कुणाशी तरी बोलायचंय

Submitted by मी चिन्मयी on 4 December, 2020 - 18:43

इथे खूप धागे ऑलरेडी आहेत. त्यामुळे यात काय नवीन असं बर्याचजणांना वाटू शकतं. मुळात पर्सनल प्रॉब्लेम्स इथे कशाला मांडायचे असाही मतप्रवाह असू शकतो. पण मला गरज आहे. व्यक्त होण्याची. अनोळखी माणसं बरा ऑप्शन आहे कारण कुणी 'जज' करणार नाही. आणि केलंच तरी उद्या ऊठून त्यांना सामोरं जावं लागणार नाही.
‌माझं लग्न होऊन आता दोन वर्ष होतील. मी तिशीची आणि तो पस्तीशीचा असताना लग्न झालं. छानसं गोंडस पिल्लूही जन्माला आलंय. समाजाच्या दृष्टीने संसार फळाला आलाय. सार्थक झालंय. कुटुंब पूर्ण झालंय. पण आत कुठेतरी मी अपुर्णच राहिलेय. याचं कारण म्हणजे नवरा बायको म्हणून आम्ही एकत्र राहिलोच नाही. अगदी सलग १० दिवसही नाही. नवरा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो. विकेंड्सना घरी येतो. अर्थात ही गोष्ट लग्नाआधीही माहिती होतीच. पण तेव्हा या गोष्टीचा इतका त्रास होईल असं वाटलं नव्हतं. आणि कुठेतरी आशा होती की तो मला त्याच्यासोबत तिकडे घेऊन जाईल. पण हे बोलून दाखवण्याची हिम्मत झाली नाही. आणि त्याने सोबत नेलं नाही. लग्नानंतर १०-१२ दिवसांनी त्याची सुट्टी संपली आणि तो कामावर हजर झाला. नव्याचे नऊ दिवस नवीन ओळखी, नवीन घरात रुळण्याचा प्रयत्न यात विरून गेले. मग एकटेपणा जाणवायला लागला. फोनवर बोलणं व्हायचंच. पण ते पुरेसं नव्हतं. त्याची सोबत हवी होती. त्याला डोळ्यांसमोर बघायचं होतं. पण नाही. मग रात्री गुपचूप उशीत तोंंड खुपसून रडणं सुरु झालं. घरचे लोक काळजी घेत होतेच. पण ही मनस्थिती कुणाला सांगणार? अशातच मला एक जॉब मिळाला. माझा दिवस बाहेर जायला लागला. पण संध्याकाळ घरीच होती. आणि ता वेळ अक्षरश: जीव खायला यायला लागली. जॉब ही पळवाट झाली. स्वत:ला कितीही गुंतवून ठेवायचं म्हटलं तरी २४ तास काय करणार? नवर्यासोबत खटके उडायला लागले. छोट्या छोट्या गोष्टी हर्ट करायला लागल्या. फोनवर रडारड आणि घरच्यांसमोर हसतमुख चेहरा अशी कसरत सुरू झाली. एक वर्ष होत आलं.मनातली पोकळी अजूनच मोठी झाली. दोघांचं वय थोडं जास्त असल्याने 'चान्स' घ्यायचं ठरलं. प्रेगनन्सी कन्फर्म झाली. आनंदाचे वारे वाहायला लागले. थोडे दिवस छान गेले. पण पुन्हा ती पोकळी जाणवायला लागली. यावेळेस जरा जास्तच. हार्मोन्समुळे असेल कदाचित. पण एकटेपणा पुरता खायला उठला. सतत वाटायला लागलं की हे मुल नको. जिथे आपलंच नातं स्थिर नाही तिथे हे नवीन कशाला. पण अबॉर्शन करायला किती हिम्मत लागते हे तेव्हा कळलं. नाही जमलं. आता बाळ झालंय तेव्हा ते नकोच होतं ही फिलिंग प्रखर व्हायला लागलेय. पोस्टपार्टम डिप्रेशन गळ्यात पडलंय. पण त्याची सुरूवात तर खूप आधीच झालेय. प्रचंड चिडचिड, रडारड (पुन्हा घरच्यांपासून लपवूनच) होतेय. यात विचार जोर धरू लागलाय तो सगळं संपवण्याचा. स्वत:ला आणि बाळालाही. हे किती चुकीचं आणि अमानुष आहे याची कल्पना आहे. तरीही.
‌-बाळावर जीवापाड प्रेम आहे माझं. नवर्यावरही आहेच. पण आता सगळंच नको नकोसं वाटतंय. काहीच नकोसं वाटतंय.
‌-त्याने लग्नानंतर मला सोबत नेलं नाही कारण त्याला वेगळा संसार मांडायचा नव्हता. मी तयार झाले कारण तेव्हा एवढा त्रास होईल याची कल्पना नव्हती. नंतर माझ्या जॉबमुळे जाता आलं नाही आणि पुढे प्रेगनन्सीमुळे. तरीही बाळ झाल्यावर तो मला सोबत घेऊन जाणार असं ठरलं. पण मध्यंतरी त्याचे वडील कोरोनामधे गेले. तो एकुलता एक नसला तरी घरची जबाबदारी त्याच्यावर आली आणि पुन्हा माझ्या स्वप्नांना खिळ बसली. आता वेगळं होणं शक्य नाही.
‌-त्याची बदली इकडे व्हायला अजून ६ महिने आहेत. पण माझा पेशन्स संपलाय. आणि कशी कुणास ठाऊक पण त्याच्यासोबत जाऊन राहण्याची इच्छाच मेलेय. ज्याला एक नजर बघायला जीव तळमळायचा तो नजरेसमोर नको झालाय. सगळ्याचाच उबग आलाय.
‌- एकटीनेच रहायचं होतं तर मी लग्न कशाला केलं? सगळंच मनाविरूद्ध कसं काय आणि कधीपर्यंत? आता तो तयार आहे मला सोबत घेऊन जायला पण माझीच इच्छा नाहीये. सगळं फ्रस्ट्रेशन ओवरफ्लो व्हायला लागलंय आणि माझं बाळ त्यात भरडून निघायला लागलंय.
‌- माझे विचार चुकीचे आहेत, बाळाची यात काही चूक नाही, नवर्याचा नाईलाज आहे हे सगळं माहितेय मला. पण नाही सहन होत आता. नुसता सेल्फिश विचार करून भागत नाही तसं वागावंही लागतं कधीकधी. ते मला जमलंच नाही. मीच हट्ट करायला हवा होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नवरा नोकरी निम्मित बाहेर गावी राहतो पण week end ला घरी येतो

असा उल्लेख आहे.
ह्याचा अर्थ नवऱ्याचे कामाचे ठिकाण हे 100 किलो मीटर पेक्षा कमी अंतरावर आहे.
एवढं अंतर असेल तर च आढवड्याला घरी येवू शकतो.
1)त्याचा पगार नवीन ठिकाणी राहण्याचा खर्च भागवू शकेल एवढं आहे का,भविष्याची बचत पकडुन.
2) त्याचे स्वतःचे घर त्या ठिकाणी आहे का.
नवीन घर घेणे किंवा भाड्या नी घर घेणे त्याला परवडेल का.
3) आणि समजा परवडलं तरी नवीन जागेत बायको ला लहान मुला सहित दिवसातून 10 ते 12 तास एकटे ठेवणे सुरक्षित आहे का.
ह्या सर्व प्रश्नांना ची उत्तर पण शोधावी लागतील ना.
लहान मूल असेल तर एक व्यक्ती कायम बरोबर असायला हवी त्यांची सासू बाई त्यांच्या कडे आहे हा प्लस पॉइंट झाला.
असा mature विचार करावाच लागेल.

खरंच पुन्हा खूप thank u सगळ्यांनाच. तुमच्याकडून पॉझिटीव एनर्जी मिळते आहे, ज्याची अत्यंत गरज आहे. आणि ती इथे जवळच्या कुणाकडून मिळणं निव्वळ अशक्य आहे. नवर्याची सोबत म्हणजे फक्त फिजिकल रिलेशन नाहीच. इमोशनली कनेक्ट होणं गरजेचं आहे. ते सोबत वेळ घालवल्यानेच शक्य आहे. दिवसभरात अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी होतात, त्या त्याला सांगाव्याशा वाटतात. कधी फक्त त्याला बघाव़सं वाटतं. बाळ रोज काहीतरी नवीन छान छान गोष्टी करतं. तेही त्याच्याकडून मिस् होत़य. जे माझ्या हातून सुटलं ते माझ्या बाळाच्या हातूनही सुटतंय. ते मला मान्य नाहीये.
बाळंतपण माहेरीच झालंय पण इथे घर सुनं वाटतं म्हणून लवकर आणलंय.

भरत+१
आज बोकलत यांनी खराखुरा अनुभव लिहिल्याचे पाहून माझे डोळे भरून आले.

नवर्याची सोबत म्हणजे फक्त फिजिकल रिलेशन नाहीच. इमोशनली कनेक्ट होणं गरजेचं आहे. ते सोबत वेळ घालवल्यानेच शक्य आहे. >> ही अगदी महत्वाची गरज आहे. सद्य परिस्थितीत त्यांचे वडील गेलेले असल्याने ते ही थोडे भांबावलेले दु:खी असतील तर त्यांना व्यक्त होउ द्या. तुमचे दोघांचे इशूज जे आहेत डिस्कस करायला व सॉल्व्ह करयला वेळ हातात आहे. ग्रीफ मध्ये अस्ताना त्यांना तुम्हाला अपेक्षित उत्तरे देणे जरा अवघड आहे.
ह्यात तुमच्या गरजांकडे दुर्लक्ष करा असे आजिबात नाही. ते दु:खातून बाहेर आले की परिस्थिती नीट समजू शकतील. कपल्स काउसेलिंग आवश्यक असल्यास घ्या नक्की.

बोकलत तुम्हाला माज्या तर्फे एंपथी. समजू शकते परिस्थिती.

माझे सासरे हैद्राबादेस नोकरी करत त्यांनी बायको वारल्यावर माझ्या सासुबाईंशी लग्न केले पण आर्थिक गरज होती म्हणून त्यांना पुण्यात नोकरी करवत ठेवले. ह्या मुळे साबांची फार चिड चिड होत असे. नोकरीत हाय पोस्ट ला असल्याने( हेड ऑफ डिपार्ट मेंट) तिथले पर्क्स सोशल
सर्किट व गायन सर्किट मध्ये असलेली मानाची पोझिशन सोडून पगार सोडून पूर्ण वेळ गृहिणी होणे त्यांना पचनी पड त नव्हते. पण नवरा दूर आहे हे ही रुचत नसे. ती चि ड चीड आमच्यावर निघायची. ते पण एकत्र आले - साबु इथे पुण्यात आले कि किंवा कॉलेजाच्या मोठ्या सुट्टीत त्या हैद्राबदेस गेल्या की बिट्स पार्ट्स मध्ये संसार शेअरिन्ग जवळीक होत असे. पण भांडणे ही तितक्याच जोरात होत.

माझे लग्न फर्स्ट इअर्ला असताना झाले. १९८२ मध्ये लग्न व १९८४ मध्ये मे महिन्यात आम्ही हैद्राबादेस गेलेले असताना साबुंचे अचानक हार्ट अ‍ॅटेक ने निधन झाले. तेव्हा साबा एकदम दिशा हीन झाल्या. त्यांनी नुकता च राजिनामा देउन पूर्ण वेळ हैद्राबादेस शिफ्ट व्हायचे ठरिवले होते.
ह्या राजिनामा नाट्याचा पण साबुंना हार्ट अ‍ॅटेक येण्यात हात असावा. कारन शी वॉज इन टू माइन्ड्स. त्यात त्यांना मुले जवळ नको होती. दोघे दोघेच राहायचे होते. हे साबुंना नको होते.

माझ्या नवर्‍याची बंगलोर ला बदली झालेलीच होती. म्हणजे डिग्री घेउन मी बंगलोरास गेले असते पण माझ्याच वयाच्या नणंदेचे काय?

१९८४ मध्ये सासरे वारले तर साबा परत आल्या व राजिनामा परत घेउन रिटायर मेंट परेन्त नोकरी केली. १९८५ मध्ये ग्राजुएट डिग्री हातात घेइपरेन्त
मी तिथेच पुण्यात राहिले व परीक्षा होताच की हैद्राबादेस आले. नणंद पण माझ्या बरोबर आले. पण ह्या वेळे परेन्त नवृयाला एकटे राहावे लागले. व वडील वारल्याचा धक्का दु:ख पचवता पचवता नव्या नोकरीत अ‍ॅडजस्ट व्हावे लागले.

त्याची नोकरी सोडून तो साबुंच्या जागी रुजू झाला होता. ही सेम परिस्थिती मी तो अचानक साबुंच्याच वयाचा असताना वारल्यावर अनुभवली तेव्हा मला तो नक्की कश्यातून गेला असेल ते कळले. त्याकाळात मी त्याच्या जव्ळ राहाय्चे तर शिक्षण सोडूनच द्यावे लागले असते.
लिहायचा उद्देश की परिस्थिती अवघड असते एकत्र राहायची आवड व गरज कपल मध्ये असतेच. तुम्ही म्हणता तसे अनेक गोड क्षन एकत्र अनुभवायचे असतात. तर न चिड चिड होउ देता शांत पणे सर्व परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्या. बाळाचा जीव घेण्याचा हक्क कोणत्याही पालकाला नसतो. तो विचार सोडून द्या. आर्थिक परिस्थिती असल्यास मदतनीस ठेवा. बाळाला आई व बाबा आहेत ही फार चांगली आनंदाची बाब आहे तिला तो अ‍ॅड्व्हांटेज उपलब्ध करून द्या. एकत्र राहायला मिळावे ह्यासाठी मज कडून शुभेच्छा. धीर सोडू नका
आप दिल छोटा मत करो.

मी लहान असल्यामुळे या बाबतीत तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही पण वाचताना खरच तुमचं दुःख जाणवलं. मरायचे विचार मनात आले की आपल्या पिल्लाकडे बघत जा. तो पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे आणि त्याची या सगळ्यात काही चूक नाही. ही वेळ पण निघून जाईल हे कायम मनाशी पक्कं करा. काळजी घ्या.

मी_चिन्मयी, सर्वात आधी एक घट्ट मिठी! It's alright to feel overwhelmed at times. बाकीच्या सगळ्यांनीच उत्तम सल्ले दिले आहेत. बोकलत यांचा दृष्टिकोन बेस्ट आहे - जेव्हा परिस्थिती बदलणे हातात नसते तेव्हा one day at a time असा approach ठेवणे श्रेयस्कर. आणि आता सहाच महिन्यात तुम्हाला एकत्र राहता येणार आहे ना? मग हे सहा महिने भुर्रकन उडून जातील. जेव्हा एकत्र असाल तेव्हा सहा महिन्यांनंतर काय काय कराल याच्या विशलिस्ट्स बनवा. पुढची स्वप्नं नेहमीच आधार देतात!
But first things first, तुमच्या गायनॅकॉलॉजिस्टना फोन लावा किंवा भेटा (जे लवकर शक्य असेल ते). शिवाय घरातल्या कोणाशी तरी बोला की तुम्हाला पोस्ट पार्टम डिप्रेशनचा त्रास होतो आहे. तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य तो वैद्यकीय सल्ला देतीलच. You need not go through this alone. माहेरी सासरी याविषयी मोकळेपणाने बोला (तुम्हाला ज्यांच्याशी बोलताना कंफर्टेबल वाटेल अशांशी). This is a phase. It's treatable and completely curable. नवऱ्यालाही कल्पना द्या. एकदा का तुमची मनस्थिती सुधारली की तुम्हालाच अजून छान कल्पना सुचायला लागतील!
जेव्हा वाटेल तेव्हा मायबोलीवर मोकळेपणाने लिहा. We are lots of ears Wink
Remember, this too shall pass! All the best!

चिन्मयी, मनातलं सगळं व्यक्त केलंत हे खूप चांगलं केलंत. सर्वांनीच खूप चांगले सल्ले दिलेत. मीही पोस्ट पार्टम डिप्रेशनमधून गेलेय. I quit , या स्टेजला मीपण पोचले होते. पण निव्वळ माझ्या लेकीसाठी माझा पाय मागे घेत होते. कारण तेव्हा घरात माझी हक्काची अशी तीच एक होती, असे विचार तेव्हा डोक्यात होते. तिला तिच्या पायावर उभी राहीपर्यंत मी तिच्यासाठी असलेच पाहिजे, या एकाच इच्छाशक्तीवर मी या नकारात्मक मनस्थितीतून मी स्वतःला बाहेर काढलं.

या सर्वात मी वैद्यकीय मदत घेतली नाही, पण त्यामुळे मला खूप मानसिक त्रास झाला. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय मदत नक्की घ्या आणि यातून लवकर बाहेर या. मनातली खदखद साठवून न ठेवता व्यक्त होत रहा.

शिवाय स्वतःकडे लक्ष द्या. थोड्या स्वार्थी व्हा. पण आपण दुसऱ्यांंकडून गृहीत धरले जात असू, तर ते वेळीच ओळखा आणि तुम्हालाही तुमचा वैयक्तिक वेळ मिळायला हवा, हे घरच्यांना सांगायला शिका.

इथे सगळ्यांनी खूप समजूतदार प्रतिसाद दिले आहेत , त्यांचा तुम्हाला फायदा होईल ही आशा ... तुम्हाला सल्ला देण्याएवढा अनुभव आणि पात्रता अजिबात नाही पण जे वाटतं ते सांगते ... कमी जास्त असलं तर राग मानून घेऊ नका ..

सध्या तुमची स्वतःची पूर्ण रिकव्हरी आणि बाळ ह्या तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असायला हव्यात ... शारीरिक आजार असता तर कोणी तुमच्याकडून घरची जबाबदारी रेटण्याची अपेक्षा ठेवली नसती , मग आता का ? शक्य असेल तर बाळाला घेऊन माहेरी जा ... स्वतःला संपवायचे विचार येतात हे नवऱ्याला आणि तुमच्या आईवडिलांना सांगा ... योग्य पद्धतीने .. म्हणजे आहे तशी परिस्थिती रेटून नेणं तुम्हाला पेलत नाहीये , तुम्हाला ब्रेकची नितांत गरज आहे , हे सगळ्यांच्या स्पष्ट लक्षात येईल . माहेरी बाळाला सांभाळायला फुल टाईम / पार्टटाइम मदतनीस बाई ठेवा .. तिकडेही स्वतःला फक्त घरकामात गुंतवून घेऊ नका , आराम करायला आला आहात असं आधीच सांगा ... लवकरात लवकर काऊन्सिलर - मेडिकल ट्रीटमेंट चालू करा आणि थोडा व्यायाम - बाळाला कोणाकडे तरी सोपवून अर्धा तास मोकळ्या हवेवर झाडांच्या सान्निध्यात फिरून येणं , योग्य आहार ( अगदी कधी मुद्दाम तुमच्या आवडीचा ) , तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी - सिरिअल्स ( ओरिजिनल्सचा धागा पाहिला ) - Me time .. घालवता येईल असं बघा ... हे सगळं तुम्हाला सासरी कितपत जमेल शंका आहे ...

तुमचे मिस्टर समजूतदार असतील . आजकाल निदान सुशिक्षित कुटुंबात तरी डिप्रेशनबद्दल फारसं अज्ञान राहिलेलं नाही , त्यांनी समजून घ्यायला हवं . तुम्ही कशाहीबद्दल गिल्टी वाटून घेण्याची गरज नाहीये ... तुम्ही आजारी असता तर सासरची , सासूबाईंची जबाबदारी सांभाळण्याची व्यवस्था मिस्टरांनी लावलीच असती ना मग मनाच्या आजारात का नाही ? शरीर धडधाकट आहे म्हणून मनाच्या आजारांना कमी लेखू नये हे आपण वारंवार पाहतो , अगदी ताजं ताजं उदाहरणही तुम्हाला माहीत असेलच ..... शरीर कमकुवत झालं की दिसतं , मन झालेलं इतरांच्या लक्षात येत नाही . पण तुम्ही तरी त्याला कमी लेखण्याची चूक करू नका ... गांभीर्य लक्षात घ्या ... निभावून नेईन , निभावून नेईन म्हणत असतात आणि एक क्षण असा येतो जिथे आता निभावायला जमणारच नाही म्हणून खचतात एकदम ... ती वेळ येईलच असं नाही पण रिस्क का घ्यायची .... खडखडीत बऱ्या होईपर्यंत तुम्ही स्वतः , तुमची तब्येत आणि तुमचं बाळ सोडून इतर सगळं , सगळ्या जबाबदाऱ्या , सगळ्या कमिटमेंट्स , बायको - सून ह्या सगळ्या भूमिका , कोणाला काय वाटेल , कोण काय म्हणतील हे सगळं गेलं चुलीत . सॉरी , राग मानून घेऊ नका ... चांगल्या भावनेनेच सांगत आहे ...

वरच्या सर्व तळमळींच्या सल्ल्यांना मम.खरंतर लिहिल्यानंतर तुम्हाला अर्धे बरे वाटले असेल.छान केलेत लिहिले ते.गुड लक!

डॉक्टरची गरज आहे आणि लवकरच जाणारही आहे. पण तोवर कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं होतं. म्हणून इथे

>> बिग हग. शुभेच्छा.

त्याच विषयात हे चूक की ते बरोबर असे सल्ले देवून मानसिक घालमेल थांबत नाही.
त्यांनी स्वतः ला कशात तरी गुंतवून घेतले पाहिजे,
सिरीयस कार्यक्रम टीव्ही न बघता कॉमेडी कार्यक्रम बघितले पाहिजेत.
टेंशन देणारे विचार डोक्यात आलेच नाही पाहिजेत.
त्यांच्या sep मधील धाग्यात त्यांना उच्च रक्तदाब चा त्रास आहे असा उल्लेख आहे.
शरीर आणि मेंदू म्हणजे तरी काय एक केमिकल लोच्या च असतो.
Dr योग्य औषध देवून निराशेच्या भावना मनात निर्माण करणारे हार्मोन्स वर कंट्रोल करतात.
स्वतः चे मन ताब्यात नसेल सारखे त्याच विषयाकडे धावत असेल तर dr च सल्ला आणि औषध च योग्य.

चिन्मयी नवरा जवळ नसणे या परिस्थितीतुन मी पन गेलेय,आम्ही दोघे नासिकचे, दोघांचं शिक्षण पुण्यात झालेले, लग्नानंतर नवऱ्याच्या जॉब मुळे मुंबईत होतो, दोघांनी स्वतःचे घर घेतले कुणाचाही आधार न घेता, यासर्व धामधुमीत लग्नानंतर 8वर्षांनी प्रेग्नंट झाले(ते दिव्य वेगळे होते). पण नवरयची अचानक पुण्यात बदली झाली, प्रमोशन वर, त्याच्या बॉस ने सांगितले की क्लायंट साइड प्रोजेक्ट आहे 8 महिण्याचे, तू जा,।मग परत ये मुंबईत, त्यावेळी मी पण जॉब करत होते अनि साबू आणि साबा होत्या मुलाकडे बघायला, जाऊ दे अशी ट्रान्सफर होते असे मनाला समजवून नवरा पुण्यात आला,
पण इथे आल्यावर 1 वर्ष झाले , 2 झाले तरी रिलीज काही मिळेना, वय चाळीशी च्या आसपास त्यामुळे settle जॉब सोडून देण्याची रिस्क नको होती,
इकडे एकदिवस साबूची तब्येत रात्री अचानक बिघडली, रात्री 2 वाजता शेजारच्या मदतीने ऍडमिट केले हॉस्पिटलमध्ये, पण त्यांची तब्येत अधिक खालावल्याने ते परत नाशिक ला गेले,
आता मी आणि मुलगा एकटे राहिलो, माझा IT मधला चांगला जॉब सोडला कारण नवरा नाही मुलगा दिवसभर एकटा, या दरम्यान नवरा प्रत्येक वीकएंड येत होता मुंबईत( मगरपट्ट यातील ऑफिस मधून शुक्रवारी रात्री साडे आठ निघायचे , पूणे स्टेशनवर जाऊन 9,30ची शिवनेरी पकडून न जेवता रात्री1,45 सायन ला उतरून घरी कांदिवली ला यायला 2,30 वाजयचे, आणि सोमवारी पहाटे साडे तीन ला उठून 5 ची परत शिवनेरी पकडून 10 ला ऑफिसमध्ये जायचे) असे जवळपास 6 7 महिने केले, यादरम्यान एक वेगळाच प्रॉब्लेम सुरू झाला, मुलगा नवऱ्याच्या जवळ जाई ना, त्याला माझ्याशी बोलू द्ययायचा नाही, मुलगा त्याच्या मित्राच्या घरी खेळायला नेल्यावर मित्राच्या बाबांशी खेळायचा( मुलाचे वय 7 वर्षे होते,हे मला।आणि नवऱ्याला खूप शोकिंग होते)
आता 2 घरे(मुंबई आणि पुणे) चालवणे जड जाऊ लागलं, मुंबई सोडवत नव्हतती, करण चांगली शाळा, नौकरी च्या संधी माझ्या साठी किंवा नवरयची साठी पण, स्वतःचे घर वगैरे ,आजून कुठेतरी आशा होती नवरा परत येईल, त्याची ट्रान्सफर होईल,
मग नवऱ्याने दुसरा जॉब बघण्यास।सुरुवात केली, त्यात यश येत नव्हते,
मग मनाचा हिय्या करून पुण्यात शिफ्ट व्हायचे ठरवले, जे काय होईल ते होईल असा विचार करून,( म्हणजे मध्येच परत मुंबईत ट्रान्सफर झाली तर वगैरे),
मग एक आठवडा मुला साठी पुण्यात येऊन शाळा शोधली, मगरपट्ट जवळ भाड्याने घर घेतले हेतू हा की मुंबईत 3 4 तास travelling मध्ये जायचे ते इथे नको, आणि अखेर शिफ्ट झालो,
मला पुण्यात येण्याचे स्वातंत्र्य होते, तुम्हाला ते नाहीं
वर लोकांनी अतिशय चांगले सल्ले दिले आहेत, मी इतकेच सांगेन की थोडा धीर धारा आणि खंबीर राहा, सगळे नीट होईल, ( अजूनही मन मुंबई पुणे तुलना करत रहाते)

<<<प्रचंड चिडचिड, रडारड (पुन्हा घरच्यांपासून लपवूनच) होतेय. यात विचार जोर धरू लागलाय तो सगळं संपवण्याचा. स्वत:ला आणि बाळालाही. हे किती चुकीचं आणि अमानुष आहे याची कल्पना आहे. तरीही.>>> please please visit a psychiatric immediately. .. ASAP. .. this is due to "chemical locha" in brain. You are not the only one who experience this. The medicines work like miracle in such cases. But please please hurry up and visit the doctor today itself. Best wishes for you... you will be perfectly fine after a short course of medicines. .. blessings for you and baby.
Sorry for English typing.

मी पण तेच सांगत आहे.
भावनांचा गोंधळ निर्माण झाला आहे त्या साठी dr कडे जावून रीतसर औषध घेणे हाच उपाय आहे.
आत्महत्या,हत्या सारख्या अतिउच्च टोकाच्या भावना निर्माण होतात ह्याचा अर्थ हार्मोन्स संतुलन बिघडले ल असावे
हा अतिउच्च भावनिक गोंधळ आहे.
त्या साठी dr च योग्य उपचार करतील.
नवरा जवळ नाही पण दोन दिवस तरी असतो ना विक इंड ला.
बरोबर का घेवून जात नाही ह्याची पण कारण त्यांना माहित आहेत.
तरी अस्वस्थ होण्याचे काहीच कारण नाही.
त्यांना ज्या समस्या वाटत आहेत त्या समस्या समजण्या एवढ्या मोठ्या घटना नक्कीच नाहीत.
स्पष्ट लिहलय त्या बद्द्ल क्षमस्व.

चिन्मयी तुम्हाला बिग हग! इथे सगळ्यांनी छान सल्ले दिले आहेत.
लवकरात लवकर डॉक्टरांची अपाँइटमेंट घ्या. यातून मन स्थिरावले की तुम्हा दोघांसाठी कपल काउंसेलिंगही घ्या. साचलेले सगळे निचरा होवून जाऊ दे. डॉक्टरांची तारीख मिळेपर्यंत स्वतःला सांभाळण्यासाठी हेल्पलाईनला कॉल करा. भारतात आहात तर नॅशनल सुईसाइड प्रिवेंशन हेल्पलाईन 1-800-121-3667 हा मदतीचा मार्ग आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे, फ्री आणि कॉन्फिडेन्शिअल आहे केवळ सुईसाइडच नव्हे तर इतरही समस्यांसाठी तुम्हाला ऐकणारे कान आणि आधार मिळेल.
त्यांचे संकेत स्थळ https://hellolifeline.org/

https://youtu.be/R-dXS5TI_dQ

मला खरंच माहीत नाही मी हे इथं का पोस्ट करतोय.. कदाचित दारूचा अंमल किंवा या धाग्याचा मी करत असलेला continuous विचार.. पण नक्की ऐका

चिन्मयी , सगळं ठीक होईल गं राणी... बिग हग्ज गं
हेही दिवस जातील ... सगळ्या प्रतिसादांतून जे काय पटतं ते घे. आम्ही आहोत नेहमीच... विपु कर लागल्यास.

सेल्फीश बनायला शिका... स्वतःसाठी नाही विचार करणार तर कोणासाठी??
नाही म्हणायला शिका... जिद पे अडना आना चाहीये... काही लोकांसमोर आपण वाईट ठरलो म्हणजे आपण खरेच वाईट होत नाही...
अडजस्टमेंट असावी पण एक लिमिट पर्यंत...संपूर्ण आयुष्य कॉम्प्रेमाईज करण्यात घालवण्यासारखी चूक नाही...

चिन्मयी,
सगळ्यांनी आधीच खूप चांगले सल्ले दिले आहेत. कृपया डॉक्टरची मदत घ्या. नवऱ्याशी पण (न भांडता) मनातले स्पष्ट बोलून घ्या. असे दूर रहाणे कदाचित त्यालापण आवडत नसेल, पण नाईलाजास्तव कदाचित तो पण काही बोलत नसेल. एकमेकांना साथ मिळाली की सर्वांना बरे. सहा महिने बघता बघता जातील. तुम्हाला शुभेच्छा.

हा पण विचार करा.
सैन्यात काम करणारे 8 ते 9 महिने घराबाहेर असतात एकटेच..
शीप वर काम करणारे 6 ते 7 महिने घरा पासून लांब असतात.
ज्यांना विदेशात साधी नोकरी आहे ते 2 वर्ष घरा पासून लांब असतात.
आयएएस ,आयपीएस नवरा बायको असतील तर वेगवेगळ्या राज्यात असतात
किती तरी महिने एकत्र येवू शकत नाहीत.
भविष्य उज्वल हवे असेल तर त्याग पण आलाच .
पण तो हसत करता आला पाहिजे.
आणि हा त्याग एक च व्यक्ती करत नाही तर कुटुंबातील सर्व करतात.
आई ,वडील ना पण मुलगा जवळ हवा असे वाटते.
आणि भूमिका प्रत्येकाच्या बदलत असतात.
आज बायको असणारी उद्या आई होणार असते आणि नंतर आजी होणार असते.
तसेच.
मुलगा, नवरा,भाऊ,बाप,ह्या मधून पुरुषानं पण जावे लागते.
हेच नात जवळ च हे लांब चे असे काही नसते..
सर्व च नाती जवळची असतात.

तुमची माहिती वाचून सुचवावेसे वाटते.
आयुष्याला काही ध्येय ठेवा...आवडीच्या कामासंबंधातले मोठे उद्दिष्ट ठेवा...त्याच्या पूर्तीचे ; रोजचे -आठवड्याचे -महिन्याचे -वर्षाचे - ५ - १० वर्षांचे उद्दिष्ट निर्माण करा ...आणि स्वतः ला झोकून द्या ...
चेहऱ्यावर सतत हास्य ठेवा...ते केल्याने सकारात्मक संप्रेरकांचे राज्य सुरु होईल..
हळूहळू सगळे बदलून जाईल.

चिन्मयी , सगळं ठीक होईल. व्यक्त होणं ही गरज आहे. सगळ्यांनी छान सल्ले दिलेत.
तुम्हाला योग्य दिशा सापडो अशी शुभेच्छा.

बोकलत, तुम्हालाही शुभेच्छा! बाकी दुपारी सगळे झोपल्यावरच बासरी का वाजवायची म्हणे? Light 1

चिन्मयी कशा आहात?
वरती सगळ्यांनी छान सल्ले दिले आहेत
काळजी घ्या
बाळ आहेच तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर काढेल ते पिल्लू <३
शुभेच्छा

बाकी दुपारी सगळे झोपल्यावरच बासरी का वाजवायची म्हणे? >>>> माणसाने फक्त रात्रीच झोपावे असं मला मनापासून वाटतं. देवाने झोपण्यासाठी खास रात्र निर्माण केली आहे त्यामुळे जे दुपारी झोपतात ते देवाच्या या देणगीचा अपमान करतात असं मला वाटतं. त्यामुळे दुपारी बासरी वाजवून झोपलेल्या माणसांना उठवणं हि एक प्रकारची देवपूजा आहे. तसेच दुपारी माणसाकडे भरपूर फावला वेळ असल्यामुळे तो आत्मचिंतन व्यवस्थित करू शकतो. दुपारी न झोपल्यामुळे वजन वाढत नाही आणि माणूस सुदृढ राहू शकतो, तसेच यावेळेत सासू सुना एकमेकेंशी बोलल्यामुळे त्यांच्यात जिव्हाळ्याचे नातेसंबंध तयार होतात. त्याचा डायरेक्ट्ली फायदा घरातल्या पुरुष माणसांना होऊन त्यांचे मानसिक संतुलन चांगले राहते. याचा फायदा ते ज्या कंपनीत काम करत असतील तिथल्या वातावरणावर होऊन कंपनीत एक फ्रेंडली वातावरण निर्माण होते. असे भरपूर फायदे सांगता येतील.

चिन्मयी कशा आहात आता?
इथे खूप चांगले सल्ले दिलेत बऱ्याच जणांनी, आशा करते तुम्हाला त्याचा फायदा होईल.

अगदी नाही पण थोडीफार तुमची मनस्थिती समजू शकते असे वाटते. माझ्या गरोदरपणात मीही खूप डिप्रेस झाली होते . कोरोना असल्याने उगाच रिस्क नको म्हणून नवरा तीन महिने जुन्या घरी राहत होता. रोज बोलणे व्हायचे, व्हिडीओ कॉल व्हायचे, मला आवडतात म्हणून गिफ्ट पाठवायपचा , दूर राहून घेता येईल ती सर्व काळजी घ्यायचा माझी, तरीही व्हायचा मानसिक त्रास. शेवटी जे होईल ते होऊदे म्हणून परत आला इकडे रहायला.
ते तीन महिने खूप तणावात गेले होते माझे, इथे तर तुम्ही लग्न झाल्यापासून ह्या परिस्थितीतून जात आहात, त्यात बाळाची जबाबदारी.

काळजी घ्या अन सकारात्मक रहा इतकेच म्हणू शकते

Pages