बाल्कनी बाग - एक विरंगुळा. ( डिसेंबर २०२०)

Submitted by Srd on 10 December, 2020 - 09:05
चिनी गुलाब किंवा ओफिस टाइम.

बाल्कनीतल्या अपुऱ्या जागेत आणि फारतर पाच तासांचे मिळणारे ऊन यात बागकामाची हौस भागवणे एक कसरतच असते. सर्वच प्रकारची झाडे हवीहवीशी वाटतात पण जागा पुरत नाही. एक काढले तर दुसऱ्याला जागा मिळते. इनडोर्स पद्धतीची सर्वच लावून चालत नाहीत. कामाचीही लागतात. पुन्हा त्यात वेलवर्गीय भाज्या, साध्या हिरव्या पालेभाज्या, फुलझाडे, मसाले, शेंगाभाज्या, पक्षी / फुलपाखरे यावेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळी असे नाना प्रकार. सर्वप्रथम ठरवून टाकलेले की रासायनिक फवारे मारायचे नाहीत. ते बाजारात मिळतातच. रोग पडलाच तर सोपा उपाय करायचा अथवा झाड उपटून टाकायचे. फळे,फुले नाही आली तर बदलायचे. उपाय शेवटी दिले आहेत.

तर सध्या( 2020_डिसेंबर) जे काही आहे ते फोटोमाध्यमातून.

फोटो १
.पुदिना

फोटो २
.पुदिना एका ट्रेमध्ये आहे त्यामुळे सतत ओलावा मिळतो. कापडी पिशवीमुळे मुळांना गारवा राहतो.पाणी तुंबत नाही.

फोटो ३
.गवती चहा हवाच.

फोटो ४
.गवती चहा खूप वाढला की हिरवी पाने कापून जुडी करून पंख्याखाली वाळवली की वापरता येतात.

फोटो ५
.मिरची. भाजीसाठी आणलेल्या हिरव्या मिरच्यातील एखादी लाल करून बी टाकून ठेवायचे. उगवलेल्या रोपांतून एक दोन ठेवायचे. वेगवेगळ्या वेळी आणलेल्या मिरचांचे असे केल्यावर एखादा लॉट चांगला लागतो. काही खटपट न करता त्यास मिरचा लागतात. मिरचा लागणाऱ्या रोपाचे शेंडे कापून वाढवल्यास त्यास खात्रीने मिरचा लागतात. काम सोपे होते. बाजारातून बी आणण्यापेक्षा हा प्रयोग साध्य होतोच. आणि चारपाच प्रकारची झाडे वाढवल्याने दीड महिना वाया जात नाही. फक्त फुलेच येणारे एक झाड मात्र कायम ठेवायचे.

फोटो ६
.पालक. थंडीचे दिवस सरेपर्यंत म्हणजे महा शिवरात्रीपर्यंत पालक वाढवणे मुंबईकडच्या गरम हवामानात साध्य होते. बी आणून वाढवण्यापेक्षा बाजारातून भाजीसाठी मुळे असलेली लहानसर पालक जुडी उपयुक्त. वरची पाने काढून खालचा मुळांचा भाग मातीत लावल्यावर पाने येतात. तीनदा पाने काढता येतील नंतर मार्चमध्ये काढून घ्यायचा. माती चिकट लाल नको आणि ऊन फार तडतडीत सोसत नाही. मातीत पाणी साठता कामा नये.

फोटो ७
.विड्याचे पान. नागवेल. छोटे पान.

फोटो ८
.विड्याचे पान मोठे. यास नर्सरीवाले मघई पान म्हणून विकतात. पण खरे मघई पान बिहारमध्ये डिसेंबर ते फेब्रवारीत पिकते. तिथून खात्रीशीर वेल आणला पाहिजे. या पानांस तडतडीत थेट ऊन नको. गारवा हवा.

फोटो ९
.मनी प्लांटचा उपयोग सावलीची जागा झाकण्यासाठी होतो. आणि ऊन्हाऐवजी फक्त उजेडावरही वाढते ही जमेची बाजू.

फोटो १०
.घेवडा. बाजारात जो चपटा चंद्रकोरीसारख्या शेंगांचा मिळतो त्यातल्याच जून शेंगा वाळवून बिया लावल्या की चार दिवसांत रोपे उगवतात. आधाराच्या काटक्या आणि दोऱ्या तयारच ठेवाव्या लागतात. कारण वेल भराभर वाढतात आणि दहा पाने आली की कळ्यांचे शेंडे डोकावू लागतात. तसे बारमाही पीक आहे. दोनदोन महिन्यांनी नवीन दाणे रुजवावे म्हणजे शेंगा सतत मिळतात. एका वेळेला आठदहा वेल असावेत.

फोटो ११
.चिनी गुलाब. सतत फुलं दिसायला हे सोपे झाड. फक्त थंडीत कोमेजते. ऊन भरपूर हवं.छोटंसं आटोपशीर आणि रंग वेगवेगळे.

फोटो १२
.कर्दळ. ही दोन फुटी जात आहे। फूल नावालाच पण लाल आहे. पानेही उपयोगी मोदकासाठी किंवा इतर कामाला.

फोटो १३
.इनडॉरमध्ये भरपूर वरायटी आहेत. त्यातले हे एक. मोठ्या कुंड्या ( तळाची भोके बुजवली आहेत. त्यात ही झाडे ठेवून दोन दिवस आत ठेवता येतात. परत बाल्कनीत न्यायची.

फोटो १४
.टेडीलाही आवडतो मनीपॉट.

फोटो १५
.काळी मिरी. लावून ठेवली आहे. पाहू मिरी येते का.तीन वर्षांनी येते म्हणतात. मोठ्या झाडांचा गारवा हवा.

फोटो १६
.छोटी लिली. दिसते छान, वाढवायला सोपी. पांढरी मोठी फुलेही येतात.

फोटो १७
.छोटे गवत. यात बऱ्याच जाती आहेत. हँगिगची एक वेगळी सुंदर जात असते.
हाफ राउंड कुंड्या प्लास्टिकच्या हुकसह मिळतात. भितींला लावता येतात. पण प्रत्येक कुंडीसाठी दोन भोके पाडावी लागतात. माझ्याकडे एक दुसऱ्या कामासाठी शिडी केली होती ती उपयोगात आणली. दोन्ही बाजूने वर खाली हलवता येतात कुंड्या.

------------------------

माती आणि कुंड्या -

लाल मातीमध्येच नर्सरीवाले रोपे देतात. पण बाल्कनीतल्या कुंड्यांत फार त्रासदायक असते.लाल पाणी होऊन फरशी घाण होते. शिवाय लाल मातीतले पाणी वाळले की धोंडा होतो. भुसभुशीत राहात नाही.

कुंड्यांना भोके असली की पाणी बाहेर वाहते. ते वाहू नये म्हणून ट्रे ठेवावे लागतात. किंवा भोके नसलेल्या कुंड्या/टब घेऊन त्यात पिशवी ठेवणे हा उपाय करतो. हँगिग कुंड्यांना भोके असतात त्यातून पाणी ठिबकत राहाते. त्याखाली दुसरी भोके नसलेली कुंडी ठेवावी लागते. दुसरी साधी माती असणे उत्तम. पण रोपाची लाल माती काढून यात लावणे अवघडच.किंवा कटिंग लावणे,बिया लावणे वगैरे.

बी/बियाणे उगवण्यासाठी साधी भुसभुशीत माती हवी. वापरलेली माती असेल तर ती प्रथम प्रेशर कुकरमधून वाफवून घेतो. यात बी लावले की उगवते. मातीतले शंख गेल्याने कोंब खायची भीती राहात नाही.

रोग निवारण -

चवळी/घेवडा या भाज्यांच्या वेलांवर कळ्या येण्याच्या सुमारास हमखास रोग पडतो. ते काळे/पांढरे कीडे झाडाचा रस शोषतात. त्यास सोपा निर्धोक उपाय म्हणजे खळ ( कांजी) फवारणे. खळ वाळली की किडे थिजतात. हलता उडता येत नाही. रोज रात्री नवे कीडे हल्ला करतात. रोज एकदा/ दिवसाआड फवारणी करायची. साधारणपणे पंधरा दिवस धाड येते. नंतर येत नाही. पाव लिटर पाण्यात दोन चहाचे चमचे मैदा घालून उकळून गार केले की फवारण्यायोग्य पातळ खळ तयार होते. फवारणी झाल्यावर स्प्रेअर साध्या पाण्याने धुऊन ठेवायचा.

खत -
घालायचे झाल्यास शेणखत - मिरची,झेंडू,मोगरा, टोम्याटोसाठी.

घरातला ओला कचरा - वेलवर्गीय भाज्यांना.

नवी ऊन खाल्लेली माती - पालक, पुदीना,गवती चहा, चमेली, सायली,जाई,जुई,कढीपत्ता.

गांडुळ खत - पुदीना.

----------------------------------------

नवीन २०२०_१२_११;

काही प्रश्न आले आहेत प्रतिसादांत. त्याबद्दल-

१) अधिक माहिती टाका धाग्यात - सतीश.
२) बाल्कनीत बाग करायची आहे कशी सुरवात करावी.
खूप सारी आयुधे, कुंड्या, रोपे जमा केली आहेत. तर कुंड्यांसाठी प्ल्आस्टिक ट्रे आणा आणि त्यात खाली मातीचा थर एक इंच देऊन त्यावर कुंडी ठेवा. वाहणारे पाणी फरशीवर किंवा भिंतीवर जाणार नाही. खतामध्ये असलेली पोषक द्रव्येही वाहून न जाता खालच्या मातीत जमा राहतील. पाणी उघडे नसल्याने डास होणार नाहीत. त्या मातीत दुर्वा लावू शकता.

३) बाल्कनीच नाही. - हर्पेन.
हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नव्हता. काही घरांत बाल्कनी आत घेतलेली असते आणि स्लाइडिंग खिडक्या लावलेल्या असतात. बाहेरच्या बाजूस बॉक्स ग्रिलसुद्धा काही सोसायट्यांत लावून देत नाहीत किंवा त्या ग्रिलमध्ये झाडे लावू देत नाहीत. कारण मातीचे ओघळ वाहून इमारतीचा भिंतीचा रंग खराब होतो.

उपाय -

फोटो १८
.छोटा टब, तळाला भोके न पाडलेला मिळतो. यात काळ्या प्लास्टिकचे उन्हाला टिकाऊ असे या साईजमध्ये मिळत नाहीत. मिळाले तर उत्तमच.


फोटो १९
.ही जी कापडी ( पॉलीएस्टरची कुजत नाही.) पिशवी केली आहे तशा दोन या टबमध्ये राहतात. त्यात झाडे लावता येतील.

हा टब तळाला साडेचार इंच आहे तो खिडकीच्या स्लाइडिंग खिडक्याच्या आतल्या बाजूस राहू शकेल. किंवा टांगता येईल. खिडकीतून उजेड मिळेल, भोके नसल्याने खाली पाणी सांडणार नाही. घराच्या आत असल्याने कुणाची तक्रार नसणार. चार पाच टब ठेवल्यास आठ दहा झाडे येतील. लाल माठाचे शेंडे लावल्यास वाढतात. पालकही लावता येईल. नर्सरीतून आणलेल्या तुळस,सदाफुली,शेवंती इत्यादी रोपांच्या छोट्या पिशव्या यात राहतात. म्हणजे काही खटपट करावी लागणार नाही. वरती मनी प्लांट लावलेले फोटो क्रमांक (९) मधले टब फारच निमुळते आहेत ते घेऊ नका. त्यात पिशवी बसत नाही.

------------------------
विड्याच्या पानांचा उपयोग.
फोटो २०
साधारण तीस चाळीस पाने महिन्याने मिळाली की ती घेतो.
पानांचे तुकडे करून त्यात थोडा गुलकंद, थंडक उर्फ मेंथॉल, बडीशेप भरडून, कात, चुना टाकून मिक्सरमध्ये भरड दळायचे. तो लगदा सावलीत पंख्याखाली वाळवलेला विडा तयार होतो. असा दुकानातही मिळतो. यात नंतर बारीक सुपारी मिसळणे ऐच्छिक.

फोटो २१
.विडा वाळवल्यावर.फ्रिजमध्ये ठेवतो.

पुदिनाचा उपयोग.
फोटो २२
.ओली पाने वापरतोच. पण खूप वाढला तर त्याचे लांब शेंडे कापून घ्यायचे.ते सावलीत चाळणीवर वाळवायचे. चार दिवसांनी कुरकुरीत वाळल्यावर चुरायचे आणि चाळले की आपोआपच काड्या वेगळ्या होऊन खाली बारीक चुरा मिळतो तो बॉटलमध्ये भरून ठेवायचा. फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नसते. भेळेत वापरता येतो. पाणीपुरीच्या पाण्यासाठी वापरता येतो. शिवाय दह्यात घातल्यावर फळाच्या फोडींसाठी डिप तयार होते.

####################

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद srd..
आज मिरची लावली आहे पाहू आता रोपं येत की नाही ते.
उद्या तुम्ही सांगता त्याप्रमाणे पालक आणि शेंगा लावते. Recently घराला colouring केल्यामुळे जुने मोठे colour चे डब्बे आहेत ते वापरले तर चालेल का?

>>> जुने मोठे colour चे डब्बे आहेत ते वापरले तर चालेल का? >>

चालतीलच. दहा किलोचे असतात त्याला खाली भोके पाडून माती भरली तर खूपच जड होतात. म्हणून तो डबा तसाच ठेवायचा आणि त्यात पाच किलोचा डबा भोके पाडून ठेवायचा. मोठ्या डब्यात खाली मातीचा थर द्या. एखादे उंच वाढणारे इनडॉर प्लांट किंवा जास्वंद किंवा अनंत / कढिपत्ता आतल्या डब्यात लावल्यास खूप छान वाढते. आणि हलवताही येते. तसेच खाली भिजलेल्या मातीत ओलावा असल्याने झाडास पाण्याचा ताण पडत नाही.

Srd, तुमची बाग सुरेख आहे.

कांजी फवारल्यावर रोपांची खोडे आकसत नाहीत का?

अमृताक्षर, तुमचीही बाग सुंदर आहे.

गुलाबांच्या कलमांवर हार्मोन पावडर मारलेली असते त्यामुळे ती दुकानात असताना तिच्यावर डौलदार मोठ्ठा गुलाब असतो. घरी आल्यावर काही महिन्यात कलम केलेली ती छोटीसी फांदी मरते. असे होऊ नये म्हणून कलम मोठे होईपर्यंत गुलाब लागायला द्यायचे नाहीत, कळ्या खुडून टाकायच्या. पण हे करणारे हात आपल्याकडे आधी हवे Happy गुलाबाला कळी आली की आपले देहभान विसरले जाते Happy

कलम मोठे होईपर्यंत गुलाब लागायला द्यायचे नाहीत, कळ्या खुडून टाकायच्या. पण हे करणारे हात आपल्याकडे आधी हवे.......हार्मोन पावडर माहित नव्हते.आता गुलाब आणून पहाते.काळ्या खुडायला वाईट वाटेल.

धन्यवाद srd करून पाहते हा प्रयोग.
हो ना साधना..कळ्या खुडून टाकणे म्हणजे खुपचं अवघड काम आहे.
पुढच्या वेळेस मोठं झालेलं रोपं घेऊन येईल

>>> कांजी फवारल्यावर रोपांची खोडे आकसत नाहीत का? >>>

नाही. एक पातळ पांढरा कांजीचा थर /पापुद्रा वाळलेला तयार होतो. तो फोडून शेंडे ,कोंब सहज वाढतात. पण त्या अगोदर किड्यांना जखडून टाकायचं काम झालेलं असतं. तो थर नंतर फुटून गळून पडतो. किंवा शेंगा धुताना सहज निघून जातो.

कुणी विचारेल फक्त गुळाचं पाणी फवारलं तर? हो. तेसुद्धा चालेल. चिकटपणामुळे कीडे निष्क्रीय होतील. ( हल्लीचा पिवळा सुंदर गुळ हा ४० ते ६० टक्के साखरच असते.)
-------------------------
गुलाबाच्या कलमाबद्दलचं खरं आहे. कलमं बालपोषण आहार आणि प्रतिबंधक औषधांंवर वाढलेली असतात. शिवाय उघड्या जमिनिवर बारा तासांचे ऊन खात असतात. ते अचानक बाल्कनीत तीन तासांवर येते. गुलाबांना उन्हाचा डोसच फार उपयोगी असतो कारण त्या जाती वाळवंटी असतात. काश्मीरकडचे गावठी गुलाब वेगळे असतात. पण तेही उन्हाळी अधिक फुलतात आणि बर्फाळ थंडीही सहन करतात. ऊन महत्त्वाचे. शिवाय रोपाची पांढरी लव असणारी कार्यक्षम मुळे हलवल्याने तुटलेली/ कोमेजलेली असतात. ती वाढण्यासाठी वेळ हवा. तिसरी एक गोष्ट की गुलाब हे झुडुप प्रकारचे झाड आहे. सर्व बाजूस वाढते. इथे बाल्कनीत फक्त उन्हाच्या दिशेनेच अर्ध्या बाजूस वाढण्याचा पर्याय शिल्लक राहतो. घराच्या दिशेने वाढलेली फांदी न कापता लांब वाढवून वळवून बाहेर करणे गरजेचे असते.

त्यामुळे सुरवातीला शेणखत घालून झाड वाढवायचे आणि कळ्यांना मुकेच ठेवण्याचा उपाय करावा लागतो.

छान माहिती srd, साधना , तरीच टवटवीत गुलाब घरी आल्यावर असे का होतात कळायचं नाही. हार्मोन पावडर वगैरे माहीत नव्हतं, अगदी गुलाबाला ऊन खूप लागतं हे पण मला माहित नव्हतं. उपयुक्त माहिती मिळते आहे. धन्यवाद.

बाल्कनीत एका भिंतीला एक रॅक लावून त्यावर ट्रे ठेऊन त्यात भाजी झाडे लावायची आहेत

रुंदी फक्त 2 फूट आहे, लांबी 13 फूट

मेटल ग्रीलला अडकवायला कुंड्याही मिळतील का

SAVE_20211217_191339.jpegimages_1.jpeg

अजून काही आयडिया

6 छोटे ट्रे करून धने , मोहरी , मेथी प्रत्येकी 2 लावले तर मस्त भाजी मिळेल

सगळे मिसळून एक वेळ भाजी होऊ शकेल

सगळे साधारण 8,15 दिवसात उगवतील

Pages