Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.”
– UNHCR, Policy on Refugee Children
"... तुर्कस्थानातून ग्रीसच्या किनार्यावर होड्या भरून आलेले निर्वासित... मोठी माणसं, लहान मुलं... सगळे असे कोर्या चेहर्याने इथे तिथे बसलेले... मला कळेना, यांच्यासमोर मी काय सादर करणार... तरी मी खिशातून नेहमीचे गंमतीदार मोठे दात काढले, ते माझ्या दातांवर बसवले आणि भुवया उडवून जरासा हसलो; तर एका लहानगीचा चेहरा लगेच खुलला, तिने शेजारच्या मुलाला कोपराने जरासं ढोसून खुणेने सांगितलं, तो बघ, कोण आहे!” हे सांगणारा क्ले मेझिंग एक विदूषक आहे. आधुनिक जगात सर्कसच्या बाहेर विदूषक बघायला मिळणं तसं दुर्मिळच. आज मेझिंगसारखे अनेक विदूषक आपली ही दुर्मिळ पण अस्सल कला जगभरातल्या निर्वासित मुलांसमोर सादर करण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रसिद्धी नको आहे, पैसा नको आहे; निर्वासित मुलांच्या चेहर्यांवर हसू फुलावं इतकीच त्यांची इच्छा आहे. मेझिंगसारख्या विदूषकांना एकत्र आणलंय ‘क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर (सीडब्ल्यूबी)’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेने.
‘सीडब्ल्यूबी’ची स्थापना कशी झाली हे आवर्जून जाणून घेण्यासारखं आहे.
१९९० च्या दशकाच्या सुरूवातीची गोष्ट... स्पेनमधला एक प्रसिद्ध विदूषक टोर्टेल पोल्त्रोना बार्सिलोना शहरातल्या एका शाळेत गेला होता. पोल्त्रोनाच्या गमतीजमती त्या शाळेतल्या मुलांना माहिती होत्याच. तो त्यांचा अगदी आवडता विदूषक होता. त्यादिवशी त्या मुलांनी पोल्त्रोनाकडे एक अनपेक्षित मागणी केली. पोल्त्रोनाने थेट क्रोएशियातल्या एका शाळेत जाऊन तिथल्या मुलांसाठी कार्यक्रम करावा अशी त्यांची इच्छा होती. तेव्हा युगोस्लाव्हियामध्ये मोठं यादवी युद्ध माजलं होतं. बार्सिलोनाच्या मुलांची क्रोएशियाच्या काही निर्वासित मुलांशी पत्रमैत्री होती. ती निर्वासित मुलं हसणं विसरली होती; मजा कशाला म्हणतात हे विसरली होती. त्यांनी बार्सिलोनातल्या मुलांना पत्रांतून त्याबद्दल सांगितलं. त्यावर या मुलांना पोल्त्रोना न आठवता तरच नवल होतं. पोल्त्रोना या मुलांची विनंती अव्हेरणं शक्यच नव्हतं. तो आपल्या काही साथीदारांना घेऊन १९९३ साली क्रोएशियाच्या इस्त्रिया प्रांतातल्या त्या शाळेत पोहोचला. बार्सिलोनाच्या मुलांनीच त्यांच्या प्रवासासाठी निधी उभा केला. त्यांतली १२-१३ वर्षांची काही मुलंही पोल्त्रोनाबरोबर क्रोएशियाला गेली.
या पहिल्या दौर्यात पोल्त्रोनाने जवळपास चार हजार मुलांसमोर कार्यक्रम केले. परतल्यावर त्याने स्पेनमधल्या इतर विदूषकांना त्याबद्दल सांगायला सुरूवात केली. १९९३-९४ या वर्षांत पोल्त्रोना आणि इतर काही स्पॅनिश विदूषकांनी बाल्कन राष्ट्रांचे १२ दौरे केले. क्रोएशिया झालं; त्यानंतर बोस्निया झालं. संयुक्त राष्ट्रं, बाल्कनमध्ये कार्यरत असणार्या स्पॅनिश फौजा या सर्वांचं त्यांना सहकार्य लाभलं. त्यांच्या मोहिमांना अधिकाधिक प्रतिसाद मिळत गेला. विनोद, हास्यरस यांमुळे निर्वासित मुलांना मानसिक आधार मिळू शकतो हे दिसून आलं. या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असणार्या सर्वांनी मिळून निर्वासित मुलांसाठी कायमस्वरूपी काहीतरी करायला हवं असा विचार पुढे आला. त्यातून पोल्त्रोनाला ‘सीडब्ल्यूबी’ स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.
आज १५ देशांमध्ये ‘सीडब्ल्यूबी’च्या शाखा आहेत. त्यांच्या विविध विदूषकांनी १२५ देशांना भेटी दिलेल्या आहेत. लाखो निर्वासित मुलांच्या चेहर्यांवर त्यांनी काही काळ का होईना हास्य फुलवलेलं आहे. अधिकाधिक निर्वासित मुलांसाठी कार्यक्रम करायचे आणि त्यांच्या आयुष्यात चिमूटभर तरी आनंद निर्माण करायचा, हे त्यांचं एकमेव उद्दीष्ट आहे. ‘सीडब्ल्यूबी-यूएसए’ची एक्झिक्युटिव डायरेक्टर नाओमी शाफर म्हणते, "एखाद्या वाईट अनुभवानंतर एक दिवस आपण काहीतरी निमित्ताने आपल्याही नकळत अगदी दिलखुलास हसतो आणि आपल्याला त्या दुःखाच्या ओझ्यातून मोकळं झाल्यासारखं वाटतं. आयुष्य परत मार्गावर आणण्याला त्याची मदत होते. निर्वासित मुलांना हाच अनुभव देण्याचा आम्हा क्लाऊन्सचा प्रयत्न असतो.”
मुळात ‘क्लाऊनिंग’ हे एक ‘परफॉर्मिंग आर्ट’ आहे. त्यामागे मोठी जागतिक परंपरा आहे.
लहान मुलांना रिझवणं, रमवणं फार अवघड असतं, असं म्हटलं जातं. मुलं फार वेळ एका जागी बसू शकत नाहीत. एकाच गोष्टीवर बराच वेळ सलग लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या मनोरंजनासाठी खास वेगळा विचार करावा लागतो. ‘परफॉर्मिंग आर्ट’च्या दृष्टीने पाहता, मुलांसाठी काही निर्मिती करताना रंगीबेरंगी वेषभूषा, मेक-अप, आकर्षक संगीत, नृत्य, वेळप्रसंगी काही गंमतीशीर अंगविक्षेप यांचा आधार घेतला जातो. संवाद कमीतकमी ठेवून मुलांसमोर काही पेश करायचं तर हे सगळं हवंच. अशा प्रकारच्या सादरीकरणाला मुग्धनाट्य (पँटोमाइम) म्हणतात. तसं पाहता, संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून मजा घेता यावी अशीच याची रचना असते. मात्र त्यात मुलांना मजा आणणारं बरंच काही असतं. अशा प्रकारच्या सादरीकरणांमध्ये या बालप्रेक्षकांचा अधिकाधिक सहभाग असावा, अशी अपेक्षा असते. मुलांसमोर नाट्य अशा पद्धतीने सादर केलं जातं, की मुलं कधीकधी नाटकातल्या कलाकारांबरोबर गाणी गातात; कधी नाटकातल्या एखाद्या पात्राच्या संवादाला किंवा प्रश्नाला उत्स्फूर्तपणे उत्तरं देतात. १८व्या शतकात इंग्लंडमध्ये अशा मुग्धनाट्यांची परंपरा खर्या अर्थाने बहरली. दरवर्षी ख्रिसमसच्या सुमारास प्रसिद्ध कथांवर/बालकथांवर आधारित मुग्धनाट्यं सादर व्हायला लागली. या सादरीकरणांमध्ये ‘हार्लेक्विन’ नावाचा एक मस्कर्या असायचा. तो कथानकात काही ना काही गोंधळ घालायचा, आपल्या मालकाला अडचणीत आणायचा. हे मस्करे कलाकार चेहर्यावर खास मुखवटे (पँटोमाइम मास्क) लावायचे. जोसेफ ग्रिमाल्डी हा असाच एक प्रसिद्ध इंग्लिश मस्कर्या होता. एकदा त्याने असा मास्क लावण्याऐवजी आपल्या चेहर्याला गंमतीशीर मेक-अप केला. एका अर्थाने ही आधुनिक ‘विदूषका’ची सुरूवात होती. त्या काळात हा प्रयोग प्रेक्षकांना भलताच आवडला; इतका, की आजही पाश्चात्य देशांमध्ये अशा विदूषकांना ‘जोईज्’ (जोसेफ या नावाचं लघूरूप) असंच म्हटलं जातं.
‘सीडब्ल्यूबी’चं काम जाणून घेताना ही पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. पँटोमाइमची पातळी जराही न सोडता मुलांना कार्यक्रमात शिरण्यासाठीच्या अनेक आकर्षक आणि सोप्या जागा तयार करणं, त्या नकळत मुलांसमोर येतील हे पाहणं, ही या कलाकारांची खासियत. त्यात समोर बसलेल्या निर्वासित बालचमूतलं कोण कसल्या अनुभवाला सामोरं जाऊन तिथे येऊन पोहोचलेलं आहे, हे काय सांगावं! खूप नाजूक मनोवस्था असते त्यांची; त्यांना प्रेमाने गोंजारायला जावं तरी दहादा विचार करावा लागतो. क्लाऊनिंगचा तिथे कस लागतो, पण तोच हुकुमी उपायही ठरतो.
इंटरनेटवर ‘सीडब्ल्यूबी’चे अनेक व्हिडिओ आहेत. एका व्हिडिओत एक स्त्री-विदूषक साबणाचे फुगे उडवताना दिसते. समोर बसलेली मुलं खिदळतायत, उड्या मारतायत, ते फुगे आपल्या हाताने आणखी उडवतायत... ती विदूषक साबणात बुडवलेली काडी एका मुलीसमोर धरते, त्या मुलीने त्यावर फुंकर मारावी अशी तिची अपेक्षा, पण त्या मुलीआधी तिच्या मागे उभं असलेलं कुणी मोठं माणूसच न राहवून त्या काडीवर फुंकर मारतं, त्यातून उडालेल्या फुग्याकडे बघून त्याचाच चेहरा खुलतो... व्हिडिओतला तो क्षण अतिशय बोलका आहे; अर्ध्या-एका सेकंदात ‘सीडब्ल्यूबी’च्या कामावर भाष्य करणारा आहे.
कधीकधी याच्या उलटही होतं. लुझ गॅक्सिओला ही विदूषक सांगते, "कधीतरी आमचा शो सुरू असताना मुलं आमच्या दिशेने दगड फेकतात. पण मला नाही वाटत आम्हाला त्रास देण्याचा त्यांचा उद्देश असतो. उलट त्यांना या ना त्या प्रकारे आम्ही करतोय त्यात सामिल व्हायचं असतं.”
मॅझिंगनेही अशी एक हृद्य आठवण सांगितली आहे. एका निर्वासितांच्या छावणीत कार्यक्रम करून तो आणि त्याचे सवंगडी परत निघाले होते. तेवढ्यात एक लहान मुलगी त्याच्या दिशेने धावत आली, जवळ येऊन तिने आपले दोन्ही हात वर उचलून धरले, मला कडेवर घे असं ती त्याला सांगत होती. त्याने तिला उचलून घेतलं. ती हसत नव्हती, रडत तर अजिबात नव्हती, बराच वेळ त्याच्या कडेवर ती नुसती बसून होती. तिला फक्त आणि फक्त तो आपल्यासोबत असावा असं वाटत होतं. मॅझिंग म्हणतो, "कधीकधी या मुलांची अवस्था बघून खूप रडावंसं वाटतं. पण आम्ही या मुलांना हसू वाटायला गेलेलो असतो; तिथे रडून चालणार नसतं...”
मानसशास्त्रीय दृष्टीने पाहता, कोणताही जबर मानसिक धक्का बसल्याने मुलांच्या मनावर आलेला तणाव ओसरायला सरासरी एक ते सव्वा वर्ष लागू शकतं, ते सुद्धा त्या मुलांना पुन्हा त्यांचं नेहमीचं आयुष्य जगायला मिळालं तरच. निर्वासितांच्या छावण्यांमध्ये याची शक्यता कमीच. त्या मुलांचे पालक त्यांच्याबरोबर असले, तरीही ते स्वतःही सतत खूप तणावाखाली असतात; मुलांना ते देखील कळत असतं; त्याने मुलांवरचा ताण आणखीनच वाढतो. त्या मुलांना खेळायला मिळालं, मनमोकळं हसायला मिळालं तर त्यांच्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. तो एक प्रकारचा औषधांविना होणारा उपचारच असतो. ‘सीडब्ल्यूबी’चे विदूषक हा उपचार देऊ करतात.
या विदूषकांसमोर आणखी एक आव्हान असतं. जगभरात ते जिथे जिथे जातात, तिथे धर्म, वंश, चाली-परंपरा, सामाजिक चौकटी खूपच वेगवेगळ्या असतात. त्यांना मुळीच न छेडता केवळ हास्याची तार त्यांना छेडायची असते. त्यासाठी ‘क्लाऊनिंग’चं तंत्र कामी येतं आणि मग बघताबघता प्रेक्षकांमधल्या भेदाभेदाच्या भिंती आपोआप गळून पडतात. पोल्त्रोना एक जुनी आठवण सांगतो- २००७ साली तो कोसोव्होमधल्या मित्रोविच या गावी कार्यक्रम करण्यासाठी गेला होता. ते गाव वंशभेदाने पुरतं ग्रासलेलं होतं. गावातली मुलं एकाच शाळेत जात. मात्र सर्बियन मुलं सकाळच्या सत्रात आणि अल्बेनियन मुलं दुपारच्या सत्रात शिकत. पोल्त्रोनाच्या त्या कार्यक्रमाला मात्र दोन्ही वंशांची मुलं एकत्र बसली; एकत्र हसली, खिदळली. त्या गावासाठी हे अद्भुत होतं. इथे एक-दोन वाक्यांत लिहून झालेली ही बाब समजून घेताना त्यामागची खोलवरची प्रादेशिक परिमाणं समजून घ्यावी लागतात. बोस्निया, कोसोव्हो, अल्बेनिया इथल्या लोकांनी १९९० च्या दशकात काय काय भोगलं आहे, तो इतिहास लक्षात घ्यावा लागतो. तरच या विदूषकांच्या कामाचं मोल केवढं असेल याची कल्पना करता येते.
मुळात या विदूषकी करामती अगदी साधेपणाने सादर केल्या जातात. कोणताही डामडौल टाळला जातो. निर्वासितांच्या छावणीत जायचं, जराशी मोकळी जागा बघून सुरूवातीची एक परेड करायची; विदूषकी वेषभूषेमुळे आसपासच्या माणसांचं लक्ष जातंच. मोठी माणसं आधी जरा अंतर राखूनच असतात. मुलं मात्र बघता बघता कार्यक्रमात रमतात. मानसिक धक्क्याशिवाय इतरही काहीतरी छान, गंमतीशीर आहे, जे आपण मिळून अनुभवू शकतो, हे त्या मुलांना उमजतं, तो क्षण ‘सीडब्ल्यूबी’साठी मोलाचा असतो. आजवर या विदूषकांनी असे लाखो मोलाचे क्षण गोळा केले आहेत. या विदूषकांबरोबर कधीकधी जादूगार, नर्तक असतात. त्यांना काही स्थानिक मंडळीही मदत करतात. त्या दृष्टीने ‘सीडब्ल्यूबी’तर्फे कार्यशाळा आयोजित केल्या जातात. त्या कार्यशाळांमधून ‘सीडब्ल्यूबी’साठी कायमस्वरूपी काम करणारे काही स्वयंसेवकही तयार झाले आहेत. पॅलेस्टाइनमधल्या एका स्थानिक थिएटर कंपनीची कलाकार मनाल, ही अशीच पुढे आलेली बेदूइन जमातीतली पहिली स्त्री-विदूषक आहे.
नाओमी शाफर सांगते, की "क्लाऊनिंग अन्न, निवारा अशा गोष्टींची जागा घेऊ शकत नाही, याची आम्हाला पुरेपूर जाण आहे. पण हास्य ही देखील माणसाची गरज असते. काही देशांतले आमचे स्वयंसेवी मित्र सांगतात, की तुम्ही येण्यापूर्वी इथल्या छावणीतली मुलं युद्ध-युद्ध खेळायची; आता ती क्लाऊन-क्लाऊन खेळतात. निर्वासितांसाठी सर्वच संसाधनांचा कायम तुटवडा जाणवतो; हसू मात्र म्हणू तितकं मिळू शकतं. आम्ही या मुलांना तेच देतो.”
या उपक्रमाचं महत्त्व मोठ्यांना कसं पटतं त्याचा एक विलक्षण अनुभव पोल्त्रोना सांगतो. तो काही आठवडे सलग बोस्नियातल्या मुलांसाठी कार्यक्रम करत होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याच्या वाटेवर ठिकठिकाणी क्रोएशियाचे चेक-पॉइंट्स होते. तिथल्या लोकांना तो येता-जाता केवळ अभिवादन करत असे. एक दिवस मात्र त्या सैनिकांनी त्याच्यावर बंदुका ताणल्या; त्याचं कारण गमतीशीर होतं; पोल्त्रोनाने आता बोस्नियाच्या मुलांसाठी नव्हे तर क्रोएशियन मुलांसाठी कार्यक्रम करावेत, अशी त्यांची आज्ञा होती. एकदा क्रोएशियाच्या तुकड्यांनी त्याचं अपहरणही केलं होतं.
२००५ मध्ये बाल्कन राष्ट्रांमध्येच कुठेतरी तो कार्यक्रम करत असताना एक २४-२५ वर्षांची तरुणी त्याच्याजवळ आली. १२ वर्षांपूर्वी त्याच्या एका कार्यक्रमात ती अनेक महिन्यांनी खळखळून हसली होती, त्याबद्दल तिला त्याचे आभार मानायचे होते. त्या कार्यक्रमात उधळलेले रंगीत कागदांचे काही तुकडे (confetti) तिने गोळा केले होते; इतक्या वर्षांनंतरही अगदी जपून ठेवले होते. ते तिने पोल्त्रोनाला आवर्जून दाखवले. एकदा पोल्त्रोना एका हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम करण्यासाठी गेला होता. तिथे जबर मानसिक धक्क्यामुळे आधीची तीन वर्षं बोलणं हरवून बसलेलं एक मूल पोल्त्रोनाबरोबरच्या एका विदूषकाशी आपणहून बोलायला लागलं.
‘सीडब्ल्यूबी’च्या स्वीडन, जर्मनी आणि फ्रान्स शाखांनी भारतातही झोपडपट्टीतल्या, वेश्यावस्तीतल्या मुलांसाठी कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या दौर्यांमध्ये मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, दिल्ली इथले स्थानिक कलाकार सहभागी झालेले आहेत. २००४ सालच्या सुनामी संकटानंतर पोल्त्रोना आणि त्याचा चमू श्रीलंकेत गेले. तिथे एका हायस्कूलमधल्या १५०० मुलांपैकी ८०० मुलं सुनामीत मृत्यूमुखी पडली होती. त्या शाळेचं नवं सत्र सुरू झालं त्यादिवशी या विदूषकांनी तिथे मुलांसमोर शो केले. परतताना त्या शाळेचे डायरेक्टर त्यांना म्हणाले, मदत म्हणून आम्हाला सतरंज्या, ब्लँकेट्स, कपडे, औषधं मिळतात; पण तुमच्यामुळे आम्हाला जीवन परत मिळाल्यासारखं वाटलं.
जगभरात दरवर्षी नैसर्गिक आपत्ती, यादवी युद्धं, आरोग्य समस्या यांमुळे लाखो माणसं विस्थापित होतात. काही देश, संस्था त्यांच्या पुनर्वसनासाठी तळमळीने झटतानाही दिसतात. अशा पुनर्वसनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत बाबी पुरवण्यावर सर्वाधिक भर असतो. ते साहजिकही आहे. त्यानंतर शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, या गोष्टी येतात. या सगळ्यांत निर्वासितांच्या मानसिक आरोग्याचा विचार होतोच असं नाही. ‘सीडब्ल्यूबी’चे अनेक जोईज् निर्वासित मुलांना क्षणैक आनंद मिळवून देतात. त्या पूंजीवर त्या मुलांचं जगणं थोडं अधिक सुसह्य व्हावं यासाठी झटतात.
----------
http://www.cwb-international.org
’अनुभव’ मासिकाच्या ऑक्टोबर-2020च्या अंकात प्रकाशित झालेला लेख.
फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत.
खूप भारी काम करतायत हे विदूषक
खूप भारी काम करतायत हे विदूषक.
'घर से मस्जिद है बहुत दूर चलो
'घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाये' आठवलं.
अगदी पुण्ण्याचं काम करताहेत हे विदुषक
त्यांच्या कार्याला सलाम _/\_
त्यांच्या कार्याला सलाम _/\_
आणि त्यांच्या शी ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद !
करील मनोरंजन जो मुलांचे
करील मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयाचे
खरोखरच पुण्याचं काम!!
हर्पेन >>>>अगदी पुण्ण्याचं
हर्पेन >>>>अगदी पुण्ण्याचं काम करताहेत हे विदुषक>>>
पुण्ण्याचं.... होय ....पुण्ण्याचं.....पुण्याचं नाही
पन इटेंडेड
वाह!!! किती दूरदॄष्टी आहे.
वाह!!! किती दूरदॄष्टी आहे. किती पुण्याचे काम आहे. हा लेख इथे शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद ललीता-प्रीती. किती मस्त वाचायला मिळालय.
खूप छान झालाय हा लेख. कधी
खूप छान झालाय हा लेख. कधी लक्षातच आला नव्हता हा पैलू. खरच पुण्याचे काम.
सुरेख लेख ललिता. धन्यवाद !
सुरेख लेख ललिता. धन्यवाद ! वेगळ्या पद्धतीने माणुसकी जपणारे हे अनूभव नवा दृष्टीकोन देतात. फोटोमुळे अगदी जवळुन अनूभवला. लिहीत रहा, आणी असे अनेक उत्तम लेख वाचायला मिळुन देत.
जन्मापासून निर्वासित म्हणून
जन्मापासून निर्वासित म्हणून असुरक्षित आणि अनिश्चित आयुष्य जगणाऱ्या ह्या मुलांच्या आयुष्यातही आनंदाचे दोन क्षण यायला हवेत हा विचार करणाऱ्या आणि अमलात आणणाऱ्या लोकांना खरेच मनापासून सलाम.
लेख आवडला.
छान माहिती. यापूर्वीही
छान माहिती. यापूर्वीही तुम्ही लिहीलेला निर्वासितांच्या बॅगा असा लेख वाचल्याचे आठवते. अशा विविध निर्वासितांच्या लेखांचे कंपायलेशन करून पुस्तक/इ-बुक होऊ शकेल. मराठीत हा विषय तसा अपरिचित आहे!
जन्मापासून निर्वासित म्हणून
जन्मापासून निर्वासित म्हणून असुरक्षित आणि अनिश्चित आयुष्य जगणाऱ्या ह्या मुलांच्या आयुष्यातही आनंदाचे दोन क्षण यायला हवेत हा विचार करणाऱ्या आणि अमलात आणणाऱ्या लोकांना खरेच मनापासून सलाम. >>> + 1
ललिता प्रीती, खुप माहितीपूर्ण आणि वेगळा लेख आहे. या माहितीसाठी धन्यवाद.
सुंदर लेख.
सुंदर लेख.
नवी माहिती समजली आणि एकदम ओघवता लिहीलाय. धन्यवाद.
लेख आवडला...
लेख आवडला...
हे फारच अद्भुत आणि सुंदर आहे.
हे फारच अद्भुत आणि सुंदर आहे. लेख खुपच आवडला.
सुंदर लेख!
सुंदर लेख!
सर्व प्रतिक्रियांबद्दल
सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
सीमंतिनी, तुझा प्रतिसाद आवडला. (पुस्तकाचं वगैरे माहिती नाही, पण) हो, निर्वासितांच्या प्रश्नाकडे वेगवेगळ्या कोनांतून पाहण्याचा मानस आहे.
उत्तम लेख. काही व्हिडीओही
उत्तम लेख. काही व्हिडीओही पाहिले सीडब्ल्यूबी चे. फार चांगलं काम करत आहे ही टीम.
छान लिहिलं आहेस. अतिशय हृद्य
छान लिहिलं आहेस. अतिशय हृद्य माहिती, खरंच पुण्यकर्म आहे हे.
सुंदर लेख !
सुंदर लेख !
'घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाये' आठवलं.
खरंच फार छान काम करत आहेत हे लोक !
ललिता प्रीती, खुप माहितीपूर्ण
ललिता प्रीती, खुप माहितीपूर्ण आणि वेगळा लेख आहे. या माहितीसाठी धन्यवाद.>>>> +१
माझं वाचन यथातथाच आहे. हा लेख
माझं वाचन यथातथाच आहे. हा लेख वाचताना एका अपरिचित विश्वाची सफर घडली. असे विश्व जिथे स्वार्थाला थारा नाही. माणुसकीची जबाबदारी घेऊन लहानग्यांना हसवणारे विदूषक त्यांची मुलांना रिझविण्याची तळमळ !
पण इतकाच हा विषय नाही. त्या मागे कितीतरी पदर आहेत. निर्वासित, निर्वासितांचे जिणे, निर्वासित होण्याची कारणं, त्यांच्यातले गृहयुद्ध, त्याची वांशिक-भाषिक कारणे.... माहिती घ्यावी तेव्हढं थोडं आहे.
या सर्वांची जाणिव करून देणारा लेख आहे !