. मला आमच्या मध्यस्थांच्या थोडा रागही आला. परंतु ते काही चेहऱ्यावर न दाखवता मी त्या लोकांशी निव्वळ उपचार म्हणून हवापाण्याच्या गप्पा मारल्या. संध्याकाळी आमच्या पाहुण्यांना म्हणालो, झाले ते बस झाले. आता मी तातडीने निघतो. तुम्ही ज्या साठी मला इथे आणले तो तुमचा हेतू फसलेला आहे असे समजा. पुन्हा असला विषय माझ्याकडे काढत जाऊ नका. आणि मी तिथून निघालो.

तर असा हा माझ्या आयुष्यातला माझी इच्छा नसताना घडलेला पहिलावहिला ‘पाहण्याचा’ कार्यक्रम !

हा हा. मस्तं धागा.
दुसऱ्या धाग्यावर लिहिले आहे तसे मला नकार आल्याची काही कारणे-
१. पहिली नोकरी होती तिथे पगार कमी होता. हे माहितीमध्ये लिहिलेलं होतं तरी भेटायला आले आणि जाताना "हे तुला कोणी सांगणार नाही, पण पैशाहून महत्वाचं काहीच नसतं, तुझा पगार जास्त असता तर आम्ही विचार केला असता " असं सांगून गेले.

२. १२ वी ला PCM ला 90% नाहीत. (COEP नाही पण पुण्यातल्या चांगल्या कॉलेज मध्ये engg केलं होतं तरी)

३. रोज एकदातरी संपूर्ण स्वयंपाक करत नाही. मुलगा स्वतः काहीही करत नव्हता. "बायका फार महान, घरकाम, स्वयंपाक, सगळं करून नोकरी करतात. म्हणून देवाने त्यांना मातृत्व, मानसिक शक्ती दिली आहे. आम्ही पुरुष इतके महान नाही. रोज ऑफिसला जाताना चहा, डबा आईने दिला नाही तरी विसरतो. बायकां इतकं व्यवस्थित, परफेक्ट वागणं पुरुषांना अजिबात जमणार नाही " वगैरे विचारांचा.

४. एकदा पोह्यावजी इडली- चटणी केली होती. चटणी कोणी केली असं विचारल्यावर आईने केली हे सांगितलं म्हणून. त्यांनी फोनवर विचारलं की मुलगी सगळ्या स्वयंपाकाची जबाबदारी घेत नाही का? काही काम टाळते का?

(बिचारा माझा नवरा भेटायला आला होता तेंव्हा त्याला या प्रोसेसला वैतागून विकत आणलेला चिवडा त्याच्याच समोर पाकीट उघडून डिशमध्ये भरून दिला होता. )

माझा एक मित्र मुलींना पुरणपोळी येते का हे विचारायचा. का तर त्याच्या आजीने सांगितले होते की ज्या मुलीला पुरण शिजवण्यापासून सगळे येते तिला कुठलाही स्वयंपाक जमेल, अशाच मुलीशी लग्न कर.

६. आम्ही एका शनिवारी रात्री 5 दिवसांच्या ट्रिपवरून उशिरा परत आलो होतो. झोपायला 2 /2.30 वाजले असतील. रविवार असल्यामुळे मी 8 पर्यंत गाढ झोपले होते. एका स्थळाचा फोन आला, तो मीच घेतला. मी झोपेत आहे हे त्यांना आवाजावरून कळले. नंतर आईने फोन केला त्यावेळी "रविवार असला आणि रात्री 4 वाजता जरी झोपले तरी सकाळी 8 पर्यंत घरातल्या बायकांनी झोपायचे नसते ", असे ऐकवले.

अजून किस्से आठवले की लिहीन.

डेंजर आहे
मी एका दिवशी 3 मुले पाहिली(2 जीवनसाथी वरची आणि तिसरा एका मासिकातला).तिन्ही पुण्याच्या बऱ्याच टोकाला होती.
त्यातल्या एका मुलांकडच्यांचा नकार त्यांनी आम्ही घरातून निघाल्या निघाल्या पोस्टकार्ड टाकले असावे, कारण घरी पोहचलो तर पोस्टकार्ड दारात होते 'अपेक्षा न जुळल्याने आमचा नकार आहे, कृपया आशेत राहू नये." माझ्यात नाकारण्या योग्य बरीच कारणे होती. पण त्यांच्या घरात काचेच्या कपाटातल्या सतारीला बघून 'हा तंबोरा कोण वाजवतं' असं विचरल्याने त्यांचा निर्णय पक्का झाला असावा Happy
गंमत म्हणजे पाहिलेल्या 5 मुलांपैकी कोणालाही ट्रे मध्ये चहा पोहे नेऊन दिले नाहीत.त्यांच्या घरी गेल्याने आम्हीच चहा प्यायला आणि पोहे (डोसा) खाल्ला.पण कोणीही मुलगा दाराआड उभा राहून अंगठ्याने जमीन उकरत नव्हता.

गमतीशीर धागा, माझ्याही बऱ्याच गमतीदार आठवणी आहेत. आमच्यात मुलीच जातात मुलांकडे कांदेपोहे खायला.
एकदा मी ज्या दिवशी जायचं कांदेपोहे कार्यक्रमाला त्याच दिवशी सकाळी 11 ला एका दाढेचं रूट कँनल केलं होतं . सकाळी जेऊनच अपॉइंटमेंट घेतलेली. मग लगेच निघालो. 4वाजता कांदेपोहे शेंगदाणे घालून आले. आता दाताच काम केल्याने एक बाजूने खायचं नाही , मी जास्त करून डाव्या बाजूने खाते. तिकडचच दात खोदकाम झालेलं . म्हणून मी तिथल्या छोट्या 4,5 वर्षांच्या मुलीला विचारलं शेंगदाणे हवेत? ती माझ्यशेजारीच बसलेली. ती हो म्हणल्यावर मी लगेच सगळे शेंगदाणे तिला दिले. त्यांच्याकडून नकाराचं कार्ड आल्यावर माझी घरात सगळ्यांनी चेष्टा केलेली की मुलीला शेंगदाणे खाता येत नाहीत म्हणजे दात खोटे असावेत.
गम्मत म्हणजे लग्न अशा ठिकाणी झालं त्यांनी बटाट्याचा चिवडा,वेफर्स दिलेले. अंगारकी की काहीतरी उपवास होता त्या दिवशी.

अनु ची पोस्ट वाचून फसकन हसूच आले . मासिक म्हणजे रोहिणी का ? माझ्यावेळी ही रोहिणी मासिक प्रसिध्द होते . माझ्यावेळी तर पोहे ऐवजी चहा - बिस्किटे हा नवीन प्रकार उदयास आला होता . अर्थात तो एक प्रकारे बराच वाटायचा . पोहे संपवत जास्त वेळ काढायला लागायचा नाही .

मला हे सगळं नवीन च आहे! असेही लोकं असतात??

माझ्या बहिणीचा अनुभव फक्त माहिती आहे..तीची सरकारी नोकरी.. पहिला मुलगा पुण्यातला..कुणीतरी सुचवलेला.. पण फोनवरच त्यांनी कळवलं त्यांना नोकरी करणारी मुलगी नको होती.. मग दुसरे पाहुणे आईकडून नात्यातले...एकदाच बघायचा कार्यक्रम झाला..ते लोकं दुरून आले असल्याने जेवणच बनवलं...दोन महिन्यांनी लग्न झाले त्या मुलाबरोबर...

वर्णिता Lol

काय आठवत नाही
असंच कोणत्या तरी समाजाचं मासिक होतं कोणत्या तरी नातेवाईकांकडे .
त्यावेळी इंपोर्टेड स्थळं शोधणारे बरेच लोक्स शुभविश्व ला पण नावं टाकायचे.

पूर्वी अमृत नावाच्या मासिकात "याला जीवन ऐसे नाव" नावाचे एक सदर येत असे, त्यात कुणीतरी लिहून पाठवलेला हा प्रसंग आहे. पण मला तो वाचलेला अजून लक्षात आहे. कुमार सरांच्या या धाग्यावर याआधी मी तो लिहीला असेल असे वाटले. पण तिथे दिसत नाही. असो. इथे लिहितो.

प्रसंग बराच जुन्या काळातला आहे. कोणत्या शहरातला वगैरे तपशील आता आठवत नाही. एका घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम सुरु होता. दुमजली घराच्या माडीवर बैठक व्यवस्था होती. सगळे पाहुणे आपापल्या खुर्च्यांवर विराजमान झाले होते. मुलगी पोह्यांच्या डिशेसचा ट्रे हातात घेऊन आली. एक एक करत सर्व पाहुण्यांना पोहे द्यायचे म्हणून तिने सर्वात डावीकडे बसलेल्या पाहुण्याकडून सुरवात केली. तर पहिल्याच पाहुण्याने विनम्रपणे "आधी त्यांना द्या" असे सांगून दुसऱ्या एका पाहुण्याकडे हात केला. मुलीने पुढे जात त्या दुसऱ्या पाहुण्यासमोर ट्रे धरला. तर त्यानेही तेच केले. "आधी त्यांना द्या" असे सांगून अन्य एकाकडे हात केला. झाले. मुलगी ट्रे घेऊन त्या पाहुण्यासमोर उभी राहिली. तेंव्हा त्याने सुद्धा तेच केले व अन्य एका पाहुण्याकडे बोट दाखवत मुलीला आधी त्यांना पोहे देण्यास सांगितले. मुलीचे वडील तिथेच बसले होते. हे सर्व ते शांतपणे पाहत होते. ते अत्यंत शीघ्रकोपी होते (जुन्या काळातले अनेक जेष्ठ लोक शीघ्रकोपी असंत). हा प्रकार अनेक वेळा झाल्यावर, आपला पाहुणचार सर्वांकडून अव्हेरला जात आहे अशी त्यांची भावना झाली. त्यासरशी ते उठले आणि "कुणालाच नको असेल तर आण तो ट्रे इकडे" असे म्हणत मुलीच्या हातातला ट्रे त्यांनी जवळजवळ हिसकावूनच घेतला. आणि कुणाला काही कळायच्या आत, गरमागरम पोह्यांच्या डिशेसनी भरलेला तो ट्रे त्यांनी शेजारच्या खिडकीतून थेट बाहेर भिरकावून दिला. अनपेक्षितपणे घडलेल्या ह्या प्रकाराने पाहुणे चांगलेच भांबावून गेले. त्यांची चांगलीच तंतरली. मुलगी पहायचा कार्यक्रम आवरता घेत त्यांनी काही मिनिटांतच तिथून पोबारा केला.

'अमृत'च्या त्या अंकात या प्रसंगाशेजारी चित्रकाराने रेखाटलेल्या चित्रात खिडकीतून बाहेर फेकलेला ट्रे आणि त्यातून उडालेल्या पोह्यांच्या डिशेस दाखवल्या होत्या. ते चित्र मला अजूनही आठवतेय.

हा माझ्या शेजारच्या मुलाबरोबर दहाएक वर्षांपुर्वी घडलेला किस्सा आहे. तो सिईओपी आणि आयआयएम इंदोरचा पास आऊट आहे. त्यांच्या समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने त्याला हवी तशी मुलगी मिळत नव्हती. एकदा तो एके ठिकाणी मुलगी पाहायला गेला तेव्हा मुलीने विचारले तुम्ही काय करता? याने सांगितले की मी आयआयएम पासआउट असून बजाज फायनान्समध्ये आहे. त्यावर ती मुलगी म्हणाली, “ पण मला तर घरचे म्हटले की तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचे इंजिनिअर असून एमबीए झाला आहात." परत त्याने मुली पाहायचा नाद सोडला आणि आता आंतरजातीय लग्न करून सुखात आहे.

सर्व किस्से भारी Happy
माझंही नाव एका मावशींनी (आईची मैत्रीण ) शुभ विश्व ला नोंदवलं होतं.
जुन्या काळातील हापीस, फोटो ची हार्ड copy हाताने भरून दिलेला फॉर्म वगैरे आठवत आहे

10 एक वर्षांपूर्वी सी एस / कम्पनी सेक्रेटरी ह्या कोर्सबद्दल फारशी माहिती नव्हती ( आत्ता तरी आहे की नाही कुणास ठाऊक) आम्हा मित्रांची तेंव्हा एकच कॉमन अडचण म्हणजे लोकांना सी एस ह्या करिअर बद्दल काहीच माहीत नव्हते. एका ठिकाणी मुलीच्या बहिणीने मला सेक्रेटरी तर मुली असतात ना जनरली असे ऐकवले होते Happy

@अनु शुभविश्व मध्ये अगदी मध्यमवर्गीय स्थळे असत, ह्या इंपोर्टेड साठी अनुरुप होते, शुभविश्वची देणगी पण अगदी वाजवी होती.

अनुरूप तर आता full फॉर्म मध्ये आहे,
Market म्हणता येईल
सर्व ms in us वाले स्थळं सांगून यायचे
त्यांना खूप भाव असतो तिकडे

तंबोरा कोण वाजवतं', ट्रे त्यांनी शेजारच्या खिडकीतून थेट बाहेर भिरकावून ...>>> Lol

माझे काका एके ठिकाणी आधी न कळवता मुलगी बघायला गेले होते. त्यांच्या घरात नेहमीच कोणी ना कोणीतरी येत असे. प्रत्येक वेळी कोण चहा करणार म्हणून ते फोनवर बिल्डिंग जवळ चहावाला होता त्याला ॲार्डर द्यायचे. तेव्हा मुलगी आणि तिच्या दोन बहीणीच घरात होत्या. त्यांनी सवयीप्रमाणे चहा मागवला तेव्हा काकांना ते काही झेपलं नव्हतं.

मस्त किस्से.. मी पण आठवत आहे.. लिहीते लवकरच.
कुमार सर आणि अतुल यांचे किस्से वाचत रहावे वाटले. छान लिहिले आहेत.

>> त्यांनी सवयीप्रमाणे चहा मागवला तेव्हा काकांना ते काही झेपलं नव्हतं.

हाहा . कसा झाला असेल प्रसंग ...चार कटींग भेजना ...
अनु, तंबोरा Proud

ण त्यांच्या घरात काचेच्या कपाटातल्या सतारीला बघून 'हा तंबोरा कोण वाजवतं' असं विचरल्याने >>> Lol हे मी पण एका घरी गेलेलो असताना विचारले होते (जनरल गेलेलो असताना. कांदे-पोहे कार्यक्रमाला नव्हे)

त्यांनी सवयीप्रमाणे चहा मागवला तेव्हा काकांना ते काही झेपलं नव्हतं. >>> लोल. बस कंडक्टर मुलगा स्थळ बघताना मुलीशेजारी बसायला सांगतात तेव्हा अहो जरा सरकून घ्या म्हणतो असा जोक मधे फिरत होता ते आठवले Happy

अमृत मधला किस्सा मनात कल्पून खूप हसायला आले. अजून थोडा वेळ थांबलो तर आपल्यालाच खिडकीतून बाहेर फेकून देतील अशी भीती वाटली असेल त्यांना Biggrin
कुलकर्णी यांचे पवित्र विवाह अजूनही फाईल पद्धतीने चालते. दादरला स्टेशनंजवळ कपडे दुकानातून वाट काढत लाकडी जिन्यावरून वर गेल्यावर एका गाळ्यामध्ये त्यांचे ऑफिस आहे. फॉर्म भरणे आणि सहा की काहीतरी हार्ड कॉपी फोटो घेतात. लग्न जमल्यास किंवा सदस्यता संपल्यास फोटो परत मिळत नाहीत. बाई अतिशय उद्धट आहेत. प्रत्येक जातीची फाईल असते.

कांदेपोहे ह्या धाग्यावर काही किस्से टाकलेत .. त्यामुळे आता इथेही तेच रिपिट करत नाही.. पण एक सुंदर किस्सा वाचण्याआधी थोडा पाल्हाळ तो बनताइच है बॅास..तर, ते वर्ष होतं २०११, घरचे लग्न कर म्हणून मागे पडलेले आणि नेमका ह्याच वर्षी मला कोणी बॅायफ्रेंड नव्हता..म्हणून घरच्यांनी एका मॅट्रिमोनीवर नाव नोंदवले आणि कांदेपेह्यांचे कार्यक्रम सुरू झाले..
मी एकूण १४ स्थळं बघितली.. १४ पैकी ७ जणांनी खरी कारणं देत मला नकार दिला.. जसं की मुलगी टिकली लावत नाही, मुलीला वेळेची किंमत नाही, आयटीतला जॅाब म्हणजे शिफ्ट्स मधे काम करणार, अंगाखांद्याने खात्यापित्या घरची वाटते वगैरे वगैरे .. बरं, मी नकार असा कोणालाच दिला नाही..माझी एकच अट असायची कि मी मुलाला कमीच कमी ३-४ वेळा भेटूनच निर्णय घेणार.. माझ्या त्या अटींमुळे उरलेल्या ५ जणांनी पहिल्या भेटीनंतरच मला कल्टी दिली.. आता उरलं १३व आणि १४व स्थळ.. १३व स्थळ हे अमेरीकेत रहात होतं आणि भारतात यायला दोन एक महिन्याचा अवकाश होता.. तसं फोनवर एकदा आणि मेसेंजरच्या चॅटवर एकदा असं बोलणं झालेलं.. पण ह्या दरम्यान १४व स्थळ आलं, मुलाला तीन चार वेळा काय तर चांगलं सात आठ वेळा भेटून निर्णय घ्यायचा होता.. त्याच बरोबर आमच्या ॲाफिसचं स्थळही सेमच होतं म्हणजेच आम्हा दोघांची कंपनी सेम, जॅाब लोकेशन सेम, ॲाफिसची बिल्डिंगही सेम फक्त प्रोजेक्टस वेगवेगळे .. मग काय, अगदी रोजच भेटायचो, गप्पा मारायचो.. आणि शेवटी ते दिलाचे तार वगैरे जो प्रकार असतो तो जुळलाच.. एकमेकांना होकार कळवून एंगेजमेंटची तारीख ठरली, अंगठ्या घ्यायला दादरच्या वामन हरींकडे गेलो.. तीथूनच पुढे मी आणि होणारा नवरा वरळी सीफेस वर जाऊन बसलो.. छान हातात हात होते, गुलूगुलू गप्पा चालल्या होत्या पण मधूनच कुठून तरी सिगरेटचा वास येऊ लागला.. वळून बघितले तर एक तरूण सिफेसच्या कट्ट्यावर उभा राहून सिगरेट ओढत गार वाऱ्याचा आस्वाद घेत समुद्राच्या दिशेने तोंड करून उभा होता.. अगदी काही क्षणातच सिगरेंट संपवून मागे वळाला आणि त्याला बघून माझ्या पोटात गोळा आला.. यायलाच हवा होता कारण तोच तर आपला स्थळ नंबर १३ Lol .. बरं, त्यानेही नेमकं त्याच वेळेस मला बघितलं .. दोघांनीही एकमेकांना ओळखलं होतं .. एकमेकांसोबत एक स्माईल एक्सचेंज करत तो तिथून निघून गेला .. संध्याकाळ झाली होती..मी पण घरी परतले.. घरी जाऊन त्याला मेसेज करून लग्न ठरलेयाबद्दल सांगावे म्हणून मेसेंजर उघडले तर आधीच मेसेज आलेला होता... “ती तूच होतीस का?” ह्या त्याच्या मेसेजला “हो..ती मीच होते” असा रिप्लाय केला आणि मेसेंजर बंद केलं.

रात्री झोपतानाच आज ह्यावर धागा काढायचा विचार करत झोपले.. नाश्ता करून माबो ओपन केलं तर पृथ्विकरांनी आधीच हा धागा मार्केटमधे आणला होता.. पण असो, किस्सा शेअर करता आला ह्याचं समाधान Happy

मस्त किस्से आहेत सगळ्यांचे...!!

मी कॉलेजला असतानाच अर्धा वेळ account शिकायला एका CA फर्ममध्ये जात होते. त्या ऑफीसमध्ये मला पाहून , एका मुलाला कुणीतरी माझं स्थळ सुचवलं होतं. तो मुलगा आणि त्याचा भाऊ माझ्या ऑफीसमधे आले होते मला पाहायला.. ते दोघे ऑफीसमध्ये आले कारण माझ्या सरांशी त्यांचे कौटूंबिक संबंध होते. मला काही ह्या गोष्टीची कल्पना नव्हती. ते दोघे सरांच्या केबिनमध्ये बसले होते, त्याच वेळेस सरांनी काहीतरी काम सांगण्याच्या बहाण्याने मला केबिनमध्ये बोलावलं. ते दोघे गेल्यानंतर सरांनी मला
ते दोघे का आले होते त्याची कल्पना दिली. मी शिकत होते त्यामुळे मला काही लग्न करायची घाई नव्हती. पुढे त्या ऑफीसमध्ये आलेल्या मुलाने काही कळवलं नाही आणि मी पण काही विचारलं नाही.

शिक्षण संपल्यावर मला स्थळं येत होती; पण मी काही त्याचं एवढं मनावर घेतलं नव्हतं. त्यावेळेस ऑफीसमध्ये माझी एक मैत्रिण होती; तिचं लग्न जमायला थोड़ी समस्या येत होती; कारण त्यांच्या समाजात २४ वय म्हणजे मुलीचं खूप वय झालं अशी समजूत होती. तर ती मला रोज तिच्या न ठरणाऱ्या लग्नाचंचं सांगत असे आणि मग तिचं रोजचं तेचं ऐकून माझ्या डोक्यात पण किडा वळवळू लागला की, आता आपणसुद्धा पुढचं पाऊल उचलण्याच्या दृष्टीने विचार करायला हवा. मग काय? उचलली बोटे आणि लावली keyboard ला ..! पटकन bharat matrimony वर केलं नाव रजिस्टर.!! त्यानंतर ऑफीसमध्ये पाऊल टाकलं की पहिल्यांदा स्वतःचे मेल चेक करायची सवय लागली.. कोणती आणि किती मुलांची स्थळं आलीत ते ! . रोज बरेच interest आलेले असायचे. मग एके दिवशी एका मुलाची matrimony site वरची profile पाहून त्याचा interest accept केला. मी त्याचा interest accept केल्यावर त्या साहेबांनी मला ऑर्कुट साइटवर शोधलं आणि ऑर्कुटवर मेसेज पाठवला. ( आम्ही दोघांनीही मॅट्रॉमोनी साइटवर फ्री रजिस्टेशन केलं होतं म्हणून एकमेकांना contact No. दिसत नव्हता).. त्याने त्याच्या ऑफीसचा नंबर दिला आणि मी कुतुहलाने तो नंबर डायल केला. फोनवर मी त्याच्याशी एकेरी संवाद साधला. पुढे संवाद वाढत गेला. फोनपेक्षा इमेलनेच संवाद जास्त साधला गेला. मग भेटण्याचे ठरवले तर त्याच दरम्यान त्याच्या कंपनीने त्याला एक महिन्यासाठी दिल्लीला पाठवले. एक महिन्यानंतर त्याने प्रत्यक्ष भेट घेईन असं सांगितलं. नेमकं त्याचवेळेस चुलत भावाने त्याच्या मित्राचं स्थळ माझ्यासाठी आणलं. तो मुलगा मला पहायला येणार होता , तेव्हा चुलत भावाला पहिल्या स्थळाची कल्पना दिली. दिल्लीला गेलेल्या मुलाचा माझ्याशी इमेलवरून संवाद सुरुच होता. तो दिल्लीवरून आल्यावर आम्ही दुसऱ्याच दिवशी भेटण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी तो घरून बाइक घेऊन निघाला. एकमेकांशी फोनवरून आणि इमेलवरून संवाद होता, एकमेकांचा फोटो पाहीला होता ; तरीही प्रत्यक्ष भेट घेताना मनात हुरहुर होती. आणि आमची दोघांची पहिली भेट 'रस्त्यावर' झाली. मी ऑफीसमधून खाली रस्त्यावर आले आणि तो मुलगा समोरुन बाइकवरून आला. एकमेकांनी कुठल्या रंगाचे कपडे घातले आहेत ते सांगितले होते. मी त्याची बाइक मध्येच थांबवत त्याला डायरेक्ट त्याचं नाव घेऊन विचारलं .. तू तोच आहेस ना? .. एकमेकांची ओळख पटली. त्यानंतर जवळच्या कॉफी हाऊसमध्ये दिड तास छान गप्पा मारल्या. एकेमकांची सगळी माहिती घेतली जी खरी होती. माझं पहिल्या फोनवरचं ' त्याला ' एकेरी संबोधणं त्याला खूपच आवडलं होतं; हे त्याने प्रत्यक्ष भेटीत सांगितलं. सगळं बोलून झाल्यावर मी त्याला स्पष्ट विचारलं.. आता काय विचार आहे ? पुढे घरी सांगायचं की.. इथूनच मागे फिरायचं... कारण मला स्थळं येतायेतं... त्यांना पण उत्तर द्यायची आहेत त्यांना टाळून चालणार नाही. ...आता पुढची स्थळं तू पाहू नकोस.. माझ्याकडून होकार आहे ..मुलाने उत्तर दिलं. माझासुद्धा होकार होताच.. ! पुढे रितसर दोघांनी घरी कल्पना दिली. त्यानंतर माझ्या घरी मला बघण्याचा कार्यक्रम झाला .. जो नावापुरता होता. त्यानंतर सगळे योग जुळून आले आणि मग एका लग्नाची गोष्ट सुरु झाली.. ..!! आता लग्न होऊन तेरा वर्ष होतील पण आमची पहिली भेट मात्र कायम एकमेकांच्या लक्षात राहेल.

मी जीवनसाथी (की अजून कुठली आठवत नाही आता, ) मध्ये नाव नोंदवले होते. बाकी ऑफलाइन विवाह संस्थेत बहीणींनी नाशिकला आणि नागपुरला नावे नोंदवली होती.
जीवनसाथीवर बर्‍याच इच्छुक मुला मुलींनी ऑनलाईन स्वतः नोंदणी केलेली असे, तर काहींच्या पालकांनी वगैरे.
माझा असा विचार होता की आधी मुला - मुलीने भेटावे. पहिल्या भेटीत आपल्याला या स्थळाचा विचार पुढे करायचा की नाही हे ठरेल, मग घरच्यांना पुढे सहभागी करावे. याला बहुतेक जणांची तयारी असे तर काही घरीच भेटणे पसंत करीत. बाहेर भेटायचे तेव्हा रेस्टॉरंट मध्ये भेट व्हायची.
माझा टूरींगचा जॉब होता. मुंबई, बडोदा, अहमदाबाद, पुणे इथे नेहमी टूर्स असायचे. जास्त मुली इथे बघितल्या. बहुतेक चांगलेच अनुभव आहेत, काही मुली मला पसंत पडल्या नाहीत, काहींना मी पसंत पडलो नाही. पण काही वेगळे अनुभव आले.

यात एक भारी मुलगी भेटली दादरला. भेटलो, प्रश्न माहिती विचारुन झाली, गप्पा झाल्या आणि मग अचानकच ती म्हणाली की तिला एवढ्यात लग्न करायचं नाहीय. मुलं बघण्याचा अनुभव म्हणुन ती भेटायला आली. घरचे मागे लागले म्हणुन नाव नोंदवलं. रेस्टॉरंटचे बिलही आग्रहाने तिनेच दिले आणि मला शुभेच्छा देउन निघुन गेली.

पुण्यात पण बर्‍याच मुलींना भेटलो.
मी माझ्या बायोडेटा मध्ये नोकरी बाबत "working in an MNC" असे लिहिले होते आणि पद वगैरे. कंपनीचे नाव बहुतेकजण बायोडेटा मध्ये लिहित नसत. एका मुलीला भेटलो तेव्हा मी कुठल्या कंपनीत आणि काय काम करतो वगैरे सांगितल्यावर ती जरा उखडलीच. म्हणे मला वाटलं हैद्राबाद म्हणजे IT मध्ये असाल, तुम्ही लिहायला हवं होतं IT मध्ये नाही. मी म्हणालो तुम्हीही मला IT मधला हवा आहे असं लिहायला हवं होतं. यावर ती चिडुन सरळ उठुन ताड ताड निघुन गेली. Lol आम्ही अजुन काही ऑर्डर नव्हतं केलं हे नशीब.
मग मी ही माझ्या बायोडेटा मध्ये "working in an MNC (not related to IT)" असा बदल करुन टाकला.

आपल्या बायोडेटा मध्ये विधवा/घटस्फोटीत चालेल असे मी लिहिले होते. मी लग्नही उशीरा करत होतो.
आता मी शॉर्टलिस्ट केलेल्या आणि मला शॉर्टलिस्ट केलेल्या मुलीही त्या आसपास वयाच्या असल्या तरी लग्नाला उशीर का झाला वगैरे चौकशी व्हायची ते ठीक.
पण एकदा एका मुलीला तिच्या घरी बघायला गेलो होतो. मुलीचे आई वडिल होते हॉल मध्ये आणि ओळख होत नाही तो लगेच त्यांनी सुरवात केली लग्न उशीरा आणि विधवा घटस्फोटीत चालेल असं कसं काय? म्हणे आम्ही आज सकाळीच हे वाचलं, आधी लक्षात नव्हतं आलं. यावरुनच एवढा कीस झाला, मी काही सांगीतले तरी त्यांचं समाधान होत नव्हतं , काहीतरी गौड बंगाल आहे असे त्यांना वाटत असावे. मुलगी तर हॉलमध्ये आलीही नाही. जवळपास अर्धा तास हेच चाललं होतं. मग मी म्हटलं निघतो, तर आलाच आहात तर चहा घेउन जा म्हणाले. म्हटले नको. तर मागे लागले, चहा घेउनच जा, आम्हाला तेवढंच समाधान वाटेल. म्हटलं हे बरं आहे. बोलायचं असं आणि शेवटी आपल्याला बरं वाटावं म्हणुन समोरच्याने चहा प्यायचा. नम्रपणे नाकारुन निघुन आलो.

बहुत करुन मुलीला भेटण्या / पहाण्या अगोदर फोटोंची देवाण घेवाण झालेली असे. मी इमेल ने फोटो पाठवायचो. काही मुलीही इमेल ने पाठवायच्या तर काही कुरियर, पोस्टाने. औरंगाबादच्या एका मुलीने मला इमेलद्वारे संपर्क केला होता. मी तिला माझे फोटो इमेल द्वारे पाठवले. तिने कुरियरने पाठवले. ते मिळाल्यावर मी तिला फोटोवरुन पसंती कळवली आणि पुढे कसे जायचे याबद्दल माझे मत कळवले. यावर तिचे उत्तर आले की तिचे वडिल बाहेरगावी गेले आहेत, ते आल्यावर मला संपर्क करतील.
मी म्हणालो ठीक आहे. आणि आता पुढे जायला मी माझ्या आवडी निवडी वगैरे सविस्तर रितीने कळवल्या, नोकरी बाबत सविस्तर लिहिले आणि तिला म्हणालो की तुमच्याकडुनही अशी माहिती वाचायला आवडेल. आणि दरम्यान मी दिल्लीला टूरवर गेलो.
त्यावर तिचे उत्तर आले की तिने आधीच सांगीतले आहे आता तिचे वडिल संपर्क करतील, तिला इमेलवर काही सांगायचं नाहीय.
मग दुसर्या दिवशी तिचे मेल आले, फोटो परत पाठवा.
मी उत्तर दिले मी टूरवर आलो आहे, चार दिवसांनी परत गेलो की फोटो कुरियरने पाठवून देइन.
आता तिचा यावर विश्वास बसला नाही. फोटो लगेच पाठवा असे लगेच उत्तर आले. हे सकाळी झाले होते.
मग रात्री परत आलो आणि मेल चेक केले तेव्हा तिने अथवा तिच्या आयडी वरुन घरच्या कोणी मला लांबलचक मेल पाठवला होता, जीवनसाथीमध्ये तक्रार करु, पोलीसात तक्रार करु, ताबडतोब फोटो परत पाठवा. आधी विचार आला गेले उडत, उत्तर द्यावे काय करायचे ते करा, मी टूरवर आहे, परत गेल्यावर फ़ोटो परत पाठवेन. पण नंतर जरा शांत झाल्यावर मी उत्तर दिले ’खात्री नसत पटेल तर मी दिल्लीला या हॉटेलवर आहे हा त्याचा फोन नंबर, ही माझी रुम नंबर, करा फोन’ आणि तिच्या वडिलांनी फोन केलाही. तेव्हा मात्र ते अनेक ठिकाणी फोटो पाठवावे लागतात, किती कॉपीज काढणार, काही लोक पाठवतच नाहीत परत, गेलात की लगेच फोटो पाठवून द्या वगैरे बोलले. आणि मॅटर तिथे मिटले. परत गेल्यावर मी फोटो परत पाठवून दिले.

वाशीला एका मुलीला भेटलो. आम्हा दोघांचीही संमती झाली. मग तिच्या घरी जाउन तिच्या घरच्यांशी भेटायचे ठरले. दुसर्‍या दिवशी परत त्याच रेस्टॉरंटसमोर भेटुन ती मला तिच्या घरी घेउन गेली. घरी जाताना तिने सांगितले की तिच्या काकांना चेहर्‍यावरुन माणसांचा स्वभाव कळतो, ते ही आले आहेत. म्हटलं असेल, बघु या काय ते. आई, वडील, काका यांची ओळख झाली, प्रश्न, चौकशी सुरु झाले. आणि तिचे काका माझ्या कडे टक लावून बघु लागले. मी बोलत असताना त्यांच्याकडे बघितले की त्यांचे माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही बस मला निरखताहेत. मग ते अचानाक उठुन आत निघुन गेले. मुलीची आई नंतर आत गेली आणि चिवडा चकली लाडु घेउन आली. तिने काकांना हाक मारली तर त्यांनीच तिला आत बोलावले. मग आई बाहेर आली आणि वाडिलांना आत पाठवले. आता सगळे गप्प झाले होते. मीच मुलीशी काहीतरी बोलत होतो. मग वडील बाहेर आले. मी खात होतो तरी तुम्ही खा, असे उगाच एक दोनदा म्हणाले. मग विशेष काही बोलणे झालेच नाही. यंत्रवत चहा आला, सगळ्यांनी यंत्रवत चहा पिला. मी निघालो तेव्हा मुलगी खाली सोडायला येऊ लागली तर आईने तिला काही निमित्ताने हटकले, मला आता हसुही येऊ लागले होते, ते मोठ्या मुश्किलीने आवरत मी गुडबाय करुन आलो. मला खूप मोह होत होता काकांना विचारावे सगळे एवढे गप्प का झाले, "ये तो आदमी के रुप मे नाग है / इसमे शैतान के आत्मा की परछाई दीख रही है" असा काही दृष्टांत वगैरे झाला का माझा चेहरा बघुन, पण तो ही आवरला.

एका मुलीच्या काकांनी "लग्न झाल्यावर जॉब सोडून घरी बसणार का?" असं विचारलं चक्क.. बरं स्थळ असं की लहानपणापासून त्यांनी मला आणि मी त्या लोकांना दरवर्षी भेटत आलेलो, त्यामुळे रागावून पटकन काही बोलताही आलं नाही. मुलीच्या भावाने मग त्या काकाला गप्प केलं.

नंतर समजलं की त्या काकांचा जावई लग्न झाल्यावर जॉब सोडून रिकामा बसला होता..

Pages

Back to top