दख्खनचे जागतिक बंध उलगडताना....

Submitted by वरदा on 14 September, 2020 - 08:33

आजचं जग हे झपाट्याने होणार्‍या वैश्विकीकरणाचं आणि त्याचबरोबर अस्मितांविषयक वाढत्या जाणिवांचे आहे. सगळं जग एकसमान व्हायला लागलं तर आपण आपली सांस्कृतिक ओळख विसरून जाऊ, अशा एका नकळत्या भीतीने गेल्या काही दशकांमध्ये अस्मितांच्या भिंती जास्तच पक्क्या होऊ लागल्या आहेत. या अस्मितांचे ताणेबाणे बहुपेडी आणि गुंतागुंतीचे असतात. यातला एक ठळक उठून दिसणारा धागा म्हणजे प्रादेशिक अस्मिता. त्याविषयी आपण समाज पातळीवर, सांस्कृतिक क्षेत्रात वारंवार प्रकट होत असतो. मग ते 'लाभले आम्हांस भाग्य...' गाण्याला दाद देण्यापासून ते, खास मराठी पेशवाई/कोल्हापुरी/खानदेशी/वैदर्भीय खाद्यसंस्कृतीपर्यंत अनेको क्षेत्रातील गोष्टींचे अभिमान बाळगण्यात, या देशीचे अस्सल मराठमोळेपण कशाकशात आहे याची खानेसुमारी करण्यात पदोपदी दिसत राहते.

आपली प्रादेशिक अस्मिता/ओळख, त्याचा इतरांपासून दिसणारा वेगळेपणा कधी आणि कसा कसा निर्माण झाला? आपण ज्याला मराठी संस्कृती, राहणीमान म्हणतो त्याचा उगम किती मागे जातो? या इतिहासाचा सुरूवातीपासून आजपर्यंत मागोवा घ्यायला गेलं तर किमान एका बृहद्ग्रंथाच्या आवाक्याचे काम आहे. पण आपण आपल्यापुरती तरी दख्खनी/ महाराष्ट्रातील प्रादेशिक संस्कृतींची पाळेमुळे नक्की किती प्राचीन आहेत, त्याची सुरूवातीची जडणघडण कशी होती, याचा एक थोडक्यात धांडोळा घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला लिखित इतिहासाच्याही मागे काही हजार वर्षे जावे लागते. इथल्या आद्य ग्रामसमाजांची जडणघडण समजावून घ्यावी लागते. संस्कृती म्हणजे फक्त मानवी जीवनाची पद्धतशीर संरचना नव्हे, तर आसपासच्या पर्यावरणाशी, जीवसृष्टीशी तिचे अभिन्न नातेही यात अंतर्भूत असते. तेही तपासून बघावे लागते.

इतिहासपूर्वकालात मानवी संस्कृतीने स्थैर्याकडे जी सुरूवातीची पावले टाकली त्यात सभोवतालच्या पर्यावरणाचा, जीवसृष्टीचा फार मोठा वाटा होता. या टप्प्याला 'नवाश्मयुगीन क्रांती' म्हणतात. औद्योगिक क्रांतीच्याही आधीची मानवी इतिहासातील एक तितकीच किंवा अधिक महत्वाची क्रांती! या टप्प्यावर माणूस शिकारीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेले भटके जीवन सोडून, एका जागी स्थिर वस्ती करून राहू लागला, जंगली धान्यांना जोपासून त्यापासून पद्धतशीर पिकं घेऊ लागला, जंगली प्राण्यांना माणसाळवून उदरनिर्वाहाच्या कामांत, रोजच्या जगण्यात त्यांची मदत घेऊ लागला, त्याला हव्या तेवढ्या तापमानाची आणि हव्या तेवढ्या वेळेसाठी आग तयार करता येऊ लागली - आणि त्याचं जीवन कायमसाठी बदललं. आदिमानवाने आता अश्मयुग सोडून तुमच्या-आमच्यासारख्या स्थिर जीवनात प्रवेश केला.

दख्खनी संस्कृतीच्या गोष्टीचा उपोद्घात होतो बलुचिस्तान मध्ये. 'मेहेरगढ' नामक 'बोलन' नदीच्या काठावर, सिंधूच्या खोर्‍याकडून इराणच्या उंच पठारांकडे जाणार्‍या बोलनखिंडीच्या तळाशी वसलेल्या एका छोट्याशा गावात. इ.स.पू. ७००० च्याही थोडं आधीपासून इथे आपल्याला एका गावाचे अवशेष मिळतात. भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन वसाहतींपैकी सगळ्यात जुनी वसाहत. सिंधू संस्कृतीच्या नागरीकरणाच्याही आधी जवळजवळ चार ते पाच हजार वर्षांपूर्वी आपल्याला इथे आद्य शेतीच्या, पशुपालनाच्या खुणा सापडतात. यांच्याकडे हे शेती व पशुपालनाचे तंत्रज्ञान, उत्तरेला मध्याशियातल्या 'अमुदर्या' नदीच्या खोर्‍यातून आणि सुदूर पश्चिम आशियातील जगाच्या शेतीच्या आद्यस्थानातून - म्हणजे आजचा सिरिया-लेबॅनन-जॉर्डन-इराक येथील भागातून- इराणच्या 'झाग्रोस' पर्वतरांगांना, पठारांना कवेत घेऊन खाली सिंधूच्या खोर्‍यात आले हे सर्वमान्य आहे.
नवाश्मयुगीन क्रांतीचा अभ्यास करताना जसा प्राणी व पिके यांच्या जंगली आणि माणसाळलेल्या वाणांचा तौलनिक शास्त्रीय अभ्यास करतात, तसेच हे वाण जगात कुठे आणि कधी प्रथम मानवी संस्कृतीशी निगडित झाले व विविध मानवसमूहांच्या परस्परसंबंधांमधून, देवाणघेवाणीतून कसे आणि कुठे पसरले याचा इतिहासही पुरातत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ 'पुरावनस्पतीशास्त्र' आणि 'पुराप्राणीशास्त्र' या शाखांमध्ये अभ्यासत असतात.

मेहेरगढला प्रथम भारतीय 'झेबू' जातीचे वशिंड असलेले गाईबैल आणि शेळ्यामेंढ्या माणसाळवल्या गेल्या. तसेच गहू आणि जव याची शेती सुरू झाली. कालांतराने त्यात द्विदल धान्यांची आणि तेलबियांची भर पडली. मेहेरगढच्या अगदी सुरुवातीच्या कालखंडात आपल्याला जंगली धान्ये व त्यांची लागवडीखाली आणलेली वाणे तसेच जंगली प्राणी आणि त्यांच्या पाळलेल्या प्रजाती असे दोन्ही प्रकारचे पुरावे मिळाले आहेत.
हे तंत्रज्ञान हळूहळू या भागात सर्वदूर पसरले, तांब्याच्या तंत्राचा शोध लागला आणि सिंधू संस्कृतीची पायाभरणी झाली. याच कालखंडात राजस्थानातही ग्रामसंस्कृतीचा उदय झाला. कालांतराने, म्हणजे इ.स.पू. २५०० - २००० या कालात भारतभर बहुतेक सर्व प्रदेशांमध्ये शेती आणि पशुपालन करणार्या ग्रामसंस्कृतींचा उदय आणि विस्तार झाला. नवाश्मयुगीन क्रांती फक्त मेहेरगढमध्येच नव्हे तर विकेंद्रित स्वरूपात गंगाखोर्‍यात, ओडिशात, दक्षिण भारतात, गुजरातेत आणि काश्मीरच्या प्रदेशात स्वतंत्रपणे झाली असे पुरावे आपल्याला सांगतात.

महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर ७-८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेती आणि पशुपालनाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख दख्खनच्या पठारावर रहाणार्‍या मानवसमूहाला झाली असं दिसतं. महाराष्ट्रात, दख्खनच्या भूमीवरती इ.स.पू. २४५० ते ९०० च्या आसपास या ताम्रपाषाणयुगीन ग्रामसंस्कृतीचा विस्तार आपल्याला तापी, गोदावरी-प्रवरा, भीमा आणि कृष्णा खोर्‍यांमध्ये झालेला दिसतो. कोकणामध्ये मात्र आपल्याला अद्याप तरी असा काही पुरावा उपलब्ध नाही. विदर्भामध्ये साधारण इ.स.पू. १२००-१००० नंतर ग्रामसंस्कृतीचे अवशेष आपल्याला आढळायला लागतात.
आत्तापर्यंत सुमारे दोनशेहून अधिक ताम्रपाषाणयुगीन स्थळे उजेडात आली आहेत. यातील इनामगाव, वाळकी, दायमाबाद, प्रकाश, कवठे, सोनगाव, आपेगाव इ. उत्खनने तसेच विदर्भातील माहुरझरी, भागीमहारी, खैरवाडा, नायकुंड, टाकळघाट खापा इ. उत्खनने महत्वाची आहेत.
उत्खननांत घरंदारं, खापरं, दागिने, औजारं, हत्यारं याशिवायही मिळणारे अत्यंत महत्वाचे पुरावे म्हणजे विविध प्राण्यांची हाडे व इतर अवशेष, जळालेले धान्याचे दाणे, बिया, परागकण, झाडाचे कोळसे इ.... मानवसमूहांबरोबरच तिथल्या जीवसृष्टीत आणखी कुठकुठले सजीव त्यांच्या जीवनसृष्टीचा कशा पद्धतीने भाग होते ते आपल्याला याच्या शास्त्रीय विश्लेषणावरून कळते.
सर्वात प्रथम तापीच्या खोर्‍यात, खानदेशात या वसाहती उदयाला आल्या असं दिसतं. सुरूवातीची गावं हंगामी होती, जितकी शेतीवर तितकीच शिकार आणि पशुपालनावर अवलंबून होती. अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आ़णि त्यांचे रूपही पालटले. या लोकसमूहांना अजून लोहतंत्रज्ञान अवगत झालेलं नव्हतं. फक्त तांबं आणि दगड यांचा वापर ते करत असत म्हणून त्यांना 'ताम्रपाषाणयुगीन संस्कृती' असं म्हणलं जातं. मात्र नंतरच्या टप्प्यात विदर्भात उदयाला आलेल्या ग्रामसमूहांना लोह तंत्रज्ञान अवगत झालेले दिसून येते.

कशी होती या आद्य ग्रामसमूहांच्या, दख्खनच्या आद्य शेतकर्‍यांची राहणी?

ही छोटी गावे शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार अशा उपजीविकेच्या प्राथमिक पर्यायांवर अवलंबून होती. सुनियंत्रित राजसत्ता व प्रशासकीय चौकट, नागरीकरण, लेखनकला, नाणी असे कुठलेही घटक अस्तित्वात यायच्या कैक शतके आधीचा हा काळ. तेव्हा कुटुंब आणि कुल याच्या चौकटीत वावरणारे हे 'ट्रायबल' स्वरूपाचे समाज होते हे निश्चित आहे. त्या गावांचे कारभार बघण्यासाठी गावप्रमुख असावा आणि काही मोठी गावे ही आसपासच्या उपप्रदेशातील मुख्य केंद्रे असावीत असं पुरावे आपल्याला दर्शवतात. उदा: भीमा खोर्‍यात इनामगाव, गोदावरी-प्रवरेत दायमाबाद, तापी खोर्‍यात प्रकाश, इ.
यांचे आपसात व समकालीन अन्य प्रादेशिक ग्रामसमूहांशी देवाणघेवाणीचे नाते होते. याचे पुरावे आपल्याला उत्खननात सापडणार्‍या पण त्या त्या भूभागात सहजी न उपलब्ध असणार्याी धातू, दगड, शंख अशापासून तयार केल्या गेलेल्या विविध गोष्टींतून मिळतातच पण शेती आणि पशुपालनाच्या तपशीलांमधूनही स्पष्ट होतात. तेव्हाही दख्खनची भूमी अर्धशुष्क पर्यावरणाची भूमी होती. राजस्थान मधील पुरापर्यावरणीय पुरावे आपल्याला असे सांगतात की आजच्या तुलनेत त्याकाळी पाऊसमान थोडे जास्त होते. लोकसंख्या कमी असल्याने जंगले, अरण्ये, गवताळ कुरणे यांचे प्रमाण नक्कीच आजच्यापेक्षा अनेको पटीने जास्त असणार. यांच्या सभोवतालची सजीवसृष्टी जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या उपजीविकेचे पुरावे तपासून बघावे लागतात.

या काळातील आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची उपजीविका म्हणजे शेती तंत्रज्ञान. पिकांच्या लागवडीमुळे मानवी समाजाला वर्षातून सहासात महिन्यांपेक्षाही जास्त काळ एका जागी मुक्काम ठोकण्यास भाग पाडले आणि गावे उदयाला आली. नव्याने सुरू केलेल्या या अन्न मिळवण्याच्या तंत्रामध्ये कुठून आणि कसे विविध घटक जमा झाले, हे बघणे रोचक आहे.

पुरावनस्पतीय पुरावे बघता अगदी सुरूवातीला फक्त बाजरी, उडीद आणि कुळीथ याची लागवड आपल्याला खानदेशातील 'कवठे' येथे केलेली दिसते. मात्र काही पुढील शतकांमध्येच शेतीच्या तंत्राचा विस्तार होऊन विविध खरीप आणि रब्बी पिकं नियमितपणे घेतलेली आढळतात. यात धान्ये, डाळी/ कडधान्ये, मिलेट्स, तेलबिया इ.चा समावेश आहे.

धान्ये - गहू, जव, तांदूळ
डाळी, कडधान्ये - मसूर, हरभरा, खेसरी/ लाखेची डाळ, तूर, उडीद, मूग, कुळीथ, वाटाणा, वाल
मिलेट्स - ज्वारी, बाजरी, नाचणी, कांगणी, कोदरा (वरईची एक जात)
तेलबिया - करडई, तीळ, अळशी

एकूण बघता, दख्खनच्या शेतीतील पारंपरिक स्थानिक पिके, म्हणून जी काही गणली जातात त्यातली बहुतेक सर्व पिके ताम्रपाषाणयुगापासूनच लागवडीत आणली गेली होती असे दिसून येते. यात तांदळाचे प्रमाण अत्यल्प आहे, आणि दख्खनचे हवामान लक्षात घेता हे स्वाभाविकच आहे. गहू व तांदूळ सोडता इतर सर्व पिके ही इथल्या अर्धशुष्क वातावरणाला, कमी बेभरवशी पाऊसमानाला तोंड देऊन तगून राहणारी, सिंचनाची गरज न पडणारी अशी आहेत. मजेची बाब अशी की नंतरच्या काळात- अगदी आजपर्यंतही - दख्खनी जेवणाची ओळख असलेली ज्वारी, बाजरी मात्र या काळात अगदीच नावापुरती मिळाली आहे. जव आणि नाचणी हेच प्रमुख शाकाहारातील आहारघटक होते.

मात्र यातली किती पिके खरंच स्थानिक वाणाची आहेत? जी पिकं आपण पारंपरिक दख्खनी म्हणून गणतो ती प्रथम लागवडीखाली कधी आणि कुठे आली? या प्रश्नाचे उत्तर बघायला गेलं तर मात्र असं लक्षात येतं की, बहुतांशी पिकं, त्यांचे वाण हे दख्खनच्या बाहेरून आलेले आहेत. पुरावनस्पतीशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानंतर असे दिसून आले आहे की आफ्रिका, पश्चिम आशिया, चीन, युरोप आणि भारतीय उपखंडातील विविध प्रदेश अशा उत्पत्तीस्थानांमधून ही वाणे हस्ते-परहस्ते दख्खनपर्यंत पोहोचली आहेत.

गहू आणि जव हे प्रथम सिरिया-इराक-जॉर्डनच्या चंद्रकोरीच्या आकाराच्या सुपीक प्रदेशात (फर्टाईल क्रीसेन्ट) लागवडीखाली आणले गेले. ते तिथून मेहेरगढला पोहोचले आणि कालांतराने सिंधू संस्कृतीची मुख्य पिके म्हणून महत्वास पावले. सिंधू संस्कृतीतून राजस्थान ---> माळवा ---> नर्मदा मार्गे ही पिके आपल्याकडे आली असावीत, असा तज्ज्ञांचा कयास आहे. तांदूळ मात्र प्रथम आपल्याकडे गंगेच्या आणि बेलन नदीच्या खोर्‍यात लागवडीखाली आलेला दिसतो आणि तिथूनच आपल्यापर्यंत पोहोचला.

डाळी/ कडधान्ये यांमध्ये मूग, उडीद, कुळीथ यांची प्रथम लागवड बहुतेककरून पश्चिम भारतात (राजस्थान-गुजरात-उत्तर दख्खन) भागात झाली असावी. तूर प्रथम ओडिशा-बस्तर-उत्तर आंध्र या पट्ट्यात पेरणीखाली आली असावी. मसूर, खेसरी, वाटाणा आणि हरभरा मात्र पश्चिम आशियातून आलेल्या पीकसमुच्चयापैकी आहेत. वालाचा उगम आफ्रिकेतील आहे. मिलेट्स मध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी पूर्व आणि ईशान्य आफ्रिकेतून आपल्याकडे संक्रमित झाली. कांगणी चीन किंवा आग्नेय युरोपमधून, तर कोदरा गंगेच्या खोर्‍यातील भातशेतीबरोबर असलेल्या तणपिकांपैकी एक असावे.

तेलबियांपैकी तीळ जरी मेहेरगढमध्ये पहिल्यांदा लागवडीखाली आले असे दिसून येत असले, तरी करडई आणि अळशी मात्र पश्चिम आशियातील पीकसमुच्चयापैकी आहेत.

विदर्भामध्येही फार वेगळी पीकपद्धती नाही, तिथल्या उत्खननांमधून तांदूळ, गहू, जव, कोदरा, मसूर, उडीद, कुळीथ, वाटाणा, तूर, बोरं यांचे अवशेष नोंदण्यात आलेले आहेत. या पिकांशिवाय ताम्रपाषाणयुगीन समाज सभोवतालच्या परिसरातून फळे, पालेभाज्या इत्यादि गोळा करून त्यांचा आहारात समावेश करत असे दिसून येते. यात बोरं, जांभळं, शिंदीचे खजूर, आवळे, चारोळ्या, शेलू, तुती यांचा समावेश आहे. पालेभाज्यांमध्ये नागरमोथा, घोळ आणि चाकवत यांचा पुरावा मिळाला आहे.

याशिवाय विविध झाडांचे कोळसे उत्खननांमध्ये मिळालेले आहेत. यांमध्ये सागवान, खैर, धावडा, रोजवूड, गोरड, साळई, बहावा, कुड, बिबला/बीजसार, बाभूळ यांची ओळख पटलेली आहे. आपल्याकडे आजही साळई, बहावा आणि बिबला ही झाडे औषधी म्हणून पारंपरिकरित्या वापरली जातात तर इतर झाडे घरबांधणी, अवजारे यासाठी वापरली जातात. मात्र या ताम्रपाषाणयुगीन काळात या झाडांचे नक्की काय उपयोग होते, हे पुराव्यांअभावी सांगता येणार नाही. याच्या व्यतिरिक्त दायमाबादमधील एक विधी- धर्मश्रद्धा संबंधित वास्तुसंकुलाच्या संदर्भात 'सुगंधबेला' नामक सुगंधी व औषधी वनस्पतीचा पुरावा मिळाला. ही वनस्पती कोकणात आढळते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या या दायमाबादमध्ये ही वनस्पती नक्कीच कोकणात राहणाऱ्या समुहांकडूनच ती मिळविली गेली असणार, असे वाटते.

पशुपालनामध्ये गाय-बैल, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, गाढव, डुक्कर, कोंबडी, कुत्रे आणि मांजर यांना पाळल्याचे दिसून येते. अपवादात्मक रीतीने घोड्याचाही पुरावा अंतकाळात मिळालेला आहे. या प्राण्यांचा शेतीच्या कामासाठी, कदाचित दूध आणि इतर प्राणिजन्य पदार्थांच्या उत्पादनासाठी, राखणीसाठी तसेच अन्नपुरवठ्याचा स्रोत म्हणून वापर केला जात असणार. याकाळातील आहारातील प्रमुख पदार्थ हा 'गोमांस' होता हे उत्खननातून मिळालेल्या हाडांच्या संख्येवरून तसेच त्यांच्या ब्रेकेज पॅटर्नवरून सिद्ध झालेले आहे.

यातील गायी-बैल, म्हैस, शेळ्या मेंढ्या, कुत्रे, मांजर इ. प्राणी मेहेरगढला सर्वात आधी मिळाले आहेत. तेव्हा पशुपालन तंत्रज्ञान तिथून इतरत्र भारतात पसरले असावे असा एक कयास आहे. घोडा मात्र प्रथम माणसाळवला गेला तो मध्य आशियाच्या विस्तीर्ण चराऊ कुरणांमध्ये. सिंधू संस्कृतीत घोडा नव्हता. तो उत्तर सिंधू काळानंतर आपल्याकडे मिळू लागतो. मात्र ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या अंतकाळात अपवादात्मक रीतीने मिळणारा घोडा हा विदर्भातील महापाषाणीय लोहयुगीन समाजांसाठी फार महत्वाचा आणि मौल्यवान प्राणी होता. दफनांमध्ये तर याची हाडे मिळतातच पण कदाचित घोड्याचा बळी देऊन, त्याच्या मांसाच्या मेजवान्या काही विशेष प्रसंगी केल्या जात असाव्यात असे तज्ज्ञांचे अनुमान आहे,

याशिवाय अनेक वन्य प्राण्यांच्या शिकारी केल्याचे पुरावेही हाडांच्या स्वरूपात मिळालेले आहेत. यामध्ये अनेक प्रकारची हरणे (काळवीट, चितळ, सांबर, चौसिंगा, बारासिंगा, भेकर, हॉग डीअर (हिंदित पाढा म्हणतात), चिंकारा), नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, कोल्हा, ऊदमांजर, अस्वल, माकड, साळिंदर, ससा, मुंगूस, बिबळ्या, वाघ, रानमांजर आणि लांडगा यांची नोंद झालेली आहे. यावरून या वसाहतींच्या आसपास दाट जंगले असतील असे अनुमान काढण्यास हरकत नसावी. या प्राण्यांशिवाय घोरपड, सुसर, बदक, मोर, बगळा, माळढोक, कबुतरे यांचीही शिकार केली गेलेली दिसते. जलचर प्राण्यांमध्ये नदीत राहणारी कासवे, खेकडे, गोड्या पाण्यातील मासे, समुद्रातले मासे आणि शिंपले याचे अवशेष मिळालेले आहेत. वर उल्लेख केलेल्या 'सुगंधबेला'चे कोकणामधील अस्तित्व आणि समुद्री पाण्यातील माशांचा पुरावा बघता कोकणाशी या ग्रामसमूहांचा नियमित देवाणघेवाणीचा शिरस्ता असावा, हे सहजच उमजून येते. याशिवाय बांगड्या करण्यासाठी लागणारा वैशिष्ट्यपूर्ण शंख - 'टर्बिनेला पायरम' - हाही खास गुजरातच्या किनार्‍यावरून मागवला जात असे.

यातील काही शिकारींचा किंवा प्राण्यांचा संबंध त्या समाजाच्या श्रद्धाविश्वाशी निगडित असावा. इनामगाव येथून एका मोठ्या साठवणीच्या हातघडणीच्या रांजणावर 'अर्धा माणूस आणि खालचे अर्धे शरीर बिबळ्याचे' असे अंकन मिळाले आहे. तर नर्मदेच्या तीरेवरील 'नावडातोली' नामक दख्खन आणि माळवा संस्कृतींचा दुवा असलेल्या वसाहतीमधून मिळालेल्या एका रांजणावर एका घरात उभा असलेला एक माणूस व शेजारी एक मगर असेही अंकन मिळालेले आहे. या समाजांच्या भाषेविषयी काही माहित नसल्याने, या मागे असलेल्या मिथकांचा शोध घेणे शक्य नाही, पण मिथके त्यांच्या सभोवतालच्या जीवसृष्टीशी संबंधित असणार हे प्रकर्षाने दिसून येते.

ही झाली सगळ्या जीवसृष्टीची खानेसुमारी. पण थोडंसं खाद्यसंस्कृतीविषयीही बोलूयात. मुद्दाम वेगळेपणाने अशासाठी कारण उत्खननांमधून मिळालेले स्वैपाकघरातल्या उपकरणांचे अवशेष. हो उपकरणेच की- पाटे-वरवंटे-चुली-भांडीकुंडी आणखी बरंच काही. सगळ्याच उत्खननांमधून भरपूर प्रमाणात रगड्यासारखे दिसणारे खोलगट पाटे-वरवंटे सापडले आहेत. रोजची धान्ये त्यात वाटून घेऊन, मग रांधली जात असत असं अभ्यासकांचं मत आहे. ज्या प्रमाणात विविध प्रकारचे खापरी वाडगे सापडले आहेत त्यावरून सरसरीत, लापशीसारख्या रूपातले पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केले जात असत असे अनुमान काढता येते.
थाळ्या जवळजवळ नाहीतच. अगदी शेवटच्या काळात थोड्याफार पराती आणि थाळ्या मिळतात. पण इनामगावच्या उत्खननामध्ये चक्क तवा सापडला आहे. एका चुलीला मातीने लिंपूनच टाकला होता तो कायमसाठी!! ते बघून भाकरीसारखा पदार्थ नक्की होत असणार, हे उघड आहे. माझ्या मते तर पिठलं (कुठल्याही डाळीचे वाटून पाण्यात विरघळवून शिजवलेले कालवण) आणि भाकरी (धान्य वाटून त्याची थापून चुलीवर भाजून केलेली) हे बहुदा 'आद्य दख्खनी पदार्थ' असायची दाट शक्यताही आहे.

या व्यतिरिक्त मांसाहार हे प्रमुख अन्न होते. गोमांसावर जास्त भर असे. पण ताम्रपाषाणयुगाच्या शेवटी शेवटी आपल्याला सतत दुष्काळ अवर्षण पडल्याने संस्कृतीची घडी विस्कटल्यासारखी दिसायला लागते. गहू, तांदूळ, वाल वगैरे पिके नाहीशी होतात. नाचणी, जव अशी दणकट, कमी काळात तयार होणारी आणि सहजी साठवण करता येण्यासारखी पिके प्रामुख्याने घेतली जातात, तसेच गोमांसापेक्षा काळविटाच्या मांसावर जास्त भर दिला जातो. अगदी शेवटी शेवटी खाण्याची तीव्र भ्रांत पडल्याने, कुत्राही खाल्लेला इनामगावमध्ये दिसून येतो.

सततच्या अवर्षणामुळे संस्कृतीचे चाक उलटे फिरते आणि स्थिर शेतकरी जीवनाकडून ताम्रपाषाणयुगीन शेतकरी, परत एकदा भटके होतात. आपल्यासाठी त्यांचा पुराव्याचा माग संपतो. तो पुढील काही शतकांनंतर ऐतिहासिक काळापर्यंत. विदर्भात मात्र नुकत्याच उदयाला आलेल्या लोहयुगीन वसाहती सलगपणे ऐतिहासिक काळात संक्रमण करतात. दख्खनच्या आद्य ग्रामसमूहांचा अध्याय इथेच समाप्त होतो. त्यांच्या शेतीतंत्राचा, जीवनपद्धतीचा वारसा येणार्या् ऐतिहासिक समाजासाठी मागे ठेवून.

लेखाच्या सुरूवातीला वैश्विकीकरणाचा उल्लेख केला होता. तो आत्ताच्या आधुनिक काळासंदर्भात होता. पण खरंच 'वैश्विकीकरण' ही फक्त आधुनिक सांस्कृतिक प्रक्रिया आहे का? आपण सहसा वैश्विकीकरण आणि स्थानिक/प्रादेशिक ओळखी या परस्परविरोधी प्रक्रिया आहेत असे मानतो. तसे खरंच आहे का? आपल्या या धारणा, हे समज पुन्हा एकदा मोकळ्या मनाने तपासून बघितले पाहिजे असे दख्खनी संस्कृतीच्या आदिकाळाचे पुरावे आपल्याला सांगतात.

आपण वरचे तपशील बघताना हे स्पष्ट आहे की मानवी संस्कृतीच्या सुरूवातीपासून - अगदी प्रागैतिहासिक काळापासून - वैश्विकीकरण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण ही एक अविरत सुरू राहिलेली आणि संस्कृतींना चालना देणारी, सर्व इतिहासाला पार्श्वभूमी देणारी एक महत्वाची प्रक्रिया आहे. प्रागैतिहासिक काळापासून, आदिमानव आफ्रिकेतून जगात सर्वदूर पसरला तेव्हापासून जगाच्या कानाकोपर्‍यापासून सर्वत्र स्थानिक ते दूरपल्ल्याची अशी देवाणघेवाण, परस्पर संबंध प्रस्थापित झाले होते. या वैश्विक पातळीवरील तंत्रज्ञान प्रसाराच्या, देवाणघेवाणीच्या बळावरच विविध प्रादेशिक संस्कृती उपजल्या, फुलल्या, त्यांच्या स्वतंत्र ओळखी/अस्मिता तयार होण्यास सुरूवात झाली. या अस्मिता वरवर बघता स्वतंत्र वाटल्या तरी सगळ्यांच्या मागचे सांस्कृतिक ओघ कुठेतरी एकमेकात मिसळलेले आहेत. स्थानिक आणि वैश्विक या दोन परस्परविरोधी घटना नसून एकाच प्रक्रियेची दोन टोके आहेत. आणि आज नव्याने वैश्विकीकरण होताना प्रागैतिहासिक काळापासून चालत आलेले एक प्रक्रियावर्तुळ पूर्ण होत आहे. 'दख्खनी असणं म्हणजे काय?' याचा उहापोह करताना आपल्याला हे वैश्विक वर्तुळ आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे.

(पूर्वप्रसिद्धी - भवताल दिवाळी अंक २०१९)
(हा लेख येथे पुनर्मुद्रित करण्यासाठी तत्परतेने परवानगी दिल्याबद्दल भवतालचे संपादक श्री. अभिजित घोरपडे यांची मनःपूर्वक ऋणी आहे)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथल्या जुन्या वाचकांना यातला मधला काही तपशील बर्‍यापैकी पुनरावृत्ती आहे हे जाणवेल, परंतु त्याला नाईलाज आहे. सर्वांनीच माझे आधीचे लेखन वाचले असेल असे नाही Happy

तुम्ही इतिहास अभ्यासक आहात का? लेख छान आहे .
आर्य आक्रमणाविषयी व आर्यांच्या संस्कृतीविषयी लेख वाचायला आवडेल.

धन्यवाद. हो, मी पुरातत्वशास्त्रज्ञ आहे. मी स्वतः त्या विषयात काम करत नाही, त्यामुळे क्षमस्व, पण सध्या तरी लिहायला वेळ नाहीये यावर.

लेख नेहमीप्रमाणेच आवडला. फार पूर्वीपासून जागतिकीकरण आणि सांस्कृतिक देवाघेवाण होत आली आहे, ती वाटते तितकी नवीन संकल्पना नाही हे अनेक अंगांनी शक्य तितक्या सोप्या भाषेत मांडले आहे.
धाग्याचा विषय नाही, पण..
ताम्रपाषाणयुगीन ग्राम संस्कृती ही दख्खन प्रांतात इ.पू. २४५० ते इ. पू. ९०० या काळात उदयास आली/ स्थिर झाली, त्या आधी दोआबात आणि पंचनदीप्रदेशात ती स्थिर झाली होती का? की दोन्ही प्रदेशांत साधारण सारख्याच काळात ती फुलत होती?

लेख पुनः पुन्हा वाचायला हवा पूर्ण समजून घेण्यासाठी.
वरदा यांच्या लेखनात ठळकपणे जाणवणारे वैशिष्ट्य आहे ते जवळजवळ 100% मराठी शब्दांचा वापर. हे शब्द सहज सोपे असतात, बोजड कृत्रिम नसतात. वरदाचे खास अभिनंदन यासाठी. सर्व मराठी लेखकांनी हे कौशल्य आत्मसात केले पाहिजे.

टोनी जोसेफ यांच्या अर्ली इंडियन्स या पुस्तकात यातील काही संदर्भ आले आहेत. हे पुस्तक नुकतेच वाचले असल्याने हा लेख वाचायला अजून मजा आली. पुन्हा काही वेळा वाचून प्रतिक्रिया देईन.

टण्या आणि हीरा, धन्यवाद.
हीरा, पंजाब हरियाणा प्रदेशात या काळात साधारणपणे उत्तर सिंधू कालीन वसाहती आढळतात आणि नंतर पेंटेड ग्रे वेअर लोहयुगीन संस्कृतीच्या वसाहती. गंगेच्या खोर्‍यात मात्र (आजचा उत्तर प्रदेश) इ स पू सहाव्या सहस्रकापासून शेतीचे आणि नवाश्मयुगीन वसाहतींचे पुरावे मिळायला लागतात. त्याच कालांतराने ताम्रपाषाणयुगीन होतात. मात्र बलुचिस्तान, सिंध अशा प्रदेशातील सलग सांस्कृतिक घडामोडींचा विस्तृत पुरावा जसा आपल्याकडे आहे तसा येथून नाहीये.
इ स पू २५००/ २४०० नंतर भारतातल्या बहुतेक प्रदेशांमध्ये प्रादेशिक संस्कृती, तेथील आद्य शेतकर्‍यांच्या वसाहती उदयाला आलेल्या दिसतात.

खूप छान लेख. माहिती अगदी रोचक आहे. सखोल अभ्यास दिसून येतो या मागे.
लेख नक्कीच परत वाचावा लागेल.

कुठली पिके घेत, कुठले प्राणी पाळत याचा शोध कसा घेत हे समजण्या सारखे आहे, पण कुठल्या प्राण्यांचे मांसभक्षण करत हे कसे ठरवतात?

मला वाटते सापडलेल्या हाडांच्या तुकड्यांच्या कट्स वरून समजत असेल. नैसर्गिक मरण असेल तर सांगाडा साधारण तसाच राहील, हाडे सुटी होऊन.

याकाळातील आहारातील प्रमुख पदार्थ हा 'गोमांस' होता हे उत्खननातून मिळालेल्या हाडांच्या संख्येवरून तसेच त्यांच्या ब्रेकेज पॅटर्नवरून सिद्ध झालेले आहे.>>>

हे लिहिलेय की , काय खात होते याचा अंदाज बांधण्यासाठी..

लेख आवडला.

इथल्या जुन्या वाचकांना यातला मधला काही तपशील बर्‍यापैकी पुनरावृत्ती आहे हे जाणवेल, परंतु त्याला नाईलाज आहे. सर्वांनीच माझे आधीचे लेखन वाचले असेल असे नाही >>>

कितीतरी दिवस झाले तुझे लेख वाचून. चांगला उजाळा मिळाला. अजीबात कंटाळवाणे झाले नाही. लिहित रहा. इथेही.

या अस्मिता वरवर बघता स्वतंत्र वाटल्या तरी सगळ्यांच्या मागचे सांस्कृतिक ओघ कुठेतरी एकमेकात मिसळलेले आहेत. स्थानिक आणि वैश्विक या दोन परस्परविरोधी घटना नसून एकाच प्रक्रियेची दोन टोके आहेत. >>> सगळ्या तपशीलाच्या घुसळणीतून आलेले सार / नवनीत.

जुने लेख तेर ते तगर वगैरे वाचले आहेत.
--------
>>> आत्तापर्यंत सुमारे दोनशेहून अधिक ताम्रपाषाणयुगीन स्थळे उजेडात आली आहेत. यातील इनामगाव, वाळकी, दायमाबाद, प्रकाश, कवठे, सोनगाव, आपेगाव इ. उत्खनने तसेच विदर्भातील माहुरझरी, भागीमहारी, खैरवाडा, नायकुंड, टाकळघाट खापा इ. उत्खनने महत्वाची आहेत. >>

मागच्या एका लेखात 'पांढरीची टेकाडे' आणि शोध यात गावांचा उल्लेख टाळला होता असं लिहिलंय. कारण तिथे अजून शोध चालू असेल तर काही चोरीला जाऊ नये म्हणून. ते बरोबरच आहे. पण वरील उल्लेखलेल्या गावांतील तपास पूर्ण झाला असेल तर ते नकाशावर दाखवता येईल काय?

--------------
>>> पंजाब हरियाणा प्रदेशात या काळात साधारणपणे उत्तर सिंधू कालीन वसाहती आढळतात आणि नंतर पेंटेड ग्रे वेअर लोहयुगीन संस्कृतीच्या वसाहती. >>
पेंटेड ग्रे वेअरचा उल्लेख वाचला एका पुस्तकात*१. कुरुक्षेत्र आणि हस्तिनापुर येथे खोदकाम करून हे पेंटेड ग्रे वेअर थरापर्यंत गेले तरी महाभारतातील युद्धातील वर्णन केलेल्या भव्य वस्तू सापडल्या नाहीत. एक कागदावरचे महाकाव्यच ठरतंय.

लेख आवडला. मजेची गोष्ट जागतिकीकरण अजूनही चालूच आहे. गेली 3 4 वर्षे मावळ पट्ट्यात खासकरून या वर्षी कोरोना मुळे सोयाबीन फार मोठ्या प्रमाणात घेतले जातंय. तसे पाहिले तर आज सांगितले तर खोटे वाटेल अशी नारळ भात टोमॅटो बटाटा अशी पिके बाहेरून आलीयेत. महाराष्ट्राची शान वाटावे अशी वाड्यांची(कोर्टयार्ड घरे) रचना पहिल्यांदा सुमेरिया मध्ये दिसते. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या स्थानावरून अनेक प्रवाह मिळून आज दिसतोय तो समाज बनलाय. काही या मातीतले आहे आणि काही बाहेरून येऊन या मातीतले वाटावे इतके मिसळून गेलाय. अश्या लेखांमधून हे कळणे सोपं होतंय.