व्यसनामुळे नैराश्य येतं कि नैराश्यामुळे माणसे व्यसनाला जवळ करतात हा एक कठीण प्रश्न आहे. पण काहीवेळा या दोन्ही गोष्टींचं सहचर्य आढळतं. दु:ख विसरण्याचं निमित्त म्हणून व्यसन जवळ करणारी काही माणसे आपल्याला आढळतात. अनेकदा माणसांना आयुष्यात अपयशाचा सामना करावा लागतो. निरनिराळ्या प्रकारची संकटे येतात. काही आपदा स्वतःच्या चुकीमुळे सहन कराव्या लागतात तर काही त्रास इतरांमुळे भोगावे लागतात. प्रत्येक माणसांची या संकटांना तोंड देण्याची पद्धत आणि क्षमता निरनिराळी असते. काहीजण सकारात्मक दृष्टीकोण वापरुन प्रयत्नाने संकटांवर मात करतात तर काही निराश होऊन व्यसनाला जवळ करतात. नैराश्यामुळे जी माणसे व्यसन जवळ करतात त्यांच्याबाबतीत व्यसनमुक्ती ही अवघड होऊन बसते कारण आपल्या व्यसनाचे कारण त्यांनी बाहेर शोधलेले असते. मला अमुक अमुक नुकसान सहन करावे लागले म्हणून मला नैराश्य आले आणि म्हणून मी व्यसनी झालो. व्यसनीमाणूस कारण म्हणून सांगत असलेले नैराश्य हे व्यसनाची भलावण करण्यासाठी त्याने वापरलेले डिफेन्स मेकॅनिझम असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
एकदा का माणुस आपल्या व्यसनाची कारणे बाहेर शोधू लागला की त्याला व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणणे कठीण होऊन बसते. कारण आपल्याला व्यसन आहे ते आपल्या स्वभावदोषामुळे आहे, त्याला आपणच कारणीभूत आहोत या गोष्टीचा त्याने स्विकारच केलेला नसतो. एखादी गोष्ट जर तुम्हाला बदलायची असेल तर आधी तुम्हाला त्या गोष्टीचा स्विकार करावा लागतो. व्यसनात बुडालेली बहुतांश माणसे "डिनायल" मध्ये गेलेली असतात. त्यांना आधी व्यसनाचा स्विकार करण्यासाठी तयार करावे लागते. त्यामुळे तथाकथित नैराश्यातून जवळ केलेले व्यसन हे दूर करणे जरा गुंतागुंतीचे होऊन बसते. त्याचप्रमाणे अनेकदा आनंदासाठी व्यसन करणारी आणि पुढे त्यात बुडालेली माणसेही निराशाग्रस्त झालेली आढळतात. त्याची कारणे ही आर्थिक, शारीरिक, मानसिक स्तरावर व्यसनामुळे जे नुकसान होते त्यात शोधता येतात. व्यसनामुळे चांगले मित्र दूर होतात, कुटूंब दूर जाते, समाजात कुणी विचारत नाही आणि माणुस एकटा पडतो. या एकटेपणामुळेही नैराश्य येते.
पुढे एकटेपणामुळे व्यसन करायचे आणि व्यसनामुळे पुन्हा एकटेपणाच वाढवायचा अशा विषारी चक्रात माणुस सापडतो. याशिवाय तुम्ही जे व्यसन करता त्यातील रसायनांमुळे आपल्या शरीरात जे रासायनिक बदल होतात त्यामुळेही नैराश्य येण्याची शक्यता असते. एकंदरीत काय तर व्यसन कुठलेही केले तरी त्याच्या एखाद्या टप्प्यावर तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आपल्याला व्यसनातील मनोविकारांची माहिती असणे आवश्यक आहे. या सदरात आपण व्यसनासोबत जे मनोविकार सर्वसाधरणपणे दिसून येतात त्यांची माहिती घेणार आहोत.
शद्बांकन - अतुल ठाकुर
(आनंदयात्री जूलै-ऑगस्ट २०२० मध्ये पूर्वप्रकाशित)
(डॉ. मैथिली उमाटे या मुंबईच्या सुप्रसिद्ध जे.जे. रुग्णालयात मानसोपचारतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तेथिल ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये त्या सहयोगी प्राध्यापिका म्हणून काम करतात.)
चांगले लिहिले आहे.
चांगले लिहिले आहे.
एकंदरीत काय तर व्यसन कुठलेही
एकंदरीत काय तर व्यसन कुठलेही केले तरी त्याच्या एखाद्या टप्प्यावर तुम्हाला नैराश्याचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. >>>नाही केले तरी शक्यता नाकारता येत नाही
>>>>एकदा का माणुस आपल्या
>>>>एकदा का माणुस आपल्या व्यसनाची कारणे बाहेर शोधू लागला की त्याला व्यसनमुक्तीच्या मार्गावर आणणे कठीण होऊन बसते.>>>> सौ टकेकी बात.
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
घाटपांडेकाका नैराश्य फक्त व्यसन केले तरच येते असे नाही. त्याची इतर अनेक कारणे असतात. लेख व्यसनाशी संबंधित असल्याने येथे फक्त व्यसनाचाच विचार केला आहे.