लेखनस्पर्धा -माझा अनुभव -कोवीड 19 लॉक डाऊन - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 3 September, 2020 - 06:15

फेब्रुवारी महिन्यापर्यंत चीन मध्ये कुठे तरी कोणती तरी भयंकर साथ आलीय आणि तिने तिथे हाहा:कार माजवला आहे ह्या हुन अधिक मला काही माहीत नव्हतं कोरोना बद्दल. कारण जगात कुठे ना कुठे कोणती ना कोणती तरी साथ आलेली असते आणि ती थोड्याच दिवसात विरून ही जाते हा अनुभव असल्याने मी इतकं काही सिरीयसली घेतलं नव्हतं. पण हळू हळू यरोप अमेरीका सिंगापूर अश्या सगळ्याच ठिकाणी ती पसरायला लागली, निरपराध जीव तिला बळी पडू लागले तेव्हा मी माहिती गोळा करायला सुरुवात केली नि जेव्हा साथ भारतात /मुंबईत पोचली तेव्हा त्याबद्दल मला बरीच जागरूकता आली होती. हा एक महा भयंकर साथीचा आजार असल्याने लोकांत न मिसळणे हेच एकमेव औषध आहे ह्यावर हे कळून चुकले होते. तरी ही आठ पंधरा दिवस घरात राहिलं तर होईल सगळं सुरळीत ह्या आशेवर मी होते.

कामवालीला मी 15 मार्च पासूनच थोडे दिवस सुट्टी घे असं सांगितलं होतं. तसेच मी ही घराबाहेर पडणं बंद केलं होतं. 22 मार्चचा जनता कर्फ्यु झाला की जाऊ शकू बाहेर अस वाटत असतानाच तीन आठवड्याचा देशव्यापी लॉक डाऊन जाहीर झाला तेव्हा मात्र गरज पडली तर काय करायचं ह्या विचाराने पाया खालची वाळू सरकली. अगदी मुलांना सांभाळून ऑफिसच काम कसं करायचं, नोकरी कशी टिकेल, ( ती जाऊन खूप वर्षे झालीयेत आता☺️) घराचे हप्ते कसे भरू असे तरुणांपुढे असलेले प्रश्न जरी माझ्यापुढे नसले तरी तीन आठवडे बाहेर न जाता जीवनावश्यक वस्तू कशा मिळवायच्या आणि emergency आली तर काय करायचं हे दोन मोठे प्रश्न माझ्यापुढे उभे राहिले. तसेच गरज पडली तर लांब रहाणारी मुलं आणि नातेवाईक तर सोडाच पण शेजारी ही मदतीला येणं कठीण आहे ही वस्तुस्थिती झोप उडवणारी नक्कीच होती.

हे संकट एखाद्या युद्धा पेक्षाही भयंकर आहे कारण शत्रू छुपा आहे हे मी मनात पक्कं केलं होतं. सरकार ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी ही बाहेर पडू नका, बाहेर धोका आहे वारंवार सांगत होत. कोरोना पासून लांब राहायचं असेल तर घरातच रहाणं मस्ट आहे. तसेच आपण जर बाहेर गेलो नाही तर तेवढाच पोलीस यंत्रणेला रिलीफ मिळेल म्हणून मी होता होई तो बाहेर जायचं नाही हे मनाशी ठरवून टाकलं. त्यासाठी adjustment ची तयारी असली तरी आमच्या सारख्या सिनिअर सिटीझन ना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी कोणी काही करत नव्हतं. अगदी एक ही नगरसेवक ही आमच्याकडे फिरकला नाही. घरपोच सेवेसाठी खुप फोन नंबर मिळाले पण त्यातला एक ही वर्क झाला नाही. किराणा सामान होतं घरात नशिबाने . पण पंधरा एक दिवस मी घरात असणाऱ्या तुटपुंज्या भाजीवर काढले. आणि एक दिवस एक मायबोलीकर मित्र माझ्यासाठी भाजी घेऊन आले. त्यावेळी मला काय वाटलं हे सांगणे शब्दातीत आहे. त्यासाठी त्यांचे किती ही आभार मानले तरी ते कमीच आहेत. असे मित्र देणाऱ्या मायबोलीचे ही खुप खूप आभार. बरेच दिवसानी मी भाजी खाल्ल्याने ती इतकी अप्रतिम लागली की तिची चव अजून ही जिभेवर आहे. असो. मी कधी या आधी बिग बास्केट वर सामान घेतलं नव्हतं पण प्राप्त परिस्थितीत ह्याला पर्याय नाही हे कळून चुकलं आणि डी मार्ट आणि बिग बास्केट वर खातं काढून सामान , भाजी ऑर्डर करू लागले. अर्थात तिथे टाईम स्लॉट मिळणं आणि तेव्हा आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू स्टॉकमध्ये असणं ही देवाची कृपाच म्हणावी इतकं कठीण होतं.

आमच्या पिढीने रेशनराज खुप अनुभवलं आहे. वस्तू गायब होणं, त्यासाठी तासनतास लाईन लावण आम्हाला नवीन नाही पण वस्तू बाजारात आहेत पण आपण तिथं पर्यंत पोचू शकत नाही हे मात्र आमच्यासाठी कल्पनातीत होतं. एक बारीकशी वस्तू ही माझ्या पर्यंत पोचचायला किती जण आपला जीवधोक्यात घालून रस्त्यावर येतायत ह्या विचाराने मी अगदी मिनिमम वरच रहात होते. मी सगळं सामान खूप जपून वापरत होते त्यामुळे सुरवातीच्या काळात कुकिंग बेकिंग ची जी लाट आली होती त्यावर मात्र मी स्वार झाले नाही. उलट एप्रिल महिन्यात मजुरांचे जे हाल चालले होते ते बघून रोजचं साधं जेवण जेवताना ही घास घशात अडकत होता.

काळ थाम्बत नाही दिवस पुढे सरकत होते. सगळं घरकाम स्वतः करणे, सारखं लक्ष ठेवून गरजेच्या गोष्टी online मागवणे, भाज्या धुणे, सारखे सारखे हात धुणे , गुळण्या, वाफारा, इत्यादी गोष्टी करणे ह्यात दिवस जात असला तरी निर्मनुष्य रस्ता, जीवघेणी शांतता, जगात कोरोनाने घातलेलं थैमान , दररोज वाढणारे आकडे, ताक ही फुंकून पिऊन चाललेली जगण्याची धडपड ह्या गोष्टी मानसिक संतुलन बिघडवणाऱ्याच होत्या पण ह्यातून बाहेर पडण्यासाठी नाम स्मरण , मेडिटेशन ह्या गोष्टी सुरू केल्या आणि त्या उपयोगी ही पडल्या. नातलगांचे वाढदिवस, इतर सण online साजरे करून उत्साह टिकवून ठेवला.

मार्च मध्ये तीन आठवडे घरी काढणं कठीण वाटत असताना लॉक डाऊन चे तीन महिने घरात काढले आणि ठाण्यात विशेषतः आमच्या भागात कोरोना चा उद्रेक झाला . तो आमच्या अगदी शेजारीच आला तेव्हा मात्र मन परत एकदा कोलमडून पडलं. त्यातच थर्मामीटर ने चुकीचा ताप दाखवून मला एक दिवस नको एवढा मनस्ताप दिला. ऑफिस मधले काही सहकारी कोरोनामुळे गेले अशा तऱ्हेच्या बातम्या मन अस्वस्थ करतच होत्या. आपण बाहेर जात नाही आहोत त्यामुळे काळजी करायची नाही असं मनाला समजावलं आणि शांत रहायचा प्रयत्न केला.

अश्या तऱ्हेने गेले पाच महिने आम्ही घरातच आहोत नि ते ही डोक्यावर एक काळजीचं ओझ घेऊन पण हे ही दिवस जातील हा आशावाद मनाशी बाळगून. स्वतःची तब्बेत राखणं आणि घरातली उपकरणं ही काळजीपुर्वक वापरणं आणि गरजेपुरते अन्न शिजवणे ह्यात दिवस सम्पतोय . ऑफिशियली आता बंधनं खूप कमी झाली आहेत तरी साथ अजून आहेच त्यामुळे शक्यतो बाहेर जायचं नाही हे पथ्य अजून ही पाळतेच आहे. लवकरात लवकर ह्यावर प्रभावी लस मिळू दे आणि पुन्हा जग पहिल्या सारखं होऊ दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलयत

हे ही दिवस जातील हा आशावाद >> नक्कीच. उम्मीद पे दुनिया कायम है

तुमची शेवटी केलेली प्रार्थना फळाला येवो लवकरच __/\__

छान लिहिलंय.

जानेवारी महिन्यात कधीतरी मी नवर्याला म्हटले होते. डिनर मधे आज परोटा पार्सल आण. नवरा म्हटला होता, तिकडे चीनमधे पोरोना कि कोरोना ची साथ आलीए,लोकं म्रुत्युमुखी पडताएत आणि तु बाहेरून मागवून परोटा कसला खातेस?
मी मजेत म्हटलं, चीनमध्ये ना? दूर आहे खूप आणि मग पहिला रूग्ण केरळमध्ये सापडल्या पासून धाकधूक जी सुरु झाली ती अजूनही सुरूच आहे.

आणि खरंच

लवकरात लवकर ह्यावर प्रभावी लस मिळू दे आणि पुन्हा जग पहिल्या सारखं होऊ दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !

लवकर असे घडो !

सुंदर अनुभवकथन. सुरवातीला कोणीच ईतके गांभीर्याने घेतले नाही कारण भूतकाळात असे कधी घडलेच नव्हते. जे उपलब्ध आहे त्यात काटकसरीने कसे जगायचे हेच या लॉकडाऊनने शिकविले.

छान लिहिलंय.
हे ही दिवस जातील हा आशावाद मनाशी बाळगून.<<< अगदी अगदी.

छान!!!

छान लिहीलंस! माझंही ह्याकाळातलं जीवन Happy ह्यापेक्षा वेगळं नव्हतं ..... सेमपिंच
मी फक्त रविवारी भाजी व इतर सामान आणायला बाहेर पडते सकाळी अनलाॅक पासून ...

छान अनुभवकथन.

लवकरात लवकर ह्यावर प्रभावी लस मिळू दे आणि पुन्हा जग पहिल्या सारखं होऊ दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना ! >>> अगदी अगदी.