गूज

Submitted by किमयागार on 21 July, 2020 - 00:41

तुला वाटते का मला आठवावे
उराशी जरा भास माझे जपावे

जरी भंगली लाख स्वप्ने तुझी ती
तरी लोचनी स्वप्न माझे उरावे

तुझी याद येता कधी सांजवेळी
तुझे गीत मी सारखे आळवावे

फुलांनी फुलावे ऋतुंनी सजावे
तुझे श्वास हृदयात माझ्या रुजावे

अशी कोणती प्रेरणा ही तुझी की
पुन्हा इंद्रियांना नवे भान यावे

तुझ्या रोमरोमांतुनी सांडणारे
तुझे चांदणे तू मला पांघरावे.

तुला सांगतो गूज 'मयुरेश' त्याचे
तुझे गूज ही तू तया ऐकवावे.

--------©मयुरेश परांजपे----------
         

Group content visibility: 
Use group defaults