आई का ऑब्जेक्शन घेत नाही !

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 February, 2021 - 02:43

मायबोली नामक संकेतस्थळावर त्रिभंग चित्रपटाच्या धाग्यावर शिव्यांवर चालू असलेल्या चर्चेत एका प्रतिसादात मी म्हटले,

आधी मी ठराविक सर्कलमध्ये शिव्या द्यायचो, पण आता कुठेच देत नाही.
अपवाद - च्यायला, साला, आणि आईच्या गावात हे शब्द उद्गारवाचक म्हणून तोंडात येतात पण ते घरीच

---------------

यावर एक प्रतिसाद आला तो असा,

आई काही ऑब्जेक्षन घेत नाही? हॉरिबल.

---------------

सगळ्यात पहिले गंमत याची वाटली की ऑब्जेक्शन घ्यायचे काम आजही समाजाने आईवरच सोपवले आहे. मुलांना संस्कार लावायची जबाबदारी आजही तिच्याच खांद्यावर टाकली आहे. माझी आई सुद्धा वडिलांसारखीच जॉबला जायची, तिचा पगार खरे तर त्यांच्यापेक्षाही किंचित जास्तच होता, आणि तरीही माझ्या जडणघडणीला वडिलांच्या आधी तिलाच जबाबदार ठरवले जाणार आहे Happy

दुसरा विचार मनात हा आला की आता याला एक छानसा चुरचुरीत रिप्लाय द्यावा की, मला देखील घरी दारू पिणार्‍यांबद्दल हेच वाटते, घरचे कसे चालवून घेतात? हॉरीबल Happy

पण मग म्हटले असा प्रतिसाद देणे हे विषय टाळून पुढे गेल्यासारखे होईल, जाओ पहले ऊस आदमी की साईन ले के आओ म्हणत आपल्याबद्दल केलेले स्टेटमेंट मान्य केल्यासारखे होईल. स्वत:बाबत ते केलेही असते, पण ऊल्लेख आईचा आहे आणि तिच्याबाबत मी बराच भावनिक असल्याने म्हटले आपणच प्रामाणिकपणे या उत्तराचा शोध घ्यावा आणि तो ईथे मांडावा.

खरेच घरात कधीतरी माझ्या तोंडून साला, च्याईला, आईच्या गावात असे शब्द बाहेर पडतात त्यावर आई ऑब्जेकशन का घेत नाही?

तर याचे उत्तर जाणून घेताना मी नकळत माझ्या भूतकाळात शिरलो.

माझे बालपण दक्षिण मुंबईतील चाळीत गेले हे एव्हाना अखंड मायबोलीला ठाऊक असेल. त्या चाळी म्हणजे एक वेगळीच संस्कृती होती. एकमेकांच्या घरात, ताटात, आयुष्यात डोकावणे. तसेच दुसर्‍यांनी आपल्या घरात, ताटात, आयुष्यात विनाहरकत डोकावावे म्हणून जेवतानाही घराचे आणि सदासर्वदा मनाचे दरवाजे खुले ठेवणे. हा तिथला बेसिक रुल होता. तसेच तिथली एक बेसिक भाषा होती. ज्यात शिव्या बेमालूमपणे मिसळल्या जायच्या. देण्याची सक्ती नसायची, पण ऐकण्याशिवाय पर्याय नसायचा. कारण कानही दरवाज्यांसोबतच खुले ठेऊन जगायचे असायचे. पौंगंडावस्थेतील मुलांमध्ये तर ज्याला शिव्या द्यायला यायच्या नाहीत तो साधा सरळ सभ्य नाही तर बायल्या, नल्ला, बाळू, छगन अश्या नावांनी आणि विशेषणांनी गौरवला जायचा.

अर्थात, आजूबाजुचे शेजारी शिव्या देतात, अगदी घरातही देतात म्हणून प्रत्येकाने द्यायलाच हव्यात असे गरजेचे नव्हते. चाळीचे ओवरऑल जरी एक कल्चर असले तरी त्यातील प्रत्येक घराचे आपले एक भिन्न कल्चर होते. आणि ते प्रत्येकाला जपायचा अधिकार होता. त्यामुळे आपल्या मुलांना शिव्यांची सवय लागू नये म्हणून आमच्या घरचे नेहमी जागरूक असायचे.

तर या घरच्या संस्कारांबद्दल सांगायचे झाल्यास, लहानपणी माझ्या तोंडात "च्याईला" हा शिवीसद्रुश्य शब्द बसला होता. घरी सुद्धा सहजच तोंडात यायचा आणि आल्या आल्या एक थोबाडीत पडायची. एक दिवस मी पुढची पायरी गाठली आणि तोंडातून "साल्या" हा शब्द बाहेर काढला. तो देखील थेट माझ्या काकांसाठी वापरला. बस त्यादिवशी थोबाडीत न पडता माझे थोबाडच फोडले गेले. दुधाचे सारे दात एकाच दिवशी पडले. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. पुन्हा कधी घरच्यांसमोर तोंडातून अपशब्द बाहेर नाही आला. घरातच नव्हे तर बाहेरही कधी थोरामोठ्यांसमोर वा मुलींसमोर तो नाही आला. जसे शिव्या सहज तोंडातून बाहेर पडायच्या तसेच हे नियंत्रण देखील ईतकी वर्षे सहजच जमले. त्यामुळेच आज ऑफिसला व्हाईट कॉलर सोफेस्टीकेटेड ईमेज मिरवताना हा गुण कामी येतोय.

(वरील पॅराग्राफ माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ या लेखातून जस्साच्या तस्सा उचलला आहे)
https://www.maayboli.com/node/56984 - जरूर वाचा हा लेख. मायबोलीवरील माझ्या उत्कृष्ट शंभर लेखांपैकी एक आहे Happy

असो,
पण गेले काही वर्षे, म्हणजे मूलं बाळे झाल्यावर, रुढार्थाने स्वतःचा संसार सुरू झाल्यावर, या वयात आता साला च्यायला हे शब्द अध्येमध्ये सहज तोंडात येतात तेव्हा आई नाही घेत ऑब्जेक्शन. बहुधा आता माझे मी बघून घेण्याईतपत मोठा झालो आहे असे तिला वाटत असावे. किंवा ज्या ठिकाणी माझे बालपण गेले आहे ते पाहता आज मी या वयात जर दोनचार फुटकळ अपशब्द ऊच्चारत असेल तर ते तिला तुलनेत सौम्य वाटत असेल. जे एकाअर्थी खरेही आहे,

कारण,
वरील सर्व पार्श्वभूमी पाहता, आजच्या तारखेला जिथे दर दुसरया घरात मद्यपान करणारा मुलगा सापडतो तिथे आपल्या पोराला दारू-सिगारेटच नाही तर सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही, जो अश्लाघ्य शिव्या देत नाही, तंटाबखेडा मारामार्‍या करत नाही, ज्याच्या असभ्य वर्तनाच्या कधी तक्रारी येत नाही, कधी कुठल्या मुलीशी-महिलेशी गैरवर्तन नाही, आपण भले आणि आपले कुटुंब भले म्हणत जो वाईट संगतीत टवाळक्या करत हिंडत नाही, जो कधी कोणाबद्दल मनात द्वेष बाळगत नाही, कोणाचा राग करत नाही, कोणाला टोमणे मारत नाही, कोणावर कसलीही टिका करत नाही. कोणाच्या अध्यातमध्यात पडत नाही. जो घरी बाहेर सर्वत्र सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागतो, कसलाही अहंकाराचा दर्प आपल्या मनाला शिवू देत नाही, जो भौतिक सुखामागे धावत नाही, आहे त्यात समाधान मानून आपल्याच विश्वात रमतो ....... अश्या आपल्या मुलाला बघून तिला नक्कीच समाधान वाटत असेल.

जेव्हा नवीन घरात राहायला आल्यावर घरकामाला येणार्‍या बायका तिला म्हणतात की या सोसायटीत पैसेवाले खूप आहेत, पण तुमच्यासारखे सुशिक्षित सुसंस्कृत लोकं मोजकेच आहेत, तेव्हा तिला नक्कीच आपण आपल्या मुलाला एक चांगले आयुष्य दिले असे वाटत असेल.

त्यामुळे मला तरी असे वाटत नाही की आज जाऊन त्याच आईला असा प्रतिप्रश्न करावा, की माझ्या तोंडात जर आज एखादा अपशब्द येत असेल तर आई तू ऑब्जेक्शन का घेत नाहीस....

मातृप्रेमी,
- ऋन्मेष !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित,

दोन गोष्टी आहेत.
1. सगळीकडे एखादा आयडी ब्लॉक करण्याची सोय दुर्दैवाने नाही. तुम्ही क्ष ने लिहिलेली एखादी कथा वाचताय आणि तिथे श आयडी येऊन गोंधळ घालतोय. म्हणजे बेसिकली पूर्ण साईटच अव्हॉईड करायची का?
2. आता श आयडीने स्वतः काढलेले धागे तुम्ही उघडणे टाळू शकता हे मान्य. पण त्यामध्ये स्त्रियांबद्दल, स्त्रियांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदयांबद्दल अपप्रचार असेल आणि तोही अगदी साळसूदपणे, आणि हे परत परत होत असेल, तर ते व्यथित करून जातं.
Admin कधीतरी दखल घेतात जसं तो उपासाचा धागा. एरवी नाही.
अशा वेळी प्रश्न पडतो की मुद्दाम लोकांना त्रास देऊन एन्जॉय करणे हा कोणता धर्म, कोणती संस्कृती?

Whatsapp University
आमच्या शाखा,
कधीही कुठेही
कशाही काहीही

असू द्या.
असू देतो पण पोस्टमार्टम च्या ऐवजी मी पोस्टपार्टम वाचलं आता ह्याचं काय करायचं बोला!

तुम्हाला नेमका राग कसला आहे, मुलं नेहमीं ' आयला ', 'च्यायला ' करतात याचा, कीं ' बापरे ',
' बापाच्यान' करतच नाहीत याचा !!
20190124_233403_0.jpg

Pages