पाककृती स्पर्धा १- मोदक बनवणे- खजूर अंजिराचे कुकी मोदक (वावे)

Submitted by वावे on 1 September, 2020 - 14:05

मायबोलीवर रोज येणाऱ्या मोदकांच्या नवनवीन पाककृतींंपासून प्रेरणा घेऊन केलेले हे कुकी मोदक Happy

साहित्य -
पारीसाठी
कणीक - एक कप
लोणी (घरचं किंवा विकतचं अनसॉल्टेड) - अर्धा कप
बारीक चिरलेला खजूर - अर्धा कप
साखर - चार टेबलस्पून
बेकिंग पावडर चिमूटभर

सारणासाठी
सुके अंजीर, काजू वगैरे सुकामेवा बारीक तुकडे करून.

कृती
बारीक चिरलेला खजूर अर्धा कप पाण्यात नॉनस्टिक पॅनमध्ये शिजवून घेतला. पूर्ण मॅश करून घेतला. गार करत ठेवला.
लोणी, साखर आणि कणीक एकत्र करून बोटांनी नीट मिसळली. गार झालेला खजूर त्यात घातला.

IMG-20200901-WA0037.jpg

बेकिंग पावडर घालून सगळं नीट एकत्र करून गोळा तयार केला. हा गोळा दहा पंधरा मिनिटं फ्रिजमधे ठेवला.

दहा पंधरा मिनिटांनी गोळा बाहेर काढून त्याचे लहान लहान गोळे केले. एकेक गोळा मुदाळ्यात घालून दाबून त्याची खोलगट वाटी तयार केली. ( ही आयडिया कुठल्यातरी धाग्यावर जिने कुणी लिहिली आहे तिचे आभार Happy कारण त्याशिवाय कळ्यांची नक्षी नसती जमली )
500034700091_85692.jpg

मग त्यात सुकामेवा भरून मोदकाचं तोंड बंद केलं आणि मोदक बाहेर काढला. वरच्या बाजूला काट्याने कळ्यांची नक्षी पूर्ण केली.

500034700564_85852.jpg

असे सगळे मोदक तयार करून बेकिंग ट्रे ला तुपाचा हात लावून त्यात मांडून ठेवले. तत्पूर्वी ओव्हन १८० अंश सेल्सिअस ला प्रीहीट केला. साधारण पंचवीस मिनिटं मोदक बेक केले. झालं! कुकी मोदक तयार!

IMG-20200904-WA0003.jpg

तळटीप - खजूर कुकीजची मूळ रेसिपी तरला दलाल यांची आहे Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! भारी आयडीया

ही आयडिया कुठल्यातरी धाग्यावर जिने कुणी लिहिली आहे तिचे आभार Happy कारण त्याशिवाय कळ्यांची नक्षी नसती जमली ) >>>>>>>>>>>>>> ममोंच्या मोदक धाग्यावरची म्हणत असाल तर मीच ती Happy कुठेतरी एका विडीओ मधे पाहिलेली युक्ती होती.

मोदक एकदम शाही आणि देखणे जमलेत!
मुदाळ्याची युक्ती मी Yogita’s Kichen च्या एका भागात (नं २६२) पाहिली होती. तिचा मोदक निरनिराळ्या आकारात वळण्याचा video पण छान आहे.

मस्त दिसतायत
अंजीर शीर्षक आणि साहित्यात आलेत, रेसिपीत नुसतेच खजूर आहेत, तेवढा एक बदल करशील का?
(मला अंजीर आवडतात.त्यामुळे 'तयारी करेपर्यंत काढून ठेवलेले अंजीर पोटात गेले' अशी पण शक्यता आहे Happy )

सगळ्यांंना धन्यवाद _/\_
अनु, त्यात सुकामेवा भरून मोदकाचं तोंड बंद केलं यात सुकामेवा म्हणजे अंजीर आणि काजूचे बारीक तुकडे.
प्राचीन, या बंगलोरला Happy

मस्त लागतील तळून
किंवा डबल जॅकेट भांडे करून किंवा कुकरला वाफवता
पण येतील.

वाफवून चिकचिकीत होतील गं. कारण ती कणीक आहे. त्यात खजूर आणि साखरही आहे.
तळून कदाचित चांगले लागतील. करून पहा धनुडी. पण मोदकांचं तोंड घट्ट बंद झालं पाहिजे Happy

नवीन प्रतिसादकांना धन्यवाद _/\_

धन्यवाद वर्णिता. Happy
काल परत हे मोदक केले आणि जरा बरे फोटो काढून चिकटवले आहेत Happy