किचन गुरु!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 10 January, 2021 - 23:24

आता मी किचनमध्ये बऱ्या पैकी रूळलोय. पण एक काळ होता मला आणि झुरळांना आमच्या किचनमध्ये अवतरण्यास बंदी होती. बायको डकन्या हातात असेल त्याने, दिसले झुरळ कि, त्याचा निकाल लावते! (आता तुम्हीच सांगा, जी बाई झुरळाला सुद्धा भीत नाही, ती नवऱ्याला काय जुमानणार? अन त्यातही रिटायर झालेल्या?)
माझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो.
"आहो, जरा ते दुधाचं जरा गॅस वरून उतरून बाजूला ठेवता का? माझा हात खरकटा आहे. वेंधळे पणा करू नका, आधीच सांगून ठेवते!"
मी रीतसर आधी गॅस बंद केला. कडची घेतली. ती नळाखाली पाण्याने धुतली. हो, कडचीच्या टोकाला काही खरकटं लागलं तर दूध नसत. मागे झालात एकदा! कडचीने दुधाचं पातेलं उचललं आणि घात झाला. शेजारच्या बर्नरवर पोळ्यांसाठी ठेवलेला तवा तापलेला होता. माझा हात त्याला लागला! एक -मी किंचाळलो (काय करू? चटका जबर होता. पोळ्याला तवा एव्हडा तापवतात?), दोन- हातातले भांड निसटून जमिनीवर, तीन टप्पे खाऊन विसावलं. तीन -घरभर दूध पसरलं. पडल्याचा बदला म्हणून, उकळत्या दुधानं माझी पाद्यपूजा केली होती! चार-दूध आणि तव्या पेक्षा बायको ज्यास्त तापली, नव्हे पेटली होती!
"मेल एक काम धड करता येत नाही! व्हा पलीकडं! सगळं दूध मातीत घालत! पुन्हा म्हणून स्वयंपाक घरात पाय ठेवलात तर याद राखा!"
मग ती लादी पुसण्यात आणि मी बर्नोल शोधण्यात गुंतून गेलो.
पण, तिची हि आज्ञा मी बरेच दिवस पळत होतो.
०००
मला किचन मध्ये चंचू प्रवेश कसा मिळाला त्याची कथा, बेंगलोरापासून सुरु झाली. बेंगलोरला मुलाकडे असताना, आम्ही पोळ्यांसाठी बाईच्या शोधात होतो. तशी सध्या एक होती म्हणा. पण ती नम्बर एकची 'खाडेखोर' होती. येथे रविवारची सगळ्या मजुरांना, म्हणजे झाडू-पोछ्या करणारे, स्वयंपाक करणारे, सुट्टी दिली जाते. या खेरीज बायकोने, तिच्या(म्हणजे पोळ्यावालीच्या) मासिक पाळीचे चार दिवस पेड हॉलिडे मजूर करून टाकला होता! वर ती, महिन्यातून किमान चार दिवस तर 'बुखारी' डुंमी मारायची!(चार रविवार+चार पेड सुट्या+चार दिवस बुखार टोटल १२ दिवस!)पोळ्यांसाठी कोणी असेल तर पहा, म्हणून चार -सहा, ओळखीच्या लोकांना सांगून ठेवले होते.
एका मंगल प्रभाते, दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर, दारात एक लूकडेला, माध्यम (वयाचा आणि उंचीचा) आकाराचा टकला माणूस उभा होता. माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्न चिन्ह त्यानं वाचलं असावं.
" रोटी सेकनेवाला चाहीये था क्या आपको?"
गडी हिंदी भाषिक होता.
"हा! हमको पोळ्या के लिये बाई चाहिये! तुमारी बायकू पोळ्या को आती क्या?" बायकोने सूत्रे हाती घेतली कि मला भीती वाटते, कारण तिचे हिंदी! मी मग मेडिएटरच्या रोल मध्ये जातो.
"बीवी नही, हम हि करेंगे!" मी उडाला. पोळ्याला पुरुष? लग्नाकार्यात आचारी पहिले होते. रोजच्या स्वयंपाकाला पुरुष आजच पहात होतो. बायकोला तर मुळीच रुचणार नव्हते. हि नक्की 'हमको नक्को!' म्हणणार असे मला वाटत होते. पण झाले भलतेच. वीस मिनिटात बायकोने त्याला सगळ्या स्वयंपाकाचे ठरवून टाकले!
"कल ग्यारा बजे आयेगा!" असे सांगून तो निघून गेला.
"आग, तो पुरुष स्वयंपाकाला?"
"त्याला काय होतंय?" हे तिचे मला विरोध करायचे पेटंट वाक्य आहे.
"बाबा, असू द्या. काही बिघडत नाही. पाहू महिनाभर, नसता टाकू काढून!" मुलगा सून यांनी बायकोचीच बाजू घेतली! ते नेहमीचंच झालंय म्हणा.
"अहो तुम्हाला कळत कस नाही? याला 'पाळीचा' प्रश्न येणार नाही. तेव्हडेच चारदिवस, माझा मेलीचा स्वयंपाक चुकेल! म्हणून 'हो' म्हणाले!" बायकांचं लॉजिक वेगळंच असत. नाही का?
"पण, तरी मला नाही आवडलं!" मी माझा विरोध नोंदवला.
पण, या खेपेसहि बायकोचा हा निर्णय योग्य निघाला! कारण रविवार सोडले तर त्याची एकही खाडा झाला नव्हता!
०००
दुसरे दिवशी बरोबर अकरा वाजता तो हजर झाला. आल्या बरोबर त्याने, किचन सिन्कवर ठेवलेल्या हँडवॉशने स्वच्छ हात धुतले.
"अम्मा, आज क्या बनेगा रसोई मे?"
"पोळ्या, पत्ता गोबिकी भाजी, वरण भात!" बायकोने यादी सांगितली.
"रोटी कितनी बनेगी?"
"वीस -एक्केवीस, बनाव!"
सकाळ -संध्याकाळच्या पोळ्याचा हिशोब होता.
त्याने फ्रिज उघडला. पत्ता गोबीचा गड्डा, आलं -लसूण पेस्ट, काढून घेतलं. आले -लसूण -गोबी नळाच्या पाण्याखाली धून चिरून घेतली. डाळ -तांदळाचे कुकर चढवले. भाजी शिजत घातली. आणि कणिक मळायला घेतली. मी त्याचा उरक पाहून अवाक झालो.
"आप उत्तर प्रदेश के हो?"
"ना. बिहार से है! मधुबनी जिला!"
"आपका नाम?"
"जी, गोपाल है!"
एव्हाना कणिक तिंबून झाली होती.
"अम्मा, चपाती,या फुलका बनवू?"
"चपाती बनाव." मी म्हणालो.
"नको, फुलका बनाव!" बायकोने फर्मावले. तो माझ्या कडे बघून फक्त हसला. त्या दिवसा पासून फुलकेच होऊ लागले. कणकीत थेंबभरहि तेल न घालता, त्याचे फुलके, गॅसवर पुरी सारखे फुगत होते! हे कसब माझ्या तर पहाण्यात नाही. चपाती म्हणजे ती पूर्णपणे तव्यावर भाजणे, आणि अर्धवट तव्यावर भाजून राहिलेला गॅसच्या ज्योतीवर भाजणे म्हणजे फुलके. हे ज्ञान मला त्याने पहिल्या दिवशी शिकवले. त्याला हव्या त्या गोष्टी देणे, म्हणजे भाजी हलवायला डाव देणे, चॉपिंग बोर्ड देणे, बुधल्यात तेल काढून देणे, असली कामे माझ्या कडे आली. आणि अश्या प्रकारे मी किचन मध्ये प्रविष्ट झालो. गोपाल मेन ड्रॉयव्हर अन अस्मादिक किलनर!
त्या दिवशी तो सगळा स्वयंपाक करून, सव्वा बाराला निघून गेला. तो गेला तेव्हा किचन ओटा स्वच्छ केलेला होता, आणि तवा-परात भांड्यात टाकलेली होती! पहिल्याच दिवशी त्याचे कन्फर्मेशन झाले! जाताना ' बाबा, धनिया, जिरा पावडर, गरम मसाला, और हरा धनिया जरूर लाना. रोज लागेगा. दो कपडे के नॅपकिन, सफाई, और हात पोच्छने लिये लागेगा.' एव्हडे मात्र सांगून गेला. बाबा? माझ्या पांढऱ्या केसांचा प्रताप. यात आता नावीन्य राहिले नाही.
दुसरे दिवशी त्याने आवर्जून स्वयंपाक आवडला का? म्हणून विचारले.
"कुछ कमी ज्यास्ती है तो बोलो!"
आम्ही तेल, तिखट मीठ थोडे कमी करायला सांगितले. आमच्या चवीचा बॅलेन्स त्याने बरोबर पेलला. कमी मसाला आणि तेल वापरून 'टेस्ट' कशी सांभाळावी? हा वस्तुपाठ घेण्यासारखा होता आणि तो आम्ही (म्हणजे मीच) घेतला.
चार-सहा दिवसात तो चांगलाच रुळाला. त्याच्या बोलण्यातून त्याच्या घरची परिस्थिती कळली. घरची गरिबी आहे. शिक्षण नाही. दोन मुलं शिकात आहेत. गावाकडे घर, शेती आहे. भाऊ शेती पहातो. पाच एकरवर किती जण राबणारा? आणि गावात रोजगार कुठून मिळणार? म्हणून तो इतक्या लांब आला होता.
एक काळ होता जेव्हा 'पुरुषांच्या क्षेत्रातहि, बायका मागे नाहीत!' हे आवर्जून सांगितले जायचे. 'बायकांच्या क्षेत्रातहि पुरुष मागे नाही!'आज 'गोपाल' सारखे पुरुष उदाहरण घालून देत आहेत. खरे तर बायका काय? अन पुरुष काय? जरुरत इन्सान को सब कुछ सिखा देती है!
आमच्या केदारला(मुलगा) पाव-भाजी आवडते. आम्ही बाहेर जाऊन, बरेचदा खाऊन येतो.
"पाव भाजी बना सकेंगे, गोपाल? सरजी, को बहुत पसंत है." मी गोपालला गमतीने विचारले. पोळ्या भाजी करणाऱ्यांकडून अश्या चटपट्या पदार्थाची अपेक्षा करणे, म्हणजे वेल्डिंगच्या कारखान्यात, साबुदाणा आहे का, विचारण्या सारखे होते.
"बाबा, शनिचर को पाव भाजी बनेगी! आप ताजा बनपाव एक दर्जन और पावभाजी सब्जी मसाला ले आव! और हा थोडा बटर लागेगा! सरजी, के लिये पाव भाजी बनेगी!" तो आमच्या केदारला सरजी म्हणतो. पोटभर आणि अप्रतिम पावभाजी आम्ही चाखली. त्या नंतरचे बरेच शनिवार पाव -भाजीचा वार झाला होता.
मग काय? नातवासाठी म्हणून आलू पराठे, तर कधी गोबी पराठे, मेथी, मुली सुरु झालं. पण त्याची स्पेशालिटी होती ती कढी! कढी -गोळे त्याने एकदा करून खाऊ घातले, अजून चव तोंडात आहे. याचा एक परिणाम मात्र मुलाच्या लक्षात आला, आमचे हॉटेलिंगचे बिल जवळ पास सत्तर टक्क्यांनी कमी झाले होते!
त्या दिवाळीला त्याला दोन टी शर्ट घेऊन दिले. घेताना तो खूप लाजला.
एक दिवस थोडा उशिराच आला. चेहरा सुकलेला होता.
"क्या गोपाल, सुस्त दिखते हो. सबकुछ ठीक है ना?"
"बाबा, सब ठीक तो है. रातसे बुखार है! कान मे काफी दर्द है!"
"तो काम पे क्यू आये? आराम करना था."
"हमे आराम कहा? लोग छुट्टी का पैसे काटते है!" पण लगेच सावरून घेत म्हणाला," पर बात पैसे कि नाही. घर पे जी नही लागता."
"क्यू?"
"हम चार लोग एक फ्लॅट मे राहते है. सभी हमारे गाव वाले है. सभी सुभा काम पे जाते है. अकेला वहा क्या करू?" 'घरपणाला' दुरावल्याची व्यथा जाणवली.
तो नको नको म्हणत असताना, मी त्या दिवशी त्याला स्वयंपाकात मदत केली. फार नाही, कुकर लावला. भाजी चिरून दिली. अशेची किरकोळ कामे. आणि याचा मला फायदाच झाला. आमच्यात एक मैत्रीचं नातं, बहुदा या दिवशी तयार झालं. दम आलू करताना, रस्सा कसा करायचा? कांदा कधी आणि टमाटो कधी टाकायचे? मसाला राईसला तेला सोबत, चमचाभर चांगलं तूप का घालावं? अश्या कैक गोष्टी त्याने सांगितल्या, आणि त्याने न सांगितलेले, निरक्षणातून शिकलो. पण हे शिकणे एक तर्फी नव्हते. त्याला पुराण पोळी, ज्वारीची भाकरी, आणि चिंच गुळाचं आंबट वरण आम्ही(म्हणजे बायकोने) शिकवलं. भाकरीला तव्यावर पाणी लावून भाजणे, शिकायला जरा वेळ लागला. आता तो सांबार- रस्सम खाणाऱ्याला, आंबट वरण खाऊ घालतोय!
सणावाराला बायको नेवैद्य पुरता स्वयंपाक करते, तो थोडे उशिरा येऊन, राहिलेल्या पोळ्या करून जातो. तो कामाला लागल्या पासून, एक हि सण त्याला सोडून आम्ही जेवलो नाहीत. नवमी दसऱ्याला ब्राम्हण नाही मिळाला, पण पुण्य मात्र मिळाले असेल.
आमच्या एका मित्राला स्वयंपाकासाठी बाई पाहिजे होती. मी गोपालचे नाव सुचवले. तो म्हणाला विचारून पहा त्याला.
"गोपाल, डी दोसौ मे कुक चाहिये. करेंगे?"
"बाबा, टाइम नही है!"
"टाइम नाही? क्यू? ऐसे कितनी जगा काम करते हो?"
"बाबा, सुभे पाच बजेसे काम पे आता हू! ए ब्लॉक मे, मियाँ - बीबी सात बजे ऑफिस जाते है, उनका नाश्ता, लंच का टिफिन बनाना, जि ब्लॉक मे यही, ओ नो बजे जाते, फार तीन जगह जाना, दो बजे तक फुरसत नाही होती! शाम फार पाच बजेसे ग्यारा बजे टक! कैसे टाइम निकालू?"
बापरे, इतकं काम? माझ्या पेन्शन पेक्षा, याची कमाई ज्यास्त होती! माझी घरी बसायची पण याची कष्टाची कमाई होती.
मला सांगा, सकाळी सहा वाजता, नाश्ता, आणि लंच करायला कोण बाई मिळणार? तेथे गोपाल हेच उत्तर असते.
"अरे, इतना काम करेगा तो, बिमार हो जायेगा!"
"बाबा, बिमार होना नही, इसलिये रातको 'थोडी' पिता हू!"
"शराब?"
"हा! बदन दर्द करता है!"
"ऐसा कब तक चालेगा?"
"बस, थोडे साल और! बडा लाडका बारवी मे है, इंजिनियर बनावुनगा उसको! फिर क्या? मझे आराम हि आराम!"
बायका-पोरांची जवाबदारी किती पिळून काढते माणसाला नाही का?
"गाव तो जाते होंगे?"
"हा. जाते है. दो चार साल मे एखाद बार." हे म्हणताना त्याचा सूर उदास झाल्यासारखा मला वाटला.
"क्यू, साल मे एक बार जाना चाहिये!"
"कैसे जाये? जाने मे दो दिन, आने मे दो दिन. रेल भाडा लागता है. गाव जाना तो, खाली हात कैसे जाये? और गये तो हप्ताभर रुकना भी पडता है! मतलब दोहप्ते कमाई कुछ नाही! और खर्चा दुगना!"
हा हिशोब मी केलाच नव्हता.
पाणी उताराकडे, गरिबी पैशाकडे वाहतच असते. मी सुद्धा नौकरीपायी बदलीच्या गावी फिरतच राहिलो. त्याला तोही अपवाद नव्हता. लॉकडाऊन मुळे,सध्या तो त्याच्या गावाकडे गेलाय.
दोन दिवसाखाली मी पुलाव केला होता.
"बाबा, मस्त झालाय!" मुलाचे प्रशास्तिपत्रक मिळाले. बायकोनेपण भाताला नावे ठेवली नाहीत. (मी केलेल्या एखाद्या पदार्थाला, 'नावे न ठेवणे' हा माझ्यासाठी सन्मानच आहे!) आज मी मिरच्यांची रस्सा भाजी केली होती. त्या काकडी मिर्च्या, मिर्ची भज्यांसाठी वापरतात त्या. त्यांची भाजी. बायको चक्क 'मस्तय!' म्हणाली. 'पण थोडं तिखट ज्यास्तच टाकलात!' हे मागून शेपूट जोडायला विसरली नाही. असो 'गोपाल की किरपा' से कुछ बना रहे है, कुछ बन रहा है!
हा 'गोपाल' काल्पनिकच आहे. पण असे शेकडो गोपाल बेंगलोरात आहेत! पोलीस व्हेरीफिकेश करून घेतलेले! सध्या कोरोनाने गावाकडे गेलेत, त्यांच्या जागा रिकाम्याच आहेत. अजून तर कोणी 'रोटी सेकनेवाला होना क्या?' विचारायला आलेला नाही. बघू कोण येतंय.

सु र कुलकर्णी, आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय! आमच्या सोसायटीमध्ये पण असे दोन कुक येतात. ते बंगाली / उडिया असावेत.
माझा नवरा लग्नाच्या आधी इथे एका ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. तिथे जो स्वैपाक करायला होता त्याची खूप तारीफ करायचा नवरा! आकाश त्याचं नाव. पराठे, भाज्या, गाजरहलवा वगैरे उत्तम बनवायचा. त्याच्या ओळखीच्या दुसऱ्या एका कुकबरोबर तो एकदा राहुल द्रविडच्या घरीही पार्टीसाठी जेवण बनवायला गेला होता म्हणे! Happy
तोही असाच ओडिशाचा होता, बायको-मुलं गावाला. पण त्याने इथे अजून एक घरोबा केला होता.

छान

सर , तुम्ही याआधी प्रतिलिपी वर लिहीत होता का? मी वाचलंय तुमचं लिखाण ..छान लिहिता.खूप आवडलं . तिथे तुम्हाला सर्च करत होती पण प्रोफाइल नाही मिळाला तुमचा...वेलकम सर ..मायबोली वर स्वागत आहे..

छान लिहिले आहे... लेखनशैली आवडली...
माझ्या घरात गोपाल मीच आहे, सकाळी उठल्यापासून किचन मध्ये असतो.. ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत सगळे...

भारीच आहे
अश्या सर्व गोपाळ आणि गोपाळीना कामाचा योग्य मोबदला, आणि कायद्याप्रमाणे सुट्ट्या मिळाव्यात.