काव्य म्हणून पाहता पहिल्याच ओळीत 'निर्गुणाचे गुण गाणे' असा वरवर विरुद्ध वाटेल असा शब्दप्रयोग आहे. निर्गुण! ज्याला काहीच गुण नाहीत असा एक अर्थ आणि जे सत्व,रज, तम या गुणांच्या पलिकडचे आहे असे असा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ त्या निर्गुणाच्या बाबत योग्यच आहेत, पण मला दुसरा अर्थ जास्त चपखल वाटतो.
गुण गाणे ही क्रियाही त्रिगुणांच्या प्रभावातली.हे म्हणजे 'तितिर्षुर्दुस्तरं मोहात् उडुपेनास्मि सागरम्' म्हणजे दुस्तर असा समुद्र छोट्या होडीने पार करण्याची इच्छा बाळगण्यासारखे आहे. पण हे काम मी 'निर्भय' होऊन करीन. भय ही एकूणच सर्वार्थाने मनुष्याला खाली खेचणारी भावना आहे. परंतु आत्मज्ञान झालेली व्यक्ती निर्भय असते.
सर्वात मोठे भय मृत्यूचे! आणि कबीर म्हणतात जणू तो मृत्यूही समोर आला तरीही मी निर्भय राहून निर्गुणाचे गुण गाईन.
ते गुणगान मी कसे करेन?
तर 'मूल कमल दृढ़ आसन बांधू जी । उलटी पवन चढ़ाऊँगा ।
योगमार्गात षट्चक्रभेदन महत्वाचे मानले आहे. शरीरात असलेल्या सहा अतिसंवेदनशील भागांवर ध्यान करून तिथल्या सुप्त शक्ती जागृत केल्या जातात. हे उलट क्रमाने केले जाते. मूलाधार(जे माकड़ हाडाच्या शेवटी असते) चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत (सहस्रार चक्र टाळूजवळ असते)उलट क्रमाने खालून वर अशी ही चक्रे जागृत केली जातात. यालाच कबीर उलटी पवन चढ़ाऊँगा म्हणतात.
या प्रक्रियेत मन स्थिर असणं अत्यावश्यक. मनाचं गुंतणं हे साधनेतल्या प्रगतीला बाधक ठरतं. म्हणून तर तुकारामही 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग । आणि मन । ' असं म्हणतात.
एखाद्याचं गुणगान करण्यात मन महत्वाची भूमिका बजावतं. ज्याचं गुणगान करायचं त्याबद्दल मनानें अनन्यशरण असल्याशिवाय गुणगान संभवत नाही. इथे मात्र कबीर म्हणतात त्या मनाला, त्याच्या गुंतण्याला मी स्थिर करणार आहे.
'मन ममता को थिर कर लाऊ जी ।
पाँचो तत्त मिलाऊंगा ।'
निर्गुणाकडे जाणे ही स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याची प्रक्रिया आहे. मनाने किंवा आपल्या संपूर्ण अस्तित्वानेच पंचतत्वांशी एकरूप होणे ही त्यातील एक पायरी. कबीर ह्याच पंचतत्वांशी मनाला स्थिर करण्याबद्दल बोलत आहेत.
पाच तत्वे गाण्याचीही मानता येतील.
शब्द, सूर, लय, ताल आणि भाव (इथे मनाचा संबंध येतो).
आणि कुमारांनी पंचप्राण कानात आणून ऐकावं असंच हे गायलंय. त्याला वसुंधराताईंनी जणू तानपुरा होऊन केलेली साथही तितकीच महत्वाची!
मन आपल्या श्वासांशी जात्याच एकरूप असतं. मन स्थिर नसेल तर आपलं श्वसन उथळ होतं. याच गोष्टीचा वापर मन स्थिर करण्यासाठी करता येतो. दीर्घ आणि संथ श्वसन केले तर मनही शांत होतं. पुढच्या कडव्यात कबीर याच गोष्टीचा उल्लेख करतात.
इंगला पिंगला सुखमन नाडी जी ।
तिरवेनि पर न्हाऊँगा ।
इडा- डावी नाडी, पिंगला- उजवी नाडी या दोन प्रमुख नाड्या आपलं श्वसन नियंत्रित करतात. इथे कबीर इडा ऐवजी पिंगलाशी यमक साधत इंगला असा शब्द वापरतात. ही इडा डाव्या नाकपुडीतून वाहते तर पिंगला उजव्या नाकपुडीतून. कोणत्याही क्षणी आपली एकच नाकपुडी दुसरीपेक्षा जास्त क्रियाशील असते. इडा-पिंगला यांची क्रियाशीलता दर प्रहराला आलटून पालटून बदलत असते आणि आपले श्वसन नियंत्रित होत असते. तिसरी सुषुम्ना ही या दोन्हीचा मध्य आहे. आपल्याकडे ध्यान
करण्यासाठी संधिकाल उत्तम सांगितला आहे. याचं कारण संधिकालात आपल्या दोन्ही नाड्या नैसर्गिकरीत्या सम असतात. अशा वेळी मन लवकर स्थिर होऊ शकते. संधिकाल म्हणजे रात्र संपून दिवस चालू होणारा पहाटेचा काळ, दिवसाचा मध्य म्हणून माध्याह्न आणि दिवस संपून रात्र चालू होण्याचा संध्याकाळचा वेळ (तिन्हीसांजा). ध्यानाने या श्वसनाच्या नाड्यांचे नियंत्रण करता येते. परिणामी मन साधकाच्या आज्ञेत येते. कबीर या तीन नाड्या सम करून त्यांच्या त्रिवेणी संगमावर मी स्नान करेन असे म्हणतात.
पुढे ते पंचीकरणाचा दाखला देतात. विश्वाची निर्मिती पंचतत्वांपासून झाली ती पंचीकरणाने. म्हणजे प्रत्येक तत्वाचे पाच भाग झाल्याने. पृथ्वी तत्व पाच भागात विभागले, पृथ्वीचा एक भाग सोडून उरलेले 4 भाग इतर चार तत्वांत मिसळले. हीच क्रिया इतर तत्वांबद्दल झाली आणि विश्वाची निर्मिती झाली असे सांख्य तत्वज्ञान सांगते. पंचीकरणात पाचाचे पंचवीस झाले. पण यातून 'एक' विश्व निर्माण झाले.विश्वात जे तेच शरीरात. कबीर म्हणतात
'पाँच पच्चीसों पकड़ मंगाऊँगा ।
एकही डोर लगाऊंगा'
या पाच तत्वांचे पंचवीस होणे मी अनुभवेन आणि त्यातून निर्मित एकाच तत्वाचे मी ध्यान करेन.
असे करत करत मी साधनेच्या शिखरापर्यंत पोहोचेन. कबीर त्याला 'शून्य शिखर' म्हणतात. म्हणजे मीच निर्गुण होईन.
'शून्य शिखर पर अनहद बाजे रे ।
राग छत्तीस सुनाऊंगा ।'
शून्याचे शिखर, अनाहत ध्वनी असे विरोधाभासी शब्द वापरले आहेत. अनाहत म्हणजे कोणत्याही आघाताशिवाय होणारा आवाज. असा आवाज ऐकू येणे ही साधनेतली उच्च अवस्था मानली जाते.
कबीर म्हणतात त्या अनाहत ध्वनीतून मी छत्तीस राग ऐकवेन. इथे ही छत्तीस संख्याही सांख्य तत्वज्ञानाशी संबंधित वाटते. बहुतेक पंच तत्वांच्या पंचीकरणातून येणारी25 तत्वे, पाच ज्ञानेंद्रिये, त्यांचे विषय -शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि या सगळ्यांचे ज्ञान देणारे आणि त्याच्याही पलीकडे नेणारे मन असे 11.
एकूण 36 असे असावे. अर्थात, हा फक्त माझा अंदाज आहे.
अनाहत नाद आणि त्यातून ३६ राग ऐकवणे अशी पुनश्च 'निर्गुणाचे गुण गाणे' असा विरोधाभासही अधोरेखित होतोच. म्हणजे जे खरे तर शक्य नाही ते करेन असेच म्हणणे आहे.
'कहत कबीरा, सुनो भाई साधो।
जीत निशान धुराऊँगा ।'
अशा रीतीने त्या शून्य शिखरावर पोहोचल्यानंतर मी माझ्या विजयाचे निशाण फडकावेन.
इथेही पुन्हा विरोधाभास, ज्ञानी माणसाला जय-पराजय सारखेच असतात. तरीही कबीर विजयाचे निशाण फडकवण्याबद्दल लिहितात. निर्गुणाला जाणण्याचा विलक्षण आनंद व्यक्त करु म्हणता व्यक्त करता येणार नाही. मनाच्याच सहाय्याने मनालाच जिंकणे ही विलक्षण गोष्ट साधनेतून शक्य झाली. त्या विजयाचे निशाण मी फडकावेन. निर्गुणाबद्दल जसे कितीही लिहिले, बोलायचा अट्टाहास केला तरी प्रत्यक्ष अनुभव हाच तिथे प्रमाण असल्याने, ते अंततः 'अवर्णनीय' च राहते.
कुमारांचे उपकार आहेत आपल्यावर. त्यातील हे भजन एक !!
~ चैतन्य दीक्षित
वा, हि मालिका फार सुंदर होत
वा, हि मालिका फार सुंदर होत आहे. मन प्रसन्न होते हे वाचून.
खुपच सुंदर. वाचताना अर्थ छान
खुपच सुंदर. वाचताना अर्थ छान उलगडत जातो! थांकु रे ही सेरीज सुरु केल्याबद्दल!
सुरेख लिहितोयस. गवयाचा आवाज
सुरेख लिहितोयस. गवयाचा आवाज तापत जावा तसा लेखागणिक रंग चढतो आहे.
कुमार आणि वसुंधराताईंचे अद्वैत सूर डोलवतात.
शक्य असेल तर भजनाचीही लिंक देशील का लेखाखाली? म्हणजे एकतर ऐकता ऐकता वाचन होईल किंवा वाचून झाल्यावर लगेच ऐकलं तर परिपूर्ण होईल.
कबिर आणि कुमारांचे हे
कबिर आणि कुमारांचे हे निर्गुणी कार्य तू निर्भयपणे समजावून सांगत आहेस असेच वाटत आहे.
खूप सुंदर ! अनेकानेक धन्यवाद
खूप सुंदर !
अनेकानेक धन्यवाद
धन्यवाद मंडळी. सईच्या
धन्यवाद मंडळी.
सईच्या सांगण्यानुसार भजनाची लिंक मूळ लेखात समाविष्ट केली आहे.
वाह. <<गवयाचा आवाज तापत जावा
वाह. <<गवयाचा आवाज तापत जावा तसा लेखागणिक रंग चढतो आहे.>> हज्जार मोदक
अतिशय आवडले.
अतिशय आवडले.