शुभंकरोती

Submitted by सांज on 7 December, 2020 - 11:20

शुभंकरोती

काय बरं लिहावं? लिहण्याची ऊर्मी तर खूप आतून उफाळून येतेय. दरवेळी तिचा विषय ती बरोबर घेऊन येते. पण आज तसं नाही. अवेळी कारणाशिवाय ढग दाटून यावे तसं वाटतंय. कुठून वारा वाहत आला माहित नाही.. दुरून कुठून आलाय की माझ्यातल्याच कशाची वाफ होऊन हे काळेभोर ढग दाटलेत कोणास ठाऊक! तिन्हीसांजेची वेळ आहे. सांज आणि पहाट दोघीही वेड लावतात. मनावरचे सारे तरंग मिटवत खालचा तळ पहायला भाग पाडतात. आणि मग हा असा स्वत:चा स्वत:शी वेडसर संवाद सुरू होतो. जुने प्रसंग आठवतात. वेगळ्याचं कोनांतून ते उमगतात. आपला तेव्हाचा बाळबोधपणा आठवून नकळत गंमत वाटते, त्रागाही वाटतो. का हे सारं आठवतंय असंही होतं. काही भिडलेले प्रवास, भावलेली माणसं मनात डोकावून जातात. दूर असणाऱ्या आप्तांची आठवण मनात फुलुन येते. कातर कातर आठवणी डोळ्यांत दाटतात. मोठं झाल्यावर लहानपणचे मनावर कोरले गेलेले क्षण आठवतात. काही वर्षांपुर्वीच्या ‘स्वत:ची’ आठवण ताजी होते. स्वप्नं डोळ्यांसमोर उभारतात. काही अर्धवट, काही अनवट. गाणी, कविता, किस्से.. किती काय काय! मन क्षणांत किती सफरी करुन येतं. कुठलंतरी मनात रेंगाळलेलं पुस्तक आठवतं. पात्र आठवतं. ते वाचलं तो काळ तरळतो. तेव्हा सोबतीला असणारी माणसं, चवी, गंध, ठिकाणं सारं जसंच्या तसं डोळ्यांसमोर ऊभारतं. कधी हसू येतं तर कधी आसू! एकेक गाठ सुटत मन विकल विकल होत जातं. हातातली काॅफी की चहा गार झालेला असतो. पण ते जाणवत नाही. मनात वाहत असणारी ऊब अशावेळी पुरेशी असते. स्वत:च्याच सहवासात रमलेलं मन कुठेतरी भलतीकडेचं भरकटत असतं. तिन्ही सांजेला आणि पहाटेला संधीकाळ म्हणतात. मन आणि शरीर यावेळी कमालीचं एकाग्र आणि अद्वैत होतं म्हणतात. तंद्री लागते. शांत वाटतं. तसंच काहीतरी. या अशा खास स्वत:च्या अशा संध्याकाळीही आता किती दुर्लभ झाल्यायत याची जाणीव होते. न दिसणाऱ्या क्षितीजावरचे रंग उडाल्यासारखे वाटायला लागतात. हातातला कप रिकामा झालेला असतो. जिभेवरची गार चव आणि मनावरची मऊ ऊब घेऊन शरीर ऊठतं आणि आत चालू असलेल्या शुभंकरोतीला तेवढ्यापुरता पूर्णविराम मिळतो!
पण, जाताना ती भरपूर दिवस तेवत राहील असा एखादा सांजदीवा मनात तेवता करुन जाते..

~ सांज

(पेंटींग : ॲक्रिलिक कलर्स आॅन पेपर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users