एकूण काय…कठीण आहे!

Submitted by Asu on 22 September, 2020 - 08:53

एकूण काय…कठीण आहे!

१८ सप्टेंबर २०२० रोजी वसई पश्चिमेस माणिकपूर नाक्यावर बिसन पेट्रोल पंपावर भीषण राडा झाल्याची घटना सगळ्यांना माहीत असेलच. यात चूक नक्की कुणाची हे माहित नाही. पण जर ही घटना खरी असेल तर ही घटना आपल्या सगळ्यांनाच अंतर्मुख करायला लावणारी आहे.
घटना- शुक्रवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास नालासोपारा येथे राहणारे १० ते १२ तरुण दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी वसईतील माणिकपूर येथील बिसन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी विना मास्क आले. त्यांनी मास्क न लावल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला असता संतप्त झालेल्या त्या तरुणांनी पंपावर तुफान राडा घातला. एका महिला कर्मचाऱ्यासह अन्य कर्मचाऱ्यांना मारहाण करून पंपावरील सामानाची आणि फिलिंग मशीनची तोडफोड केली. त्यावेळी नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. दोन-तीन पोलीस कर्मचारीही या वेळी हजर होते, मात्र त्यांनीही हस्तक्षेप केला नाही. या घटनेतून काय संदेश मिळतो?
भारतात म्हणा वा जगात सगळीकडेच लोक कोरोनामुळे नेहमीच्या वागण्यास घातलेल्या निर्बंधांना कंटाळले आहेत. ठीकठिकाणी मोर्चे, मंदिरे सुरु करा, मॉल सुरु करा, लोकल सुरू करा, पर्यटन सुरू करा वगैरे वगैरे विविध कारणांसाठी लोक सोशल डिस्टन्सिंग न पाळता आंदोलनं करत आहेत. थोडक्यात लोकांना कुठलंच बंधन नको आहे. मास्क नको, सोशल डिस्टन्सिंग नको. बराच वेळा केवळ बंधन आहे म्हणून किंवा दंड होईल म्हणून कसातरी मास्क लावलेला असतो. सोशल डिस्टन्सिंगबद्दल तर सगळ्यांना जवळजवळ विसरच पडला आहे. हाताच्या बोटावर मोजण्याएवढे लोक सोडले तर कुणीच कोरोनापासून बचावाचे नियम पाळत नाही. खरं म्हणजे कुणालाच वागणुकीवर बंधनं नको आहेत. अर्थात लोकांना बंधनं का नको आहेत, ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
कोरोनाबाधित होऊन आपण मरू शकतो ही भीती कुणाला नाही का? मरणाची भीती नाही असंही म्हणता येणार नाही. पण मरणाच्या भीतीपेक्षाही सध्यातरी जगणं महत्वाचं आहे. हातावर पोट असणाऱ्यांना किंवा जगण्यासाठी ज्यांना नोकरीधंदा करण्यासाठी बाहेर पडणं आवश्यक आहे, त्यांनी काय करायचं घरात बसून? ते कोरोनापासून वाचतीलही कदाचित पण पैशांअभावी भुकेनं मरतील. अशावेळी कोरोनाच्या भीतीपायी त्यांना घरात बसून राहता येईल का? रोजीरोटीसाठी त्यांना बाहेर पडावंच लागेल.
दुसऱ्या प्रकारचे लोक असेही आहेत की घरात बसल्यानं ते भुकेनं मरणार नाहीत. पण त्यांना नेहमीच्या ऐषोआरामी आयुष्याची किंवा ऐषोआरामाच्या नाही पण काही विशिष्ट सवयींची एवढी सवय झाली आहे की त्याशिवाय जगणं त्यांना कठीण वाटतं. म्हणजे सवयीचे ते गुलाम आहेत. दारू किंवा ड्रगच्या सवयीसारखेच. दारू किंवा ड्रग्ज आपल्याला मरणाच्या दारी नेणार आहेत हे माहीत असूनही अशा सवयी सुटत नाहीत. तिथं कोरोनाची काय भीती! तसाच काहीसा हा प्रकार आहे.
काही लोक, विशेषतः तरुण वर्ग मस्तीत असतो. मी तरुण आहे. माझं शरीर निरोगी आणि सुदृढ आहे. कोरोना मला काही करू शकत नाही. ही अवास्तव घमेंड त्यांच्यात असते. खरं म्हणजे हे अर्धसत्य आहे. त्यांची प्रतिकारक शक्ती इतरांच्या मानाने चांगली असते, म्हणून ते कोरोनाबाधित होणारच नाहीत असं नाही. कदाचित ते लक्षणं नसलेले कोरोनाप्रसारकही असू शकतात. त्यांना स्वतःला लक्षणं नसली तरी त्यांच्यामुळे दुसऱ्यांना म्हणजे अगदी त्यांच्याच घरातल्यांनासुद्धा त्रास होऊ शकतो. किंवा त्यांच्या स्वतःच्या प्राणावरही बेतू शकतं. एकदाचा कोव्हिड झाला की मग ही घमेंड गळून पडते. पण उशिरा आलेल्या शहाणपणाचा काय उपयोग!
या सर्वांहून वेगळा असा जो सर्वसामान्य वर्ग आहे, त्याचं काय? त्यालाही कोरोनामुळे मरणाची भीती वाटत नाही का? माणसाला सर्वसामान्य आयुष्य जगण्याचीही आयुष्यभर सवय झालेली असते. अशावेळी अचानक असाधारण बंधनयुक्त आयुष्य जगण्याची कुणी सक्ती केली तर! माणूस काही दिवस तसा जगेलही. पण किती दिवस? त्यालाही बंधनांचा कंटाळा येणारच. तोही बंड करुन उठणारच. दुसरं असं की, कोरोनामुळे माणूस मरतोच का? कोरोनामुळे‌ होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त नाही. म्हणजे मरणाची भीती तशी कमीच. मग मरणाच्या या थोड्याशा भीतीपायी आपण आपलं नेहमीसारखं वागण्याचं स्वातंत्र्य गहाण ठेवायचं का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट करतांना आपण तिचे फायदे तोटे तोलूनच ती करायची की नाही हे ठरवत असतो. पण कधीकधी ९५ टक्के फायद्यापेक्षा ५ टक्के तोटाही भारी ठरू शकतो. जीवापेक्षा काहीही महत्त्वाचं नसतं एवढं मात्र लक्षात ठेवावं. सर सलामत तो पगडी पचास!
इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कोरोनामुळं मरणाचं प्रमाण कमी असेलही. परंतु कोव्हिडमधून बरं झालेल्यांच्या शरीरात कोरोना व्हायरसमुळे जे कायमस्वरूपी असे वाईट बदल झालेले असतात त्यांचे दूरगामी दुष्परिणाम कोरोनाबाधितांना भोगावे लागू शकतात. तसंच एकदा कोव्हिड झाला म्हणजे पुन्हा कोव्हिड होणारच नाही, असंही खात्रीलायक सांगता येत नाही. त्यामुळे कोव्हिडमधून बरं झालेल्यांनीही कोरोनापासून बचावाचे नियम पाळलेच पाहिजेत.
थोडक्यात काय? तर वागण्यावर कुणालाच बंधनं नको असतात. पण म्हणून- 'काय करायचं ते करा आणि मरायचं तर मरा!' असंही म्हणता येत नाही. कारण माणसाला त्याच्या स्वतःच्या जीवाची पर्वा नसली तरी ती समाजाला असते. त्यामुळे सरकार किंवा प्रशासनही कडक बंधन घालू शकत नाही. आणि त्यामुळेच नियंत्रण व्यवस्थांची बंधनांबाबत धरसोड वृत्ती दिसते. 'धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं' अशी अवस्था नियंत्रण व्यवस्थांची झालेली आहे. त्यामुळे त्यांनाही दोष देता येत नाही. कुठलीही गोष्ट सांगणं सोपं असतं पण अंमलात आणणं कठीण असतं.
यावर सर्वमान्य उपाय काय? तर शेवटी नियम पाळण्याचा निर्णय ज्याच्या त्याच्यावर सोपवावा लागेल. अशीच सध्या परिस्थिती आहे. कारण कुणी म्हणेल आयुष्य माझं आहे कसं जगायचं ते मी ठरविन. जगायचं की मरायचं ते माझं मी बघेन. तुम्ही कोण आम्हाला अक्कल शिकवणारे!
पण हा प्रश्न एवढा सोपा आहे का?... तर नाही. ज्याचं त्याचं आयुष्य असतं हे जरी खरं असलं तरी, 'आम्ही जगू किंवा मरू' हे म्हणणं तेवढसं बरोबर नाही. कोरोनाच्या बाबतीत ते 'मरू आणि मारू' असंच आहे. कारण नियम न पाळल्यानं त्या विशिष्ट व्यक्तीलाच फक्त कोव्हिड होण्याची शक्यता नसते तर त्याच्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊन नियम काटेकोरपणे पाऱ्या व्यक्तीलाही कोव्हिड होऊ शकतो. म्हणजे चोरासह संन्याशाला पण शिक्षा! न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्यांनी का भोगावी?
तर असं हे त्रांगडं! एकूण काय…कठीण आहे!
******

-प्रा.अरुण सु.पाटील (असु)
२२.०९.२०२०
© सर्व हक्क स्वाधीन

https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults

तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. कोरोनामुळे आशालता वाबगावकर यांचे निधन झाले. त्या ज्या मालिकेत काम करत होत्या त्यातील लोकांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. कोणाच्यातरी निष्काळजीपणामुळे आशाताईंचा जीव गेला.

विचार सुसंगत, व्यवस्थित मांडले आहेत. छान आहे लेख. विचारास उद्युक्त करणारा. इथ अमेरीकेतही मास्क लावा म्हटलं की ठोसे लगावुन देणारे, धक्काबुक्की, शिवीगाळ करणारे महाभाग आहेतच. तरुण लोक मास्क न घालता जॉगिंग वगैरे करत असतात बरेचदा.

पेट्रोल भरणाऱ्यांनी वाद न घालता त्यांच्यासमोर आजारी असल्याचे नाटक करून बस्स खोकायला हवे होते.
मास्क न घालता उद्दामपणा करणारे, शिस्त न पाळता जवळून जाणारे इत्यादींना हाच उपाय आहे.

खूप उद्विग्न करणारी परिस्थिती आहे. आम्हा डॉ. ना तर दिवसातून कित्येकदा प्रश्न पडतो, आपण नक्की कुणासाठी आणि कशासाठी आपल्या आणि फॅमिली च्या जीवाची risk घेतो आहोत !
खूप चांगल्या प्रकारे मांडले आहे तुम्ही लेखामधून.

अभ्यासू प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
जनजागृतीचं काम प्रत्येकानं आपापल्या परीने करत राहावं एवढंच आपल्या हाती आहे. परिस्थितीचं गांभीर्य लोकांना वेगळीच कळावं हीच अपेक्षा!
-असु