दत्त दत्त, दत्ताची गाय (पालकत्वाचा काटेरी मुकुट -किस्सा 3)

Submitted by नादिशा on 30 August, 2020 - 21:10

प्रत्येक व्यक्ती चा स्वभाव वेगळा, तशी प्रत्येकाची उपजत आवड पण वेगवेगळी असते. स्वयमला पहिल्यापासूनच प्राण्यांचे वेड होते. कळायला लागल्यापासून त्याला हंबा खूप आवडायची. कितीही रडत असू देत, हंबा दिसली की तो शांत व्हायचा. त्याच्या "हंबा"मध्ये गाय, बैल, म्हैस सर्वांचा समावेश होता.या सर्वांना तो हंबा असेच म्हणायचा.

बाबांकडे गेला, की त्याचा ठरलेला प्रोग्राम होता. दुपारच्या वेळी तिथे एक गुराखी म्हैशींचा कळप घेऊन यायचा. त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज ऐकला, की स्वयम लगेच दुडूदुडू धावत बाबांकडे जायचा. . "बाबा हंबा , बाबा हंबा.. "करत. मग गडबडीने त्यांना बेडरूम मध्ये घेऊन जायचा, खुंटीवरचा शर्ट बोटाने दाखवायचा. मग बाबांनी शर्ट घालायचा आणि बाहेर पडायचे. मग घराबाहेर ठेवलेली चप्पल तो दाखवायचा. चप्पल घालतानाही बाळराजेंचे लक्ष असायचे, बागेत फिरायची चप्पल घातली की बाहेर जायची घातली.. मग उं उं करून, टाचा उंचावून, दोन्ही हात वर करून खुणावायचा, नाही कळाले बाबांना किंवा त्यांनी दुर्लक्ष केले, तर " उंचून, उंचून "असे बोबड्या स्वरात म्हणायचा. मग बाबांनी त्याला उचलून घ्यायचे आणि त्या कळपामागे फिरायचे. तो कळप आमच्या कॉलनी मधून निघून जाईपर्यंत हे दोघे त्याच्या मागेमागे . तो सगळा वेळ बाळराजे बाबांच्या कडेवर बसून त्या कळपाचे निरीक्षण करत राहायचे.त्या कळपात जर 1-2 पिल्ले असतील, तर मग सोन्याहून पिवळे ! म्हैशी चालतात कशा, खातात काय नि कशा, शेपटी कशा उडवतात.. नीट निरखून पाहायचा. मग त्यानुसार प्रश्न विचारणार बाबांना. मिळालेली माहिती पण गंभीर चेहऱ्याने सर्वांना दिवसभर सांगत राहणार. "हंबा, हंबाचे पियू गोत खाते ", "हंबा अश्शी शेपूट हलवते. . एक माशी बसली होती तिच्या पाठीवर, तर अस्सा एक फक्का च मारला त्याच्यावर शेपटीने , भुर्रर्र उडून गेली मग माशी "..असे सांगत राहायचा मग सगळ्यांना रंगवून.

आम्ही राहतो, तो भाग ग्रामीण आहे. घरासमोर रस्ता आहे, त्यावरून लोक त्यांची गुरे, शेळ्या मेंढ्या चरायला नेतात. बैलगाड्या धावतात, रानात काम करणारे बैल सहज आजूबाजूला दिसतात. कोंबड्या, कुत्री सहज नजरेस पडतात.दोन -तीन घोडे पण आहेत पाळलेले.

पण स्वयमला प्रिय होती, ती मात्र फक्त हंबा. तो दीड वर्षांचा असल्यापासून चित्र काढू लागला. सुरुवातीला तो फक्त आणि फक्त हंबाचीच चित्रे काढायचा.सुरुवातीची त्याची चितत्रे म्हणजे नुसत्या रेघोट्याच असायच्या , पण त्या ओढताना त्याच्या डोक्यात मात्र असायची हंबा. त्याला जर विचारले," काय आहे हे , काय काढलंय तू? "तर तो सांगायचा, "हंबा".कधीकधी स्वतः एकटाच चित्र काढत रहायचा आणि त्याचे काढून झाले, की आम्हाला हाताला धरून ओढत आणायचा, त्याने काढलेली हंबा पहायला. अमितला सतत सांगायचा हंबा काढून द्यायला आणि मग तशी स्वतः काढायचा प्रयत्न करायचा .तर कधी समोर दिसणारी, चरणारी हंबा काढायचा प्रयत्न करायचा. अक्षरशः तासन्तास स्वयम घरासमोरच्या ओट्यावर हंबाची चित्रे काढत बसायचा.

रोज अमित ऑफिसला जाताना त्याला एक चक्कर हवी असायची. मग अमित थोड्या अंतरावरच्या दत्त मंदिरापर्यंत आम्हा दोघांना एक चक्कर मारायला न्यायचा , घरापर्यंत आणून सोडायचा आणि मग ऑफिसला जायचा. दत्त मंदिरात दत्त महाराजांची गाय दिसायची. मंदिराच्या समोर एक गोठा होता. तिथे म्हैशी होत्या. स्वयमला आकर्षण चक्कर मिळण्यापेक्षा त्या हंबांचे असायचे. जाताना जर कुणी त्याला विचारले, "कुठे निघाला रे ? "तर हा सांगायचा -"भुर्रर्र.. हंबाला.." आल्यावर पण सांगायचा सर्वांना -"आमी हंबाला गेलो होतो. "

त्याला दोन महिन्यांचा असल्यापासून आम्ही स्कूटी वर फिरवले. पावसाळा असेल तर रेनकोट घालून, उन्हाळा असेल तर सनकोट, घालून, हिवाळ्यात गरम कपडे घालून.पण स्कूटी वरच.त्याने पण छान साथ दिली आम्हाला. आधी झोपल्या अवस्थेत, मग मांडीवर बसून तो टुकूटुकू पाहत राहायचा सगळीकडे. आणि उभे राहायला शिकल्यावर तर मग काय, बोलायलाच नको. बाळराजे स्वारच व्हायचे अक्षरशः गाडीवर. आमच्या दोघांच्या मध्ये सीट वर तो उभा राहायचा मस्त पपांच्या खांद्यावर दोन्ही हात ऐटीत टेकवून. आणि मजा लुटायचा सगळ्या प्रवासाची. रस्त्यात एखादी हंबा दिसली, की मग स्वारी अजूनच खुशीत यायची.आम्हाला दोघांना बोटाने ती हंबा दाखवायचा आणि मग गाडीवर उभ्याउभ्याच उड्या मारायचा. मागे बसून त्याला सावरता सावरता मला पुरेवाट व्हायची.

अमितला सतत त्याला हंबा काढून दाखवावी लागायची. त्यामुळे त्याला एवढी प्रॅक्टिस झाली होती, की झोपेतून उठून, अगदी डोळे झाकून म्हटले तरी तो हंबाचे चित्र काढू शकला असता. कितीही वेळा सांगितले, तरी न वैतागता स्वयम सांगेल तिथे, सांगेल तेव्हा अमित हंबा काढून दाखवायचा त्याला. स्वयमला चित्र काढायला मोठा कॅनव्हास लागायचा. आजूबाजूला पाहत ओट्यावरच चित्र काढायला आवडायचे त्याला. त्यामुळे दिवसातून 3-4वेळा तो ओटा झाडून, डेटॉल ने पुसून द्यायची जबाबदारी माझी असायची.

आम्हा दोघांना इतकी सवय झाली होती स्वयमच्या या हंबा प्रेमाची, की विचारू नका ! कधी माझ्या माहेरी आईकडे त्याला सोडून आम्ही दोघे गाडीवर कुठे निघालो असलो, आणि रस्त्यात एखादी हंबा दिसली, तर आम्ही दोघे पण एकमेकांना हंबा दाखवायचो अनावधानाने, आणि जेव्हा लक्षात यायचे ना, आज स्वयम नाहीये आपल्याबरोबर, तेव्हा हसू आवरता आवरायचे नाही आम्हाला.

तेव्हाचे स्वयमचे आवडते गाणे होते -
"दत्त दत्त,
दत्ताची गाय,
गायीचं दूध,
दुधाची साय,
सायीचं दही,
दह्याचं ताक,
ताकाचं लोणी,
लोण्याचं तूप,
तुपाचा दिवा गणपतीला.
गणपतीच्या देवळात घंटा
वाजते घण घण घण. "
दिवसभरात कित्तीतरी वेळा या गाण्याची पारायणे व्हायची.

कितीही खराब मूड असला , रुसलेला , रागावलेला असला, तरी स्वयमचा मूड परत आणण्याचा रामबाण उपाय होता त्याला हंबा दाखवणे. अगदी कितीही आजारी जरी असला, तरी त्याच्या निस्तेज चेहऱ्यावर तजेला यायचा हंबा दिसली की !काय त्याचे नाते होते हंबाशी, ईश्वरालाच ठाऊक !
स्वयमच्या खेळण्यांमध्ये हंबांचे असणे मग ओघानेच आले. छोट्या - मोठ्या साईझच्या , काळ्या , पांढऱ्या , तांबड्या हंबा त्याच्याकडे होत्या . त्याच्या मावशीने त्याला एक सेल वर चालणारी काळीपांढरी , मोठी हंबा आणली होती, तिचे बटण चालू केले, की ती चालायची, मध्येच थांबून हंबरायची, तेव्हा तिच्या डोळ्यात लाल लाईट लागायची .पण स्वयमला नाही पसंत पडली ती, घाबरायचा तो तिला . शेवटी आम्ही तिला परत करून टाकली ती.

काही दिवसांनी त्याच्या चुलत्यांनी फर टॉय मधली एक गोंडस हंबा महत्प्रयासाने मिळवून त्याच्यासाठी पाठवली. काळीपांढरी फर होती आणि मोठ्ठे बोलके डोळे होते . ती मात्र त्याला खूप आवडली . तिला आमच्या झाडांची पाने द्यायचा स्वयम "खा, गोत खा "म्हणायचा. एका भांड्यात पाणी द्यायचा प्यायला. तिला जवळ घेऊनच रोज झोपायचा तो.

बेंदूर साठी आणलेले बैल पण खूप प्रेमाने जपायचा तो. अगदी लहान असल्यापासून कधीही तो धसमुसळेपणाने खेळला नाही त्या बैलांशी.उलट खूप जपायचा त्यांना , ते फुटू नयेत, याची खूप काळजी घ्यायचा. त्यांना नावे द्यायचा आणि बोलायचा पण त्यांच्याशी.

गावातल्या कुणालाही गुरांचे कौतुक नव्हते. कारण सतत डोळ्यासमोर असायची ना गुरे. माझ्या सगळ्या पेशंटना, गावातल्या लोकांना माहिती झाले होते स्वयमचे हे हंबाप्रेम . कुणाच्या कौतुकाचा तर कुणाच्या कुचेष्टेचा विषय बनले होते . "तुम्हीच एक वासरू पाळा आता याच्यासाठी, "असा काही जणांकडून कौतुकाने , तर काही जणांकडून उपरोधाने सल्लाही मिळायचा आम्हाला.

जवळजवळ साडेतीन वर्षांचा होईपर्यंत त्याचे हे हंबाप्रेम पुरले . आज तो हे सर्व विसरून गेला आहे , पण आजही कुणाच्या तोंडून " हंबा"असा शब्द ऐकला, की तो सारा काळ नजरेसमोर उभा राहतो .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरे आहे अस्मिता. तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आमच्यासारख्या normal बाळ असणाऱ्या, पण ज्यांना फक्त biological parents न बनता जाणीवपूर्वक मुलाला घडवायचे आहे, उद्याचा एक जबाबदार नागरिक आणि त्याहून महत्वाचे म्हणजे चांगला माणूस बनवायचे आहे, त्यांच्यासाठी पालकत्व cake walk न राहता काटेरी मुकुटच असतो !तर तुमच्या रोजच्या संघर्षाची कल्पनाच करवत नाही.
माझ्या नात्यात अशी दोन मुले आहेत. एक 14-15वर्षाचा, एक 11वर्षांचा. त्यांचा प्रवास एक मदतीला तत्पर नातेवाईक म्हणून आणि एक डॉक्टर म्हणून पण खूप जवळून पाहिलाय, पाहतेय. त्यामुळे मी अगदीच समजू शकते तुमचा रोजचाच प्रवास किती खडतर असेल.. आणि आपल्याच एका special child ला special attention देऊन वाढवणे गरजेचं असताना दुसरीकडे आपल्या normal मुलावर अन्याय होत नाही ना, यावर पण डोळ्यात तेल घालून लक्ष देणे.. खूप थकवणारे असणार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही.. एक आई म्हणून हा त्रास तुम्हालाच जास्त होत असणार. कारण "आपण कुठे कमी तर पडत नाही ना, "ही टिकटिक आपल्याच,स्त्रियांच्याच डोक्यात सतत वाजत असते.
हॅट्स ऑफ ! Really admirable dear !! परमेश्वर तुमच्या साऱ्या कष्टांना यश देवो, ही मनापासून प्रार्थना !

दीड -पावणेदोन वर्षांच्या स्वयम ने ओट्यावर -कपाटावर काढलेल्या हंबा च्या चित्रांचे जूने फोटो सापडले, ते share करते आहे.

IMG-20151005-WA0007.jpg

हे दुसरेIMG-20160214-WA0029.jpg

हे घरासमोर ओट्यावर काढले आहे. तो स्वतः हंबावर बसला आहे

.IMG-20160228-WA0004.jpg

थँक्स अस्मिता, विनिता आणि अनु.
आपण एकदम जसेच्या तसे चित्र काढू शकू. पण मुलांनी काढलेल्या चित्रातील innocrnce कसा आणणार? त्यांच्या चित्रातले डोळेच किती बोलके आणि गोंडस असतात !

दीड पावणेदोन वर्षी इतकी सुंदर चित्रे... पाच सहा वर्षाच्या मुलाची म्हणून सहज खपून जातील..
दीड वर्षाचा असताना हातात पेन्सिल धरायलाही जमत नाही आजकाल च्या मुलांना.. ग्रेट आहे तुमचा स्वयं...
दीड वर्षाचा असूनही म्हशीच्या डोळ्याच्या भुवया आणि पापण्या देखील काढल्या आहेत... मानना पडेगा....

थँक्स च्रप्स आणि वर्णिता.
त्याला खूप आवड आहे चित्रे काढण्याची. फक्त मूड यावा लागतो. त्याने काढलेली काही चित्रे मी खालील धाग्यावर टाकली आहेत.

चित्र -तुझं आणि माझं https://www.maayboli.com/node/76557

Omg... He is truly an artist.

दीड पावणेदोन वर्षांची मुलं हातात पेन्सिल धरायची कसरत करत standing line, slanting line, sleeping line ची प्रॅक्टिस करतात, तेव्हा याने म्हैस, तेही खुर शिंग पापण्या एवढ्या डिटेल्स सहित काढली आहेत. Born artist indeed.

मी आत्ता इथे चित्र -तुझं आणि माझं, या धाग्याची link share केली. मी open करून पहिली, तर त्यामध्ये काही चित्रांचे फोटो दिसत नाहीयेत.
मग मी इतर कला विभागात "रांगोळी गणेश ", "पुष्प गणेश "या धाग्यांमध्येही फोटो टाकले होते, ते check केले. त्यातही एखादा फोटो दिसतोय, बाकीचे दिसत नाहीत. असे का झाले आहे? कृपया कोणी मला सांगाल का?
आपण जेव्हा नवीन लेख लिहितो, तेव्हा choose फाईल वर click करतो, तेव्हा आधीच्या लेखात वापरलेले फोटोंचे address दिसत असतात. ते तसेच राहू द्यायचे का delete करायचे?
मी नवीन लेखात फोटो टाकण्यासाठी choose file करते, तेव्हा आधीच्या फोटोंचे address डिलिट करते, ते delete करायचे असतात का तसेच राहू द्यायचे असतात?

फोटो पर्सनल स्टोरेज स्पेस ला अपलोड केले असतील तर अड्रेस डिलीट म्हणजे ते स्टोरेज डिलीट असेल.म्हणजे तुम्ही अपलोडेड फाईल स्टोरेज मधून पुसली.
आधीच्या लिंक तश्याच ठेवा.
(म्हणजे विंडोज चं उदाहरण द्यायचं तर तुम्ही एका फोल्डर मध्ये नवी फाईल पेस्ट करण्या पूर्वी प्रत्येक वेळी सिलेक्ट ऑल करून फोल्डर मधल्या सर्व फाईल पुसल्या)

Pages