कडाकणी-- नुसतं नाव घेतलं तरी गरम गरम चहा आणि प्लेट मध्ये कडाकण्यांची चळत डोळ्यासमोर आली. कोल्हापूर बीबी वर रोजच्या गप्पा मारताना अचानक कडाकण्याचा विषय निघाला. सगळं लहाणपण डोळ्यासमोरुन जाऊ लागलं..
कोल्हापुरला आमची १२-१३ घरांची गल्ली. दसरा जवळ आला की घरातले सगळं झाडणं-पुसनं करून जीव मेटाकुटीला आलेला असायचा. एक आणि एक भांड आणि एक आणी एक कपडा धूऊन काढंण काही खायचे काम नसायचे. अगदी माळा पण लख्ख व्हायचा. पण हा सगळा शीण कडाकणी नाव काढताच् रंकाळा/कळंबा तलावाच्या पल्याड पळुन जायचा....
एक्मेकांच्या सोयीनुसार कडाकण्या करायचे वेळापत्रक ठरायचे. आज हीच्या घरी तर संध्याकाळी तिच्या.. गल्लीत नुसता घमघमाट.. लहान पोरींपासुन ते आज्ज्या पर्यंत सगळे मदतीला यायचे. कुणाच्या २ किलोच्या तर कुणाच्या ३.. लहान पोरींना पानं गोल कशी लाटायची हे शिकायची घाई तर आज्ज्यांना आपले अनुभव ऐकायला कोणी तरी हक्काचे ३-४ तास गिर्हाईक मिळायचे.. मग ह्या बारक्या पोरी सकाळ पासुन पोळपाट- लाटणी गोळा करणे, साचे गोळा करणे असली लिंबु -टीबु कामं करुन कौतुक करुन घ्यायच्या...
जीभ नुसती व्याकुळ झाली. माहेर लांब असल्याने स्वतः (रमाचे स्वतः नव्हे..:) करण्याशिवाय पर्याय नाही हे पण पटलं आणि ईकडच्या स्वतः ची तर 'व्हॉट ईझ कडाकणी' ईथं पास्सुन सुरवात म्ह्नुन मदतीचा ऑप्शन कॅन्सल झाला...
शेवटी आईकडुन फोन वरून रेसिपी विचारुन घेतली आणी जीव शांत करायचा मार्ग निवडला.
(भरपुर झालं नमनाला तेल... आता रेसिपी)
(एकटीने करायची पहिली वेळ असल्याने पाव किलोची कडाकणी केलेली आहेत. त्यानुसार सर्व साहित्य आहे..)
साहित्यः मैदा-पाव किलो,रवा - मुठभर, डालडा - पाऊण चमचा, तुप- अर्धा चमचा, मीठ - किंचीत,
साखर- एक वाटी शिगोशिग भरुन ( घरात पिठी साखर असल्याने मी दिड वाटी घेतली आहे.)
पेनाचे टोपण.
कृती:
१) मैदा चाळुन घ्या. त्यात रवा मिक्स करा. त्यात चिमुटभर मीठ टाका.
२) आता एका भांड्यात डालडा आणी तुप गरम करुन घ्या. हे गरम मोहन वरील पिठावर घाला.
३) साखर घेणार असेल तर आधी १-२ तास साखर विरघळत ठेवावी लागेल. ईथे पिठीसाखर असल्याने आयत्या वेळेलाच पाणी मिक्स केले. पण हे मिश्रण जास्त पातळ नको. अंगापुरते पाणी बास होईल.
४) आता हे पीठ चांगले मळुन घ्या. लागत असेल तर जादा पाणी घ्या. (पीठ आईच्या भाषेत 'चराचरा' मळुन घ्या.)
५) आता हे पीठ एका भांडयात ठेवा.वरुन एक सुती कापड ओले करुन त्यावर झाका. पीठ कमीतकमी ५-६ तास भिजले पाहिजे. (मी सकाळी ९ ला पिठ भिजवुन ठेऊन ऑफिसवरुन येउन ७ ला केले.)
६) आता हे पीठ मोंगली ने बडवुन घ्यायचे असते. आता हे मोंगली प्रकरण काय आहे हे पाहु. हे एक लाकडी उपकरण आहे जे पीठ बडवायला वापरले जाते जे डिक्टो जज कोर्टात ऑर्डर ऑर्डर बोलल्यावर आपटायला वापरतात तसले असते. पण आता ईथे ते कुठुन येणार मग आपला पाटा-वरवंटा कामी आला.
पण पीठ बडवताना दुधाचा हबका मारायचा. आईकडे हे काम त्यातल्या त्यात हटाकट्टा असलेल्या एखाद्या पोराकडं असायची. तो पण जास्तीच्या कडाकणीच्या आशेने बड बड बडवायचा पीठ अगदी लुसलुशीत करुन द्यायचा.
७) पोळपाट किंवा पाटावर ह्या पीठाची जाडसर सुरळी( लातिंबी) करुन घ्या. सुरीने पेढ्याच्या आकाराचे गोळे करुन घ्या.
८) पोळपाटावर पुरी येवढे पान लाटुन घ्या. (अशी ४-५ पानं लाटून ती एकावर एक रचुन कडाकणीच्या साच्याने प्रेस करायचे. हा साचा अॅल्युमिनियमचा असतो गोलाकार आकार कडेला त्रिकोणी दातं असलेला असतो.) ईथे मी गोल आकाराच्या मोठ्या वाटीने प्रेस केले आहे.
९) आता पेनाचे टोपण घ्या. ते ह्या लाटलेल्या पानावर दाबा. कडाकण्या ह्या देवीला बांधल्या जातात. दोरयात ओवता यावे म्ह्नुन ही प्रोव्हीजन..
१०.) ही लाटलेली कची कडाकणी एका पेपरवर ठेवा. अशाच खु पशा कडाकण्या करुन घ्या. पण ह्या कडाकण्या वारसंडत असल्याने लगेच तळने गरजेचे असते. ते टाळण्यासाठी पेपर वर दुसरा पेपर अंथरा.
११) कढईत तेल तापवत ठेवा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात ह्या कडाकण्या तळुन घ्या. गार झाल्यावर या नरम कडाकण्या कडकडीत होतील.
कडाकण्या खान्यासाठी कप , मग बाजुला ठेवायचे. आणी मस्त पेला/फुलपात्र घेणं मस्ट.
पेल्यात मोडलेल्या कडाकण्या वर गरम गरम वाफाळलेला चहा चमच्याने खाणे हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाहीये.
असंच काहीसं.. जेव्हा शेवटी पानं लाटायला कंटाळा यायचा तेव्हा आम्ही दोन गोळ्यांचा एक गोळा कर, कधी एक्खादा गोळा पोळपाटाखाली लपवणे अशा पळवाटा शोधायचो. शेवटी तर कधी कधी साचा वापरायचोच नाही
कारण चिरले की साईडचे निघालेले पीठ वाढायचे.
बोला उदे गं अंबाबाई आणि करा सुरवात....
शाब्बास दिपा. मस्त
शाब्बास दिपा.
मस्त कडाकण्या..
नॉस्टेल्जिक झालोय कडाकण्या बघुन.
पीठ बडवणे, पेनाच टोपण घेवुन कडाकण्याना भोक पाडणे, साच्या घेवुन त्याला त्रिकोणी कडा असलेल्या डिजाइनचा गोल करणे ही कामं करत असे मी कोल्हापुरात असताना आवडीने.
कडाकन्या फार आवडतात. नुसत्या खायला, जेवताना तोंडी लावायला आणि सकाळी नाश्ता म्हणुन चहासोबत खायला कडाकन्याच असायच्या. आई गहु वै ठेवण्याच्या मोठा डब्बा असायचा तो भरुन कडाकन्या करायची.
मी आणि भाउ तो तुफानी स्पीडने रिकामा करायचो.
मस्त रेसिपी आहे! धन्यवाद.
मस्त रेसिपी आहे! धन्यवाद.
यंदा दिवाळीत शंकरपाळ्यांच्या ऐवजी ह्या करेन. कोणाकडे साचा असेल तर त्याचाही फोटो टाका.
ती पेनाच्या टोपणाची आयडिया भारी आहे!
दिप्स माझ्या नजरेतून सुटला
दिप्स माझ्या नजरेतून सुटला कसा काय हा लेख?
एक न एक ओळ माझ्या मनातली लिहिली आहेस. कोल्हापूरला आमच्याकडे कडाकण्या करत नसत त्यामूळे आमची जत्रा इतर मराठा घरात असायची. कडाकण्या, फराळ करण्याचे काम जनरली रात्रीची जेवणं झाल्यावर चाले. फक्त शेवया (पाटावरच्या) मात्र दुपारी. कारण त्यापुढे वाळण्यासाठी उन्हात घालायला लागायच्या ना..
कडाकणी म्हणल्यावर नुसतं नॉस्टॅलजिक झाले मी..
मी पहिल्यांदाच ऐकला हा
मी पहिल्यांदाच ऐकला हा पदार्थ. छान लिहिलयस. करुन बघायला पाहिजे. दक्स तुला धन्स. तुझ्यामुळे धागा वर आला.
मी पण पहिल्यांदाच ऐकला हा
मी पण पहिल्यांदाच ऐकला हा पदार्थ.
लिहिण्याची स्टाईल आवडली मात्र झंपी सारखचं वाटलं - पुरीची रेसीपी
बरं झालं वर आली रेसिपी
बरं झालं वर आली रेसिपी
दिपु, मस्त लिहिली आहेस
दिपु, मस्त लिहिली आहेस रेस्पी.
आम्ही मैद्याऐवजी चण्याची डाळ, तांदुळ आणि गहू हे एकत्र दळून आणतो आणि ते पीठ वापरतो. साधारण अर्धा किलो (१ मापटे) डाळीसाठी सपाट वाटी तांदुळ आणि मूठभर गहू.
साखरेऐवजी गूळ वापरतो.
पेनाचे टोपन मस्त आहे
पेनाचे टोपन मस्त आहे
हा प्रकार नवीनच खाल्लेला
हा प्रकार नवीनच खाल्लेला सांगलीला असताना आणि प्रचंडच आवडला होता.... धन्यवाद. नाहीतरी संध्याकाळच्या चहासोबत नवीन काय करावं असा प्रश्न पडतो कधी कधी... हा पर्याय मस्त टेस्टी आहे...
हो गजानन यांनी म्हटल्याप्रमाणे मिक्स डाळींचे पीठ व गूळ वापरतात.
पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार.
पहिल्यांदाच ऐकला हा प्रकार. आता नक्की करुन बघेन.
<<अशी ४-५ पानं लाटून ती एकावर एक रचुन कडाकणीच्या साच्याने प्रेस करायचे.<< हे मात्र कळलं नाही.
परत काढला हा धागा वर. आज हे
परत काढला हा धागा वर. आज हे कराय्चा घाट घातला आहे. बघुया.
दसर्याला ह्याचे तोरण करून
दसर्याला ह्याचे तोरण करून दारावर लावतात
काय सुरेख रेसिपी आहे. भाषाही
काय सुरेख रेसिपी आहे. भाषाही आवडली. हाहाहा चराचरा मळून घ्या. करेक्ट असे नादमय शब्द बरोब्बर ती कॄती दर्शवतात.
उदा - रटरटा शिजत ठेवा
वरुन, पीठीसाखर भुरभुरवा,
फार घट्ट्ट नको फार पातळ नको, सरसरीतच पाहीजे जरा.
वगैरे वगैरे.
वरुन पाण्याचा हबका द्या.
आम्ही पुरणपोळी सारखे भरून
आम्ही पुरणपोळी सारखे भरून करतो
अरे वा. शंकरपाळे चिरोटे
अरे वा. शंकरपाळे चिरोटे कॅटेगरी मधला पदार्थ वाटतो आहे.
हे तिखट मीठाचे मस्त लागेल.
Pages