न जगलेला मिरूग..

Submitted by अजिंक्यराव पाटील on 13 July, 2020 - 12:27

आई दडा दडा भाकऱ्या थापत होती. मधूनच भाकरीहून फिरवलेल्या पाण्याच्या हाताचा आवाज, आणि शेकायला ठेवलेल्या भाकरीचा पोपडा भाजून सुटलेला खमंग वास. एकावेळी ३ भाकऱ्या बनत होत्या, एक परातीत, दुसरी तव्यावर आणि तिसरी शेकायला चुलीच्या तोंडापाशी- निखाऱ्यावर.
तसा संध्याकाळ व्हायला बराच वेळ होता, पण आभाळ भरून आलं आणि वेळेआधीच दिवा लावावा लागला आईला. वीज गेलेली होती. कंदील काढून त्याची काजळी काढून आईनं वात वर केली. तशी हि आईची सवयच. रोज काच स्वच्छ करणं. गावातल्या इतर बायका काजळीची पुटं चढली कि मग काच पुसत, पण आई मात्र रोज तो काच पुसत असे. खिडकीच्या उलुश्या उजेडात हे सारं काम सुरु असतानाच तिने हलकेच गावाच्या रस्त्याकडे नजर टाकून कानोसा घेतला. नक्कीच आबांचीच वाट बघत असणार ती. दिवडीत ठेवलेल्या काड्यापेटीतुन एक काडी काढून घेत तिनं कंदीलाचा काच दांडी धरून वर केला खरा, आणि काडी घासली. पण ती पेटली नाही. पावसाळी हवेमुळे सादळून गेली असणार. पुन्हा दोन तीन वेळा काडी उगाळल्यावर ती पेटली. तिच्या कपाळावरचं कुंकू तेजाळलं आणि सोबत कुंकवाखालचं गोंदण पण स्पष्ट दिसलं.

आई अश्यावेळी खूप सुंदर दिसते. अंगावर घोंगडी घेऊन बसलेल्या माझ्याकडे ती बघते आणि हसते थोडीशी, गालात. करवादून म्हणते आबाना बघून ये. मी बरं म्हणतो आणि दाराबाहेर पळतो. आमचं हे घर, दगडमातीचं चौसोपी घर आबांनी शेतात बांधलं. आबा म्हणतात माझ्या जन्माआधी त्यांनी आणि आईने स्वतः ह्या भिंती रचल्यात. मागच्या दारी असलेल्या विहिरीतून पाणी शेंदून ते कालवतांना मातीत आई कशी पडली त्याची गम्मत आबा मला सांगतात. मी तोंडभरून हसतो, आणि आई पदर तोंडाला लावून आतल्या घरात निघून जाते. मग आबा अजून काहीबाही सांगत बसतात. जागलीच्या वेळी दिसलेलं अस्वल, हरभऱ्यावर उतरणारी माकडं, आणि शेतातले नागोबादेव. मी डोळे मोठे करून ते ऐकायचो. ते असो..

तर मी बाहेर पडत असतानाच आई माझा दंड धरते. गोणपाटाचं इरलं तिच्या हातात आलेलं असतं, मला ते दिसलेलं नव्हतं खरं तर, पण डोक्यात ते चढवून मी पळत सुटतो. इरलं अंगणात सोडून. आमच्या २० एकराच्या मळ्यात मधोमध असलेलं घर, गावाच्या रस्त्याला तोंड करून. पण मी शेतातूनच पळतो. भुसभुशीत जमिनीत पाय रुततो. आणि दूर गावाकडून ठिपक्याठिपक्याचा काळपट हिरवा पटका येताना दिसतो. आबाच!
धावत जात मी आबाचा हात धरतो. आबा मला उचलून घेतात, अगदी थेट खांद्यावरच.. मी उंच होतो. आता मला घर दिसतंय. खाली चालताना दिसत नाही. आबाच्या खांद्याहुन उंच जागा कोणतीच नसणार जगात. आबा हळूच बंडीच्या खिशात हात घालून मला फुटाणं काढून देतो. मी रमत गमत एक एक फुटाणा चघळून खात असतो. अश्यानं पूडी मग जास्त वेळ पुरते.
वाटेत बाळू धनगराचं खांड लागतं. बाळुमामाचा मोठा मुलगा म्हणजे बाबड्या माझ्याहून पण मोठा होता. पण आज तो माझ्याहून खूप लहान दिसत होता. आबा बाळुमामाशी बोलत होते. बाबड्या माझ्या हातातल्या फुटाण्यांकडं बघत होता. मग मी त्याला पुडीतून ७ फुटाणे दिले. तो माझ्याकडं पाहून हसला, मी पण हसलो. बाळूमामा म्हटला, "आज मिरुग!" आबा पण खुशीने हसत म्हणाला "हो, देव भरून आलाय. यंदाच दान पण चांगलं पडल वाटतंय.. चला मग रामराम."
आबा रस्ता सोडून शेतात उतरला आणि पाण्याचा एक टपूरा थेम्ब माझ्या गालावर, मग हातातल्या फुटाण्यावर पडला... आबानं मला खाली उतरवलं, मी वारं प्यालेल्या वासरासारखा शेतभर पळू लागलो. लिंबाखालच्या मारुतीच्या पाय पडलो, आबा पण मागून आला. त्यानं सोबत आणलेला गुळ आणि फुटाणे देवापुढं ठेवले. आबा फार काही नमस्कार करायचा नाही. गावातल्या लोकांना हात उंचावून रामराम घालायचा तसा हात उंचावून कधी रामराम तर मारुतीराया असं म्हणून पुढं निघायचा.
पावसाची थेंबं जोरात लागायची, पण पहिला पाऊस, त्यातून येणारा तो मऊ मऊ वास.. मी दोन्ही हात पसरून मोठ्ठ्यानं तो वास नाकातून भरून घ्यायचो. अन मग कोसळत्या पावसात नाचत हुंदडत फिरायचो आमच्या शेतातून. नांगरटीचा तास पायाखाली मोडू देत नव्हतो, मागल्या सालच्या पहिल्या पावसात मी तास मोडले तर आबानं मला कुदळ फावडे घेऊन ते पुन्हा सारखे कराय लावले होते. माझे हात दुखून आलेले, तर म्हणाला.. " आता लक्षात ठेव, कितीबी नाच, हुंदाड, पण तास मोडू देऊ नको. आपल्या काबऱ्या आणि पाखऱ्यानं खांद्यावरून नांगर ओढून हे तास पाडलं हाईत, त्यांच्या आणि माझ्या मेहनतीवर पाय नको पडू देऊ." तर ते असो.
हळूहळू आमच्या घरातून भज्या, पापडांचा तळणाचा वास येऊ लागे, अंगभर भिजलेला मी त्या पडत्या पावसात घरी जायचो. आईनं काढून ठेवलेल्या पाण्यानं अंघोळ करून, कापडं बदलून घरात जायचो. आबा कांदा चिरत बसलेला दिसत असे. मग आम्ही तिघे त्या कांद्याची भजी खात असू. नंतर जेवण.. हे असं सगळं. नंतर दुसऱ्या दिवशीसाठी आई डाळ निवडत बसे. पाऊस थांबून आता खरा अंधार पडलेला असे. वाकळीवर आबा कसलंतरी भजन म्हणत बसलेला असे, आणि मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोप जाई.

असा माझा मिरुग. दर सालचा... आजही!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!

मस्त गाव आठवले.
गावी मृग नक्षत्रात तर फार सुंदर वातावरण असते.

छान

अतीशय सुंदर लिहीलयं. खरे तर असे वातावरण एकदाच अनूभवले होते. एकदा मैत्रिणीने तिच्या आत्याच्या शेतावर नेले होते. हलक्याश्या पडणार्‍या पावसात बांधावर चालतांना खूप मजा येत होती. भरुन आलेले काळेभोर आभाळ, दुपारचा १ वाजलेला असला तरी लांब पसरलेल्या पिकांवरचे धुके आणी मैत्रिणीच्या आत्याने केलेली राजगिर्याच्या पाल्याची भाजी, भाकरी ! असा अजून एक दिवस जरी परत मिळाला तरी आयुष्य सार्थकी लागेल.

mast..

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.. हे जे लिहिलंय ते मी अनुभवलेलं नाहीये कधी, पण माझ्या मनाच्या फार जवळच्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी एक! आमच्याच शेतातल्या गड्याचा मुलगा धावतानाचा प्रसंग.. माझ्याकडे फोटो पण होता त्याचा.. आणि बाकीच्या गोष्टी आमच्या आबासाहेबांनी सांगितलेल्या.. धावण्याचा एक प्रसंग सोडला तर ह्यातलं बरंचसं माझ्या वडिलांचंच आहे. छान वाटलं इथले प्रतिसाद वाचून!

खुप छान लिहिलयं

तुमचा वरील प्रतिसाद वाचेपर्यंत शीर्षक कळाल नव्हतं