शाकाहारी - मांसाहारी जोडप्यांचे अनुभव

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 September, 2020 - 17:07

सुरुवात मी करतो Happy

ऑर्कुट मैत्रीनंतर प्रत्यक्ष भेटल्यावरही केमिस्ट्री जुळतेय हे लक्षात आल्यावर आम्ही जेव्हा लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा दोघांच्या जात आणि प्रांत भिन्न आहेत, तर त्यातून उद्भवणारया समस्यांशी आपल्याला लढायचे आहे आणि एकमेकांच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आहे हेच आम्हा दोघांच्या डोक्यात होते.
पण अशीच एक विसंगती आमच्या खाण्यापिण्याच्या आवडीतही होती, आणि तिथेही आम्हाला एकमेकाण्शी ॲडजस्ट करावे लागणार हे आम्हाला लवकरच समजले.

तर माझी बायको, म्हणजे तेव्हाची गर्लफ्रेंड शुद्ध शाकाहारी होती. तीच नाही तर तिच्या घरचेही शुद्ध शाकाहारी होते. याऊलट मी प्रचंड मांसाहारप्रेमी, रोज खाऊ घातले तरी आनंदाने खाणारा, आणि त्यात नास्तिक असल्याने वर्षाचे ३६५ दिवस कुठलाही सणवार न मानता खाऊ शकणारा होतो.

आम्ही जेव्हा लग्नाआधी डिनर डेटला जायचो तेव्हा शुद्ध शाकाहारीच खायचो. ती मला एकाच टेबलावर मांसाहार करायची परवानगी द्यायची, पण दोघांनी शेअरींग करून खायचे ते दिवस असल्याने मी ते टाळायचो.

पुढे मला समजले की ती खूप लहान असताना त्यांच्या घरी सारे जण नॉनवेज खायचे. पण देवाधर्माच्या कारणाने कित्येक वर्षे झाली त्यांनी कायमचे सोडले होते.

पुढे लग्न जमताना आंतरजातीय विवाह असल्याने तसेच पत्रिकेतही मृत्युयोग आल्याने दोन्ही घरात बरेच महाभारत घडले. ते पुन्हा कधीतरी. पण ते वादळ शांत होऊन जेव्हा सामंजस्याने दोन्ही घरातून लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा तिच्या घरचेच तिला म्हणाले की आता तुला जमत असेल तर नॉनवेज खायला सुरुवात कर. माझ्या घरचेही म्हणाले की ती बनवायला शिकली नाही तरी चालेन पण खायला शिकली तर सगळ्यांच्याच सोयीचे होईल.

बायकोनेही मग ती मानत असलेल्या देवांचे दोन तीन वार वगळून ईतर दिवशी नॉनवेज खायला सुरू करायची तयारी दर्शवली आणि आमच्या डिनर डेटला पनीर चिल्लीसोबत चिकन लॉल्लीपॉप सुद्धा दिमाखात टेबलावर विराजू लागले.

पण तिने हे मान्य करताना माझ्याकडूनही एक अवघड वचन घेतले. ते म्हणजे तिच्या लाडक्या महादेवाच्या सोमवारी मी नॉनवेज खाणार नाही. हे माझ्यासाठी अवघड होते कारण रविवारचा शिल्लक मांसाहार सोमवारी डब्यात न्यायचा हा माझा शिरस्ता होता. आता मला त्याजागी घासफूस खावी लागणार होती. अमान्य करायचा पर्याय नव्हता कारण आमचे अडचणीत आलेले लग्न सुखरूप पार पडावे यासाठी तिने दोघांच्यावतीने तसा नवसच केला होता. ती सोमवारचा उपवास करणार होती तर मी वार पाळणार होतो.

मग माझ्याकडे पर्यायच नव्हता. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है म्हणत मी ते ऐकले खरे. पण ऑफिसमध्ये ईतरांच्या डब्यात मांसाहार असेल वा बाहेर कुठे खायची संधी मिळाली तर गपचूप खाऊ लागलो. तिची श्रद्धा तिच्याजवळ माझे विचार माझ्याजवळ. फक्त तिला समजू नये याची काळजी घ्यायचो.

वर्ष असेच सरले. मग मात्र हळूहळू तिला मस्का मारत या शापातून उ:शाप मिळवला. माझा सोमवार पाळायचा बंद झाला.

त्यानंतर पुढे कधीतरी तिला सांगितले की मी याबाबत तिला चीट करायचो. सोमवारीही संधी मिळताच बाहेर नॉनवेज चापून खायचो. पण तोपर्यंत तिला मी असाच आहे हे कळले होते त्यामुळे विशेष काही वाटले नाही.

आजच्या तारखेला ती माझ्यासारखा वारंवार मांसाहार करत नाही. पण जेव्हा मांसाहार करते तेव्हा माझ्या दुप्पट आवडीने करते.
लग्नाला ईतकी वर्षे होऊन मांसाहार बनवायला आजवर शिकली नव्हती. पण अखेर या लॉकडाऊनच्या कृपेने तो सुद्धा योग आला.
फक्त आजही सासुरवाडीचा पाहुणचार घ्यायला जातो तेव्हा मात्र मटार उसळ आणि पुरणपोळ्यांवरच समाधान मानावे लागते Happy

असो, हे झाले माझे.

शाकाहार-मांसाहाराबाबत आणि याच्याशी जोडल्या गेलेल्या धार्मिक संकल्पनांबाबत जरी प्रथमदर्शनी आमचे विचार वेगळे असले तरी एकमेकांच्या या वैयक्तिक बाबींत आम्ही हस्तक्षेप न करता सुखसमाधानाने जगत आहोत.

पण घराघरातली परिस्थिती वेगळी असू शकते.
याबाबतचे विविध अनुभव वाचायला आवडतील. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहेरी वर्षातून ४ वेळा मटन व २ वेळा मासे होत. सासरी पोर्क/बीफ पासून कशालाच मज्जाव नव्हता. नाक मुरडत खायला शिकले कारण शेजारच्या सेम जातीच्या साळकाया म्हाळकाया ( साबांच्या मैत्रिणी) - "अगं पण आपल्यात खातात ना? मग तू का नाही खात?"
सध्याची केस - मासे आवडतात पण बीफ/पोर्क/चिकन/मटन नको वाटते.
विशेष काहीच बनवता येत नाही पण नॉनव्हेज तर एकदम ढ च.

आमचं लग्न (arranged marriage) झालं तेव्हा माझा नवरा मांसाहार प्रेमी होता. मी स्वतः मांसाहार करत नसले तरी माझ्या समोर/ टेबलवर इतरांनी खाल्लं तरी मला वावडं नव्हतं. मी तशी बर्‍यापैकी नास्तिक असल्याने अमुक वारी मांसाहार करू नये असे काहीही समीकरण डोक्यात नव्हते.
सासूबाई घरात चिकन/ मासे वगैरे करायच्या. मी मात्र काही झालं तरी मांसाहारी स्वयंपाक करणार नाही हे लग्नाआधीच स्पष्ट केलं होतं. तरी सासूबाईंची अपेक्षा असायची की त्या चिकन वगैरे करत असतील तर मी त्यांना मदत करावी. पण ते मला अजिबात आवडायच नाही.
नंतर आम्ही अमेरिकेत गेलो. तिथे मी हळूहळू नॉनव्हेज खायला लागले. त्याच मुख्य कारण की restaurants मधे जेवायला गेलो की व्हेज पदार्थांमध्ये फारच कमी options असायचे. आणि restaurants मधे तेचतेच व्हेज पदार्थ खाऊन कंटाळा येऊ लागला. शिवाय अनेकदा restaurants मध्ये पोर्शन्स एवढे मोठे असतात की आम्ही दोघांनी एखादी डिश शेअर केली तरच ती संपायची.
घरी मात्र मी कधीही नॉनव्हेज स्वयंपाक केला नाही.
नंतर आम्हाला मुलगी झाली. ती थोडी मोठी झाल्यावर तिनेही शाकाहारी व्हावे असे मला वाटे. याची दोन कारणे होती. १) ती नॉनव्हेज खायला लागली की ती मला घरीही नॉनव्हेज स्वयंपाक कर असा आग्रह करेल असे वाटले. नवर्‍याचा आणि सासूचा आग्रह मी जितक्या सहजपणे धुडकावून लावला तितक्या सहजपणे लाडक्या लेकीचा आग्रह धुडकावून लावता येणार नाही असे वाटत होते. २) आम्ही जरी नॉनव्हेज खात असलो तरी चिकन आणि मासे यापुढे आमची मजल गेली नव्हती. पण अमेरिकेत बीफ/पोर्क सर्रास खाल्ले जाते आणि शाळेच्या cafeteria मध्येही मिळते. ते मुलीने खाऊ नये असे वाटे.
पण तरीही मुलगी शाळेत गेल्यावर हळूहळू नॉनव्हेज खायला लागली.
त्यानंतर मुलगी साधारण ८ वर्षाची असताना नवर्‍याने अचानक नॉनव्हेज खाणे सोडले. त्याने सोडले तसे मग मी पण सोडले. मुळात मला फार आवड नव्हतीच. केवळ त्याला कंपनी द्यायला मी नॉनव्हेज खात होते.
आता ह्या घडीला अशी परिस्थिती आहे की आम्ही दोघही नॉनव्हेज खात नाही. आमची लेक आवडीने खाते. त्यामुळे restaurant मधे गेलो की आम्ही दोघं शाकाहारी पदार्थ order करतो आणि मुलीसाठी नॉनव्हेज.
नॉनव्हेज स्वयंपाक मी आजतागायत केला नाहीये. Happy

सासरी आणि माहेरी मांसाहार म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय..
समुद्राच्या जवळपास राहत असल्यामुळे माहेरी गुरुवार सोडून रोजच जेवणात मासे असायचे. कदाचित समुद्राच्या जवळ राहणाऱ्या लोकांचे मासे हे मुख्य अन्न घटक असावेत. मला स्वतःला शाकाहारी जेवण बनविण्यापेक्षा मांसाहारी जेवण बनवायला जास्त आवडते. श्रावण महिना आणि नवरात्रीचे नऊ दिवस सोडले तर इतर दिवशी आमच्या कडे मांसाहाराचे वावडे नाही. पण मी शक्यतो सोमवार आणि गुरुवारी मांसाहार बनविण्याचे टाळते. दोन्ही मुले हि आवडीने मांसाहार करतात.

माझ्या घरचे शाहाकारी आहेत आणि अर्धांगिनी सुद्धा कट्टर शाहाकारी आहे. त्यामुळे मला हॉटेल आणि मित्रा शिवाय पर्याय नाही.
चिकन आणि मासे माझा वीक पॉईंट आहेत.
विशेष घरी आजून माहित नाही मी बाहेर मांसाहारी खातो ते.
एकदा गंम्मत झाली, आम्ही सगळे जगन्नाथ पुरी ला गेलो होतो, समुद्र किनाऱ्यावर फिश फ्राय पाहून तोंडाला पाणी सुटलं मग काय सर्वाना संध्याकाळी रूम वर सोडून देव दर्शनाला जातो सांगून जावे लागले, काय करणार.

आमचं लग्न ठरलं तेव्हा बायकोने मला हाच प्रश्न विचारला - "नॉनव्हेज खाता ना..?" माझा होकार आल्यावर तिचं मणभर ओझं उतरल्या सारखं वाटलं Proud

अगदी अट्टल मांसाहारी तीही नाही अन मीही नाही पण तरी एखाद्या दिवशी नॉन्व्हेज बेत ठरला तर उगीच पंचाईत होत नाही.

माझ्या घरी सगळे शुद्ध शाकाहारी (म्हणजे अंडे पण खात नाहीत, दूध मात्र चालतं).

मी एकटाच मांसाहार करायला लागलो हॉस्टेलवर असताना. बायको पण शुद्ध शाकाहारी, पण लग्ना आधीच तिला सांगितले मी मांसाहार करतो ते. ती म्हणाली तिला मांसाहार स्वयंपाक नाही येत, मी म्हणालो मलापण नाही येत मी बाहेरच खातो.

आम्ही बाहेर जेवायला गेलो की एकाच टेबलावर मी नॉनव्हेज खायला तिची हरकत नसते. तसेच मी धार्मिक/आस्तिक नसल्याने मला कुठलेच वार, चतुर्थी, एकादशी वगैरे ठाऊकही नसते आणि ती आस्तिक असली तरी तिच्याही लक्षात नसते, ती ही कुठला वार वगैरे पाळत नाही. तेव्हा अमुक वारी/सणाला खाऊ नकोस असे ती ही कधी म्हणत नाही.

मध्यंतरी एकदा चिकन गुन्या अंगावर काढल्याने (टूरवर होतो) खूप अशक्तपणा आला होता तेव्हा डॉक्टरांनी मला रोज अंडी खाण्याचा सल्ला दिला, तेव्हा तिने घरी अंडी खायला परवानगी दिली. मग मी घरी ऑम्लेट, हाफ फ्राय, भुर्जी वगैरे बनवू लागलो. आताही बनवतो अधून मधून, पण घरात दोघंं असताना एकट्याने वेगळे बनवून खा यात मजा नाही, तेव्हा कवचित बनवतो.
बायको माहेरी गेली असेल तेव्हा मात्र नाश्त्याला बहुतेक वेळा अंडे आणि जेवायला कधी अंडकरी बनवतो. चिकन / मासे (मटण क्वचित खातो) मात्र बाहेरच.

या टॉपिक वर माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे Lol

माझ्या सासरी आणि माहेरी पण सगळे अट्टल शाकाहारी (वेगन नव्हे :)). पण नवरा चवीने नॉन-व्हेज खाणारा आहे. हे त्याने लग्नापूर्वी मला सांगितलं होतं, पण हे त्याच्या घरी माहिती नव्हतं.

लग्नानंतर एकदा आमचं कडाक्याचं भांडण झालं तेव्हा डोकं फिरलेलं असल्याने काहीही कारण नसताना मी साबांना सांगितलं की हा नॉन व्हेज खातो,आणि त्या mom knows everything स्टाईल मध्ये म्हणाल्या मला माहिती आहे आणि कधी पासून खातो ते पण सांगितलं. माझा अशक्य पचका झाला पण नवरा बिनधास्त झाला.

जेव्हा आम्ही दोघंच जायचो तेव्हा त्याला व्हेज च खावं लागायचं कारण मला ऑम्लेटचा देखील वास सहन व्हायचा नाही आणि व्हेज ऑर्डर एकटीला संपायची पण नाही. पण हॉटेल मध्ये येऊन घासफूस खाण त्याला जड जायला लागलं त्यामुळे ते हळूहळू बंद झालं.

एकदा गोव्यामध्ये नवरा सी फूड सिझलर हाणत होता आणि मी रोड वर उभी होते. हे प्रकार आम्ही गोवा,केरळ, कोकण या अशा बऱ्याच ठिकाणी केले आहेत. ओव्हर द टाइम टेबल शेअर करायला शिकलेय. इकडे तिकडे न बघता समोरच्या पनीर कडे लक्ष द्यायला जमतंय आता.

मुलीच्या बाबतीत आम्ही ठरवलं होत की कोणीही फोर्स करायचा नाही. तिने मागितले तर मी खाऊ द्यायचे आणि नवऱ्याने जबरदस्ती खायला लावायचे नाही. अजून तरी तिची गाडी अंड्यापर्यंत आलीये आणि तिला आवडतंय. जगाच्या पाठीवरच्या बऱ्याच deficiencies माझ्या मध्ये असल्याने मला ती अंड तरी खातेय हे पाहून बरं वाटत.

इंटरेस्टिंग धागा. सर्वांचे अनुभव वाचायला मजा येतेय. आमच्याकडे घरी सगळे शाकाहारी. अगदी वास सुद्धा सहन होत नाही, असे शाकाहारी. लग्नाच्या वेळी tension होतेच, की शाकाहारी सासर नाही मिळाले, तर काय करायचे? आधी शाकाहारीच हवा, असा हट्ट होता. मग सर्वांनी समजावल्यावर बाकी सगळे जमले, आणि फक्त एवढ्याच मुद्द्यावर घोडे अडले, तर मी nonveg बनवणार नाही, खाणार नाही. इतरांनी केले, खाल्ले, तर चालेल, एवढी adjustment करायला मी तयार होते.
लग्न जमले, तेव्हा सासरच्यांना तसेच सांगितले. त्यांनी कबूल केले. सुदैवाने नवऱ्याच्या नोकरीमुळे आम्ही बाहेरगावी होतो आणि नवरा कट्टर मांसाहारी नव्हता. क्वचित मासे, चिकन, अंडी खायचा फक्त. त्यामुळे एखादेवेळी मित्रांबरोबर जाऊन खाऊन यायचा. आम्ही दोघे कुठे गेलो, तर शाकाहारीच खायचो. त्यावरून फार मोठा issue झाला नाही कधी. यथावकाश त्याने खूप मनापासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला, degree घेतली, तेव्हा स्वतः होऊन त्याने मांसाहार सोडला. त्यामुळे मग प्रश्नच मिटला.
Vit. B12, उच्च दर्जाचे proteins अशा कारणांसाठी मांसाहार चांगला, हे एक डॉ. म्हणून पटत असल्याने मुलाला मात्र शाकाहाराचा आग्रह नाही धरला. जवळच्या मित्रांनी, नातेवाईकांनी मांसाहार बनवल्यावर मुलाला तिकडे पाठवून खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. पण त्याने नाही खाल्ले. फसवून दिले, तर उलटी काढतो तो. मग विषय सोडून दिला. सध्या तिघेही शाकाहारी. पुढे मोठा झाल्यावर मुलाने खाल्ले मित्रांबरोबर, तर आम्हाला काही problem नाही.. चालेल, आवडेल आम्हाला.

आमच्या कडे वेज-नॉनवेज असा प्रश्न नाहीये..नवर्याला नॉनवेज असेल नसेल तरी प्रॉब्लेम नसतो आणि मलाही करायचा कंटाळा(स्वयंपाक, घरकाम वगैरे)...आता मुलांना आवडते मग नियमित बनवते.

बेस्ट आहे धागा.

बहुतेक अनुभव नवरा मांसाहारी प्रेमी आणि बायको शाकाहारी असे दिसतायत. Proud आमच्याकडे उलट होतं. मी मां.प्रेमी आणि सासरी कुणीही अंड्यालाही हात न लावणारं.

माझा घरी नॉनव्हेज करण्याचा विशेष उत्साह कधीच नव्हता. त्यामुळे कधीमधी हॉटेलमध्ये खाऊ असं मी ठरवलं. मात्र मी नवर्‍याला कधीही 'तू एकदा खाऊन तरी बघ' म्हणून आग्रह केला नाही; आणि त्यानं मी नॉनव्हेज सोडावं अशी कधी अपेक्षा केली नाही.
मात्र लग्नानंतर दोन-एक वर्षांनंतर तो आपणहूनच चिकन, अंडी खायला लागला.

मी मासेप्रेमीही आहे. तो मासे मात्र तितकेसे आवडीने खात नाही.

मी लग्नापूर्वी शाकाहारी होतो, व्यायामासाठी अंडे उकडून वगैरे खात असे पण तितकेच
पण बायकोच्या घरी सगळेच अट्टल मांसाहारी आणि तिकडे पहिल्यांदा त्यांनी मला चिकन बिर्याणी चाखायला लावली
मी आपला भावी सासर्याना कुठं विरोध करायचा म्हणून आपले दोन चार घास घेतले. त्यावेळी तो उग्र वास नको वाटला पण चव भारी होती
नंतर मग हळूहळू जेव्हा केव्हा सासरी जाणे व्हायचे तेव्हा नॉनव्हेज चा बेत केला जायचा आणि बघता बघता मी अत्यंत आवडीने आणि चवीने सगळं खायला शिकलो

मी गंमतीने बायकोला म्हणतो एका देशस्थ ब्राह्मणाने दुसऱ्याला बाटवण्याची घटना फारच दुर्मिळ असेल ना Happy

आम्ही दोघेही शाकाहारी त्यामुळे कधी काही प्रश्न आला नाही.
ह्यांना अंडं चालतं, मला चालत नाही.
पण आवडतं असं काही असल्यामुळे काही मतभेद वगैरे झालेच नाहीत

माहेरी अस्सल मांसाहारी घरात असूनही मी नॉनव्हेजला हातही लावत नव्हते. मासे, चिकन, मटण काहीही नाही. माझ्यासाठी आईला काहीतरी वेगळं करायला लागायचं. अगदी अंडी देखिल दोन दिवस लागोपाठ खाल्ली की अंड्यांची शिसारी यायची मला. १९८० साली आम्ही घर बदललं. नव्या घरात सामान तीन दिवस लावत होतो सगळेजण. तेव्हा कामानं दुपारी सडकून भूक लागायची. पहिल्याच दिवशी सकाळी कोळीण घरी आली आणि आईनं तिच्याकडून भरपूर कोळंबी घेऊन दुपारी गरमागरम आंबेमोहराचा गुरगुट्या भात आणि कोळंबीचं कालवण करायची. मी चापून जेवले आणि रोज हाच बेत हवा असं सांगून टाकलं. पुढे दोन तीन दिवस दुपारचं जेवण हेच होतं. अन मी नॉनव्हेज खाऊ लागले.

लग्न ठरलं पक्क्या शाकाहारीशी. सासरी तर स्वयंपाकात कांदा लसूणही खात नाहीत. मी बाहेर नॉनव्हेज खाल्लं तरी चालेल पण घरी करू नये आणि खाऊ नये ही एकुलती एक अपेक्षा नवर्‍यानं समोर मांडली. मीही ओके आहे. नॉनव्हेजवर खूप काही प्रेम नाही. भाज्या वगैरे मिस करते मी मात्र नॉनव्हेजबद्दल आवड आहे पण अतिआवड नाही त्यामुळे निभतंय. मुलगी मात्र नॉनव्हेज खाते हे बरं झालं, आम्ही बाहेर खातो आणि बिल्डिंगमध्येच माझे आईबाबा राहतात त्यांच्याकडे खातो. मी नॉनव्हेज खाते हे सासरी सर्वांना माहित आहे. अजून एक जाऊ देखिल कायस्थ आहे त्यामुळे ती देखिल खाते.

रेस्टोरंट मधे शेजारी बसून खातो त्याबद्द्ल नवर्‍याला काही प्रॉब्लेम नाही. उलट त्याला खूप कुतुहल वाटतं. कोल्ड स्टोरेज सेक्शनमध्ये जाऊन हे काय ते काय असं विचारतोदेखिल. चुकून खाऊनही झालंय त्याचं. बेसिकली स्वतः नॉनव्हेज खाण्याबद्दल मेंटल ब्लॉक आहे त्याला हे माझ्या लक्षात आलंय कारण इतरांनी खाण्याबाबत तो अतिशय फ्लेक्सिबल आहे. आम्ही ट्रिपवर गेलो असताना सोबत बहिण आणि तिची मुलं होती आणि आम्ही एअरबीएनबी मध्ये एकत्रच रहात होतो. तिच्या मुलांना नॉनव्हेजशिवाय जेवण जात नव्हतं तर आम्ही बाहेरून आणून घरी खाणे, जास्तीचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवणे वगैरे प्रकार चालले नवर्‍याला. ते ही अर्थात मुलं लहान होती म्हणून. आता पुढे अशी ट्रिप घडली तर दोन शेजारी शेजारी घरं घ्यावी लागतील. आणि घरात नॉनव्हेज अजिबात नकोच हा पवित्रा कायम आहे.

याउलट माझ्या बहिणीची कथा. ती देखिल माझ्यासारखी. नॉनव्हेजची फारशी आवड नसणारी. तिच्या देशस्थ नवर्‍याच्या माहेरी नॉनव्हेज नाहीच अर्थात पण तो बाहेर खायचा आणि त्याला आवडायचं नॉनव्हेज. लग्न झाल्यावर माझ्या आईला म्हणजे त्याच्या सासूला घेऊन मासळीबाजारात घेऊन कोणते मासे घ्यावेत, कसे बघून घ्यावेत इ खास शिकून घेतलं. नॉनव्हेज घरच्या घरी करता येतं, चिकन-मटण-मासे घरच्या चवीचे आणि हवे तेवढे घरी बनतात याचं त्याला सुरवातीला इतकं अप्रुप वाटे! मुलं देखिल अर्थातच अट्टल खाणारी झालीयेत.

सासरी माहेरी निदान 1-२ तरी पूर्ण शाकाहारी माणसे आहेत.
बाकी मांसाहारी.त्यांच्या स्वयंपाकाची भांडी वेगळी आहेत.तर shakaharyanchi ता टे,पेले वेगळे असायचे..त्यामुळे रविवारी दोन्ही स्वयंपाक असायचे.

ह्म्म्म मी कोब्रा आणि नवरा सिंधी लग्नाच्याआधी चांगलं ७ वर्ष मी त्याला ओळखत होते but कसम पैदा करने वाले कि सगळी वर्ष आई बाबा ना कसं पटवायचं यातच गेली..ले मारामारी, पत्रिका, ग्रह, न मिळणारे गुण पण ठरलं लग्न एकदाच..हुश्श, साखरपुड्याच्या आधी ऑफिस मध्ये गप्पांच्या ओघात मैत्रीण बोलली "सिंधी ना म्हणजे नॉन व्हेज खात असणार नक्की " च्या मारी लागलाच आधी फोन केला नवऱ्याला आणि बड बड बड बड चालू केली मला नाही चालणार, मी नाही बनवणार, तू नको खाऊ हे नई ते नई
तो शांतपणे बोलला "मी नाही खात नॉन व्हेज फक्त एग खातो " जीव भांड्यात पडला माझा, सो आता अंड्या चे प्रकार घरी बनवते, बाकी नॉन व्हेज नाही घरी बनत, आणि खाल्लेलं चालणार पण नाही बाहेर, हॉटेल कुठेच..

आमच लग्न ठरल तेव्हा आम्ही दोघेही शाकाही होतो. दोघांच्याही घरी अंडी आजरी माणसाला डॉ़क्टर ने सांगितली म्हणुन तेवढ्या पुरतीच घरात आलेली. माझे आजोबा भटकी(पुजा अर्चा करणारे गुरुजी) करणारे असल्याने घरात कडक सोवळे होते. आजोबा गेल्या नन्तर काही वर्षांनी हळू हळू अंड्यांनी घरात प्रवेश केला. त्या साठी वेगळी भांडी वापरली जायची. लग्न ठरल तेव्हा खर तर दोघांनीही नॉन्व्हेज विषयी कहिच विचारले नाही . नंतर कळाले की सासरी दिर, जाऊ आणि सासरे चिकन खातात. साबा त्यात न्हवत्या आणि बाहेर काहिहि खा घरी आणायचे अथवा बनवायचे नाही एवढिच साबांची अट. पहिल्यांदाच दिर -जाऊ यांच्या सोबत केवळ उत्सुकता म्हनुन चिकन टेस्ट करुन बघितले. नवरा मात्र शाकाहारिच होता. नेमक कस लागत ही खाउन बघण्यामागची उत्सुकता काही पदार्थ खाल्यावर कमी झाली. अर्थात मी बाहेर गेल्यावर थोड्फार चिकन आणि मासे खाउ लागले. ह्याचे एक कारण म्हणजे, माझ्या एका बहिणीचा नवरा पक्का मांसाहारी. आठवड्यातून एक दोन वेळा तरी त्या चिकन लागायचे. पण बहिन शाकाहारि असल्याने त्याला नेहमी हॉटेल मध्ये गेल्यावर शाकाहारीच मागवावे लागायचे. मग कोणी तरी त्याला चिकन खायला कंपनी द्यावी म्हणुन तो आमच्या मागे लागयचा. मग मी त्याला कंपनी देउ लागले. चिकन्च्या पुढे अजुन उडी गेली नाही.
लग्नानंतर नवरा परदेश वारी करुन आला आणि खाण्याचे हाल झाल्यामुळे एकदम बारीक झाला. त्याच वेळी ठरवले की मुलाला चिकन खायची सवय लावणार. कधी परदेशी जाण्याचा योग आलाच तर निदान खाण्याचे हाल तरी नाही होणार. मग मुलगा ताव मारुन खाऊ लागला. ( त्याचा आता खरच ऊपयोग होतोय) माझ्या घरी आईला आणि बहिणीला हे चालायचे नाही. मुलगी ऐकत नाही म्हनल्यावर अनेक प्रकारे नातवाला सांगून झाले की चिकन खाऊ नको. पण तो ऐकायचा नाही. मुलगा मुद्दाम आज्जीला आणि मावशीला त्रास द्यायचा. आज मी चिकन खाल्ले आहे मी तुला मिठी मारणार, मग ती त्याला जवळ येउ द्यायची नाही. पण हळू हळू त्यांनिही ही गोष्ट मान्य केली.
एक दिवस नवर्‍याला काय वाटले माहित नाही, त्याने ही खाऊन तर पाहुन म्हणुन सुरुवात केली आणि आता सगळेच मांसाहारी झालो.

आमच्या घरी माझी आई आणि मी सोडून बहिण भाऊ पप्पा सगळे मांसाहार खात होते.. मलाही कधी खावसं असं वाटलं नाही.. तसं खायला न खायला कुणाचं बंधन नव्हतं पण आईबरोबर मी ही संत्संगला वैगेरे जात असल्यामूळे धार्मिक प्रवृतीकडे माझा कल होता.

पुढे माझ्या ख्रिश्चन एक्स गर्लफ्रेंडमूळे थोडंफार खायला शिकलो होतो. ती तर पोर्क आणि बीफही खायची पण मी ते सोडून सगळं ट्राय केलेलं.. कधी टाऊनला फिरायला गेलो तर जीमीबाॅयला खिमा पाव आणि पत्रानी मच्छी मात्र आवडीने खायचो...

माझी दुसरी लाॅग डिस्टन्स गर्लफ्रेःड म्हणजे आताची बायको शुद्ध शाकाहारी आहे. तिला एका टेबलावरच काय तर नाॅनवेज मिळणार्या हाॅटेलचही वावडं आहे.. सहसा तिला बाहेरच खायला आवडत नाही जरी कधी बाहेर खायचं झालचं तर पुअर व्हेज हाॅटेलमध्ये जाऊन जेवतो..

तसं लग्न ठरल्यापासून दिड वर्षे पूर्ण बंदच केलं होतं पण मग एकदा कोल्हापूरला चुलत मेहूण्याने खुपच गळ घातली तेव्हा मस्त तांबड्या पांढर्यावर ताव मारलेला.. तेव्हापासून मित्रांबरोबर किंवा ऑफिसमध्ये वार नसला की खातो थोडं.. पाहीजेच किंवा फार आवडत असं काही नाही माझं...

>>>>एकदा गंम्मत झाली, आम्ही सगळे जगन्नाथ पुरी ला गेलो होतो, समुद्र किनाऱ्यावर फिश फ्राय पाहून तोंडाला पाणी सुटलं मग काय सर्वाना संध्याकाळी रूम वर सोडून देव दर्शनाला जातो सांगून जावे लागले, काय करणार.>>>> हाहाहा असं निरुपद्रवी फसवणं चालतं. पुढे आठवले की मजा येत असावी. Happy
_______________________
एकेक अनुभव जबरी आहेत. मजा येतेय वाचताना. ललीता प्रीती, आशुचँप यांच्या अनुभवांसारखे काही काही क्रॉसओवर म्हणजे गटबदलू आहेत हे वाचून बरे वाटले. वाण नाही पण गुण तरी.

बहुतांश प्रतिसाद महिलावर्गाचे. नव्या नवरीला नवीन घरात नवीन किचनमध्ये ॲडजस्ट करावे लागते त्यामुळे असावे. माझ्या बायकोलाही तिचा पॉईंट ऑफ व्यू विचारायला हवा Happy

एक किस्सा आठवला.
तिने जेव्हा लग्न ठरल्यावर नॉनवेज खायला सुरुवात करायची ठरवले तेव्हा आमचे बाहेरच खाणे व्हायचे. सुरुवात चिकन लॉलीपॉप आणि चिकन क्रिस्पीपासून झाली. चिकन तंदूरी माझ्या आवडीचे पण ते तिला रुचले नाही. चिकन सिझलर मात्र आवडले. जसे स्टार्टर आवडायचे तसे मेन कोर्स तेव्हा झेपायचे नाही. माश्यांकडे तर अजून वळलीही नव्हती. अंडा भुर्जी आणि ऑमलेट सुद्धा आपण फार काही मोठा मांसाहार करत आहोत अश्या थाटात खायची. थोडक्यात मांसाहाराच्या पहिलीत होती.

लग्नानंतर जेव्हा आमच्या घरी आली तेव्हाही सुरुवात म्हणून मला लाडीक गळ घातली. अंडेच का होईना पण बोहनीचे तू मला आपल्या हाताने करून खाऊ घाल. हाऊ रोमॅण्टीक वगैरे म्हणत मी सुद्धा एका रविवारच्या सकाळी ब्रेकफास्टला तिला माझ्यासोबतच अंडे करून दिले. पण तिच्या दुर्दैवाने माझ्या आवडीचा प्रकार होता हाफफ्राय ..
झाले, मळमळ उलट्या ढवळून येणे.. पुढचे काही दिवस अंड्याचे नाव काढले नाही. आमच्याकडे सगळेच आवडीने हाफफ्राय खात असल्याने मलाही कळले नाही की नेमके माझे काय चुकले. पण नंतर ऑफिसमध्येही जेव्हा यावर बोलणे झाले तेव्हा लक्षात आले की कित्येक भल्याभल्यांनाही ते हाफफ्रायचे वरचे अर्धे कच्चे लेयर असलेले अंडे झेपत नाही.

अर्थात आजही ती हाफफ्राय खात नाहीच. पण केवळ आवडीचा भुर्जीपाव खाण्यासाठी म्हणून येऊन जाऊन तासाभराचा प्रवास आणि दोन अडीचशे रुपये कॅबचे भाडे भरायची तयारी असते Happy

आमचं माञ जरा चांगल आहे कारण घरी आणि बायको च्या माहेरी सर्व शुध्द शाकाहारी आहेत त्यामुळे वादच नाही. प्रत्येक वर्षी दोन वेळा वारी (आषाढी आणि कार्तिकी) करणारे. शुध्द शाकाहारी हाॅटेल नसेल तर उपाशी घरी येणार पण मिक्स हाॅटेल जेवण नाही करणार असे आमच्या घरचे लोक आहेत. मी माञ अपवाद आहे. मिञ आणि ऑफिस मुळे मला मांसाहारी लोक आणि हाॅटेल ची सवय झाली आहे. मांसाहार माञ नाही करत.

आमच्या कडे ४ कपल्स असे आहेत की मुलगी शाकाहारी , मुलगा मांसाहारी.
लग्न ठरल्याच्या आगेमागे स्वतःहून मांसाहार सोडला (मुली म्हणाल्याने नाही, वेगळे ट्रिगर होते.).

सासरी, नणंदेमुळे ति चा` नवराही खायला लागला.

लग्नानंतर एकदा आमचं कडाक्याचं भांडण झालं तेव्हा डोकं फिरलेलं असल्याने काहीही कारण नसताना मी साबांना सांगितलं की हा नॉन व्हेज खातो,
>>> यु आर डेंजरस....

@च्रप्स , ते फक्त आता माझी सटकली मोड मध्ये, नाहीतर गरीब गाय आहे मी (असं आई आणि आजी म्हणतात) Happy

फ्रेंड्स मधला तो एक एपिसोड आहे ना , मोनिका आणि रॉस त्यांच्या आई वडिलांना एकमेकांची सगळी सिक्रेट्स सांगतात. https://www.youtube.com/watch?v=I3hn40NlrVk

Lol...

माझा मुलगा लहान असताना आवडीने खायचा चिकन
एकदा त्याने हॉटेल मध्ये त्याच्यासाठी एक चिकन लॉलीपॉप आणि एक उकडलेले अंडे अशी गजब ऑर्डर केली होती

नंतर मग त्याने कधीतरी चिकन सेंटर पाहिले आणि त्याचे निरागस मन बदलले, तो म्हणतो आपल्या खाण्यासाठी त्या बिचाऱ्या प्राण्यांना मारून टाकतात, मी हे खाऊ शकणार नाही यापुढे
आम्हीही त्याला काही विरोध अथवा सहमती दाखवली नाही
आम्हाला आवडतं आणि चालतं त्यामुळे आम्ही खाणार
तुला नको असेल तर आग्रह नाही
तो आता अंडी खातो फक्त ते पण ऑम्लेट वगैरे मध्ये
ही एक केस आणि दुसरे पिल्लू म्हणजे आमचे भुभु
आम्ही नवरा बायको मांसाहार करत असलो तरी घरी परवानगी नव्हती
काय खायचे ते बाहेर खाऊन या अशी परवानगी
पण भुभु ला काही महिन्यांपूर्वी चिकन सुरू करा असे व्हेट ने संगितले
त्यामुळे त्याच्यासाठी म्हणून आईने परवानगी दिली घरी चिकन आणून शिजवण्यासाठी
विशेष म्हणजे हे चिकन धुणे, कुकर ला शिजवल्यावर भुभु च्या बाउल मध्ये भातासोबत कुस्करून देणे हे पोरगा करतो
त्यात त्याला काही वाटत नाही कारण हे भुभु चे नैसर्गिक अन्न आहे आपले नाही
मलाच एकदम न्यूनगंड वगैरे म्हणतात तो आला त्यावेळी

विशेष म्हणजे हे चिकन धुणे, कुकर ला शिजवल्यावर भुभु च्या बाउल मध्ये भातासोबत कुस्करून देणे हे पोरगा करतो
त्यात त्याला काही वाटत नाही कारण हे भुभु चे नैसर्गिक अन्न आहे आपले नाही>>>> Happy

, तो म्हणतो आपल्या खाण्यासाठी त्या बिचाऱ्या प्राण्यांना मारून टाकतात, मी हे खाऊ शकणार नाही यापुढे......... किती गोड.अशाच थाटाचा f.bvar eka मुलीचा व्हिडियो पहिला होता त्याची आठवण झाली.

पण हाच मुलगा भू भू ला मात्र चिकन कुस्करून देतो हे जास्त कौतुकाचे आहे.मला पटत नाही मी खात नाही.तुझे ते अन्न आहे तू खा.इतकी साधी सोपी विचारसरणी लेकाची आहे.

Pages

Back to top