ती आणि मी

Submitted by वैभव जगदाळे. on 18 December, 2020 - 14:41

इथे कसं बरं वाटतंय. शांत,निवांत. इथे कोणी ओरडायला नाही की लाथ घालून हाकलायला नाही. जागाच तशी आहे इतकी दाट झाडी की दिवसासुद्धा माणसं इकडं यायला घाबरतात आणि रात्री तर म्हणे इथल्या झाडांवर भुतं लटकलेली असतात, मला अजून तरी दिसली नाहीत ती. जाऊद्या त्यामुळं का होईना पण इकडे कोणी फिरकत तर नाही. इथं मी एकटाच असतो. पाचोळ्यावर पाठ टेकवली की शांतपणे पडता येतं. असं शांत पडून डोळे बंद केले की ती आठवते, खरं तर आठवायला अगोदर तिला विसरायला तर हवं ना! जेव्हापासून ती भेटली होती तेव्हापासून असा एकही क्षण गेला नाही की मी तिला विसरलो असेल.
   आमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर.गावातल्याच एका बड्या बापाची बेटी होती. त्यांना मी मान्य होणार नव्हतो. एक दिवस पळून जायचा प्रयत्न केला आणि पकडले गेलो. मला गुरासारखं मारलं आणि तिला घेऊन गेले. पंधरा दिवस आम्ही एकमेकांना पाहिलं नाही, पंधरा दिवसांनी कळलं की तिचं लग्न आहे. मी तडक मंडपात धाव घेतली. भर लग्नात गोंधळ झाला. गाव मला तुडवत होतं आणि नवरीच्या वेषात नटलेली ती डोळ्यातलं पाणी अडवून माझ्याकडं बघत होती.
   "इथं राहिला तर मरशील" असं सांगून बापानं त्याच दिवशी गाव सोडायला लावलं. पुढे बरेच दिवस भटकत होतो, परत गावात आलो तर माझी अवस्था बघून बापानं घरात घेतलं नाही. जवळचे मित्र बोलायला तयार नव्हते, बोलायला गेलं की लांब पाळायचे. मग मीच ठरवलं आता एकटं राहायचं आणि ही जागा निवडली. ओढ्याचा काठावरची ही घनदाट झाडी. इथं चुकून सुद्धा कोण फिरकत नाही. इथं शांत झोप लागते. सकाळी ती येते अगदी तशाच वेषात जशी ती तिच्या लग्नात दिसत होती. मी आता म्हातारा झालोय पण ती आजही तशीच आहे. तितकीच सुंदर. रस्ता फुटेल तिकडे ती चालायला लागते मीही तिच्या मागे निघतो, तिच्याशी बोलत. आम्ही कुठेही थांबतो, कुठेही बसतो. गावच्या चौकात, रस्त्याच्या बाजूला, मंदिराच्या पायरीवर नाहीतर एस टी स्टँड मध्ये, कुठेही. तासन् तास बोलत असतो,कधी हसत असतो कधी रडत असतो. गावातली माणसं विचित्र नजरेने आमच्याकडे बघत असतात. उनाड पोरं 'मजनू' अशी हाक मारून मला हिनवत असतात. पण ती समोर असली की मला कुठल्याच गोष्टीचं दुःख वाटत नाही. देवळापुढं पडलेली मोगरा आणि गुलाबाची फुलं गोळा करून मी तिच्यासाठी गजरा करत बसतो. संध्याकाळ झाली की, उद्या परत भेटायचं वचन देऊन ती निघते. मीही माझ्या जागेकडे निघतो. तिला आठवत पावलं टाकत राहतो. पाचोळ्यावर जाऊन पाठ टेकवली की डोळे घट्ट मिटून घेतो झोप येइपर्यंत पुन्हा ती दिसत राहते. सकाळी जाग येईपर्यंत ती माझ्या जवळ आलेली असते. दिलेलं वचन ती रोज पळते. मग पुन्हा तोच दिनक्रम.
    कधी कधी गावात आलेला एखादा नवखा माणूस एखाद्या गावकऱ्याला माझ्याबद्दल विचारतो.
तेव्हा गावकरी सांगतात," हा आमच्या गावचा मजनू, कधी पंचवीस तीस वर्षांपूर्वी गावातल्या एका पोरीसंग ह्याचं लफडं होतं, तिचं लगीन मोडलं होतं यानी. तव्हा लय हाणला होता याला आन्  त्या पोरीनी बी राहत्या घरात गळफास लावून घेतला होता म्हणत्यात याच्यापायी. तव्हापासून हा येडा झालाय, एकटाच बडबड करीत फिरत असतोय"
आम्ही दोघेही त्यांचं ते बोलणं ऐकत असतो पण आता आमचा त्याच्यावर विश्वास नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलीयं कथा!!
पुढील लेखनास शुभेच्छा तुम्हांला...

अपेक्षित शेवट पण चांगली लिहिलंय कथा

छान .
तरी अजून कथा फुलवता आली असती असे वाटून गेले. >>> +1