ख्रिसमस केक

Submitted by Adm on 26 December, 2020 - 01:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

१. १ कप ड्राय चेरी. मला १७० ग्रॅमचं पाकीट मिळालं. साधारण कपभर होतं.
२. १ कप बदाम (सालं काढून उभे काप केलेले)
३. १ कप बेदाणे (रेझिन्स - हे आपल्याकडे मिळणारे बेदाणे आणि काळ्या मनुका ह्यांच्या मधले असतात असं मला नेहमी वाटतं!)
४. १ कप कॅन्डिड सिट्रस पिल्स. (संत्र आणि लिंबाची पाकवलेली सालं), मला इथे २२५ ग्रॅमचं पाकीट मिळालं ते सगळं घातलं. एक कपापेक्षा थोडं जास्त भरलं. हे घरीही करता येतं, पण मी तयार आणलं.
५. अर्धा कप बिया काढून चिरलेले खजूर
६. अडीच कप मैदा / केक फ्लोअर
७. १ कप बटर
८. पाव ते अर्धा कप मोलॅसेस (काकवी). इथे दोन प्रकारचे मोलॅसेस मिळतात. एक ब्लॅकन्ड मोलॅसेस असतं. ते मी मागे एकदा वापरलं होतं. पण ते खूप स्ट्राँग वाटलं. (त्याला लहान मुलांना जे आयर्न ड्रॉप्स देतात तसा वास होता!). आता मी साधं वापरतो.
९. अर्धा कप द्राक्षाचा ज्युस - साखर नसलेला (किंवा ब्रँडी / रेड वाईन)
१०. अर्धा कप सफरचंदाचा ज्युस - साखर नसलेला.
११. दोन कप बारीक ब्राऊन शुगर. (मी पावणे दोन कपच घातली, नंतर असं वाटलं की दिडकपही चालली असती. सिट्रस पिल्समध्ये नेहमीपेक्षा जास्त साखर होती बहुतेक).
१२. सहा अंडी
१३. एक टीस्पून बेकिंग सोडा
१४. अर्धा टीस्पून मीठ
१५. अर्धा ते पाऊण टीस्पून ऑलस्पाईस पावडर (ह्यात दालचिनी, लवंग आणि जायफळ ह्यांची पूड एकत्र केलेली असते. जर ऑलस्पाईस नसेल तर ह्या गोष्टी थोड्या भाजून त्यांची वस्त्रगाळ पूड करून घ्यावी).

क्रमवार पाककृती: 

आईबाबांच्या ऑफिसात भरपूर कॉस्मो पब्लीक असल्याने वेगवेगळ्या सणांचे आणि प्रांतांचे पदार्थ घरी यायचे. आईच्या ऑफिसमधली एक कलिग दरवर्षी ख्रिसमसचा स्पेशल केक द्यायची. पुढे माझ्या ऑफिसातल्या एका कलिगचे वडील मुंबईच्या ताज मध्ये शेफ होते. तो दरवर्षी तिथला खास केक ख्रिसमसच्या आठवड्यात घेऊन यायचा. पुढे कधीतरी हा केक स्वत: करून बघायचं खूळ आलं. मी इंटरनेटवरच्या दोन तीन रेसिप्या बघून आणि तीन-चारदा प्रयोग करून ह्या प्रमाणापर्यंत आलो आहे. तरीही आज साखर जरा कमी असती तरी चाललं असतं असं वाटलं. पारंपारीक ब्रिटीश पद्धतीचा ख्रिसमस केक तयार करण्याचं काम हे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच चालू होतं म्हणे. सगळी फळं आणून त्यावर प्रक्रीया करून ती केकमध्ये घालण्यायोग्य बनवून मग ती ब्रँडी, रम किंवा वाईनमध्ये भिजत घातली जातात. आता सगळं तयारच मिळतं त्यामुळे मी केक करायच्या एक दिवस आधी सुरूवात करतो.
१. केक करायच्या आदल्या दिवशी सगळी फळ एकत्र करून त्यात द्राक्षाचा ज्युस घालून, झाकून फ्रिजमध्ये भिजवत ठेवा. वाईन, ब्रँडी, रम ह्यापैकी काही असेल तर त्यात भिजत घाला नाहीतर द्राक्षाच्या ज्युसही चवही चांगली लागते. ह्यात मी आक्रोड घालत नाही. कारण मग तो बनाना वॉलनट केक सारखा लागतो. तुम्हांला हवा असेल तर घालू शकता.
२. केक करायच्या दिवशी सकाळी फळं फ्रीजमधून काढून त्यात अर्धा कप मैदा घालून हलक्या हाताने ढवळून घ्या. मैद्याच्या कोटींग मुळे बेक केल्यावर फळं करकरीत (क्रंची आणि क्रिस्पी) लागतात.
३. एका भांड्यात मैदा, बेकींग सोडा, मीठ आणि ऑलस्पाईस घालून मिसळून घ्या.
४. दुसर्‍या भांड्यात हँड मिक्सरने बटर फेटून घ्या. ते छान मऊ झालं की त्यात हळूहळू साखर घालून फेटून घ्या.
५. आता त्या मिश्रणात एक एक अंड फोडून फेटत रहा.
६. सगळी अंडी घालून झाली की मग मोलॅसेस आणि सफरचंदाचा ज्युस घालून नीट ढवळून घ्या. ह्या केकला जो डार्क रंग येतो तो ह्या मोलॅसेसमुळे येतो.
७. आता दुसर्‍या भांड्यात एक भाग ओलं मिश्रण आणि एक भाग कोरडं मिश्रण असं घालून हँड मिक्सरने फिरवत रहा. पिठाच्या गुठळ्या व्हायला नको.
८. सगळं मिश्रण एकजीव झालं की त्यात फळ घालून हलक्या हाताने ढवळून घ्या. एकंदरीत पीठा एव्हडीच फळ असल्याने मिश्रण नेहमीच्या केकसारखं स्मूथ दिसत नाही.
९. बेकींग ट्रे ला बटर लावून आणि पार्चमेंट पेपर लाऊन मिश्रण त्यात ओतून घ्या.
१०. अवन २७५ डी फॅ ला प्रिहीट करून त्यात केक बेक करून घ्या. ह्यात खूप फळं असल्याने हा कमी तापमानावर जास्त बेक करावा लागतो. साधारण दीड ते पावणे दोन तासांनी टूथपीक कोरडी निघाली की केक झाला असं समजावं. ह्यातल्या मोलॅसेस आणि ब्राऊन शुगरमुळे बेक करताना नेहमीच्या खमंग वासाऐवजी गुळचट गोडूस वास सुटतो.
*
20201225_133612.jpg

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात एक लोफ पॅन आणि एक आठ इंची गोल पॅन एव्हडा केक झाला.
अधिक टिपा: 

१. ह्यातल्या फळांमुळे हा केक क्रंबली होतो. कापताना धारदार सुरीने करवतीसारखं मागे पुढे करत कापलं तर नीट वड्या पडतात.
२. खूप फळं असल्याने प्रत्येक घासाला फळं येतात. चेरीचा आंबटपणा, सिट्रस पील्सची थोडीशी कडवट चव, खजूराची गोड चव आणि बदामांची 'नटी' चव अशी एकत्र चव मस्त लागते. शिवाय मोलॅसेसने येणारी विशिष्ट चव हे या केकचं वेगळेपण!

माहितीचा स्रोत: 
इंटरनेटवरच्या दोन तीन रेसिप्या आणि माझे प्रयोग
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!
फ्रूट केक खूप आवडतो. फोटोत दिसतोय पण भारी!

छान रेसिपी आणि फोटो. बरीच मेहनत आहे पण.

आमच्या घरी कोणालाच या केकचं कौतुक नाही. मी सेफवेमधून एक सहज आणला तर तो अक्षरशः भयानक गोडमिट्ट आहे. केक कमी आणि फळं-सुकामेवा जास्त. वैतागच आलाय. आळशीपणा न करता घरीच करायला पाहिजे हे नक्की! भारतात छान मिळतात हे केक्स.

भरपुर कष्ट आहेत की, पण एक नंबर रेसिपी आहे. फोटो अतिशय टेम्पटिंग आहे.

बेकिंग हॉबी असेल आणि पुढच्या वर्षीही केक करणार असाल तर प्रयोग म्हणून ड्राय फ्रुटस 10-12 दिवस आधीच रममध्ये मुरवत ठेवा. माझी स्वित्झर्लंडमधली शेजारीण जवळ जवळ एक महिना मुरवायची. आणि मग केक बेक केल्यावर त्या ड्राय फ्रुटसमध्ये ती मिरमिरणारी रमची चव इतकी उच्च लागते. मला नुसतं आठवुनही तो वास आणि चव जाणवली.

सगळ्यांना धन्यवाद.

बेकिंग हॉबी असेल आणि पुढच्या वर्षीही केक करणार असाल तर प्रयोग म्हणून ड्राय फ्रुटस 10-12 दिवस आधीच रममध्ये मुरवत ठेवा. >>>>> हो हे करायचं आहे. पण होतं काय की दरवर्षी ख्रिसमस केकची अगदी ऐनवेळी आठवण होते आणि मग रम किंवा वाईन कुठूनतरी मिळवणं होत नाही. शिवाय अगदी पहिल्यांदा एका गटगसाठी केला होता तेव्हा ख्रिसमस केक आणणार आहे म्हटल्यावर काही जणांनी फोन करून सांगितलं होतं की मुलं पण खाणार आहेत त्यामुळे रम किंवा वाईन घालू नका. स्वतःची आणि कुठली ना कुठली दुसर्‍यांची मुलं दरवर्षी केक खातातच. त्यामुळे मग राहूनच जातं. पुढच्या वर्षी मे बी दोन घाण्यांमध्ये वेगवेगळी मुरवलेली फळं घालू.

सायो, मीरा, सनव, वाटतायतं तेव्हडे कष्ट नाहीयेत. फक्त फळं भिजत घालणं तेव्हडं आधी करावं लागतं. बाकी केकला असतात तेव्हडेच कष्ट आहेत.

फारच छान रेसीपी व केक . इथे भारतात पंच तारांकित हॉटेलात हे केक साठीची फळे रम / वाइन मध्ये भिजवण्याचा एक समारंभ असतो साधारण पेज थ्री सेलिबिर्टी बायकांना बोलवतात. व मुंबई टाइम्स मध्ये फोटो येतो. हे उगीच अवांतर. तुमचे अभिनंदन. व नववर्शाच्या शुभेच्छा.

ती वेगळी

केकात वापरतात ती ब्राऊन शुगर वेगळी

नेहमी सारखा एक क्वेस्चन आहे Happy

केक करायच्या दिवशी सकाळी फळं फ्रीजमधून काढून त्यात अर्धा कप मैदा घालून हलक्या हाताने ढवळून घ्या. मैद्याच्या कोटींग मुळे बेक केल्यावर फळं करकरीत (क्रंची आणि क्रिस्पी) लागतात. >>>>>
६. अडीच कप मैदा / केक फ्लोअर >>>>> या अडीच कपातलाच घ्यायचा ना ? म्हणाजे केकसाठी २ कप मैदा वापरायचा ?

या अडीच कपातलाच घ्यायचा ना ? म्हणाजे केकसाठी २ कप मैदा वापरायचा ? >>>> हो हो. अडीच कपांतला अर्धा कप फळांमध्ये घालायचा आणि दोन कप मुख्य बॅटरमध्ये.

इथे भारतात पंच तारांकित हॉटेलात हे केक साठीची फळे रम / वाइन मध्ये भिजवण्याचा एक समारंभ असतो साधारण पेज थ्री सेलिबिर्टी बायकांना बोलवतात. >>>>> हे माहीत नव्हतं. Happy

तुमचे अभिनंदन. व नववर्शाच्या शुभेच्छा. >>>> तुम्हांलाही नववर्षाच्या शुभेच्छा अमा. Happy पण आमचं अभिनंदन कश्याबद्दल. Proud