शाकाहारी - मांसाहारी जोडप्यांचे अनुभव

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 September, 2020 - 17:07

सुरुवात मी करतो Happy

ऑर्कुट मैत्रीनंतर प्रत्यक्ष भेटल्यावरही केमिस्ट्री जुळतेय हे लक्षात आल्यावर आम्ही जेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा दोघांच्या जात आणि प्रांत भिन्न आहेत, तर त्यातून उद्भवणारया समस्यांशी आपल्याला लढायचे आहे आणि एकमेकांच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आहे हेच आम्हा दोघांच्या डोक्यात होते.
पण अशीच एक विसंगती आमच्या खाण्यापिण्याच्या आवडीतही होती, आणि तिथेही आम्हाला एकमेकाण्शी ॲडजस्ट करावे लागणार हे आम्हाला लवकरच समजले.

तर माझी बायको, म्हणजे तेव्हाची गर्लफ्रेंड शुद्ध शाकाहारी होती. तीच नाही तर तिच्या घरचेही शुद्ध शाकाहारी होते. याऊलट मी प्रचंड मांसाहारप्रेमी, रोज खाऊ घातले तरी आनंदाने खाणारा, आणि त्यात नास्तिक असल्याने वर्षाचे ३६५ दिवस कुठलाही सणवार न मानता खाऊ शकणारा होतो.

आम्ही जेव्हा लग्नाआधी डिनर डेटला जायचो तेव्हा शुद्ध शाकाहारीच खायचो. ती मला एकाच टेबलावर मांसाहार करायची परवानगी द्यायची, पण दोघांनी शेअरींग करून खायचे ते दिवस असल्याने मी ते टाळायचो.

पुढे मला समजले की ती खूप लहान असताना त्यांच्या घरी सारे जण नॉनवेज खायचे. पण देवाधर्माच्या कारणाने कित्येक वर्षे झाली त्यांनी कायमचे सोडले होते.

पुढे लग्न जमताना आंतरजातीय विवाह असल्याने तसेच पत्रिकेतही मृत्युयोग आल्याने दोन्ही घरात बरेच महाभारत घडले. ते पुन्हा कधीतरी. पण ते वादळ शांत होऊन जेव्हा सामंजस्याने दोन्ही घरातून लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा तिच्या घरचेच तिला म्हणाले की आता तुला जमत असेल तर नॉनवेज खायला सुरुवात कर. माझ्या घरचेही म्हणाले की ती बनवायला शिकली नाही तरी चालेन पण खायला शिकली तर सगळ्यांच्याच सोयीचे होईल.

बायकोनेही मग ती मानत असलेल्या देवांचे दोन तीन वार वगळून ईतर दिवशी नॉनवेज खायला सुरू करायची तयारी दर्शवली आणि आमच्या डिनर डेटला पनीर चिल्लीसोबत चिकन लॉल्लीपॉप सुद्धा दिमाखात टेबलावर विराजू लागले.

पण तिने हे मान्य करताना माझ्याकडूनही एक अवघड वचन घेतले. ते म्हणजे तिच्या लाडक्या महादेवाच्या सोमवारी मी नॉनवेज खाणार नाही. हे माझ्यासाठी अवघड होते कारण रविवारचा शिल्लक मांसाहार सोमवारी डब्यात न्यायचा हा माझा शिरस्ता होता. आता मला त्याजागी घासफूस खावी लागणार होती. अमान्य करायचा पर्याय नव्हता कारण आमचे अडचणीत आलेले लग्न सुखरूप पार पडावे यासाठी तिने दोघांच्यावतीने तसा नवसच केला होता. ती सोमवारचा उपवास करणार होती तर मी वार पाळणार होतो.

मग माझ्याकडे पर्यायच नव्हता. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है म्हणत मी ते ऐकले खरे. पण ऑफिसमध्ये ईतरांच्या डब्यात मांसाहार असेल वा बाहेर कुठे खायची संधी मिळाली तर गपचूप खाऊ लागलो. तिची श्रद्धा तिच्याजवळ माझे विचार माझ्याजवळ. फक्त तिला समजू नये याची काळजी घ्यायचो.

वर्ष असेच सरले. मग मात्र हळूहळू तिला मस्का मारत या शापातून उ:शाप मिळवला. माझा सोमवार पाळायचा बंद झाला.

त्यानंतर पुढे कधीतरी तिला सांगितले की मी याबाबत तिला चीट करायचो. सोमवारीही संधी मिळताच बाहेर नॉनवेज चापून खायचो. पण तोपर्यंत तिला मी असाच आहे हे कळले होते त्यामुळे विशेष काही वाटले नाही.

आजच्या तारखेला ती माझ्यासारखा वारंवार मांसाहार करत नाही. पण जेव्हा मांसाहार करते तेव्हा माझ्या दुप्पट आवडीने करते.
लग्नाला ईतकी वर्षे होऊन मांसाहार बनवायला आजवर शिकली नव्हती. पण अखेर या लॉकडाऊनच्या कृपेने तो सुद्धा योग आला.
फक्त आजही सासुरवाडीचा पाहुणचार घ्यायला जातो तेव्हा मात्र मटार उसळ आणि पुरणपोळ्यांवरच समाधान मानावे लागते Happy

असो, हे झाले माझे.

शाकाहार-मांसाहाराबाबत आणि याच्याशी जोडल्या गेलेल्या धार्मिक संकल्पनांबाबत जरी प्रथमदर्शनी आमचे विचार वेगळे असले तरी एकमेकांच्या या वैयक्तिक बाबींत आम्ही हस्तक्षेप न करता सुखसमाधानाने जगत आहोत.

पण घराघरातली परिस्थिती वेगळी असू शकते.
याबाबतचे विविध अनुभव वाचायला आवडतील. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आणि माझ्या घरचे म्हणजे नॉनव्हेज सर्व करणाऱ्या हॉटेलातही न जाणारे.
मग एक वर्ष नोकरी निमित्त बाहेर गावी जावं लागलं, तिकडे ऑपशन नव्हता म्हणून मी अशा हॉटेलात जाऊ लागले पण एका टेबल वर बसून जेवणे म्हणजे माझ्यासाठी फार त्रासदायक.
मग दुसऱ्या देशात जावं लागलं, पुन्हा ऑपशन नाही म्हणूनलोकांना नॉन व्हेज खाताना बघायची सवय करून घेतली.
पण एका किचन मध्ये सेम भांडी - बिग नो नो!
मग लग्न झालं , नवरा कट्टर मांसाहारी. मग तुझं तू खा मोड जमला. भांडी शेअरिंग ची सवय झाली.
आता बाळ झालं, त्याने खायचं तर मी खायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं पडलं, मग एक दोन वेळा चव चाखून पहिली पण आवडलं नाही. अजून तरी बाळालाही आवडत नाहीये पण त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालणं अजून जमलेलं नाही पण तो ही प्रयत्न करतेय. ते जमलं तर बनवायला शिकेन.

माझे आई बाबा अजूनही पहिल्या सारखेच आहेत. बहीण सगळ खाते.
आईला आम्ही कोणी काही खाल्याने फरक पडत नाही (हा तिच्यातला लेटेस्ट बदल आहे) पण अमावस्या पौर्णिमा नको म्हणते तेवढं बहीण पाळते

माझा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. मला लहानपणापासुन फळं आवडत नाहीत. काही फळांच्या वासाने तर अक्षरशः उलटीची भावना होते. बायको पक्की फळं खाणारी. लग्नानंतर तिने मला फळं खायला घालायचा खुप प्रयत्न केला. या एका मुद्द्यावर माझी आईपण तिला फुस लावायची. मी तिला समजावलं की काही जणांना कोळी (स्पायडर), पाल, झुरळ यांची उगाचच भिती/किळस वाटते, त्यांना पोर्क खायला आवडत नाही, तसंच मला फळं नाही आवडत. फळांचे सगळे फायदे/आवश्यकता माहीत असुनही मी नाही खाउ शकत. पण तिने ट्रायल-एरर पद्धतीने काही वर्षात मी काय सहन करु शकतो ते शोधुन काढलं. मग ती बिनवासाची/कडक/कच्ची फळं फ्रिजमध्ये एकदम थंड करुन मला द्यायला लागली. संत्र/मोसंबी सोलुन, आतल्या फोडींची पण साल (?) काढुन, तो गर थंड करुन द्यायला लागली. वर हे चारचौघात सांगुन (संत्र नुस्तं सोलुन नाही चालत याला.....) माझ्या इज्जत चा फालुदा करायला लागली. मग पुन्हा आमची भांडणं, बायो- हे असं करुन तु माझे लाड नाही करत, माझ्यावर अन्याय करतेस. माझ्या मनाविरुद्ध मला खायला लावतेस जे मी शब्दशः गिळतो.
अजुनही काही फळं (पपई, टरबुज, बोरं इ.) कोणी खात असेल तर मी गुप्चुप शक्यतो दुसर्‍या खोलीत जातो. केळं+दुध यांच्या मिक्श्चरविषयी आता टाईप करतानाही मला यक्क होतंय. पण हाडाचा कोकणी असल्याने की काय आंब्या/फणसाचे उग्र वास सहन करु शकतो
दुर्दैवाने माझी मुलगी माझ्यापेक्षाही कट्टर फळंद्वेष्टी झालीय. अजिबात म्हणजे अज्जिब्बात काही फळं खात नाही. थंड करुन द्या की आईस्क्रिम्+कस्टर्ड खाली लपवुन द्या ती खातच नाही. पण त्यावरुन मला बोलणी मात्र खावी लागतात. मुलगा मात्र गेल्या जन्मी माकड असावा तसा फक्त फळं खाउन जिवंत राहू शकतो. माझ्यासमोर केळ्याची साल नाचवायची मस्करी करायची हिंमत आता कोणी करत नाही एव्हढी कडाक्याची भांडणं आणि आकांडतांडव मी केली आहेत. I am not proud about it but that's who I am.
व्हेज्/नॉन-व्हेज वाले एकमेकांची मतं बदलंवायचा जेव्हढा प्रयत्न करत असतील/नसतील त्याच्या कित्येक पटींने जास्त हल्ले आम्हा फळं न आवडणार्‍या लोकांवर होतात. आता जवळच्या लोकांनी नाद सोडालाय आणि इतरांना इग्नोर करायला शिकलोय. काही नाही तर अ‍ॅलर्जी आहे असं सांगुन माझा बचाव करायला शिकलोय.

यात त्याला काही वाटत नाही कारण हे भुभु चे नैसर्गिक अन्न आहे आपले नाही >> ग्रेट!

पण भुभूला चिकन शिजवून देणे चांगले की कच्चे देणे चांगलें? कच्चे दिल्यास नैसर्गिक होईल ना.

माझा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. मला लहानपणापासुन फळं आवडत नाहीत. काही फळांच्या वासाने तर अक्षरशः उलटीची भावना होते. बायको पक्की फळं खाणारी>>>>>>>>बाप रे किती अजब, फळ ना खाणारा माणूस..कधी डॉक्टर ला विचारला आहे का कि काय प्रॉब्लेम असू शकतो कि मला फळ नाही आवडत

आशुचँप, तुमच्या मुलाचं वाचून मला अनिल अवचटांच्या 'मोर' पुस्तकातला एक लेख आठवला. बहुधा 'कोंबडी' असं नाव आहे लेखाचं. (पुस्तकाचा विषय 'पक्षी' असा नाहीये Proud )
तर, मुली लहान असताना ते सगळेच व्यवस्थित नॉनव्हेज खायचे. पण एकदा कोंबडी आणायला ते मुलींना घेऊन गेले. कोंबडी निवडल्यावर दुकानदार दुसऱ्या कामात होता, तेवढा वेळ मुली तिच्याशी खेळत बसल्या. तिला त्यांनी नावही ठेवलं. मग नंतर दुकानदार ती घेऊन गेला आणि मारून, साफ करून डब्यात घालून ते चिकन घरी घेऊन आले. जेवायला मित्रही आले होते. एकजण म्हणाला, मस्त झालीय कोंबडी. मुलगी म्हणाली, कोंबडी कुठाय? (तिला चिकन म्हणजेच कोंबडी हे माहिती नव्हतं) त्यावर अवचटांनी सांगितलं, तुम्ही जिच्याशी खेळत होतात त्याच कोंबडीला कापून शिजवलंय. त्यावर मुलीने ज्या रडवेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं, त्यामुळे अवचटांनी नॉनव्हेज खाणं सोडलं Happy
(गंमत म्हणजे मुलगी खात राहिली)

चिकन मटण खातो तेव्हा निष्पाप जीवांचा बळी देतो हे बघून मलाही खूप वाईट वाटतं. खासकरून जेव्हा बोकड कापतात ते बघून तर मी इमोशनल फुल होतो. पण खाताना बरं वाटतं. म्हणून नॉनव्हेज आणायला मी शक्यतो जात नाही. मासे, खेकडे, कोळंबी यांच्याबद्दल शक्यतो काही वाटत नाही. पण मागे एकदा खेकड्याचे पाय नांग्या तोडताना इमोशनल झालो होतो. मागे एकदा मटण आणायला गेलो आणि तेव्हाच नेमकी बोकडांची भरलेली गाडी आली. ती माणसं बोकडाना कसंही उचलून फेकत होते आणि गाडी रिकामी करत होते. माझी वर्षाची मुलगी ते पाहून हसत होती. खूपच विरक्ती आणणारा प्रसंग होता तो.

हेहे.. मला कल्पना आहे इथेही माझ्यावर कीती हल्ले होतील, नको असलेले सल्ले दिले जातील पण आधी म्हटल्याप्रमाणे, इतरांना इग्नोर करायला शिकलोय. Happy

सुकामेवा आवडतो, फळभाज्या (काकडी, टोमॅटो, भोपळा, पडवळ, वांगी, भेंडी इ. सर्व) आवडतात.
थंडगार कलिंगड, द्राक्ष, संत्र-मोसंब्याचा गर चालतो. पण चालतो म्हणजे आवडतोच असं नाही. ताजी फळं शक्य तितकी टाळायचाच प्रयत्न असतो. वास वाली, मऊ किंवा लिबलिबीत फळं उलटी आणतात. जवळजवळ कच्चा कडक थंड पेरु बायकोच्या प्रेमाखातर खाईन पण पिकलेला मऊ वास वाला पेरु खोलीत असेल तर पळुन जाईन.

सुकामेवा आवडतो, फळभाज्या (काकडी, टोमॅटो, भोपळा, पडवळ, वांगी, भेंडी इ. सर्व) आवडतात.
थंडगार कलिंगड, द्राक्ष, संत्र-मोसंब्याचा गर चालतो
>> एवढं पुरेसं असावं न्यूट्रिशनच्या दृष्टीने.

इतकी साधी सोपी विचारसरणी लेकाची आहे.>>>>
हो ना मलाही कौतुक वाटलं त्याचं
या वयात त्याला हे इतक्या सहजपणे जमलं
किंवा मग लहान असल्यामुळे पण
मोठे झालो की आपण जास्त रिजिड होत जातो बहुदा

(तिला चिकन म्हणजेच कोंबडी हे माहिती नव्हतं) >>>>
सेम, पोरालाही आधी माहिती नव्हतं, त्याला जेव्हा कळलं की या कलकलाट करणाऱ्या कोंबड्या मारल्या की त्याचं चिकन होतं तेव्हापासूनच त्याने सोडलं खायचं

पण भुभूला चिकन शिजवून देणे चांगले की कच्चे देणे चांगलें? कच्चे दिल्यास नैसर्गिक होईल ना.>>>
त्यात अनेक मतांतरे आहेत, काही जण म्हणतात योग्य काही नाही
असेही तो 8 महिन्यांचा आहे त्यामुळे इतक्यात तरी कच्चे मांस पचवू शकेल का माहिती नाही

लहान मुलाने असा विचार करणे खरेच ईंटरेस्टींग आहे.

मला या निमित्ताने कुत्र्यांबाबत वेगळाच प्रश्न पडलाय. चर्चा भलतीकडे जाऊ नये म्हणून स्वतंत्र धागा काढतो जमल्यास.

मी माहेरची सारस्वत. पण आई-बाबा अंडं सोडलं तर बाकी काही खात नसत त्यामुळे आम्ही दोघी बहिणी पण खात नाही. बाकी सगळी चुलत आते भावंडे पक्की खाणारी. त्यामुळे, सुट्टीत एकत्र जमलो की एकाच टेबलवर शेजारी शेजारी बसून चुलत भाऊ फिशफ्राय आणि मी बटाट्याची कापं खात असू. Proud
लग्न ठरले तर सासरी ' अंडं' हा शब्द सुद्धा वर्ज्य. मी सारस्वत म्हणून आडून आडून ' आपल्यात चालत नाही' असं सांगून झालं मला. असो.
लग्नानंतर नवरा बायको दोघेही वेगळेच राहणार होतो, नवऱ्याला माझ्या अंडं खाण्यावर काही आक्षेप नव्हता. पण मीच अंडं खाणं बंद केलं. अगदी केकसुद्धा बिनअंड्याचे करायचे.
नंतर मुलीला बालदम्याचा खूप त्रास झाला तेव्हा तिला अंडी द्यायला सुरुवात केली. अशा रीतीने अंड्याचा घरात प्रवेश झाला. आता नवरापण खातो अंडं. मुलगी चिकन, फिश, प्रॉन्स खाते.‌पण घरी नाही, बाहेर. केरळाला गेलो होतो तेव्हा मीपण थोडे फिश आणि चिकन टेस्ट केले. पण फार काही वेगळी चव वाटली नाही किंवा परत खावेसे वाटले नाही.
आमचा कुत्रा अंडं नसेल तर जेवत नाही त्यामुळे, श्रावण असो की संकष्टी, आमच्या घरी अंडी उकडली जातातच. मध्यंतरी सासू सासरे आले होते तरीही यात खंड पडला नाही. त्यांना आवडले की नाही माहीत नाही, ते काही बोलले नाहीत.
कुत्र्यासाठी म्हणून पेडिग्री चिकन पाऊच वगैरे आणले जातात तेवढेच.
पण शेजारी बसून कोणी नॉनव्हेज खात असेल तर शिसारी वगैरे येत नाही.

हे अंडे आणि प्रोटीन यावरून आठवले की माझ्यावर बायकोने लादलेला सोमवार कसा बंद झाला.
माझी अतड्याच्या टीबीची ट्रीटमेंट चालू होती. नऊ महिन्यांचा कोर्स होता. त्यात प्रोटीनसाठी रोज दोन उकडलेली अंडी मटक मटक करत खायची होती. त्यामुळे मग बायकोने आता कसला सोमवार पाळणार म्हणत मला अंडे खायला सूट दिली. मी मग आता वार तसाही बुडतोच आहे म्हणत हळूहळू सारेच सुरू केले Happy

जास्त नॉनव्हेज खाल्याने कोरोना होत नाही. मला काही दिवसांपूर्वी ताप आला होता त्यावेळी मी मटणाचा काढा प्यायलो. ताप लगेच गेला.

मी इतकी शाकाहारी आहे की केसांना लावायला म्हणून सुद्धा अंडे घरात आणणे सोडाच,तसा विचारही करत नाही.
हे फारच अवांतर झाले.असो.

मी इतकी शाकाहारी आहे की केसांना लावायला म्हणून सुद्धा अंडे घरात आणणे सोडाच,तसा विचारही करत नाही
>>>>>>>

बरेच शाकाहारी जे धार्मिक कारणासाठी वा जीवहत्या नको म्हणून मांसाहार करत नाहीत ते केसांना चोळायला अंडे वापरायचाही विचार करणार नाहीतच.

उलट जर तुम्ही एखाद्याचा जीव खायला घेत असाल तर ते निसर्गनियमाला धरून आहे. पण चैनीला वा शोभेच्या वस्तू वा सौण्दर्यप्रसाधन बनवायला घेत असाल तर त्यात क्रौर्य आहे बोलू शकतो.
कागदही वेस्ट घालवायला याचसाठी आवडत नाही की त्यासाठी झाडे कापली जातात.
कदाचित म्हणूनच भले आपण कोंबड्या बकरी मारून खात असू पण कोणी खोड्या करायला एखाद्या गरीब बकरीला त्रास देत असेल तर आपल्याला त्याची चीड येतेच.

@ मटणाचा काढा किंबहुना गावठी कोंबडीचा काढा माझी आज्जी एक नंबर करायची. आणि आम्ही दोघेच प्यायचो.
बाकीचे सारे यावर चिडायचे कारण त्याने बाकी कोंबडीची चव कमी व्हायची आणि त्या काढ्यात उतरायची.
आमच्या घरात मागच्या पिढीत सारेच मांसाहारप्रेमी होते. कारण जातीधर्मात ठरवून लग्न झालेले सारे.

बाकीचे सारे यावर चिडायचे कारण त्याने बाकी कोंबडीची चव कमी व्हायची आणि त्या काढ्यात उतरायची.

Lol

त्या काढ्याला सूप म्हणतात ना? कि वेगळे काही घालून केलेला असतो?

त्या काढ्याला सूप म्हणालो तर आजीचा आत्मा मला सूपात घालून पिसून काढेल. ते वेगळेच प्रकरण होते. तशी चव मी आजीपश्चात आजतागायत कधी चाखली नाही. आणि आज जवळपास पंधरावीस वर्षांनीही जशीच्या तशी जिभेवर रेंगाळतेय. या एका कारणासाठी मला वाटायचे की आजीने
माझ्या पोटी माझी पोरगी म्हणून पुनर्जन्म घ्यावा.

त्या काढ्याला सूप म्हणालो तर आजीचा आत्मा मला सूपात घालून पिसून काढेल.
Lol
मी कधी चिकन मटण चा काढा नाही पीले,सूपच माहितीए म्हणून विचारले कि वेगळे काय करतात.
(काढा म्हणजे कडू आणि औषधी अशी माझी समज)

Pages