शाश्वत विकास म्हणजे काय? -भाग १

Submitted by जिज्ञासा on 26 June, 2020 - 05:27

गेले काही महिने एका गटाबरोबर पर्यावरण विषयाचा अभ्यास करते आहे त्यातून तयार झालेले काही विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यातील काही गोष्टी तुमच्या माहितीच्या असतील आणि काही नवीन असतील पण साकल्याने विचार केला तर आपल्यातल्या प्रत्येकाला यातून एक विचारांची नवीन दिशा सापडेल अशी मला आशा वाटते.

मी तीन छोट्या लेखात किंवा भागात हे विचार मांडणार आहे. काही विधानांसाठी माझ्याकडे लगेच विदा उपलब्ध नाहीये त्यामुळे याकडे लक्ष न देता त्यामागील विचाराकडे संदेशाकडे लक्ष द्यावे असे मी आत्ता पुरते म्हणेन. म्हणजे विदा उपलब्ध नाही असे नाही मात्र माझ्याकडे संदर्भ या क्षणी उपलब्ध नाही हे एवढेच कारण आहे. पुढेमागे मी लेखात त्यांची भर घालीन.

पहिल्या भागात दोन सर्वाधिक परिणाम करणारे प्रश्न आणि त्यांचे थोडक्यात स्वरूप.

दुसऱ्या भागात शाश्वत विकासाचं प्रारूप कसं असावं (आपल्याला काय मुक्काम गाठायचा आहे)?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐकू येणाऱ्या काही चांगल्या बातम्या पाहिल्या तर त्यात पर्यावरणाविषयीच्या बातम्या दिसतात. या जागतिक साथीनंतर भविष्यातले जग बदलेल असे बऱ्याच जणांना वाटते, मात्र पर्यावरणाचा विचार करताना ते बदल कसे असले तर हे आलेले संकट आपल्याला योग्य मार्गावर नेणारे ठरेल याबद्दल मला काही विचार मांडायचे आहेत.

तिसऱ्या भागात आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करावे लागतील जेणेकरून आपण अधिक शाश्वत मार्गाने जीवन जगू शकू. यात मी Do’s and Don’ts ची यादी देण्याच्या ऐवजी काही प्रश्न सांगणार आहे. तुम्ही हे प्रश्न विचारलेत की तुम्हाला सगळ्यात चांगला पर्याय कोणता ते लक्षात येईल. अर्थात आपल्याला हे लक्षात येईलच की सर्वोत्तम पर्याय वापरणे सर्व वेळेस शक्य नसते. अशावेळी कमीत कमी हानी घडवणारा पर्याय वापरता येईल. It will be a trade-off but it will make you aware of the limitations of the option you choose.

भाग १: पृथ्वीची सद्यस्थिती

ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फार भयावह आहे. एका भांड्यातील पाण्याचे तपमान अत्यंत कमी गतीने वाढत असेल तर त्या भांड्यातील पाण्यात बसलेल्या बेडकाला त्याची जाणीव होण्यास खूप वेळ लागतो आणि अशी स्थिती येते की ते पाणी उकळू लागते आणि बेडूक वेळेत बाहेर न पडल्यामुळे मरण पावतो. आपण सध्या हळूहळू तापणाऱ्या भांड्यातल्या पाण्यातला बेडूक आहोत आणि लवकरच हालचाल केली नाही तर आपण बाहेर पडू शकणार नाही.
Frog.png

नक्की प्रॉब्लेम काय आहे? प्रदूषण, तपमानवाढ, अविघटनशील कचरा या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात पण हा प्रश्न हिमनगासारखा आहे. आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी या त्या हिमनगाचे एक टोक! खोलात जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हा प्रश्न दोन पातळ्यांवरचा आहे.
एक म्हणजे उपलब्ध नैसर्गिक स्रोतांची होणारी हानी (crossing of planetary boundaries) आणि दुसरा पैलू म्हणजे ऊर्जेची वाढलेली आवश्यकता (increasing energy needs).

१. पृथ्वीच्या क्षमतांवर येणारा ताण आणि निसर्गाच्या चक्रामध्ये झालेले फेरफार:

पृथ्वीवर बाहेरून फक्त सौरऊर्जा येते. बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या ग्रहावर रिसायकल होत असतात. माणसाने या सर्व चक्रांमध्ये ढवळाढवळ सुरू केली आहे याचा परिणाम जैवविविधता नष्ट होणे, प्रदूषण अशा गोष्टींमधून दिसून येतो.
जसं आपलं घर खर्चाचं एक बजेट असतं की महिन्याला अमुक रुपये खर्चाला आहेत वर्षाला अमुक रुपये आहे आणि याउपर खर्च आला तर मात्र कर्ज काढावे लागेल. त्याचप्रमाणे निसर्गाच्या प्रत्येक स्रोताची झालेली झीज भरून काढण्याची एक क्षमता असते. ती झीज भरून निघायला काही काळ लागतो. निसर्गाची चक्र पूर्ण व्हावी लागतात. त्याचा विचार करून पृथ्वीच्या खर्चाचे बजेट असतं - म्हणजे एका वर्षात आपल्या मानवजातीने किती रिसोर्सेस वापरले पाहिजेत असं. तर मी तुम्हाला पृथ्वीच्या खर्चाचं गणित सांगते. मग तुम्हीच ठरवा आपण किती खर्च करतो आहोत.
आपण आपलं 2019 सालचं बजेट जुलैमध्येच वापरून संपवलं. 29 जुलै 2019 हा हा आपला ओव्हर शूट डे होता आणि त्याच्या पुढचे पाच महिने जगाने जो खर्च केला तो आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी असलेले नैसर्गिक स्रोत वापरून केला. याचा अर्थ असा की ही जी आपली मौजमजा चालली आहे आपल्या नातवंडांच्या पतवंडाच्या तोंडचे अन्न पाणी काढून घेऊन चालली आहे. खऱ्या आयुष्यात कोणतेही सुज्ञ माणूस हे असे बजेट काढून जगणार नाही.

निसर्गचक्र कशी चालतात?

निसर्गा कडे पाहिलं तर लक्षात येईल येईल की सगळ्या गोष्टी चक्राकार पद्धतीने चालतात म्हणजे पाण्याची वाफ होते वाफेचे ढग होतात आणि ढगांमधून पाऊस पडतो आणि पुन्हा पाणी जल स्वरूपातील येतं हे जलचक्र झालं तसंच प्रत्येक नैसर्गिक गोष्टीचा आहे. कार्बन ऑक्सिजन किंवा सल्फर आणि बरीच खनिजं नव्याने तयार होत नाहीत, त्यांचे फक्त स्वरूप बदलते.

सूर्याची ऊर्जा वापरून झाडे कार्बन डाय ऑक्साईडचं रूपांतर साखरेत करतात. ही झाडे प्राणी खातात आणि ऊर्जा वापरताना कर्ब वायू उत्सर्जित करतात. ही साधीसोपी कार्बन सायकल झाली. प्राणी भुकेपेक्षा अधिक खात नाहीत आणि बहुतेक प्राणी अथवा झाडे अनावश्यक साठवणूक देखील करत नाहीत. यामुळे निसर्गाचे चक्र चालू राहते.

कार्बन फार महत्त्वाचा आहे कारण पृथ्वीवरील जीवन हे कार्बन वर आधारित आहे म्हणजे आपले शरीर हे बहुतांश कार्बन ने बनलेले आहे या कार्बनचे चक्र बिघडणे म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका निर्माण होणे. आता हा धोका का निर्माण होतो? जेव्हा आपण खनिज तेलाचा वापर करतो तेव्हा हा कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो. पण हा अतिरिक्त कार्बन डाय-ऑक्साइड कुठेच रिसायकल होऊ शकत नाही. पृथ्वीच्या कार्बन डाय ऑक्साईड रिसायकल करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे आपण कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करतो आहोत. लाखो वर्षापूर्वी जीवाश्म जमिनीच्या आत गाडले गेले ते जाळून आज आपण पण ऊर्जा मिळवतो आहोत पण त्यातून निर्माण झालेला कार्बन हा जमिनीत परत कसा जाईल (carbon sequestration) याविषयी आपल्याकडे कोणतीही योजना नाही. माणसाच्या एकूण हालचालीमुळे इतर जीवसृष्टी देखील धोक्यात आली आहे आणि जीवसृष्टी जगणं हे माणसाच्या जगण्या इतकेच महत्त्वाचे आहे कारण जीवसृष्टी जगली नाही तर माणूस जगणार नाही.

या नैसर्गिक चक्राच्या विरुद्ध आपली सर्व जीवनशैली आहे. आपली अर्थव्यवस्था चक्राकार नाही. आपण सतत अधिकाचा (surplus) विचार करतो. अधिक उत्पादन अधिक विक्री अधिक नफा त्यातून अधिक उत्पादन. यात कोठे चक्राकार गती नाही. परंतु अनिर्बंध आणि सतत वाढ ही निसर्गाच्या विरुद्ध आहे. ही वाढ आपण सध्या नैसर्गिक स्रोत वापरून करतो आहोत पण या स्रोतांना मर्यादा आहेत (planetary boundaries) आणि आता त्या उघड होऊ लागल्या आहेत.

या अमर्यादित वाढीचे अजून एक कारण असे की आपल्याला या गोष्टी हे सर्व संसाधने फुकट वापरायला मिळतात. हवा, पाणी, धातू, जमीन या साऱ्या गोष्टी वापरण्याचे आपण निसर्गाला पैसे देत नाही. आपण पैसे देतो ते फक्त मनुष्यबळाचे, सरकारला कर वगैरे देतो. पण झाडाला, हवेला या कराच्या पैशांचा काय उपयोग? निसर्गाची परतफेड निसर्गाच्या भाषेत आपण करतच नाही आणि ही परतफेड न करणं आता अंगाशी येऊ लागला आहे.

या अर्थव्यवस्थेत भांडवल म्हणून फक्त पैसा किंवा मनुष्यबळ बघितले जाते पण आपण भांडवली खर्चामध्ये निसर्गाचे जे स्रोत वापरतो त्याची कोणतीच पर्यावरणीय किंमत लावत नाही. किंवा एखादी वस्तू वापरताना जर आपण हवा पाणी किंवा जमीन वगैरे वापरत असून तर त्याची वेगळी अशी किंमत आपण मोजत नाही. उदाहरणार्थ गाडी चालवताना जेव्हा पेट्रोल जळतो तेव्हा वापरला जाणारा ऑक्सिजन आपण फुकटच वापरतो. गाडीच्या उत्पादनासाठी जो कार्बन जाळला, जी खनिजं उपसली त्याची पर्यावरणीय किंमत जेव्हा आपण मोजायला लागू तेव्हा आपल्याला आपल्या कृतींची नीट जाणीव होईल.

माणसांची वाढती संख्या, तिला लागणारे अन्न पुरवण्यासाठी आणि त्या लोकसंख्येच्या दैनंदिन प्राथमिक व इतर वाढत्या गरजा पुरवण्यासाठी आपण पृथ्वीवरील बहुतेक भूभाग हडप केला आहे. याला इंग्रजीत human footprint अशी संज्ञा आहे. यात मानवी वस्त्या, माणसाने पाळलेली सर्व जनावरे (मासे, गुरे, डुकरे, कोंबडया, शेळ्या, बकऱ्या, मेंढरे, कुत्रे, मांजरी), या सर्व माणसांसाठी आणि त्यांच्या जनावरांसाठी जंगले तोडून चालवलेली शेती, त्यासाठी लागणारे पाणी, निवाऱ्याची सोय या सर्व गोष्टी माणसाच्या फूटप्रिंट मध्ये येतात. यातील मांसाहारासाठी आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठीची (दही, तूप, लोणी, चीज इत्यादी) पाळीव जनावरे हा प्रदूषणाचा मोठा स्रोत आहे. जगातली ७५% शेती ही माणसासाठी अन्न पिकवण्यासाठी होत नाही. या जनावरांचे अन्न तयार करण्यासाठी केली जाते. गायी म्हशी या मिथेन नावाचा एक वायू हवेत सोडतात. तपमान वाढीसाठी हा वायू कार्बन डाय ऑक्साईड पेक्षा २१ पट अधिक धोकादायक आहे.

Planetary boundaries
Planetary boundaries.png२. ऊर्जेचा प्रश्न

पृथीवरील सर्व ऊर्जेचा स्रोत हा सूर्य आहे. ऊर्जा प्रत्येक कामासाठी ऊर्जा लागते.
फिजिक्समध्ये एंट्रॉपी नावाची संज्ञा आहे. त्याप्रमाणे एखादे काम करताना जी उर्जा लागते त्याच्याच बरोबरीने काही ऊर्जा ही वाया जात असते. तिला एंट्रॉपी असे म्हणतात. या एंट्रॉपीचा विचार केला तर उर्जेच्या स्रोतांचे दोन प्रकार सांगता येतील. एक ज्याच्यात एंट्रॉपी जास्ती आहे आणि दुसरी ज्याच्यात एंट्रॉपी कमी आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सौर ऊर्जा ही अधिक एंट्रॉपी असलेली उर्जा आहे आणि पेट्रोल हे कमी एंट्रॉपी असलेलं इंधन आहे. म्हणजेच जेव्हा आपण सौरउर्जा वापरतो तेव्हा त्यातली बरीचशी उर्जा ही निरुपयोगी असते.

आता याचा पर्यावरणाच्या प्रश्नांची काय संबंध तर आपले हे जे पर्यावरणाचे सध्याचे प्रश्न आहेत ते खरं तर बरेचसे उर्जेचे प्रश्न आहेत. म्हणजे गाडी चालवायला जी उर्जा लागते ती आपण खनिज तेल वापरून मिळवतो आणि त्यातून कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण होतो. वीज निर्मितीसाठी आपण कोळसा जाळतो त्यातूनही कार्बन डाय-ऑक्साइड निर्माण होतो आपल्या प्रत्येक कृतीसाठी आपण या ना त्या प्रकारे कमी एंट्रॉपी असणारे स्रोत वापरतो आहोत. ज्यातील बरेचसे स्रोत हे हवेचे प्रदूषण करतात. जगात clean energy/green energy या शब्दांचा बोलबाला आहे. दुसरा शब्द म्हणजे renewable energy. सौर उर्जा, वायू उर्जा, जलविद्युत उर्जा हे उर्जेचे अपारंपरिक स्रोत आहेत आणि हे वापरले तर निसर्गाची हानी होत नाही. प्रदूषण होत नाही. मात्र यातील बरेचसे खरे नाही. या सर्व ऊर्जेच्या स्रोतांमुळे देखील प्रदूषण होते आणि यातील योग्य प्रकारे आणि प्रमाणात वापरले तर आणि तरच जल विद्युत आणि सौर उर्जा (सोलर panel मधून मिळणारी नाही)हे दोन स्रोत त्यातल्या त्यात बरे आहेत.

माणसाच्या वाढत्या भौतिक हव्यासापायी आपण उर्जेच्या अति वापराकडे झुकतो आहोत. शाश्वत विकासाची पहिली पायरी ही माणसाची संसाधनांची आणि उर्जेची एकूण गरज कमी करणे हीच आहे. पण मग आपण जगायचे तरी कसे? नव्या शाश्वत जगाचे चित्र कसे असले पाहिजे? हे आपण पुढच्या भागात पाहू!

काही पुरक युट्युब व्हिडीओज च्या लिंक्स
१. माणसाचा फूटप्रिंट म्हणजे काय? - https://www.youtube.com/watch?v=g_aguo7V0Q4
२. Earth overshoot day विषयी माहिती - https://www.youtube.com/watch?v=jgbY79Opn34&t=1s
३. Clean energy/green energy या फसव्या दिशाभूल करणाऱ्या ट्रेंड चा फोलपणा दाखवणारी डॉक्युमेंटरी - Planet of the humans - https://www.youtube.com/watch?v=Zk11vI-7czE&t=4201s
४. Electric car मुळे carbon footprint खरोखरच कमी होतो का? - https://www.youtube.com/watch?v=tikyHEvswUI&t=320s
5. उर्जेचा प्रश्न अतिशय सोप्या भाषेत मांडणारे एक उत्तम पुस्तक - The third curve - Mansoor Khan http://mansoorkhan.net/ हे पुस्तक या साईटवर निशुल्क उपलब्ध आहे.
6. मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे होणारे प्रदूषण - https://www.youtube.com/watch?v=hFwx7W-lx5w

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरिष्टनेमी मी अगदी तुमच्या सारखे वागतो. दिवाळीत एक सुध्दा फटाका आणत नाही, नेहमी कापडी पिशवी बरोबर ठेवतो. दिवाळी ला जेव्हा माझे शेजारी पाजारी हजारो रुपयांचे फटाके फोडत असतात तेव्हा ते आमच्या कडे कुत्सितपणे पाहतात, त्यांना वाटते मी कंजूस माणूस आहे. सायकल वापरतो तेव्हा आज कार कुठं गेली हे विचारतात. नदीत निर्माल्य टाकणाराला अडवतो तेव्हा लोक विचित्र कटाक्ष टाकतात. मी येशूच्या धर्तीवर म्हणतो देवा यांना माफ कर. यांना पर्यावरणाचं महत्त्व कळू दे, सद्बुध्दी दे.

मुकुंद, planet of the humans विषयी थोडी चर्चा तिसऱ्या (३.२) भागात झाली आहे. यातील डाटा जरी जुना असला तरी यातला संदेश योग्य आहे. आपली उर्जेची गरज मुळात कमी करण्याची आवश्यकता आहे कारण कोणताही उर्जा स्रोत हा शंभर टक्के चांगला नाही including nuclear power. अल गोर अथवा इतर संघटना यांनी कदाचित स्वार्थ अधिक परमार्थ या हेतूने या ग्रीन एनर्जी चा पुरस्कार केला असेल मात्र हे holistic solution नाही हे आता स्पष्ट झाले आहे. या डॉक्युमेंटरीचा हाच हेतू आहे की जो येनकेनप्रकारेण अधिकाकडून अधिकाकडे जाण्याचा प्रयत्न सुरू आहे तो विघातक आहे. I think the documentary does justice to this.
Bring down the consumption should be the new mantra. But it goes against the conventional model of development. Consumption वाढले नाही तर GDP वाढणार नाही आणि GDP वाढला नाही तर देशाचा "विकास" होणार नाही या कल्पनेत आपण अडकून पडलो आहोत. We need to have a paradigm shift to less is more at each level.

भरल्या पोटीच निसर्ग प्रेम ऑनलाईन बक्कळ मिळेल. >>> आजवर गरीबांसाठी केलेल्या कामांची यादी द्यावी प्लीज. १९९१ च्या आर्तिक सुधारांनंतर गरीबी आणि श्रीमंती यातली दरी वाढत चालली आहे. आपल्याला गरीबांची कणव आली म्हणून आपण या सर्वांना विरोध केला असेलच. त्या प्रयत्नांची माहिती द्या प्लीज. सर्वांनाच ऑनलाईन चर्चा न करता प्रात्यक्षिकं करून भरल्या पोटी निसर्ग प्रेम कसं मिळवणे चुकीचे आहे याचा बोध होईल.

नवीन Submitted by पारंबीचा आत्मा on 26 May, 2021 - 11:19

आपण जीवनशैलीमध्ये बदल करायचा असं नेहमीच नसतं. बरेच वेळा आपल्या नकळत आणि अनेक वेळा मनाविरुद्धही आपल्यात (देहात-मनात ) बदल घडत असतात. आपण निसर्गाचा, सभोवतालचा भाग आहोत. तिथे जे जे घडतं त्यानुसार मेंदूकडून संदेश जातात आणि वर्तन/वृत्ती/भाव/वागणूक यात बदल घडतात. असं सतत होत राहिलं तर तसेच बदल घडवण्याची शिकवण मिळते.
मानवाने मंचावरची भूमिका घेऊ नये. जसा निसर्गनाशाचा मक्ता मानवाकडे नाही तसाच निसर्गसंवर्धनाचाही नाही. निसर्ग अतिविशाल आणि अतिसूक्ष्म आहे. त्याच्यापुढे मानव स्वतः: आणि त्याचे चिंतन अगदी खुजे, थिटे, तोकडे आहे. वरती कोणीतरी मांडले आहे तसे गरजेपुरते घ्यावे निसर्गाकडून. आणि गरजा वाढल्या तर अधिकाधिक घेत राहावे लागणार. कालवे काढावे लागणार, नद्यांचे पाणी वळवावे लागणार, पूल बांधावे लागणार. फॉसिल फ्युएल नाहीतर chemical fuel वापरावे लागणार.
सगळ्याच बाबींचे विकेंद्रीकरण शक्य नाही. उलट समूहासाठी एकत्रितपणे कमी स्रोत संसाधने वापरता येतात. सोयीसुविधा, संरक्षण, दळण वळण इत्यादि पुरवणे सोपे जाते.
म्हणून फार पुढच्या भविष्याचा विचार किंवा प्लॅनिंग करून उपयोग नाही. बदल वेगाने घडतात आणि आपले चिंतन त्या वेगाबरोबर धावू शकत नाही. बदल सूक्ष्मतेने आणि मंदगतीनेसुद्धा घडतात. निसर्गाचा हा अतिखर्जातला आवाज टिपण्यासाठीही मानवी मेंदू सक्षम नाही. जरी तोही निसर्गाचाच भाग असला तरीही. कारण एका मानवी आयुष्यात हे बदल दृष्टोत्पत्तीस येत नाहीत.
.

नवीन Submitted by हीरा on 26 May, 2021 - 11:52

हीरा, तुमचा आत्ताचा प्रतिसाद आणि आधीचा पारंपरिक ज्ञानाविषयीचा प्रतिसाद दोन्ही आवडले.
पारंपरिक ज्ञानाच्या बाबतीत मूळ ज्ञान थोडे आणि फोलपटे जास्त अशी स्थिती असल्याने त्याचा तारतम्याने विचार व्हावा असे वाटते. सध्याच्या काळात तर आमच्या पूर्वजांना सगळंच कसं माहीत होते यानेच सुरूवात होते आणि मग डोळ्यांवर पट्टी बांधून अनुसरण करायची अपेक्षा ठेवली जाते. त्यामुळे मला मग विज्ञानाचा मार्ग कमी धोक्याचा वाटतो.
दुसर्‍या पोस्टमध्ये तुम्ही Ecological time scale बद्दल अगदी अचूक निरीक्षण नोंदवले आहे.

माझ्या मते सगळ्याच्या मुळाशी वाढती लोकसंख्या आहे.

जगातील प्रत्येकजण सुखी व्हावा
प्रत्येकाला भरपूर, आवडीचे खायला प्यायला
हवे तेव्हा हवे ते आणि हवे तेवढे कपडे घालायला
रहायला हवेशीर मोकळे घर
प्रत्येक प्रौढव्यक्तीकडे (किमान एक) कार, एखादी अर्धा लिटर इंजिन असणारी बाईक, त्याला लागणारे इंधन/बॅटरीज,
दोन स्मार्टफोन, दोन स्मार्टवॉच, एक लॅपटॉप, एक टॅब्लेट, एक प्रिंटर, येणारे नवनवीन गॅजेट्स, घरात सर्व सुविधा, त्यांच्या वापरला हवी तेवढी वीज, हवे तेवढे पाणी, डीनर सोबत फोडायला एक वाईन बॉटल
असा विकास होणार असेल तर कोणाला नको आहे?

मानव यांच्या प्रतिसादातील हा भाग खरा ठरायला अडथळा लोकसंख्येचा आहे. जसजशी लोकसंख्या वाढत जाईल तसतसं नैसर्गिक संसाधनांवरचा ताण वाढत जाणार. लोकसंख्या आटोक्यात कशी आणणार?

कार्बन फूट प्रिंट आणि निसर्गसंवर्धन हा जर विषय असेल तर मानवी गरजा माफक असणे हा मुद्दा अनिवार्य आहे. मानवी गरजा माफक असणे याचा अर्थ अ‍ॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीची/ सायन्स संकल्पना नीट समजून घेणे. त्याचा पारंपारीक ज्ञानाशी काही एक संबंध नाही. विज्ञानाचा अचूक आणि माफक वापर म्हणजे पारंपारीक ज्ञानातल्या टाकाऊ गोष्टींचे गौरवीकरण नव्हे.

भूतान हा सुखी माणसांचा देश आहे. तिथे विकास नाही. विकास आला तर माणसे सुखी होतीलच याची खात्री नाही. विकास नसेल तर माणसे दु:खी होतील याचीही नाही. सुखासीन आयुष्य माणसाच्या शरीराची प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची क्षमता कमी करतं. त्यामुळे जीम मधे जाऊन घाम गाळावा लागतो. जीवनशैली मध्ये घाम गाळावा लागला तर जीम मधे जाण्याची गरज राहत नाही.
त्याच बरोबर साथीच्या आजारांना आधुनिक विज्ञानाचा सहारा आहे. याचा साईड इफेक्ट मृत्यूदर ढासळून लोकसंख्येचा अतिताण नैसर्गिक स्त्रोत्रांवर येणे हा आहे. केवळ कार्बन एमिशनच्या नजरेतून या समस्याकडे बघता येत नाही. I rest my case ...

लोकसंख्या हे वर वर दिसणारे कारण. संसाधनाच्या वापरातली
आणि पर्यायाने फूटप्रिंटमधली विषमता लक्षात घेतली तर मोजके समृद्ध लोक प्रचंड लोकसंख्येने असलेल्या गरिबांच्या काहीपट खड्डा खणत असल्याचे दिसेल.

जिज्ञासा, आभार.
आपलेही प्रतिसाद कळकळीने आणि पोटतिडकीने लिहिलेले असतात. माहितीपूर्ण आणि वाचनीय तर असतातच.

निसर्गाची परतफेड निसर्गाच्या भाषेत आपण करतच नाही आणि ही परतफेड न करणं आता अंगाशी येऊ लागला आहे.>>>अगदी पटलं

गेले काही महिने असच काही डोक्यात घोळत होत, तुमचा लेख वाचताना clarity मिळत गेली.
Recycling आणि ev कार्स च ऐकिवात होत, थोडीफार कल्पना होती, पण खोलात जाऊन माहिती काढायला जमलं नव्हतं. पण आता तुम्ही वर दिलेल्या लिंक बघीन. धन्यवाद!

अमेरिकेसारख्या देशाला ह्याची झालं पोहोचणार नाही किंवा तत्सम उल्लेख आलेत. माझा खूप अनुभव नाही आणि अभ्यासही. पण येवढे नक्की की गेल्या काही वर्षात अमेरिकेतही दुष्काळ, वणवे, महापूर ह्यांचे प्रमाण, तीव्रता आणि त्यामुळे होणारी हानी हे सगळेच वाढल्याचे जाणवले.
आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही प्रगत देशात राहतो हा भाव आणि विचार हे दोन्ही फार काळ टिकणारे नाहीत. ही गोष्ट एकदा covid ने दाखवून दिलीये.
Cooling systems also produce green house gases.

निसर्गाची परतफेड निसर्गाच्या भाषेत आपण करतच नाही आणि ही परतफेड न करणं आता अंगाशी येऊ लागला आहे.>>>अगदी पटलं

गेले काही महिने असच काही डोक्यात घोळत होत, तुमचा लेख वाचताना clarity मिळत गेली.
Recycling आणि ev कार्स च ऐकिवात होत, थोडीफार कल्पना होती, पण खोलात जाऊन माहिती काढायला जमलं नव्हतं. पण आता तुम्ही वर दिलेल्या लिंक बघीन. धन्यवाद!

अमेरिकेसारख्या देशाला ह्याची झालं पोहोचणार नाही किंवा तत्सम उल्लेख आलेत. माझा खूप अनुभव नाही आणि अभ्यासही. पण येवढे नक्की की गेल्या काही वर्षात अमेरिकेतही दुष्काळ, वणवे, महापूर ह्यांचे प्रमाण, तीव्रता आणि त्यामुळे होणारी हानी हे सगळेच वाढल्याचे जाणवले.
आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही प्रगत देशात राहतो हा भाव आणि विचार हे दोन्ही फार काळ टिकणारे नाहीत. ही गोष्ट एकदा covid ने दाखवून दिलीये.
Cooling systems also produce green house gases.

निसर्गाची परतफेड निसर्गाच्या भाषेत आपण करतच नाही आणि ही परतफेड न करणं आता अंगाशी येऊ लागला आहे.>>>अगदी पटलं

गेले काही महिने असच काही डोक्यात घोळत होत, तुमचा लेख वाचताना clarity मिळत गेली.
Recycling आणि ev कार्स च ऐकिवात होत, थोडीफार कल्पना होती, पण खोलात जाऊन माहिती काढायला जमलं नव्हतं. पण आता तुम्ही वर दिलेल्या लिंक बघीन. धन्यवाद!

अमेरिकेसारख्या देशाला ह्याची झालं पोहोचणार नाही किंवा तत्सम उल्लेख आलेत. माझा खूप अनुभव नाही आणि अभ्यासही. पण येवढे नक्की की गेल्या काही वर्षात अमेरिकेतही दुष्काळ, वणवे, महापूर ह्यांचे प्रमाण, तीव्रता आणि त्यामुळे होणारी हानी हे सगळेच वाढल्याचे जाणवले.
आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही प्रगत देशात राहतो हा भाव आणि विचार हे दोन्ही फार काळ टिकणारे नाहीत. ही गोष्ट एकदा covid ने दाखवून दिलीये.
Cooling systems also produce green house gases.

Pages