खरंतर माझ्या माहेरची लोकं फारच अरसिक..सिनेमा, नाटकं, गाणी.. कसली म्हणजे कसलीच आवड नाही..त्यामुळे एखाद्या सिनेमातील इमोशनल सिन बघताना रडणं तर दूर पण साधं एक टिप्पूसही कोणाच्या डोळ्यात आलं तर शप्पथ ..मी त्यांच्या अगदीच विरूद्ध..अर्थात नाॅर्मल.. इतरांसारखेच सिनेमा, गाणी, कॅरम, पत्ते यांसारखे शौक..आमच्या आवडी निवडी आणि स्वभावातील तफावत पाहता मला ह्यांनी लहानपणी खरच एखाद्या मंदिराच्या पायऱ्यांवरून उचलून आणलेले असावे असच कायम वाटायचं .. मग मोठेपणी ठरवलं की लग्नानंतर आपल्याला मिळणारं सासर तरी निदान थोडंफार..नाही नाही, बऱ्यापैकी रसिकच असाव..मग हिच ‘इच्छा माझी पुरी करा’ म्हणत पोह्यांचे कार्यक्रम उरकले.. म्हणजे, पोह्यांच्या कार्यक्रमात सासरच्यांना गाणी किंवा कोणते डायलाॅग्ज वगैरे मारायला लावले नाहीत..पण एका कोपऱ्यात लाजत खुर्चीवर बसण्याऐवजी त्यांच्याशी थेट संवाद साधत, त्यांच्या आणि माझ्या आवडीनिवडी कितपत जुळतात हे जाणून घ्यायलाच मी उत्सुक असायचे..
असो, तर अशा प्रकारे देवाच्या नव्हे तर स्वःतच्याच कृपेने मी असं रसिक सासर पदरात पाडलं..
लग्न झाल्यावर सुरूवातीच्या तीन एक आठवड्यातच सासऱ्यांसोबत ‘दोस्ती’ चित्रपट पहाण्याचा योग आला..ब्लॅक ॲंड व्हाईट सिनेमा बघायची माझी चौथीच वेळ असावी... चित्रपट सुरूवातीपासूनच कमालीचा इमोशनल..त्यात “चाहूॅंगा मै तुझे सांज सवेरे” गाणं लागताच मन भरून आलं..आता सासऱ्यांसमोर लगेचच आपल्या अश्रूंना पाय फुटायला नकोत म्हणून मी सोफ्यावरून एक पाय खाली ठेवत तिथून सटकणार तितक्यातच हा भला मोठा हुंदका..माझा नव्हे, सासऱ्यांचा..माझ्याआधी त्यांच्याच अश्रूंनी उंबरठा ओलांडला होता..मी लगेचच रूमालाच्या शोधात लागले..तितक्यात सासू आतून टाॅवेल घेऊन आली आणि म्हणाली “रूमालाने नाही भागणार आज टाॅवेलच लागणार” (सासूला अशाच वेळेस बरोबर काव्य सुचतं).. एव्हाना माझ्या लक्षात आलेले की हे नेहमीचंच प्रकरण आहे..त्यांच रडणं बघून मला थोडंफार हसूही आलं.. थोडक्यात सांगायचं झालं तर “मर्द को भी दर्द होता है “ हे कळालं आणि ते सांगताही येतं आणि दाखवताही येतं ह्यावर विश्वास बसला .. मग काय..त्यानंतर आम्हा दोघा ढवळ्या-पवळ्याची जोडी चांगलीच जमली.
त्यांना गोडधोड खायला आवडतं मला बनवायला आवडतं..
त्यांना पत्ते पिसायला आवडतात मला लोकांचे पत्ते कट करायला आवडतात..
त्यांना जुनी गाणी ऐकायला आवडतात मला ती म्हणायला आवडतात..
त्यांना ग्लासभरून व्हिस्की आवडते तर मला ताटभरून चकना..
बरं, आमच्या ह्या आवडी-निवडीच्या लिस्टला चार चांद लावायला अजून दोन गोष्टी आहेत.. पहिली म्हणजे कॅरम खेळताना आम्हा दोघांचाही राणीसाठी केला जाणारा आटापीटा..त्यांना कॅरम खेळताना बघून मला कायम मुन्नाभाईतल्या पारसी बावाचीच आठवण होते.. मग वाटतं एवढी चांदीसारखी बायको असताना (सासूचे सगळे केस पिकलेत त्यामुळे सोन्याऐवजी चांदीसारखीच म्हणावं लागेल) का बरं त्या राणीच्या पाठी पडायचं?
तर दुसरी गोष्ट म्हणजे दोस्ती नंतरचे ‘सूर्यवंशम’ चित्रपटावर असलेले आम्हा दोघांचे अतोनात प्रेम ..
लोकांनी ह्या चित्रपटाला कितीही नावं ठेवली तरी “नाव काढलं बाप लेकाने” असं म्हणत आम्ही दोघे हा विचित्रपट दरवेळेस बघतो..
घरच्यांना मात्र आम्हा बापलेकाचे सूर्यवंशम वरचे प्रेम खटकतं.. हा सिनेमा लागणार म्हटल्यावर सगळ्यांच्या पोटात दुखायला लागतं..मग त्यावर तोडगा म्हणून आम्हाला हा विचित्रपट लागण्याआधी थोडीशी जय्यत तयारी करावी लागते -
जसं की सगळ्यात आधी कामवाली बाई, बिनबुलाए मेहमान किंवा नेमक्या ह्याच वेळेस गाॅसिप नावाचा मसाला वाटायला दारात येणाऱ्या शेजारपाजारच्या बायका, अशांचा पत्ता कट करण्यासाठी दारावरची बेल बंद करून ठेवायची, लगेहात लॅंडलाईनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवायचा, त्यानंतर “अहो जरा ‘आम्ही सारे खवय्ये’ लावा ओ” अशी दर पाच मिनिटाला वाजणारी सासूची खरखर कॅसेट बंद करण्यासाठी
तिच्या फोनवरून माझ्या तीनही विवाहीत नंदांना मिसकाॅल मारायचा .. जेणे करून ताशी १ या हिशोबाने ३ तासांसाठी तीचापण पत्ता कट..
हे सगळं उरकल्यावर छान दोन पाण्याच्या बाटल्या .. हो पाण्याच्याच बाटल्या भरायच्या..एक सासऱ्यांसाठी दुसरी माझ्यासाठी, डोळे नाक पुसायला २ नॅपकिन्स आणि अधेमधे चरायला मिठी भात घ्यायचा (ज्यांनी सूर्यवंशम मन लाऊन बघितलाय त्यांनाच ह्या मिठी भाताची गोडी कळेल).. ह्या सगळ्या गोष्टींनी सोफ्यासमोरचा टेबल सजवायचा आणि मग टेबलाच्या दोन्हीबाजूंनी दोघांनी तंगड्या पसरवत एकदाचं सेटमॅक्स लावायचं.. मग त्याच त्याच प्रसंगांवर यथेच्छ रडायचं.. आणि सिनेमा संपला की टिव्ही बंद करून दोघांनी एकाच वेळी आणि एकाच सुरात म्हणायचं “आखिर हिरा(ठाकूर) है सदा के लिए”
आज माझ्या ह्याच भानुप्रतापचा उर्फ सासऱ्यांचा ७० वा वाढदिवस ..आता ठाणे सोडून अमेरीकेत आले त्याला जवळजवळ अडीज वर्षे झाली ..अर्थात तो टेबल सजून, एकत्र सिनेमा बघत रडून आणि त्यानंतर एकमेकांची चेष्टा करूनही तितकीच वर्षे झाली.. आता मात्र ह्या कोरोनाने चांगलीच गोची करून ठेवली आहे .. त्यामुळे आता फक्त वाट बघायची..
फिरसे वही मैफिल सजेगी..
जब मिल बैठेंगे तीन यार,
सून,सासरे और सूर्यवंशम
लिखाण आवडलं, माझ्या आणि
लिखाण आवडलं, माझ्या आणि माझ्या सासऱ्यांची / बाबांची पण जवळजवळ सगळीच मतं /आवडीनिवडी जुळतात. त्यांची आठवण आली. तुमच्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. लवकरात लवकर तुम्हा दोघांना सुर्यवंशम एकत्र पहाता येवो या सदिच्छा.
छान लिहिलंय नेहमीप्रमाणे
छान लिहिलंय नेहमीप्रमाणे
सुर्यवंशमबद्दल आणखी लिहायला हवे होते.
लोकं उगाच ट्रोल करतात ते पुन्हा पुन्हा लागतो म्हणून, अन्यथा धमाल मसालेदार सौथेंडीयन स्टाईल बॉलीवूडपट आहे.
आणि काय बोलावे, तुम्ही आणि तुमच्या सासर्यांसाठी जसे सुर्यवंशम आणि अमिताभ आहे तसे मी आणि माझ्या आईसाठी कभी खुशी कभी गम आणि शाहरूख आहे. आम्हीही हा चित्रपट कधीही कुठेही कुठुनही आणि किती वेळाही बघू शकतो
माझ्या आणि माझ्या सासऱ्यांची
माझ्या आणि माझ्या सासऱ्यांची / बाबांची पण जवळजवळ सगळीच मतं /आवडीनिवडी जुळतात>> बरं वाटलं ऐकून
लवकरात लवकर तुम्हा दोघांना सुर्यवंशम एकत्र पहाता येवो या सदिच्छा>> थॅंक्यू
सुर्यवंशमबद्दल आणखी लिहायला हवे होते>> मलाही आधी वाटलेलं लिहावं पण मग वाटलं धागा फारच लांबेल..सूर्यवंशम साठी एक सेपरेट धागा तो बनता है बाॅस
सूर्यवंशम साठी एक सेपरेट धागा
सूर्यवंशम साठी एक सेपरेट धागा तो बनता है बाॅस Happy
>>>>
हो, हे चालेल
@ म्हाळसा, शेवट बदला,
@ म्हाळसा, शेवट बदला,
".. पुन्हा तो टेबल सजण्याची आणि दोन टाळकी पुन्हा एकत्र भेटण्याची.."
ऐवजी,
"जब मिल बैठेंगे तीन यार, वो, आप और ....... (टॉवेल, पाणी बाटल्या, इत्यादी.... गाळलेली जागा भरा )
हीरा (ठाकूर) सेट मॅक्स वर दर
हीरा (ठाकूर) सेट मॅक्स वर दर दिवसाआड दर्शन देतो, म्हणजे हे तर रूटीन झाले.
रच्याकने तुमच्या भानु प्रताप ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
पाफा - जब मिल बैठेंगे तीन यार
पाफा - जब मिल बैठेंगे तीन यार, वो, आप और ....... (टॉवेल, पाणी बाटल्या, इत्यादी.... Wink गाळलेली जागा भरा ) >> तुम्ही मन वाचता का ओ? मी शेवट आधी असाच काही तरी लिहिला होता -“जब मिल बैठेंगे तीन यार, सून सासरे और सूर्यवंशम” .. पण नंतर बदल केला
हीरा (ठाकूर) सेट मॅक्स वर दर दिवसाआड दर्शन देतो, म्हणजे हे तर रूटीन झाले>> पूर्वी रूटीनच होतं.. आता अमेरिकेत आहे.. आमच्या खंडोबा हिरा ठाकूरवर भारीच खून्नस खाऊन मग एकटीला असले सिनेमे बघण्यात मजा नाही ओ
खूप छान खुसखुशीत लिहिलंय.
खूप छान खुसखुशीत लिहिलंय.
माझे एक निरिक्षण-
माझे एक निरिक्षण-
बहुतेक सुनांचे सासर्याबरोंबर जास्त गट्टी जमते. असं का?
सासरे आले कि आमची पण जुन्या गाण्यांची मैफल, गप्पाटप्पा, इकडचे तिकडचे किस्से रंगतात.
लेख मस्त..
लेख मस्त..
बहुतेक सुनांचे सासर्याबरोंबर
बहुतेक सुनांचे सासर्याबरोंबर जास्त गट्टी जमते. असं का?
>>> कारण सासरे किचन मध्ये येत नाहीत..
बहुतेक सुनांचे सासर्याबरोंबर
बहुतेक सुनांचे सासर्याबरोंबर जास्त गट्टी जमते >> कारण ते मीठ जास्त झालं तरी गुपचूप जे दऊ ते गिळतात ..
कारण सासरे किचन मध्ये येत नाहीत >> आणि सासऱयांसारखं मी देखिल किचनमधे जात नाही मस्त बाहेर बसून मजा मारायची..इथे अमेरिकेत ते सुख नाही
म्हाळसा : छान वाटलं तुमची
म्हाळसा : छान वाटलं तुमची सासर्यांबरोबरची गट्टी ऐकून. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
म्हाळसादेवी काय योगायोग बघा.
म्हाळसादेवी काय योगायोग बघा. अमेरिकेचे कटप्पा गेले आणि तुम्ही आल्या.
मस्त!खुशखुशीत!
मस्त!खुशखुशीत!
हाहाहा! भारी लिहिलंय.
हाहाहा! भारी लिहिलंय.
भारीच लिहिलंय.
भारीच लिहिलंय.
तुमच्या साबू ना वा दि च्या शुभेच्छा
मस्त लिहीलयं,खुसखुशीत.
मस्त लिहीलयं,खुसखुशीत.
म्हाळसादेवी काय योगायोग बघा.
म्हाळसादेवी काय योगायोग बघा. अमेरिकेचे कटप्पा गेले आणि तुम्ही आल्या >> हो.. एकदा ते आले की मी जाईन गडावर एक चक्कर टाकायला
प्रतिसादांबद्दल सर्वांचे
प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद.. सा बूं ना शुभेच्छाही कळवेन
भन्नाट लिहलं आहे
भन्नाट लिहलं आहे
सासरे सून दोघांनी एक साक्षात दंडवत स्वीकारावा
सुर्यवंशम एकदा बघणारा माणूस पण आदरास प्राप्त आहे
तुम्ही तर अतिविलक्षण गटात आहात
सुर्यवंशम एकदा बघणारा माणूस
सुर्यवंशम एकदा बघणारा माणूस पण आदरास प्राप्त आहे
तुम्ही तर अतिविलक्षण गटात आहात>> अशा अतिविलक्षण गटात मोडणारी बरीच मंडळी आहेत.. उगाचच नाही हं ह्याला कल्ट ची उपाधी मिळालीए तसंही पिच्चर में क्या रखा है.. छान कंपनी आणि मौहोल असेल तर ‘झिरो’ सारखे चित्रपटही मी आनंदाने बघू शकेन
...अरे, मेरा भी जम जाता है
...अरे, मेरा भी जम जाता है ससुर जी के साथ! काफी अच्छा लिखती है आप। मजा आया पढ़ने में।
तर ‘झिरो’ सारखे चित्रपटही मी
तर ‘झिरो’ सारखे चित्रपटही मी आनंदाने बघू शकेन
>>>>..
झिरो कतरीना आणि अनुष्काचा का?
एवढा वाईट आहे का तो? मी पाहिला नाही पण बघायची ईच्छा आहे एकदा
खुशखुशीत! असे पिक्चर बघायला
खुशखुशीत! असे पिक्चर बघायला कंपनी लागतेच.
मेरा भी जम जाता है ससुर जी के
मेरा भी जम जाता है ससुर जी के साथ>> मेरे तो झगडे भी उतनेही होते है उनके साथ तुझ्याशी जमेना, तुझ्या वाचून करमेना असं काही तरी आहे
बाय दवे.. सगळ्यांनीच
बाय दवे.. सगळ्यांनीच ‘सूर्यवंशम’ चुकीचे म्हणजेच ‘सुर्यवंशम’ असं लिहीलं आहे.. मला वाटलं मी एकटीच अशुद्ध लेखन करते
छान लेख. माझंही सासुबाई
छान लेख. माझंही सासुबाई पेक्षा सासऱ्यांशीच छान जमतं. आमची चहाची आवड आम्हाला जोडून गेली. दोघेही पक्के चहाबाज आहोत आणि त्यांना फक्त माझ्या हातचा चहा आवडतो...
वाह छान
वाह छान
तिच्या फोनवरून माझ्या तीनही
तिच्या फोनवरून माझ्या तीनही विवाहीत नंदांना मिसकाॅल मारायचा .. जेणे करून ताशी १ या हिशोबाने ३ तासांसाठी तीचापण पत्ता कट..
हे भारीय पुढे तुमच्या घरी सुन येईल तेव्हा हीच पद्धत माकड आणि टोपीवाला प्रमाणे परंपरा पाळेल हेही लक्षात असू दया.
Pages