आजारपणात खायचे पदार्थ

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2017 - 16:35
dal khichadi

आजारपणात काय खावे आणि आणि काय नको हा प्रश्न नेहमीच पडतो. काय खाल्ले की त्रास होतो, काय खाणे चांगले, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तोंडाला चव नसताना काय घश्याखाली उतरू शकते. शेवटी अपराधी पोटाची भूक तर भागवलीच पाहिजे. पण काही पदार्थ ईतरवेळी अत्यंत आवडीचे असूनही आजारपणात तोंडाला चव नसल्याने खावेसे वाटत नाहीत, किंवा खावेसे वाटले तरी सर्दी ताप खोकल्यात चालत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचे आजारपणात खायचे पदार्थ ठरलेले असतात. तेच या धाग्यावर लिहायचे आहेत. कदाचित हे पदार्थ व्यक्तीपरत्वे बदलतील. एकाचे दुसर्‍याला चालणार नाहीत. पण चालले तर लोकांना चार अतिरीक्त पर्याय मिळतील. म्हणून आजारी असताना आणि तोंडाला चव नसताना ज्या ठराविक पदार्थांवर मी जगतो ते मी लिहितो. तुम्ही आपले लिहा Happy

१) दालखिचडी - नुकतेच मायबोलीवर दालखिचडीवर एक धागा येऊन गेला. ज्यात मी दालखिचडी फक्त आजारपणातच खातो असा उल्लेख केला होता. आणि ते खरेच आहे. मी आजारी पडलो आणि तोंडाला काही चव नसली तर मी दिवसातून दोन वेळा पोटभरीचे असे काही खाऊ शकतो तर ती फक्त दालखिचडीच. गंमत म्हणजे जेव्हा मी आजारातून उठतो. म्हणजे कायमचा नाही, तर जेव्हा बरा होतो. तेव्हा मात्र अचानक त्या दालखिचडीचा तिटकारा वाटू लागतो Happy

01 Dal khichadi.jpg

यंदाच्या दिवाळीनंतर आजारी पडलो तेव्हाची ही दाखखिचडी. थंडी-ताप-खोकला नसल्याने खिचडीसोबत वाईच घोटभर ताक सुद्धा घेतले होते. आणि हो, ज्याप्रमाणे दारूसोबत चकणा तसे दालखिचडी सोबत पापड मस्टच असल्याने तो ही होताच. तसेच चार चटण्या लोणची असली की तेवढीच तोंडाला चव येते. पण त्यातही फोटोत दिसणारी भरलेली तळलेली सुकी मिरची माझी फेव्हरेट Happy

२) मीठ मीरपूड लावलेले सफरचंद - हा एक भारी प्रकार असतो. सफरचंद ईतरवेळीही आवडतेच. सर्वांनाच आवडत असावे. पण तापात मात्र तोंडाला चव नसली की खाणे अवघड होते. अश्यावेळी मग त्याला मीठ-मीरपूड चापडून बघावे. जादू केल्यासारखे अख्खे सफरचंद संपवाल. पोटालाही छान आधार मिळतो. मात्र हा पदार्थ देखील मी आजारी नसताना खात नाही. म्हणजे सफरचंद खातो, पण मीठमिरपूड लावत नाही.

02 apple.jpg

३) लिंकोमीसा सरबत - आजारात शरीरातले पाणी कमी होते. पण पाण्याचीही चव लागत नसल्याने ते सतत पिणे अवघड होते. अश्यावेळी मी हे लिंकोमीसा सरबत बनवतो.
कृती फार सोपी आहे,
१. टोपभर पाणी घेऊन उकळायला ठेवा.
२. त्यात कोकमाच्या सात आठ पाकळ्या टाका.
३. थोड्या चेचा. थोडे चमचाने ढवळा. पाण्यात छानसा काळपट लाल रंग उतरू द्या.
४. अर्धे रसभरे लिंबू त्यात पिळून घ्या आणि साल त्यातच उकळायला टाका.
५. चवीनुसार मीठ-साखर घ्या.
६. त्यात जास्तीचे पाणी टाकून एकदिड लीटरचे पातळ सरबत तयार करा.
७. सरबताची भरलेली बाटली जवळ बाळगा आणि पाण्यासारखे अधनामधना पित राहा.
सात स्टेप्स आणि सात मिनिटात आजारपणात जगवणारे लिंकोमीसा टॉनिक तयार Happy

03 kokam sarbat.jpg

४) डाळिंबाचे दाणे - फटाक्यांच्या माळेतील एकेक लवंगी सोडून वाजवावी तसे डाळिंबाचा एकेक दाणा तोंडात टाकत टाईमपास करायचा. तोंडाला चव येत राहते आणि काहीतरी पोटात जातेय याचे समाधान मिळते. मी त्यातील बी थुकतो. कारण मला माज नाही. पण किडनीस्टोन आहे.

५) तवा ब्रेड बटर - मी ते हॉटेलमधील ब्रेडबटर टोस्ट फार आवडीने खात नाही. मला माझ्या आईच्या हातचे आवडतात. ब्रेड स्लाईसच्या दोन्ही बाजूला मस्का लावून, तव्यावर परतून काविलत्याने दाबून दाबून, खरपूस भाजून किंचित ब्राऊनिश केलेले.. आजारी असो वा नसो, आवडीच्या ब्रेकफास्ट पदार्थांपैकी हा एक आहे.

04 bread butter.jpg

६) ऑलटाईम फेव्हरेट कांदेपोहे - प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी असा फेव्हरेट पदार्थ असतो की जो तो मेल्यावरही कावळा बनून खायला येतो. मग आजारपण काय चीज आहे.
माझ्यासाठी तो पदार्थ कांदेपोहे आहे.
माझ्या पोहेप्रेमाबद्दल ईथे सविस्तर जाणून घेऊ शकता - कांदे पोहे आणि फ्रेंडशिप डे - https://www.maayboli.com/node/54988
फोटो मात्र आजवर काढला नाही. कारण पोहे समोर आले की मी बस्स तुटून पडतो Happy
अरे हो, आजारपणात चहा प्यावीशी वाटत नाही, मात्र पोह्याबरोबर तेव्हाही जाते..

७) मॅगी - आजारात जसे डाळभात खावासा वाटत नाही तसे मॅगीही खायला होत नाही. पण आजारातून उठता उठता जेव्हा जीभ थोडीशी लपलपू लागते तेव्हा थोडीशी चटकदार चवीची गरमागरम मॅगी बरी वाटते. आजारात आईला खूप त्रास दिलेला असतो, पण मुळात आपलाच तो दुसर्‍यावर अवलंबून राहायचा त्रासदायक काळ असतो. त्यामुळे स्वत:च्या हाताने मॅगी करून खाणे बरे वाटते Happy

05 maggy.jpg

ईतरवेळी मी मॅगीवर बरेच प्रयोग करतो - या ईथे ते जाणून घेऊ शकता - १२ मिनिट म्यागी - https://www.maayboli.com/node/59052
मात्र आजारपणात माझ्या मॅगीचे प्रयोग टाळतो, बस्स अगदीच प्लेन नको म्हणून चवीपुरता हलक्या हाताने शेवफरसाण भुरभुरून घेतो.

८) सटरफटर - या प्रकारात नमकीन बिस्किटे खायला बरी वाटतात. त्यात मोनॅको डार्लिंग आणि मस्काचस्का हे आवडीचे.

ता.क. - ‘मांसाहार हेच खरे मनुष्याचे अन्न आणि तेच खरे पुर्णब्रह्म’ असे समजणारा मी एक नॉनवेजप्रिय व्यक्ती असलो तरी सामिष पदार्थांचे आमिष मला आजारात झेपत नाहीत. अगदी अंड्यापासूनही दूर राहतो.

असो, आणखी काही आठवलेच तर ईथेच भर टाकेन.... तसेच येत्या काळात आजारी पडलो आणि वरच्या लिस्टव्यतिरीक्त काही खाल्ले तर त्याचेही फोटो टाकेन. पण आता ईतरांचा आजार आहार जाणून घेण्यास उत्सुक Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेले काही दिवस दाढ दुखत आहे. चहा पिताना ती दातात जाऊन जी कळ उठते ती नकोशी वाटते. त्यावर उपाय म्हणून दोन दिवस चहा सोडायचे ठरवले. पण संध्याकाळपर्यंत वेड लागायची पाळी आली. मग पुन्हा त्यावर रिउपाय शोधला तो हा -

कोरा चहा + आईस टी + गरम पाणी
(कोरा चहा : गरम पाणी, प्रमाण १:२)

1607289708454.jpg

चहाची तल्लफ आली की घ्यावे हे गरमागरम अर्धा कप. दिवसातून चार वेळा म्हणजे दोन कप.
दाढदुखी आपल्या जागी आणि चहाची तल्लफ आपल्या जागी. एकमेकांना त्रास न देता प्रश्न सुटला.

माझी लिस्ट
1.इडली
2.रस्सम राईस
3.मुगाची खिचडी
4.मुगाचे वरण भात
5.तांदळाची पेज
6.दहीभात

संत्री, केळी, लिची, चिकू, पेरू, स्ट्रॉबेरी, गोड चिंचा, प्लम

काजू, बदाम, वाळलेले अंजीर, किसमिस, काळ्या मनुका, अक्रोड, पिस्ता

टोमॅटो, स्वीट कॉर्न, पालक, चिकन इत्यादि सूप, रस्सम

मूगाची खिचडी, वरण भात, दही भात, दूध भात

गरम सँडविच

ताक, सरबत, तुळशीचा चहा आले घालून, जास्वंदाचा चहा, नेहमीचा चहा, कॉफी

कशाने आजारी पडलो यानुसार यातील नको ते टाळावे.

नॉन वेज मध्ये चिकन सूप ,मटण पाया सूप, कोणताही माश्याचा रस्सा, सुकटी चा रस्सा(वाळवलेले बारीक कोळंबी) वाळवलेल्या बोंबील चे कालवण आणि भाकरी (अगदी बारीक चुरून )

वेज मध्ये फोडणी नसलेले वरण भात आणि फक्त मिठ टाकून बनवलेले ऑम्लेट.

माझे आवडते औषध या धाग्यावरील पोस्ट इथे देखील कॉपी पेस्ट करतो
--------------

आता औषधांकडे वळूया,
माझे सगळ्यात फेवरेट औषध म्हणजे ग्राईप वॉटर !
पोरांसोबत कित्येक बाटल्या रिचवल्या आहेत Happy

खोकला झाला की
१) मध + सितोपलादी
२) कोमट पाण्यातून अडुळसा
हे दोन्ही फेवरेट..
मुलगी तर खोकला नसतानाही मला पण मला पण करत प्यायला येते.

खोकला जास्त झाला असेल, अगदी घसा धरला असेल, तर आमच्याकडे एक चहा कॉफी पेक्षा भारी असा काढा बनतो. ज्यात ज्येष्ठमध खडीसाखर अजून बरेच काहीबाही टाकले जाते. चहा ऐवजी मग दोन दिवस सकाळ संध्याकाळ तोच पितो.

ॲसिडिटी झाली की अर्धा कप थंड दूध अर्धा कप पाण्यात टाकून घेतो.

मळमळत असेल तर पापडखार लिंबू सरबतमध्ये टाकून.. मीठ नाही टाकायचे त्यात. ते आधीच खारट असते.

उन्हाचा त्रास झाला, पित्त चढले तर कोकम सरबतला पर्याय नाही.

आजारी असलो, तोंडाला चव नाही, सतत मळमळत असेल तर आवडते औषध म्हणून मी एक लिंकोमिसा नावाचे सरबत बनवले आहे. लिंबू कोकम मीठ साखर. रेसिपी वरील धाग्यात दिली असावी.

औषध आवडते असो नसो, पेंटासा आयुष्यभर घ्यायचे आहे. आधी गोळ्या घ्यायचो. आता सॅचे घेतो. खायला मजा येते. असे वाटते गुटखा खातोय Happy

मला सर्दी,ताप,पोट अपसेट, डोकं दुखणे आजार काही ही असला तरी एकदम मऊ भात, तूप ,मीठ, मेतकूट आणि लिंबाचं तिखट लोणचं आणि वर पातळसर गोड ताक हेच आणि फ्कत हेच खावंसं वाटतं बाकी कश्यावर इच्छा नसते.

सर्दी तापात ताक ममोताई??
मला स्वताला ताक इतके आवडते की इच्छा तर फार होते आजारात सुद्धा.. पण प्यायची हिम्मत होत नाही. कारण जेव्हा जेव्हा हिंमत केली आहे किंवा मोह आवरला नाहीये तेव्हा तेव्हा खोकला झालाय, घसा धरलाय..
तुमचे असे होत नसेल तर नशीबवान आहात Happy

>>>>इच्छा तर फार होते आजारात सुद्धा.. पण प्यायची हिम्मत होत नाही.
मग तुमचा आय डी बदलून इंद्र करा Happy
तक्रम शक्रस्य दुर्लभम - अशी म्हण आहे.
- वरील म्हणित, व्याकरण गंडलेले असू शकते.

ताजे ,गोड ,पातळ ताक प्यायल्याने मला कधीच घसा खराब खोकला अस काही होत नाही ऋ. फ्रीज मधले थंड नको पण. नॉर्मल पिते मी.
तक्रम... हे मी ताक पिताना कायमचं मनात म्हणते. Biggrin Biggrin Biggrin

ताकात प्रो बायोटिक्स असतात डोक्यात ठेवून पी ऋन्म्या. नाही होणार त्रास. Happy आणि ममो म्हणताहेत तसं फार आंबट आणि गार नको पिऊ.

१) पातळ - येस मी तसेच पितो. कारण पातळ ताक चांगले असे आई लहानपणापासून मला सांगत आलीय. मला आधी वाटायचे, काटकसरी बाई आहे तर कॉस्ट कटींग हेतूने सांगत असावी. पण नंतर इतरांकडून सुद्धा हेच ऐकले.

२) ताजे - आमच्याकडे सर्वासाठी ताक मीच घुसळतो आणि तेव्हाच्या तेव्हा पितो म्हणजे ताजे म्हणू शकतो. पण दही मात्र घरी विरजण लावलेले नसते. तर बाहेरच्या डेअरीचे असते.

३) गोड - यात गोडव्यासाठी साखर टाकत असाल तर मात्र अवघड आहे. मला ताकात फक्त आणि किंचित मीठ लागते.

मायबोलीवर एक धागा आहे - तुम्ही चहा कशी पिता?
या धर्तीवर तुम्ही ताक कसे पिता हा देखील एक छोटा चर्चेचा विषय आहे. कारण रोजच्या जेवणात ताक असलेले बरेच जण असू शकतात. मला स्वतःलाच वरचे लिहिताना अजून चार पॅराग्राफ सुचत होते.

विकतच्या दह्याने त्रास होऊ शकतो. माझ्या मुलीला विकतच्या दह्याने तोंड येतं. विकतच दही घट्ट , गोड वगैरे असलं तरी मला एवढं आवडत नाही. असो.

बाहेरच्या दह्यात काहीतरी अ‍ॅसीड घालतात घट्टपणासाठी. घरी आरामात लावता येतं आणि लावावं दही.
ताक मीच घुसळतो आणि तेव्हाच्या तेव्हा पितो म्हणजे ताजे म्हणू शकतो>>>> इनोसन्स म्हणायचा का मी पणा? का कायच्या काय पणा Happy

मामी, आईला ठाउक आहे.
दिवसभरात दहा वेळा ती आम्हाला ही आठवण करून देत असते आणि दहा वेळा आम्ही तिला हे बोलून दाखवत असतो Proud

आशू, मला ताजे ताक म्हणजे नक्की काय हे खरेच कन्फ्युजन होते. म्हणजे दही घरचे ताजे हवे की ते घुसळल्यानंतर तयार झालेले ताक लगेच प्यायल्यास ताजे समजावे यात कन्फ्युजन होते.. इनोसन्सऐवजी बावळट पणा म्हटले तरी चालेल Happy
आणि स्वतः ताक घुसळणे म्हणाल तर मला स्वयंपाक येत नाही. त्यामुळे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी जमतात त्या घरी मीच करतो. किंवा मलाच करायला लावतात. ताक घुसळने या पैकी एक. लग्नाला दहापेक्षा जास्त वर्षे झाली. मुलगी आता अकरा वर्षाची होईल. पण मी आजवर माझ्या बायकोला ताक घुसळताना कधी पाहिले नाही.

Pages