तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?
माबो वर "तुम्ही दारू कशी पिता?" हा धागा आहे. त्या धाग्यावर समस्त तळीराम मंडळी व्यक्त होत असतात. वारुणीचे विविध प्रकार, तिचे इतर पेयांबरोबरीचे असंख्य कॉकटेल्स, एकदम एक्झ्हॉटीक पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अशी माहिती तेथे उपलब्ध आहे. दारूचे गुणगान करणारे, वाऱ्यावरती घेत लकेरी मदिरानंदी टाळी लागणारे अनेक प्रतिसाद आहेत परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात व त्यांची कुचंबणा होते असे अस्मादिकांच्या निदर्शनास आले आहे.
अशा लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपल्या आवडत्या अमादक परंतु शक्ती आणि स्फूर्तिदायक पेय्यांबद्दल लिहिण्याची संधी मिळावी केवळ ह्याच कारणासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. खरंतर "दूचकॉ" ह्या पेय्यांना दारू सारखे स्थळ, वेळ, काळ ह्यांचे बंधन नाही, दारू सारखी सामाजिक काळिमा किंवा लांच्छन (म्हणजे मराठीत सोशल स्टीग्मा) नाही त्यामुळे दुचकॉ प्राशन करणाऱ्या लोकांची संख्या दारू झोकणाऱ्यांपेक्षा जास्त असली तरी दारू पिणारे देखील दारू व्यतिरिक्त वरील पैकी एखादे तरी पेय्य पिणारे असतातच त्यामुळे तळीराम मंडळींना देखील इथे लिहिण्याची संधी आहे.
ढोबळमानाने दूचकॉ अशी विभागणी केली असली तरी ह्या व्यतिरिक्त तुमच्या आवडत्या ताक, लस्सी, कोकम, सोलकढी, लिंबूसरबतापासून ते मोहितों ची व्हर्जिन मेरी पर्यंत इतर पेय्यांबद्दल लिहिण्यास काहीच हरकत नाही.
दूध (एक पूर्णान्न):
आपण दूध कसे पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
ब्रँडेड की गवळ्याचे
धारोष्ण, थंडगार की गरम
गोड की अगोड
मसाला दुध (बासुंदी)
सायी सकट की सान्स साय
दूध व्युत्पन्न इतर पदार्थ (दही, लोणी तुपापासून मिठायांपर्यंत)
चहा (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द आम आदमी):
आपण चहा कसा पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
पावडरचा की टी बॅग्ज
पूर्णतः दुधाचा की सान्स दूध
अगोड की अतिगोड
अतिगरम म्हणजे अक्षरशः उकळता, कोमट की कोल्ड
मसालेदार काढा की फक्त स्वाद असलेले पाणचट फुळकवणी
ब्रँडेड की फक्कीवाला
ब्लॅक, ग्रीन की इतर
कॉफी (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द सिव्हिलाईझ्ड वर्ल्ड):
आपण कॉफी कशी पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
उकळून की ब्रू करून
इन्स्टंट, फिल्टर की वड्याची
तयार पावडरची की नुकत्याच दळलेल्या बियांची
पूर्णतः दुधाची की काळी
ब्लॅक, लाटे, कॅपच्यूनो की एस्प्रेसो
कुठले बीन्स वापरता
कोको - चॉकलेट पेय्यांची खरंतर आणखी एक विभागणी होऊ शकते. त्याबद्दल लिहिण्यास हरकत नाही.
मद्यपींच्या मद्य बाटल्यांचे, चषकांचे विविध मनोवेधक आणि उत्तेजक आकार असतात. घरातील छोट्या मोठया बार मध्ये स्टॉक असतो, विविध उपकरणे असतात त्या तुलनेत तुम्ही दुचकॉ कसे पिता? साधी कप-बशी, मग, टम्ब्लर, स्टीलच्या किंवा काचेच्या पेल्यातून की आणखी काही (उदा. पितळी). तुमच्या कडे चहा, कॉफी करण्यासाठी आणि पिण्यासाठी काय काय साहित्य आहे?
मद्यपींसाठी मद्य पिताना खाण्यासाठी काँडिमेंट्स (मराठीत चखना) म्हणजे साध्या पापड, शेंगदाण्यापासून काजू, चिकन पर्यंत पर्याय असतात त्याप्रमाणे दुचकॉ बरोबर खाण्यासाठी खारी, बिस्किटे, पावापासून पोळी, भजी, चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ असतात, त्यापैकी तुम्हाला काय आवडते?
मद्यपी मंडळी मद्याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असतात आणि अमद्यपींना "हाय कम्बख्त, तू ने .....' वगैरे वगैरे हिनवत असतात तेव्हा दुचकॉपींनी कमीतकमी दुचकॉ बद्दल अभिमानाने बोलायला काय हरकत आहे?
एक गरम चाइ की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो ...
पुढे तुमची "कल्पना"शक्ती हो !!
हो ना , मी तर "तो" धागा उघडत
हो ना , मी तर "तो" धागा उघडत पण नव्हते.
आता इथे लिहुयात आणि वाचूयात दुचकॉ बद्दल.
परंतु जे लोक दारूला वर्ज्य
परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात
>>
टीटोटलर याचा चहाशी काहीही संबंध नाही. मिल्क/कॉफी टोटलर असे शब्द बनु शकत नाहीत.
मला चहा आणि कॉफीची आवड नाही.
मला चहा आणि कॉफीची आवड नाही. मी गायीचं दूध पिते गुळ आणि हळद टाकून. लहानपणी घरी गायी असायच्या त्यामुळे घरचं दूध मिळायचं आता अमूल गोल्ड जिंदाबाद..
सध्या मी काळा चहा पितो.
सध्या मी काळा चहा पितो.
चहा पत्ती, सुंठ आणि वेलदोडा घालून बनवलेला. साखर अजिबात नाही.
अधून मधून जास्वंदचा पण. फक्त जास्वंदाची फुलं घालून केलेला.
>>>> टीटोटलर याचा चहाशी
>>>> टीटोटलर याचा चहाशी काहीही संबंध नाही. मिल्क/कॉफी टोटलर असे शब्द बनु शकत नाहीत. >>>>

या धाग्यावर दारू पूर्णपणे
या धाग्यावर दारू पूर्णपणे व्यर्ज आहे का?
कारण कॉफ़ी लिक्योर म्हणून एक भन्नाट प्रकार आहे
कॉफ़ी असल्याने यात चालावा
या धाग्यावर दारू पूर्णपणे
या धाग्यावर दारू पूर्णपणे व्यर्ज आहे का?
कारण कॉफ़ी लिक्योर म्हणून एक भन्नाट प्रकार आहे
कॉफ़ी असल्याने यात चालावा Happy
>>
लॉजिकली दारू ईथे नको
जसे की वांग्याच्या भाजीत सुकट मासे टाकले तर तयार होणारा पदार्थ शाकाहारींना चालेल का त्यात मेथी असल्यामुळे.... तर नाही
जसे की साबुदाण्याच्या खिचडीत अंडे टाकले तर तयार होणारा पदार्थ उपवासाला चालेल का त्यात साबुदाणा असल्यामुळे.... तर नाही
त्यामुळे प्लीज दारू नकोच

अन्यथा मजा जाईल ईथली. आणि मग मी बदला घ्यायला मग तिथे येईन कारण मी चहाचा प्रचंड मोठा चहाता आहे. गिनीज बूक ऑफ वालचंद सांगलीच्या रेकॉर्डबूकात माझे नावही आहे
चांगला धागा... दारू आवडते..
चांगला धागा... दारू आवडते.. पण दारू पिऊन .. चकना खाऊन.. बिर्याणी वगैरे चापल्यानंतर शेवटी एखाद्या दिवशी चहा घेतला तर मजा येते...
(No subject)
पण दारू पिऊन .. चकना खाऊन..
पण दारू पिऊन .. चकना खाऊन.. बिर्याणी वगैरे चापल्यानंतर शेवटी एखाद्या दिवशी चहा घेतला तर मजा येते...
>>>>
शेवटी चहा याला +७८६
चहानंतर काही खाऊन पिऊन चहाची चव घालवणे मलाजी आवडत नाही.
परवाच एका नवीन शेजारयांकडे गेलो होतो. (मास्क लाऊन) त्यांनी चहापाणी दिले. आणि त्यानंतर शेवटी बडीशेपची ताटली समोर ठेवली. मला हसावे की रडावे कळत नव्हते. त्यांना वाईट वाटू नये म्हणून मग थोडी रुमालात बांधून घेतली.
चहानंतर बडीशोप??? सिरियसली???
चहानंतर बडीशोप??? सिरियसली???
हा तर चहाचा अपमान आहे..
याची तुलना मी स्कॉच मध्ये कोक टाकणाऱ्यांशी करेन...
त्यांना पुण्याला पाठव काही
त्यांना पुण्याला पाठव काही दिवस
मग बरोबर करतील सगळं
मी आणि माझा मित्र नेहमी कडक
मी आणि माझा मित्र नेहमी कडक कोफी पितो
डार्क, बिना साखर
रुपाली मध्ये त्याला साठे कॉफी म्हणतात
कॉफी ही कडूच असावी
त्यात साखर घालणे हा कॉफीचा अपमान आहे
अगदी बरोबर आशु... मी काळी
अगदी बरोबर आशु... मी काळी कॉफी पितो.. कॉफीत साखर आणि दूध दोन्ही घालणे मला अपमान वाटतो कॉफी चा..
चहा
चहा
जास्तीत जास्त पानं(तुळशी, लिंबू पान, पुदिना, असलं तर जिरेनियम चं पान,गवती चहा, दालचिनी पावडर) घालून 1 चमचा साखर आणि कमी दूध घालून उकळलेला चहा.रंग पांढरट नको.साखर कमी असली तरी चालेल जास्त नको.(असा चहा टी ट्रेल्स वाले 'तुलसी चाय' बनवतात तो पण परफेक्ट लागतो.)
कॉफी
कडक अर्धा चमचा साखर वाली नेसकॅफे, साय अजिबात नको, दूध कॉफी सहित उकळून बनलेली जुगाड नेसकॅफे नको.
फिल्टर कॉफी, स्ट्रॉंग, थोडे दूध आणि कमी साखर वाली.
(मी सर्व गरम पेय आवडीने पिते.चहा, कॉफी, दूध हळद दालचिनी,ड्रिंकिंग चॉकलेट,काढा,बोर्नव्हिटा.)
चहानंतर बडीशोप??? सिरियसली???
चहानंतर बडीशोप??? सिरियसली???
हा तर चहाचा अपमान आहे..>> नाही हो. काही अपमान होत नाही चहाचा. उलट मजा येते बडीशोप चघळायला.
वा.. छान धागा.. इथं अपेक्षित
वा.. छान धागा.. इथं अपेक्षित असलेला प्रतिसाद अजून कुणीच दिला नाही म्हणून मी सुरुवात करतो.
तर चहा.
लहान असताना पाऊण कप घट्ट दुधात पाव कप किंवा त्याहून कमी चहा टाकून मिळाला की मोठं झाल्यासारखं वाटायचं. पचवीपासून मात्र आठवड्यातुन अनेकदा पूर्ण कप चहा मिळू लागला, त्याआधी बोर्नव्हिटा असे. अर्थात तेव्हा चहा कॉफी दूध वगैरे प्यायचे म्हणून प्यायचे ह्या कॅटेगरीत असल्याने चवीने पिणे काय ते कळत नव्हते. कॉलेजला होस्टेलवर राहताना मात्र चहाबाज झालो खऱ्या अर्थाने. बापू टी हाऊसचा तो 6 रूपये कप असलेला घट्ट, गोड, कडक चहा. दिवसातून किमान 2 वेळा तरी चहा व्हायचाच. बऱ्याचदा 10, 10 मिनिटे वेटिंग लागायचं तिथं. त्या चहासारखा सुंदर चहा मी आजवर प्यायलो नाही कुठेच.
नंतर बापू चहाच्या जवळ जाणारा चहा मी घरी बनवू लागलो. साधारण 3 कप चहा करायचा असेल तर आधी 2 वेलदोडे आणि एखादा इंच आले कुटून अर्धा कप पाण्यात उकळून त्यात 2.५ ते 3 चमचे चहा पावडर उकळतो, पाणी आहे त्याहून बरंच कमी झाल्यावर २.५ कप दूध आणि चमचाभर साय टाकतो, आणि शेवटी दोन चमचे साखर. मंद आचेवर हे सगळं सूरु करून उकळी यायला लागली की भांड्यात डाव फिरवणे, चहा डावात वर घेऊन पुन्हा पातेल्यात ओतणे वगैरे करत 7,8 मिनिटे उकळून सगळं मिश्रण अर्ध्यावर आलं, उतू जाऊ न देणं अशक्य व्हायला लागलं की कपात ओतायचा. चहा पिण्याच्याआधी ग्लासभर पाणी प्यायचं, वाटल्यास चूळ भरून घ्यायची जेणेकरून चहाच्या चविवर आपण आधी खाल्लेल्या पदार्थाचा अंमल येणार नाही. शांत पणे हा स्पेशल चहा इतर काहीही सोबत न खाता एन्जॉय करायचा.
कॉफी: कॉफी म्हटल्यावर मला फक्त एकच शब्द आठवतो, फिल्टर कापी! खास म्हैसूरला असताना या पेयाची सवय लागली होती. कडक कार्यक्रम असतो एकदम. विशेष भांड्याच्या नळातून उकळलेलं कॉफ़ीचं पाणी (याला काहीतरी म्हणतात आणि मला नेमकं आता आठवत नाहीये) आणि मग दूध घालून बनवलेलं ते मिश्रण.. अफलातून चव. अगदी लहान सहान टपऱ्यांवर सुद्धा फिल्टर कापी मिळायची. गोड म्हणजे जाणवणार नाही इतकंच. जुन्या म्हैसूरमध्ये स्पेशल बेंणे डोसा आणि त्यानंतर ही कापी म्हणजे स्वर्गसुख. इतर कोणत्याही प्रकारची कॉफी मला भावली नाहीच आजवर..
याशिवाय सर्दी झाल्यावर हळदीचं दूध आवडतं, गरम दुधात फक्त भरपूर बोर्णव्हिटा टाकून ते प्यायला आवडतं. ऑफिसमध्ये व्हेंडिंग मशीनची ब्लॅक कॉफी, ग्रीन टी पण पितो कधीतरी..
चाहसोबत खायला खारी प्रचंड आवडते. नेहमी खात नसल्याने अजूनच जास्त (माझ्या शहरातल्या विशिष्ट बेकरीचीच खारी आम्ही खातो, इतर ठिकाणच्या खारीने माझा मूड खराब केलाय नेहमीच). एकदा पुण्यात गुडलकला चहा आणि मस्का पाव खाल्लेला.. काही फार आवडलं नव्हतं ते प्रकरण. शिवाय मुंढवा चौकात इराणी चहा घेतला होता एकदा. वेगळीच चव होती. आवडली असेही नाही, आणि आवडली नाही असेही नाही! येवले आणि इतर अमृततुल्य: फक्त अनेकवेळा उकळल्यामुळे चहाला येते ती चव. बऱ्याच वेळा पिल्या जातो यांचा चहा, पण कंटाळा येतो त्या विशिष्ट चवीचा नंतरहून. डांगे चौकातून हिंजवडीकडे जाताना एक येवले अमृततुल्य लागतं, त्याच्या थोडे पुढं गेलं की एक पोहेवाला आहे. अगदी झकास, तिखट साधे पोहे, आणि त्यावर त्यांच्याचकडे एक चहा मारला की तरतरी येते. पुण्यातला (मी घेतलेला) बेस्ट चहा तोच!
कॉफी म्हटल्यावर मला फक्त एकच
कॉफी म्हटल्यावर मला फक्त एकच शब्द आठवतो, फिल्टर कापी!>> मलाही ही फिल्टर कापीच जास्त आवडते.. २००८ मधे राजूच्या कृपेमुळे जाॅबसाठी चैन्नइला धाडलं गेलं तेव्हा दिड वर्ष ह्या फिल्टर कापीनेच सांभाळून घेतलं होतं म्हणून ही विशेष आवडीची..
मी चहाबाज नाही पण एका विशिष्ट पद्धतीचाच चहा आवडतो. पाणी सोडून बाकी सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात हव्या.. आलं आणि काळ्या मीरीचा मारा.. वेलची,चहा मसाला घातलेला चहा अजिबात नाही आवडत.. टपरीवरचा पार्ले बिस्किट घालून बनवलेला चहापण आवडतो.
चहा - मला चहाच्या वासाने
चहा - मला चहाच्या वासाने मळमळते. अजिबात आवडत नाही. चहा उकळायला लागला की मी दुसऱ्या रुममध्ये निघून जाते. रोज रात्री कॅमोमाईल टी (हा तर चहा नसतोच, वाळवलेली फुलं असतात) मात्र रोज पिते. मला अतिशय आवडतात. दुसरा परत हर्बल चहा म्हणायचा पण यातही चहा पावडर नसते, तोही पावसाळ्यात अतिशय आवडतो. पाण्यात तुळस, गवती चहा आणि आलं भरपूर उकळून नन्तर किंचित लिंबाचा रस घालून पिते. (एका क्लासी कॅफेमध्ये 170रुपये देऊन प्यायले, तिथे आवडला म्हणून मग त्यांनतर कायम घरी कॉपी केला. एवढ्या घरच्या बागेत असणाऱ्या इन्ग्रेडीएन्ट्ससाठी 170 रुपये काहीच्या काहीच)
कॉफी वाटेल त्या फॉर्ममध्ये आवडते. ब्लॅक, दुधाची, इन्स्टंट, साऊथ स्टाईल दिकॉक्शन किंवा जायफळवाली कार्यालयात करतात तशी. पण साखर मात्र कमी हवी. मागे एका मैत्रिणीकडे ब्लॅक कॉफी विथ white unsalted butter प्यायली. वाटलं नव्हतं, पण आवडली. (बेस्ट कॉफी - Douwe Egbert. Tschibo ठीक ठीक. टर्किश कॉफी एवढी प्रसिद्ध आहे, पण त्यात खाली फार मड जमतो म्हणून आवडत नाही)
चॉकोलेट मिल्क - Cailler ची प्लेन कोको पावडर. ही कच्ची असते, उकळून प्यावी लागते, पण इतका ऑसम फ्लेवर की बस्स !
*कॉफीबरोबर सँडविच सगळ्यात आवडतं, पण बाकी नमकीन सुद्धा आवडतं. बाकी कोको, हर्बल टी, ब्लॅक कॉफी, कॅमोमाईल मात्र चव न बिघडवता नुसतेच पिते.
अजिंक्यराव... पुण्यात दिसताय.
अजिंक्यराव... पुण्यात दिसताय... बाणेर ला गिरधर चहा ट्राय करा.. वेटिंग असते तिथेपन..
नागपुरात धरमपेठेत गोकुळ की
छान.
पुण्यात गवती चहा मिळते तो छान
पुण्यात गवती चहा मिळते तो छान असतो.
चाहा हा योगा प्रमाणात उकळलेला साखर, चाहापती, पाणी, दुध, अद्रक, तुळशी पत्र, गवती चहा पाने टाकुन बनवलेला छान लागते.
कॉफी ही जास्त साखर, कॉफी पावडर आणि इलायची टाकून फेडून बनवलेली छान लागते.
ऋन्मेऽऽष@ परवाच एका नवीन
ऋन्मेऽऽष@ परवाच एका नवीन शेजारयांकडे गेलो होतो. (मास्क लाऊन)>>>चाहा पिताना काडला का नाही मास्क??
mi_anu@ मी सर्व गरम पेय आवडीने पिते.चहा, कॉफी, दूध हळद दालचिनी,ड्रिंकिंग चॉकलेट,काढा,बोर्नव्हिटा.)>> मला पण
कॉफी: स्टारबक्सची डार्क रोस्ट
कॉफी: स्टारबक्सची (पीट्स असेल तर अत्युत्तम) डार्क रोस्ट ड्रिप. टॉल १ क्रीम १ शुगर.
चहा १: आलं घातलेलं पाणी उकळलं की चहा पावडर (परदेशात: वाघ बकरी, भारतात: गिरनार नं ३) टाकून गॅस बंद करुन पातेलं गॅस वरुन दूर झाकुन २-३ मिनिटे ठेवायचं. त्यावेळात कपात थोडी साखर आणि थोडं दूध घालून मायक्रोवेव्ह करायचं. मग तो चहा कपात ओतायचा आणि प्यायचा.
चहा २: कपभर पाणी २ मिनिटे मायक्रोवेव्ह करायचं. मग त्यात इंग्लिश ब्रेकफास्ट टी बॅग घालून प्यायचा. यात साखर आणि दूध नाही.
चहा ३: गिरनार इंस्टंटी मिल्क टी सॅचे (आले, मझाला चाय इ.) गरम पाण्यात टाकून ढवळून ते मिट्ट गोड चिखलाचं पाणी प्यायचं. हा बुड फार न हलवता होतो हेच काय ते सुख.
चहा - आलं/ गवती चहा यापैकी
चहा - आलं/ गवती चहा यापैकी काहीही/ दोन्ही/ काहीच नसेल तरी चालेल, पण कमी दुधाचा, गरम गरम. एकटीने/दोघांनी/मोठ्या ग्रुपने, कसाही, कुठल्याही वेळी प्यायला आवडतो.
कॉफी- फिल्टर. इथल्या आशा फूड कँप नावाच्या हॉटेलातली सगळ्यात जास्त आवडते. त्याखालोखाल MTR, CTR, Brahmins etc. घरची फिल्टर कॉफीही ठीक. दोघांनीच किंवा छोट्या ग्रुपमध्ये पिण्यात जास्त मजा. चटकन हवी असेल आणि एकटीलाच हवी असेल तरच इन्स्टंट.
दूध - फारसं आवडत नाही. कोजागिरीचं मसाला दूध तेवढं आवडतं.
हो ते इन्स्टंट चहा छान असतात.
हो ते इन्स्टंट चहा छान असतात. वाघ बकरीचा जिंजर टी मस्तच असतो.
कोल्ड कॉफी राहिली की. अति थंड नको, दाट, बेताची गोड आवडते. डाल्गोना आवडली.
चहा, कॉफी - दोन्ही ब्लॅक
चहा, कॉफी - दोन्ही ब्लॅक आवडतं. साखर, दूध घालून नाही. वेगवेगळ्या फ्लेवर्स चे चहा (त्यात चहा नसतो), पण आवडतात. दूधातली कॉफी कधितरी- संध्याकाळी वगैरे कॉफी घ्यायची वेळ आली तर, पण तरिही साखर नाही. चहाइतके कॉफी चे फ्लेवर्स (हेझलनट वगैरे) नाही आवडत.
दूध- मसाला, बासुंदी, रबडी, थंडगार, सायीसकट, गाय, म्हैस, सॉय, सगळं आवडतं.
थाय आईस टी राहिला.
थाय आईस टी राहिला.
हा मात्र भरपूर आईस, हाफ अँड हाफ घालून मिट्ट गोड. जेवताना किंवा जेवण झाल्यावर स्ट्रॉने डिझर्ट सारखा प्यायचा. ह्याचा घरी पण सेम चवीचा होतो.
चहा म्हणजे जीव की प्राण आहे.
चहा म्हणजे जीव की प्राण आहे. अगदी शाळेच्या वयात चहाचे महत्व समजले नव्हते त्यामुळे काही वर्षे बंद सुद्धा केला होता पण त्यानंतर आता बंद होणे अशक्य आहे.
वेगवेगळे चहाचे प्रकार प्यायला खूप आवडते पण दुधाचा दाट (घट्ट नव्हे) चहा कशाचीच जागा घेऊ शकत नाही.
माझी चहाची पद्धत –
सर्वात आधी ज्या भांड्यात चहा बनवायचा त्यात अर्धा कप पाणी उकळायला ठेवतो. उकळल्यावर ते कपात काढून घेतो.
साठ टक्के दुध व चाळीस टक्के पाणी हे शेवटी शिल्लक राहिले पाहिजे यासाठी अजून दहा ते पंधरा टक्के पाणी जास्त टाकून भांडे गॅस वर ठेवतो.
वरील मिश्रण उकळेपर्यंत आले बारीक करून घेतो. उकळल्यावर आले टाकतो. एखाद्या मिनिटात लगेच चहापत्ती. आता किती चहापत्ती म्हणाल तर कोणती वापरता त्यावर अवलंबून आहे. ढोबळ पणे ताजमहाल कडक, सोसायटी मध्यम आणि रेड लेबल सौम्य आशी विभागणी आहे. अजून अनेक ब्रांड नुसार चव बदलते स्वस्त ब्रांड कडक म्हणजे कडू असतात आणि चवदार नसतात.
सुंदर बदामी रंग आला की साखर घालून दोन मिनिटे उकळून बंद करावा.
ज्या कपात आधी गरम पाणी ठेवले आहे ते थोडेसे फिरवून फेकून देतो आणि लगेच त्या गरम कपात चहा गाळून घेतो.
आणि आरामात त्याचा आस्वाद घेतो.
विशेषतः ताजी गवती चहाची पाने टाकून अमृतासमान चहा बनतो.
काही वेळा वेलदोडे, दालचिनी, लवंग असे प्रकार करतो पण चहाची मूळ चव जाऊन मसालेदार होणार नाही याची काळजी घेतो.
चक्री फुल (स्टार अनिस) ची एक पाकळी टाकली तर वेगळी गोडसर अर्दी अप्रतिम चव येते.
वाघ बकरी चा मसाला टी उत्तम आहे.
हे झाले दुधाच्या चहाबद्दल.
काळा चहा म्हणाल तर TWININGS चा अर्ल ग्रे हा ऑल टाईम फेव्हरीट आहे. यामध्ये थोडी साखर घालतो अगदी नावापुरती. नसेल तरी चालते.
नेहमीचा काळा बनवण्याची पद्धत.
पाणी उकळतो त्यात आले, गवती चहा किंवा वेलदोडे उपलब्धतेनुसार घालतो. मग साखर घालतो आणि चहापत्ती टाकून तीस सेकंदात बंद करतो.
बाकी ग्रीन टी पण पितो पण टी बॅग कधीच नाही. लूज विकत आणतो. त्याला मग आपल्याला कंट्रोल करता येतो.
कोरड्या कपात चहाची पाने आणि त्यावर गरम पाणी, थोडा वेळ ठेवले की पाने खाली बसतात मग चहा प्यायचा, लहर आली कि पुन्हा त्यातच गरम पाणी टाकतो. तीन वेळा पिता येतो म्हणतात पण मी दोन पेक्षा जास्त वेळा नाही पीत आणि दुसर्यांदा लगेच पिणार असेल तरच अन्यथा एकदाच.
लेमनग्रास वाला लूज ग्रीन टी मिळतो मस्त लागतो.
एकदा ऑरेंज पेको नावाचा चहा आणला होता, ग्रीन टी आणि नेहमीचा चहा याच्या मधला प्रकार आहे. बरा वाटला. जास्त कडक नसल्याने खूप पिता येतो.
फॅन्सी चहा मध्ये म्हणाल तर फॅब इंडियातले मिळणारे सगळे प्रकार पिऊन झालेत. फार आवडलेत असं नाही पण बदल म्हणून ठीक आहे. फ्लोरल नोट्स वाले किंवा अर्दी नोट्स वाले छान असतात. मोरिंगा लीव्हज म्हणजे शेवग्याच्या पानांचे वेगवेगळे फ्लेवर मिळतात पण अजिबात आवडले नाही.
ज्यामध्ये चहापत्ती नाही पण वेगवेगळे फुलाफळांचे अर्क असलेले चहा मिळतात पण त्यात चहा हा प्रमुख घटक नसल्याने त्यांना गरम पेय या वर्गात टाकतो पण चहा चा पर्याय म्हणून स्वीकारत नाही.
चहा वर खूप लिहू शकतो पण आता इतकेच.
कॉफीवर स्वतंत्र प्रतिसाद देतो.
(No subject)
चाहसोबत खायला खारी प्रचंड आवडते. नेहमी खात नसल्याने अजूनच जास्त (माझ्या शहरातल्या विशिष्ट बेकरीचीच खारी आम्ही खातो, इतर ठिकाणच्या खारीने माझा मूड खराब केलाय नेहमीच).
>>>>>>>>>>>>>
+७८६
मलाही दक्षिण मुंबईच्याच खारीत मजा येते.
ईथे नवी मुंबईत मी फार मिस करतो तिथल्या ओर्जिनल बेकर्या.
चहा खारीचा विषय निघालाय तर चहात असे शेव चकली_+ खारीचा चुरा कॉम्बिनेशन टाकून खायला मजा येते.
नुसते चकली तिखट शेव असेल तर त्यातील तिखटाची चव चहात विरघळून चहाची लज्जत वाढते.
पण जर खारी टाकून खायचे असेल तर आधी असा हा रावडाचिवडा फस्त करावा आणि मग पुन्हा अर्धा कप गरमागरम कडक चहा घ्यावा
Pages