हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-१

Submitted by mi_anu on 29 December, 2020 - 10:28

(डिस्क्लेमर: सर्व घटना व व्यक्ती काल्पनीक. विश्वंभर भाटवडेकर ला गुगल केल्यास दात पाडून हातात ठेवण्यात येतील.)

मांजरीण मीटिंग रूम मधून कोरी डायरी घेऊन बाहेर आली.मीटिंग च्या आधी मीटिंग मध्ये काय बोलायचं याची खाजगी मीटिंग, मीटिंग नंतर मीटिंग मध्ये काय बोललं गेलं याचे मिनिट ऑफ मीटिंग लिहायला अजून एक मीटिंग(म्हणजे खापर कोणाच्या डोक्यावर फोडता येईल याचे पुरावे गोळा करणे) इतका मुद्द्यांचा भुसा होईपर्यंत काथ्याकूट झाल्यावर त्या डायरीत लक्षात ठेवायला लिहायला काय शिल्लक राहणार? पण साडी नेसल्यावर छानसं रंगीत गळ्यातलं घालायचं असतं गळा भुंडा नको म्हणून.तसेच मीटिंग ला जाताना हातात डायरी ठेवायचीच असते हात भुंडे दिसू नये म्हणून.

तर दुसऱ्या विंग मध्ये जायला कार्ड स्वाईप करणार तोवर फोन आला.
"हॅलो, मी विश्वंभर भाटवडेकर बोलतोय.ओळखलं का?"
मांजरीण मीटिंग नंतर डोक्याने इतकी हलकी झाली होती की समोरून "मै मोदी बोल रहा हुं" आलं असतं तरी तिने "फ्रॉम व्हिच कंपनी?" विचारलं असतं.तिने "हाऊ आर यु?कसं चालू आहे?" वगैरे ओळख पटली नाही तरी फार गंडणार नाही असे संभाषण चालू केले.
"इंटरव्ह्यू झाला तो वेगळा विषय.पण आपण भेटूया का, मला तुमच्या बिल्डिंग मध्ये 9व्या मजल्यावर नवं कँटीन आहे ते पण बघायचं आहे.मी या बिल्डिंग पाशी आलो की फोन करतो."
'इंटरव्ह्यू' म्हटल्यावर मांजरीणीने ठेवणीतला आदराचा स्वर लावला.
"हो हो, नक्की भेटू.मला माहित नाही ते कँटीन कुठे आहे.पण सापडेल.आपण बघू."
बोलत बोलत स्वाईप करून दार का उघडत नाहीये म्हणून तिने वर पाहिलं तर कार्ड ऐवजी डायरी स्वाईप करत होती आणि समोर बसलेले सिक्युरिटी वाले दात विचकत होते.

जागेवर येऊन बसल्यावर पण मांजरीच्या डोक्यात ट्यूब पेटेना.सॉफ्टवेअर उघडेपर्यंत तिने पटकन 4 विचार करून वेळ सत्कारणी लावला.इतक्या जुनाट लांबलचक नावाच्या माणसाने इंटरव्ह्यू घेतला असता तर आपल्याला कळलं असतं ना?शिवाय याला का भेटायचं आहे?आपल्या बिल्डिंग मध्ये कँटीन आहे आणि आपल्याला इतके दिवस माहिती कसं नाही?हा माणूस फॉर्म भरताना याला कागदावरचे चौकोन पुरतात का? मुळात विश्वंभर भाटवडेकर या पुरातन नावाचा गृहस्थ आपल्याला का भेटणारे यापेक्षाही आपल्याच बिल्डिंगमध्ये नवव्या मजल्यावर कँटीन असून आपल्याला कळलं कसं नाही ही बोच जास्त मोठी होती.

मांजरीने कामात डोकं घातलं.बरीच(म्हणजे मीटिंग मध्ये किमान 8 सलग वाक्यं बोलता येतील इतकी) कामं उरकली.तेवढ्यात पमी चा फोन आला.पमी ही मांजरीची चुलत मावस बहीण आणि वर्ग मैत्रीण.
"अगं तू माझ्या नव्या युट्युब रेसिपी ला लाईक केलं नाहीस?पाहिलीस तरी का?"
पमी इतरांनी कधीही बनवले नाही असे पदार्थ बनवते.तिचे 'सुरणाची सुशी' वगैरे पदार्थ लहान मुलांना भीती घालायला अत्यंत मोठ्या प्रमाणावर सर्च होतात.

"नाही गं वेळ नाही झाला.काय बनवलंस तू?"
"अगं खूप मस्स्त पदार्थ आहे.घरी इतका आवडला ना, तुला थोडक्यात सांगते.नंतर रेसिपीला लाईक करशीलच।
फणसाचे ताजे पिकलेले गरे घ्यायचे."
इथे मांजरिणीच्या डोळ्यापुढे रसरशीत कापा फणसाचे गरे आले.आज उपास होताच.काल्पनिक फणस चालणार होता.पमीने पुढे रेसिपीची गाडी चालू केली.
"मग ना, गरे बिया काढून छान मऊसूत उकडून मॅश करायचे.एकीकडे कढईत तेल घालून त्यात कांदा पात, लसूण, बटाटा आणि टोमॅटो शेजवान मसाला घालून परतायचे, मिरची मीठ घालायचं आणि त्यात हे मॅश गरे मस्त गरगटून मिक्स करायचे.कोकणी बाबागनोश विथ चायनीज ट्विस्ट."

मांजरीच्या डोळ्यासमोर आता रेसिपी मनात बघून मोठे काळे पंखे फिरायला लागले.मनात 'का?? का?? का??' असे प्रश्न घुमायला लागले.तिने सफाईने विषय बदलला.
"हो मी लाईक करीन. मला एक सांग आपल्या ओळखीत कोणी विश्वंभर भाटवडेकर आहे का?"
तितक्यात फोनवर विश्वंभर भाटवडेकर चा मेसेज चमकला 'ऍट लिफ्ट लॉबी'.पटकन लिफ्ट मध्ये शिरत शिरत मांजरीने संभाषण चालू ठेवलं.
"विश्वंभर... नाही गं.कोण हा?मराठी सिरियल्स मध्ये आहे का?"
"अगं मी त्याला भेटायला चाललेय आता."
तिकडून पमी किंचाळली. "म्हणजे डेट?"
"डेट काय अगं..अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्या माझ्या.विश्वंभर नाव आहे म्हणजे त्याच्या पाऊण तरी गेल्या असतील." मांजरीने आपल्याला ओळख न आठवल्यामुळे सूडबुद्धीने विश्वंभर ला 20-25 वर्षं म्हातारं करून टाकलं.
"जा बाई तू डेटवर जा.मी नवा रेसिपी व्हिडीओ बनवतेय.ब्रोकोली गुळाचा पौष्टिक शिरा.फोन ठेवते गं, मला सांग नंतर काय झालं ते".

मांजरीने पटकन फेसबुक लिंकडईन उघडलं.अर्र. हा प्राणी आपला फेसबुक मित्र आहे.शिवाय आपण जिथे फोन इंटरव्ह्यू दिला त्या कंपनीत बऱ्याच मोठ्या जागी आहे.हे म्हणजे फार फार फार वाईट कॉम्बिनेशन. फेसबुकवर आपण तोडत असलेले तारे याला माहीत असणार.लिंकडईन वर एकाच कंपनीत 7 वर्षं मिळाली.युरेका.म्हणजे याला 'कोण कुठे आहे सध्या' वाल्या गॉसिप साठी भेटायचंय.म्हणजे इंटरव्ह्यूरुपी कांदेपोहे कार्यक्रमाचे चे ऑफररुपी कॉर्पोरेटलग्नात रूपांतर न होता 'एक बहुत अच्छा सा दोस्त' या निर्णयामध्ये रूपांतर झालेले आहे.

दुःखाचा निश्वास पूर्ण करेपर्यंत लिफ्ट लॉबी आली.
( क्रमशः)

यानंतरचे भागः
हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-2
हिंजवडी चावडी: गोंधळ दिवस-3

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
उगाचच धुरंधर भाटवडेकर डोळ्यासमोर येत होता सारखा.

Pages