भविष्य

Submitted by पराग र. लोणकर on 17 August, 2020 - 05:16

भविष्य

पांडुरंगशास्त्रींनी संध्याकाळी पाचची वेळ मला दिली होती. पांडुरंगशास्त्री म्हणजे आमचे ज्योतिषी. आमच्या कुटुंबाचे ज्योतिषी. मी कोणीही नव्हतो तेव्हापासून त्यांचा सल्ला घेणे सुरू केले होते. पांडुरंगशास्त्री म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र. मी शिक्षण पूर्ण केलं, पदवी मिळवली आणि व्यवसाय करायचा ठरवला. सुरुवातीच्या काही काळात व्यवसायात अपयश आल्यामुळे मी नोकरी करायचं ठरवलं, तेव्हा पहिल्यांदा पांडुरंगशास्त्रींकडे सल्ला विचारण्यासाठी गेलो. माझी पत्रिका, हस्तरेषा इत्यादी बघून पांडुरंगशास्त्रींनी मला व्यवसायातच यश असल्याचे सांगितले आणि मी व्यवसायातच माझे प्रयत्न चालू ठेवते. हळूहळू थोडंफार यश मिळू लागलं आणि मी वेळोवेळी आवश्यकतेनुसार पांडुरंगशास्त्रींचा ज्योतिषसल्ला घेणं सुरू ठेवलं. प्रत्येक वेळीच त्यांनी सांगितलेलं ऐकून माझा फायदा होत गेला आणि ते सांगतील तसंच घडत गेलं. त्यामुळे पूर्वीच्या राजांचे जसे राजज्योतिषी असत, तसेच आता ते माझे, माझ्या कुटुंबाचे, माझ्या व्यवसायाचे ज्योतिषी झाले होते. माझा व्यवसाय आता केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही अनेक ठिकाणी पसरलेला होता. एकाच नव्हे तर अनेक व्यवसायात आता आम्ही काम करत होतो. त्यापैकी कोणत्याही व्यवसायात एखादे धाडस करायचे झाले किंवा एखाद्या नवीन व्यवसायात पाऊल टाकायचे झाले की मी हमखास पांडुरंगशास्त्रींचा सल्ला घेतो आणि त्यांनी परवानगी दिली तरच पुढे पाऊल टाकतो.

एका नव्या प्रोजेक्टमध्ये पडावे असा विचार सध्या डोक्यात घोळत होता. त्यासंदर्भातला सल्ला घेण्यासाठी मी पांडुरंगशास्त्रींना आज भेटायला जाणार होतो.

पांडुरंगशास्त्री म्हणजे वेळेला एकदम पक्के! त्यामुळे पाचची वेळ ठरलेली असताना मी पावणे पाच वाजताच त्यांच्या घरात पोहोचलो. बरोबर पाच वाजता ते आतल्या खोलीतून बाहेर आले. नेहमीप्रमाणे मी त्यांना वाकून नमस्कार केला व लगेचच माझ्या येण्याचे कारण सांगितले. इतक्या वर्षांच्या अनुभव व सरावाने त्यांना आता माझी पत्रिका वगैरे बघण्याची कधीच गरज लागत नसे. ते केवळ माझी समस्या ऐकून घेऊन त्यावर त्यांचे मत व उपाय सुचवत असत. आज मात्र मी समोर बसल्यापासूनच मला ते चिंतेत वाटले. नेहमीप्रमाणे मी माझी समस्या सांगणे सुरु केल्यावरही त्यांचे फारसे लक्ष नसल्यासारखे मला जाणवले. तरीही मी माझा प्रश्न त्यांच्या समोर सांगून मोकळा झालो. थोडा वेळ ते काहीच बोलले नाहीत. मग एकदम ते म्हणाले, ``माधव, तुझ्या आजच्या प्रश्नाचा विचार आपण जरा काही दिवसाने करूयात. मला तुला आज एक वेगळाच खबरदारीचा इशारा द्यायचा आहे. एकूणच आज मला काहीतरी विचित्रच जाणीव होत आहे. जास्त प्रस्तावना न देता स्पष्ट सांगतो, पुढच्या चोवीस तासांमध्ये तू एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार आहेस. कसा, कोणाच्या, हे मी खरंच सांगू शकत नाही. पण हे घडणार हे नक्कीच!``

इतक्या वर्षांच्या पांडुरंगशास्त्रींच्या ज्योतिषविद्येचा मी घेतलेला अनुभव पाहता आज त्यांनी सांगितलेले सारे खूप विचित्र असले, तरी हसण्यावारी नेण्यासारखे नव्हते. त्यामुळे मी खूपच विचारात पडलो. मी घेऊन आलेले प्रश्न आता माझ्याही मनातून बाजूला पडून हे नवीनच गूढ मनामध्ये व्यापून राहिले. मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो आणि वाटेत इतर काही कामे करायची ठरलेली असूनही ती न करताच ड्रायव्हरला माझ्या बंगल्याकडेच गाडी घ्यायला सांगितलं.

माझ्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं. माझ्यामुळे कोणाचातरी मृत्यू होणार आहे? तेही पुढील चोवीस तासात? म्हणजे? मी कुणाचा खून करणार आहे की काय? कुणाचा करू शकेन मी खून? माझ्या डोळ्यापुढे अनेक व्यक्ती आल्या. अगदी माझ्या बायकोपासून ते माझ्या भागीदारापर्यंत; प्रत्येकाशी कधी ना कधीतरी माझे वाद होतच होते. व्यावसायिक स्पर्धकही खूप होते. त्यात तर सतत चढाओढ चालू होती. केव्हा ना केव्हा तरी यातील कुणाचातरी खून करावा असं मला कधी ना कधीतरी वाटलं होतंच. पण नाही. असं जरी कधी मला वाटलं तरी माझ्या हातून कुणाचा खून होईल असं मला वाटत नाही. तेव्हढी माझी बुद्धी शाबूत आहे.

मग काय होऊ शकेल? इंग्रजी चित्रपट मी अतिशय आवडीने पाहत असतो. त्यातील काही चित्रपटांमध्ये विविध प्रकारे माणसाकडून काहीतरी चूक घडते आणि त्या चुकीमुळे त्याचे स्वत:चे किंवा इतर कोणाचेतरी मरण उद्भवते असे दाखवले जाते. तसे तर काही होणार नाही? मग मी ठरवलं. पुढच्या चोवीस तासात कुठेही जायचं नाही आणि घरातही शक्यतो कोणत्याही उपकरणाला हात लावायचा नाही. पुढच्या चोवीस तासातली माझी सगळी कामं मी रद्द केली. माझ्या खोलीतच बसून राहिलो.

सतत आपल्यामुळे कोणाचातरी मृत्यू होणार आहे हेच डोक्यात घोळत होतं. पांडुरंगशास्त्रींचं भविष्य खोटं ठरणं शक्यच नव्हतं एवढी मला खात्री होती. मग मी ठरवलं, आज आपल्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला जवळच येऊ द्यायचं नाही. मग ती माझी पत्नी वसु असू दे, नाहीतर माझी मुलं असू दे. अगदी माझ्या कर्मचारीवर्गापैकीही कोणी पुढील चोवीस तास माझ्याकडे येणार नाही याची मी खबरदारी घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणं पुढील चोवीस तास कुणीही माझ्या जवळ न येण्याबाबत मी वसूला सांगितलं. तिने यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पण तरी यामागचं कारण मात्र मी तिला अजिबात सांगितलं नाही. कारण मग तीही प्रचंड चिंतेत पडली असती, आणि कदाचित या चिंतेमुळे ताण वाढून तिचंच काहीतरी बरंवाईट झालं असतं आणि पांडुरंगशास्त्रींचं भविष्य खरं ठरलं असतं.

ती रात्र मी एकट्यानेच तळमळत काढली. शांत झोप लागणं शक्यच नव्हतं. मुद्दाम मी आमच्या पती-पत्नीच्या बेडरूममध्ये न झोपता माझ्या वाचन करण्यासाठी असलेल्या स्वतंत्र बेडरूममध्ये झोपलो. आपल्यामुळे कुणीतरी मरणार आहे ही भावना किती विचित्र आहे हे मला जाणवत होतं. मन प्रचंड अस्वस्थ होतं. या अस्वस्थतेमुळे मलाच हृदयविकाराचा झटका तर येणार नाही अशीही शंका माझ्या मनात तरळून गेली.

सकाळ झाली. ब्रेकफास्टसाठी मला बोलावणं आलं, पण मी बाहेर न जाता ब्रेकफास्ट माझ्या खोलीत मागवला. तोही दाराबाहेर ठेवायला सांगितला.

अस्वस्थता खूपच वाढल्याने breakfast झाल्यावर मी नाईलाजाने बंगल्याच्या आवारातील बागेमध्ये पाय मोकळे करण्यासाठी जायचं ठरवलं. रोज सकाळी सकाळी बागेतल्या माळीकाकांशी दोन शब्द बोलायचे हा माझा नेहमीचाच उपक्रम असे. माळीकाका अगदी माझ्या जन्माआधीपासून आमच्याकडे कामास होते. माझ्यासकट घरातील प्रत्येक जण त्यांना आमच्या घरातील एकच मानत होतो. बागेत प्रवेश करताच बागेची स्वच्छता न झाल्याचं माझ्या लक्षात आलं. मी गेटवरील सिक्युरिटीच्या माणसाला हाक मारून विचारलं,
``काय रे माळीकाका नाही आले का?``

त्यानं धावत येउन उत्तर दिलं, ``नाही साहेब, ते सर्दी-तापाने आजारी आहेत.``

``ठीक आहे,`` असं म्हणून मी माझा फेरफटका चालू ठेवला. डोक्यातील विचार जाता जात नव्हते. शेवटी मी परत माझ्या खोलीमध्ये परतलो. वाचन चालू केलं. एरवी एकदा पुस्तक हातात घेतलं की मी त्यात रमून जातो. पण आज तेही होत नव्हतं.

पांडुरंगशास्त्रींनी मला भविष्य कालच्या साधारण पाच वाजता सांगितलं होतं आणि आता सकाळचे अकरा वाजले होते. अजून तरी माझ्या एखाद्या कृतीमुळे कोणी मरण पावण्याची घटना घडली नव्हती. मी अजून एक गोष्ट करून घेतली. मी माझ्या वकील मित्राला फोन करून अटकपूर्व जामीनाची सर्व चौकशी करून ठेवली. कारण माझ्याकडून अनवधानाने जर कोणाचा खून/हत्या वगैरे होणार असेल तर मला पुढच्या पोलिसी कारवाईला तोंड द्यावे लागणार होते. त्या वकील मित्रालाही मी या भविष्याबद्दल काहीही न सांगता ही सारी माहिती काढून घेतली होती.

काल संध्याकाळपासून संपूर्ण काळ डोक्यात फक्त हाच विचार होता. काल संध्याकाळपासून घडलेल्या सगळ्या गोष्टींचाही माझा विचार चालूच होता. अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी ताबडतोब माझ्या दुसऱ्या एका मित्राला- राजेशला फोन केला. फोनवर त्याच्याशी बोललो आणि पुढच्या पंधरा मिनिटात तो त्याच्या सहकाऱ्यांसोबत माझ्या बंगल्यावर हजर झाला. माझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी त्यानं केल्या आणि काही वेळातच तो माझ्याशी बोलण्यास माझ्याकडे झाला.

माझ्यासमोर पुरेसे अंतर ठेवून व सर्व खबरदारी घेऊन तो मला म्हणाला,
``माधव, तुझी शंका खरी ठरली. तुझ्या सांगण्याप्रमाणे आपण टेस्टिंगचा पोर्टेबल किट आणून तुझ्या सर्व टेस्ट केल्या. या नवीन तंत्रज्ञानाने टेस्टही वेगाने होतात व त्याचे रिपोर्टही लवकर मिळतात. तपशीलवार रिपोर्ट जरी काही वेळाने मिळणार असला तरी एवढेच सांगतो की तुझी शंका खरी आहे. यू आर कोविड पॉझिटिव! पण काळजी करू नकोस. तुला दुसरी कोणतीही व्याधी नाही. त्यामुळे मी सांगेन ती खबरदारी घेतलीस की तुला काहीही होणार नाही. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचीही गरज नाही. पण मला एक आश्चर्य वाटतंय, कोणतीही लक्षणे नसताना तुला कोरोना झाला असावा हे तू ओळखलंच कसं?``

डॉक्टर राजेशनं आपलं बोलणं संपवलं. हे सगळं होईस्तोवर दुपारचे तीन वाजलेले होते. म्हणजे पांडुरंगशास्त्रींनी सांगितलेले भविष्य खरे ठरायला फक्त दोन तास शिल्लक होते. मी वसुला खोलीत बोलवलं. तिला आत्तापर्यंत मला करोना झाल्याचं राजेशच्या सहकाऱ्यांकडून कळलंच होतं. त्यामुळे ती दूरच उभी होती. तीही काळजीत पडलेली होती. डॉक्टर राजेशने तिलाही आश्वस्त केलं आणि माझा पडलेला चेहरा पाहून तो परत मला म्हणाला, ``अरे तू इतका depressed का झालायस? तुला खरंच काही होणार नाही.``

मी त्याला काहीही न म्हणता वसुला म्हणालो, ``वसू, एक वाईट बातमी मला तुला सांगायला लागते आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांपैकी कुणीतरी एक, पुढील दोन तासांत हे जग सोडून जाणार आहे. बहुदा आपले माळीकाका! आपल्या रमेश आणि चेतनला पाठवून त्यांच्या घरी काही मदत लागते का ते पहा.``

मी असा भलतंच काहीतरी काय बोलत आहे, ह्याचे प्रश्नचिन्ह मला डॉक्टर राजेश आणि वसू अश्या दोघांचाही कपाळावर स्पष्ट दिसत होते.

पांडुरंगशास्त्रींचे भविष्य खोटे ठरणे शक्यच नव्हते.

आणि काल संध्याकाळपासून चाललेल्या माझ्या विचारमंथनातून माझ्यामुळे एखादी व्यक्ती मृत्यू पावण्याची शक्यता मला फक्त याच मार्गाने दिसत होती.

*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली कथा Happy
संकल्पना छान आहे,
करोना असेल असं वाटलं नव्हतं सुरुवातीला वाचताना Happy

मस्त आहे गोष्ट. मला वाटलं शास्त्रीजींनाच वर पाठवताय की काय!>>> मला पण तसंच वाटलं ..

पण हा ट्विस्ट आवडला....

ओह. असे होते तर.
वेगळी आहे कल्पना
मला वाटलं मित्राचं बायकोशी अफेअर असेल आणी मित्राचा खून होईल
(खूप जास्त थ्रिलर्स वाचल्या की हे असं होतं बघा Happy )

प्रि तम, mi_anu,
मनापासून आभार!

मित्राबाबत डोक्यात नव्हतं, पण वर दोघांनी अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे शास्त्रीजींनाच वर पाठवावे, हा विचार पहिल्यांदा डोक्यात नक्की आला होता.