कडाकणी-- नुसतं नाव घेतलं तरी गरम गरम चहा आणि प्लेट मध्ये कडाकण्यांची चळत डोळ्यासमोर आली. कोल्हापूर बीबी वर रोजच्या गप्पा मारताना अचानक कडाकण्याचा विषय निघाला. सगळं लहाणपण डोळ्यासमोरुन जाऊ लागलं..
कोल्हापुरला आमची १२-१३ घरांची गल्ली. दसरा जवळ आला की घरातले सगळं झाडणं-पुसनं करून जीव मेटाकुटीला आलेला असायचा. एक आणि एक भांड आणि एक आणी एक कपडा धूऊन काढंण काही खायचे काम नसायचे. अगदी माळा पण लख्ख व्हायचा. पण हा सगळा शीण कडाकणी नाव काढताच् रंकाळा/कळंबा तलावाच्या पल्याड पळुन जायचा....
एक्मेकांच्या सोयीनुसार कडाकण्या करायचे वेळापत्रक ठरायचे. आज हीच्या घरी तर संध्याकाळी तिच्या.. गल्लीत नुसता घमघमाट.. लहान पोरींपासुन ते आज्ज्या पर्यंत सगळे मदतीला यायचे. कुणाच्या २ किलोच्या तर कुणाच्या ३.. लहान पोरींना पानं गोल कशी लाटायची हे शिकायची घाई तर आज्ज्यांना आपले अनुभव ऐकायला कोणी तरी हक्काचे ३-४ तास गिर्हाईक मिळायचे.. मग ह्या बारक्या पोरी सकाळ पासुन पोळपाट- लाटणी गोळा करणे, साचे गोळा करणे असली लिंबु -टीबु कामं करुन कौतुक करुन घ्यायच्या...
जीभ नुसती व्याकुळ झाली. माहेर लांब असल्याने स्वतः (रमाचे स्वतः नव्हे..:) करण्याशिवाय पर्याय नाही हे पण पटलं आणि ईकडच्या स्वतः ची तर 'व्हॉट ईझ कडाकणी' ईथं पास्सुन सुरवात म्ह्नुन मदतीचा ऑप्शन कॅन्सल झाला...
शेवटी आईकडुन फोन वरून रेसिपी विचारुन घेतली आणी जीव शांत करायचा मार्ग निवडला.
(भरपुर झालं नमनाला तेल... आता रेसिपी)
(एकटीने करायची पहिली वेळ असल्याने पाव किलोची कडाकणी केलेली आहेत. त्यानुसार सर्व साहित्य आहे..)
साहित्यः मैदा-पाव किलो,रवा - मुठभर, डालडा - पाऊण चमचा, तुप- अर्धा चमचा, मीठ - किंचीत,
साखर- एक वाटी शिगोशिग भरुन ( घरात पिठी साखर असल्याने मी दिड वाटी घेतली आहे.)
पेनाचे टोपण.
कृती:
१) मैदा चाळुन घ्या. त्यात रवा मिक्स करा. त्यात चिमुटभर मीठ टाका.
२) आता एका भांड्यात डालडा आणी तुप गरम करुन घ्या. हे गरम मोहन वरील पिठावर घाला.
३) साखर घेणार असेल तर आधी १-२ तास साखर विरघळत ठेवावी लागेल. ईथे पिठीसाखर असल्याने आयत्या वेळेलाच पाणी मिक्स केले. पण हे मिश्रण जास्त पातळ नको. अंगापुरते पाणी बास होईल.
४) आता हे पीठ चांगले मळुन घ्या. लागत असेल तर जादा पाणी घ्या. (पीठ आईच्या भाषेत 'चराचरा' मळुन घ्या.)
५) आता हे पीठ एका भांडयात ठेवा.वरुन एक सुती कापड ओले करुन त्यावर झाका. पीठ कमीतकमी ५-६ तास भिजले पाहिजे. (मी सकाळी ९ ला पिठ भिजवुन ठेऊन ऑफिसवरुन येउन ७ ला केले.)
६) आता हे पीठ मोंगली ने बडवुन घ्यायचे असते. आता हे मोंगली प्रकरण काय आहे हे पाहु. हे एक लाकडी उपकरण आहे जे पीठ बडवायला वापरले जाते जे डिक्टो जज कोर्टात ऑर्डर ऑर्डर बोलल्यावर आपटायला वापरतात तसले असते. पण आता ईथे ते कुठुन येणार मग आपला पाटा-वरवंटा कामी आला.
पण पीठ बडवताना दुधाचा हबका मारायचा. आईकडे हे काम त्यातल्या त्यात हटाकट्टा असलेल्या एखाद्या पोराकडं असायची. तो पण जास्तीच्या कडाकणीच्या आशेने बड बड बडवायचा पीठ अगदी लुसलुशीत करुन द्यायचा.
७) पोळपाट किंवा पाटावर ह्या पीठाची जाडसर सुरळी( लातिंबी) करुन घ्या. सुरीने पेढ्याच्या आकाराचे गोळे करुन घ्या.
८) पोळपाटावर पुरी येवढे पान लाटुन घ्या. (अशी ४-५ पानं लाटून ती एकावर एक रचुन कडाकणीच्या साच्याने प्रेस करायचे. हा साचा अॅल्युमिनियमचा असतो गोलाकार आकार कडेला त्रिकोणी दातं असलेला असतो.) ईथे मी गोल आकाराच्या मोठ्या वाटीने प्रेस केले आहे.
९) आता पेनाचे टोपण घ्या. ते ह्या लाटलेल्या पानावर दाबा. कडाकण्या ह्या देवीला बांधल्या जातात. दोरयात ओवता यावे म्ह्नुन ही प्रोव्हीजन..
१०.) ही लाटलेली कची कडाकणी एका पेपरवर ठेवा. अशाच खु पशा कडाकण्या करुन घ्या. पण ह्या कडाकण्या वारसंडत असल्याने लगेच तळने गरजेचे असते. ते टाळण्यासाठी पेपर वर दुसरा पेपर अंथरा.
११) कढईत तेल तापवत ठेवा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात ह्या कडाकण्या तळुन घ्या. गार झाल्यावर या नरम कडाकण्या कडकडीत होतील.
कडाकण्या खान्यासाठी कप , मग बाजुला ठेवायचे. आणी मस्त पेला/फुलपात्र घेणं मस्ट.
पेल्यात मोडलेल्या कडाकण्या वर गरम गरम वाफाळलेला चहा चमच्याने खाणे हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाहीये.
असंच काहीसं.. जेव्हा शेवटी पानं लाटायला कंटाळा यायचा तेव्हा आम्ही दोन गोळ्यांचा एक गोळा कर, कधी एक्खादा गोळा पोळपाटाखाली लपवणे अशा पळवाटा शोधायचो. शेवटी तर कधी कधी साचा वापरायचोच नाही
कारण चिरले की साईडचे निघालेले पीठ वाढायचे.
बोला उदे गं अंबाबाई आणि करा सुरवात....
छान ! हा पदार्थ कर्नाटकी आहे
छान !
हा पदार्थ कर्नाटकी आहे का? उदगीर -सोलापुर भागात अनेक जण हा पदार्थ (बोली भाषेत कडकन्या) दसर्याला करतात. बहुतेकांचे मुळ कर्नाटक भागात आहे.
कुठला का असेना काण्यासाठि एकदम मस्त ..खरोखर स्वर्गसुख
खुप छान ...आवडली
खुप छान ...आवडली रेसीपी...करुन पाहीन..... माझ्या माहेरी पण करातात कडाक्ण्या (सोलापुर).
धातु ची एक जाळी (पुर्वी च्या लोखंडी क्वाट सारर्खी) असते ती त्या घटावर लावाची आणि त्याला कडाक्ण्या बांधायच्या.......सही एक्दम......
रेस्पी मस्तच . लिहायची
रेस्पी मस्तच . लिहायची स्टाइल पण आवडली.
व्हॉट इज कडाकणी विचारणार्यांनी मदत केली नसेल तर त्यांना एकही देऊ नका चाखायला
मस्त. आम्ही बेसनही घालतो आणि
मस्त.
आम्ही बेसनही घालतो आणि गूळ (बहुतेक, लक्षात नाही. खाऊन अनेक वर्षं झाली) त्यामुळे रंग वेगळा येतो.
पुन्हा वाचले तेव्हा कळले साखर
पुन्हा वाचले तेव्हा कळले साखर कधी घालायची.
नाव वाचून वाटलेले काहीतरी खल्लास टाईप पदार्थ असेल म्हणून लोकं इतकी वाट बघत...
पण पुरीची रेसीपी वाटली.:) (राग नको. हे लिहिले म्हणून.)
काय आठवण करुन दिलीत ,
काय आठवण करुन दिलीत , आमच्याकडे सोलापुरला कडकण्या घटावर बांधण्यासाठी करतात . घट उठल्याशिवाय खाता यायच्या नाहीत म्हणुन जाम हळहळ वाटायची.
अरे सोलापूरचे कितीतरी जण आहेत
अरे सोलापूरचे कितीतरी जण आहेत इथे. मी पण लहानपणी कडकण्या सोलापूरला खूप खाल्ल्या आहेत. माझ्या घरी ही पद्धत नव्हती पण मैत्रिणीची आई खूप प्रेमाने पाठवून द्यायची.
मस्त माझी आई गुळ पाण्यात
मस्त
माझी आई गुळ पाण्यात वितळवुन त्यात मावेल तेवढा मैदा / गव्हाचे पीठ घालुन करते, मस्त हलका ब्राऊन रंग येतो. याबरोबर "कापण्या" म्हणुन पण एक पदार्थ करतात , तो दसर्यादीवशी की कधी ते नाही आठवत
कडाकण्या मस्तच! 'कापण्या'
कडाकण्या मस्तच!
'कापण्या' दिवाळीत करतात. त्याही मस्त लागतात.
आम्ही बहुतेक यालाच फुलोरा
आम्ही बहुतेक यालाच फुलोरा म्हणतो.
मस्त लागतो गरम दुधात चुरुन साखर घालून.
एकदा नणंदेनं आणि मी केलेल्या
एकदा नणंदेनं आणि मी केलेल्या शंकरपाळ्यांना ती कडाकण्या म्हणालेली.. नावावरून काय पदार्थ असेल त्याचा अंदाज आलेला, आज खरा पदार्थ कळला.
माझ्या शंकरपाळ्या= कडाकण्या, मग मला जाम आवडतात कडाकण्या म्हणजे.
तिखट करतात, त्या छान
तिखट करतात, त्या छान लागतात...
दिपे, शाब्बस ! शेवटी टाकलीस
दिपे, शाब्बस ! शेवटी टाकलीस रेसिपी.
छान लिहिलं आहेस. सुगरणेस !
सगळ्यांचे मनापासुन आभार....
सगळ्यांचे मनापासुन आभार.... हा पदार्थ शक्यतो घाटावर केला जातो असं वाटतय्यं कारण कोकणात, मुंबईत हा करत नाहीत मे बी. सोलापुरचे माहीत नाही.. ही ट्रॅडिशनल रेसिपी आहे खास दसरयाला केली जाते.
ब्राह्मणांच्यात करत नाहीत .
ब्राह्मणांच्यात करत नाहीत . मला तिखट कडाकण्या पायजेत.
कडाकण्या गोडच असतात.. तिखट
कडाकण्या गोडच असतात.. तिखट वापरले तर तिखट पुर्या होतील. त्तुम्हला हवे असेल तर तिखट घालुन घ्या.
हा. का.ना.का.
छान लिहिलंय. प्रत्येक
छान लिहिलंय.
प्रत्येक पायरीचा फोटो टाकलात ते आवडलं.
तिखट कडाकण्याही असतात. खाकरा,
तिखट कडाकण्याही असतात. खाकरा, तिखट पुरी यांच्यासारख्या असतात.
मस्त.. कोल्हापुरात जास्त होतो
मस्त.. कोल्हापुरात जास्त होतो हा पदार्थ न तो तिखट
आत्तच कणीक मळलयं मी .. आईला मदत म्हणुन !
मस्त लिहिलय. फोटो पण छान.
मस्त लिहिलय. फोटो पण छान.
मला पण युगं लोटली, कडाकण्या बघून आणि खाऊनही !
मस्त लिहिलय. फोटो पण
मस्त लिहिलय. फोटो पण छान.
ब्राह्मणांच्यात करत नाहीत>>>कुणी सांगितले?
आई कोल्हापूरला होती तेव्हा
आई कोल्हापूरला होती तेव्हा शिकली होती कडकण्या करायला. मला खायला खूप आवडायच्या म्हणून आई अधूनमधून पण करत असते.
मस्त रेसिपी . नानबा >
मस्त रेसिपी .
नानबा >
छान रेसिपी.. आमच्याकडे पण
छान रेसिपी.. आमच्याकडे पण कालच केल्या.
खरतर माझ्या माहिती प्रमाणे याच नाव कडकण्या अस असत... बोलीभाषेत आपण याला कडाकण्या अस म्हणतो.
बर्याच ठिकाणी या कडकण्या ५व्या किंवा ७ व्या माळेला घटाला बांधतात.
ब्राह्मणांच्यात करत नाहीत>>> आमच्या ईथे तर ब्राह्मणांच्याकडे सुधा करतात..
मस्त............दिवाळी जवळ
मस्त............दिवाळी जवळ आली.........आमच्या घरी सुध्दा होतात
खरतर माझ्या माहिती प्रमाणे
खरतर माझ्या माहिती प्रमाणे याच नाव कडकण्या अस असत... बोलीभाषेत आपण याला कडाकण्या अस म्हणतो. >> सहमत!
ब्राह्मणांच्यात करत नाहीत>> काहितरीच! करतात तर म.न्डपीला फुलोरा बा.न्धतात कडकण्या.न्चा.
व्वा!!....कालच फोनवर बोलणे
व्वा!!....कालच फोनवर बोलणे झाले ....कडकणी ( आम्ही बोलतानाही असेच म्हण्तो) म्हणले की आईला माझी आठवण आल्याशिवाय राहत नाही.....जाम हाद्डायचे मी...पण ती कणीक कुटाय्ला पण मदत करायचे..खरच्...कोल्हापूरच्या दसर्याची मजा कुठेच नाही
झक्कास! मस्त लिहिले आहे!
झक्कास! मस्त लिहिले आहे!
मस्त. पदार्थ करुन पाहणार
मस्त.
पदार्थ करुन पाहणार नाही हा बहुतेक, पण वाचायला मजा आली.
अय्या खरच गमंत आहे ना मी कालच
अय्या खरच गमंत आहे ना मी कालच कडाकण्या केल्या. मला फार आवडतात. पण आमच्याकडे गव्हाच, बेसण पीठ आणि गूळ वापरुन करतात. कालच थोपूवर टाकलेल हा फोटो.
Pages