ब्रम्हगिरीच्या डोंगरावर..!

Submitted by Yo.Rocks on 12 November, 2009 - 12:57

सोमवार, गुरुनानक जयंतीची सुट्टी नि त्रिपुरी पौर्णिमा असा चांगला योग जुळून आला नि नेहमीप्रमाणे आदल्या रात्री अचानक "त्र्यंबकेश्वर - ब्रम्हगिरी- हरिहर ट्रेक" करण्याचे ठरले ! मी नि ऑफिसमधील माझे तीन मित्र असे चार जण तयार झाले नि रविवारी रात्री नाशिक गाठले !
तिथेच जेवण उरकुन त्र्यंबकेश्वरसाठी असणारी शेवटची (रात्री १०.३०) गाडी पकडुन रवाना झालो. सोमवारी सकाळी लवकर उठून देवदर्शन घेउन सुरवात करण्याचा प्लॅन होता.. आणि जर जमलेच तर ब्रम्हागिरी डोंगरावरुन थेट "हरिहर" गाठण्याचा विचार होता... तसा मार्ग असल्याचे नेटवर वाचले होते.. थोडीफार माहितीदेखील जमवली होती.. पण हरिहर किल्ला त्याच दिवशी सर करणे आवाक्याबाहेर वाटत होते ! कारण आमच्यातले दोघे कितपत साथ देतील याबाबत शंका होतीच !
रात्री उशीरा त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यावर लॉजिंगसाठी विचारपुस केली पण सगळे हाउसफुल होते.. ( तिकडे गेल्यास खासकरुन "स्वामी समर्थ पॅलेस", "भक्त निवास" या हॉटेल्सना पसंती द्यावी.. स्वस्त नि मस्त आहेत ) मध्यरात्री इकडे तिकडे फिरल्यानंतर आम्ही "त्र्यंबकविहार" इथे थांबण्याचे ठरवले..
सोमवार म्हणजे गर्दी असणार असा अंदाज करुन आम्ही पहाटेच मंदिर गाठले.. पण नशिबाने तुरळक गर्दी होती.. वाटले होते शिर्डीप्रमाणे इथेही मोबाईल, बॅग यांना मज्जाव असेल.. पण इकडची सेक्युरिटी खुपच ढिसाळ निघाली !

भल्यामोठ्या दिपमाळेचा स्तंभ, मंदिरावरील शिल्पकाम (खासकरुन मुख्य दरवाजा) न्याहाळत पंधरावीस मिनीटातच आम्ही गाभार्‍यात प्रवेश केला.. गाभार्‍याच्या त्या मध्यभागीच अनेक भाविकांचे विविध विधी मोठमोठ्या आवाजात वेगवेगळ्या भटजींकडुन पार पडले जात होते.. आम्ही आपले हे सगळे रांगेतुन बघत बघत मुख्य गाभार्‍यापाशी पोहोचलो नि शिवलिंगाचे दर्शन घेतले.. तेथुनच बाहेर येउन मग पुढे काही अंतरावर असलेले कुशार्वत तलावदेखील बघुन घेतले.. इथे पाप धुण्यासाठी भाविकांची झुंबड उडालेली असते.. इथुनच भाविक स्नान करुन मंदीरात दर्शनासाठी जातात..

दर्शन वगैरे करुन झाल्यानंतर नाश्तापाणी आटपून आम्ही ब्रम्हागिरी डोंगराच्या दिशेने निघालो.. या वाटेला तशी बरीच वर्द्ळ होती.. बराच वेळ चालुन गेल्यानंतर वाटेतच एकमजली धर्मशाळा लागली.. उत्तम बांधकाम असलेली ही धर्मशाळा सध्या मात्र वाईट अवस्थेत आहे.. भिंतीवर लोकांनी काहीना काही लिहुन ठेवले आहे.. एकही जागा सोडलेली नाही त्यासाठी... कसला आनंद मिळतो देव जाणे !
याच धर्मशाळेच्या मागच्या बाजुस अजुन एक जुने बांधकाम आढळते.. नि तिथेच बाजुला जंगलात एक पाण्याचे टाके आहे.. याची बांधणी खुपच सुंदररित्या केली आहे.. इथे कोणी जास्ती फिरकत नसावे म्हणुनच अजुनही ते चांगल्या स्थितीत आहे..

पुन्हा बाहेरच्या बाजुस येउन आम्ही पुढे जाउ लागलो.. बरिचशी वाट ही झाडींच्या सावलीतुन जात असल्याने नि हवेत असणार्‍या गारव्यामुळे थकवा आजिबात जाणवत नव्हता.. जाताना आम्हाला पुर्वेकडील बाजुस असणार्‍या डांग्या सुळक्याचे दर्शन झाले..
IMG_0322.JPG
नि त्याच्या बाजुलाच असणारा नैसर्गिक "U" लक्ष वेधुन घेत होता..
IMG_0333.JPG

काही क्षणातच पुढे चढण्यासाठी बांधून काढलेल्या पायर्‍यांची वाट लागते.. तीच वाट मग पुढे डोंगरात कोरलेल्या पायर्‍यांना जाउन मिळते.. इथे मात्र आल्यावर आमची उत्सुकता वाढली.. या पायर्‍या बाहेरुन जरी कोरल्या असल्या तरी बहुतांशी वाट डोंगरकपारीतुन जात असल्याने खालुन त्या नजरेस पडत नाहीत.. नि जिथे जिथे बाहेरुन वाट आहे तिथे कठडा बांधला आहे.. मोठ्या आकाराच्या या पायर्‍या चढण्यासाठी लोखंडी पाईप बसवले आहेत.. या पायर्‍या चढतानाच मध्येच एक गुहा लागते जिच्या बाहेर दोन शिल्पकाम दिसुन येतात.. आतमध्ये दोन मुर्त्या आहेत (गौतम ऋषी नि अहिल्या )..
काहि मिनीटातच आम्ही ब्रम्हगिरीच्या मुख्य दरवाज्यापाशी पोहोचलो.. हा दरवाजा खरे तर डोंगराच्या कपारीत लपला आहे.. आत प्रवेश करताच दोन्ही बाजुस गुहा नजरेस पडतात.. आम्हि पुढे चालुन गेलो नि पाच मिनीटातच डोंगरावरती आलो.. तिथेच काहिवेळ विश्रांती घेउन आम्ही पुढे गोदावरी उगमस्थानाच्या दिशेने जाउ लागलो.. ही थोडीशी चढणीची वाट आहे.. ती चढुन जाताच दोन टोकाला दोन मंदिरे दिसुन आली.. डावीकडे ब्रम्हगिरी मंदिर ( गोदावरी उगमस्थान) नि उजवीकडे शंकराचे "जटा"मंदिर.. दोन्ही मंदिर अगदी डोंगराच्या कडेला लागुन आहेत.. समोर पाहिले असता सुंदर दृश्य दिसुन आले..
harihar0.JPG
डावीकडे "कापडा" नि उजवीकडे "ब्रम्हा" डोंगर्.. नि मध्ये असणारा "हरिहर"!!

त्या हरिहरपर्यंतचे अंतर बघताच आज काही जमणार नाही लक्षात आले ! तिथे जाईस्तोवर संध्याकाळ झाली असती.. तेव्हा इथे आलो आहोत तर हा ब्रम्हागिरी पर्वत पालथा घालायचे ठरवले ! तसे वरती पठारावर येइस्तोवर दिडदोन तास गेले होते.. आम्ही लगेच गोदावरीउगमस्थानाचे मंदिर गाठले.. खरे तर या डोंगरावरील सर्वात जुने मंदिर एका बाजुला होते पण भाविकांची गर्दी दुसर्‍या बाजुस दिसली.. जिथे एक भटजी अगदी छोट्या चौकोनी विहीरीतुन गोदावरी तिर्थ भाविकांना काढुन देत होता.. आम्ही तिथे जाउन पाहिले तर त्या विहीरीच्या आतल्या एका बाजुस देवीची मुर्ती बसवली आहे..!
godvri.jpg
भटजी मंत्रजप करत भाविकांची दक्षिणा घेउन त्यांना गोदावरी तिर्थ देत होता.. अनेकजण छोटे कॅन, छोट्या बाटल्या भरुन घेत होते.. आमच्यापैकी एक जण तर मोठीच दिडलिटरची बाटली घेउन गेला.. हे पाणी खुपच थंड होते.. आम्ही ते पाणी पिल्यानंतर एका कोपर्‍यात "पाणी पिण्यास मनाई"चा फलक पाहिला.. हे मात्र विसंगत वाटले.. काही कळलेच नाही..
IMG_0506.JPG
(ब्रम्हागिरी मंदीर नि मागे टोकाला दिसणारे "जटा" मंदीर)

तिथुनच मग आम्ही पहाडावरील सर्वात जुन्या असणार्‍या ब्रम्हागिरी मंदिरात प्रवेश केला.. इथे गोमुख आहे नि त्या गोमुखावरतीच देवीची सुंदर मुर्ती आहे..

--------------------------------

अगदी गोमुखाच्या विरुद्ध बाजुस शिवलिंगाचे छोटे मंदिर आहे..

दर्शन घेउन इथुनच मग आम्ही दुसर्‍या टोकाकडे असणार्‍या "जटा"मंदिराकडे वळालो.. इथे शंकराने आपल्या जटांमधील गोदावरीला बाहेर काढण्यासाठी तांडवनृत्य करत जिथे जटा आपटल्या होत्या तिथे वळ उमटलेले दिसतात असे ऐकुन होते.. त्यामुळे उत्सुकता होती.. हे देखील छोटेच मंदिर आहे.. आत प्रवेश करताच एका बाजुस दोन खड्डे दिसतात जिथे म्हणे शंकराने आपले गुडघे टेकवले होते तर एका बाजुस खडकावरती त्या जटांच्या खुणा दिसल्या.. तिथेच गोदावरीचे पाणी झिरपताना दिसते..!!
jataa.jpg
-------------------
knee.jpg

तिथे पुजा करुन आम्ही बाहेर आलो तोच माझी नजर त्या मंदिराच्या मागे जाणार्‍या एका पाउलवाटेकडे गेले.. आमच्यातील एक मित्र एव्हाना दमला होता नि कंटाळुन परतीच्या वाटेला लागला होता.. तर मी इकडे या वाटेने पुढे गेलो.. ह्या वाटेत सुरवातीला दुर्गंधी असल्याने बाकीचे दोघे मंदिरापाशीच थांबले.. ती वाट बरीच पुढे जात असल्याने जरा कुतूहल वाटले म्हणुन दोघांनाही येण्यास सांगितले नि आम्ही तिघेही कडेकडेने जाणार्‍या वाटेने जाऊ लागलो.. आजुबाजुस असणार्‍या गवतामुळे नि थोडीशी चढणीउतरणीची वाट असल्याने नक्की हा मार्ग कुठे जातो ते कळत नव्हते.. पण नक्कीच काहीतरी असावे म्हणुन आम्ही चालत होतो.. दहा मिनिटातच आम्हाला दुरवर एक कातळकड्याचा पॅच दिसला.. थोडे पुढे गेले असता अजुन एक तसाच कातळकडा दिसला नि दोघांना जोडणारा पुलसदृश छोटा कडा दिसला.. ती नैसर्गिक रचना खासच वाटली नि कुतूहल वाटले..
doorse.jpg
(लांबुन घेतलेला फोटो)
---------

(झुम करुन घेतलेला फोटो)

माझ्या मित्राने अंदाज बांधला नक्कीच ही वाट तिथपर्यंत जात असावी.. बघुन तरी मला अशक्य वाटत होते.. मला वाटले जशी "वणी"ला आहे तशीच ही ब्रम्हागिरी डोंगराला प्रदक्षिणा घालणारी वाट असावी.. बरं इथ कुणाला विचारावे तर कुणाचा मागमुसही नव्हता.. त्यात आमचा एक मित्र माघारी फिरला होता.. तेव्हा पुढे जावे की नाही विचार करत होतो.. पण इथवर आलो आहोत तेव्हा बघुनच घेउया नि मित्राला संपर्क करायला तसा मोबाईल होताच.. फक्त नेटवर्क नव्हते हाच मोठा प्रॉब्लेम होता..

आम्ही तसेच झपाझप पुढे जाउ लागलो.. काही अंतरावर पाण्याचे टाके लागले.. तिथुन पुढे गेल्यावर मात्र वाटेला दोन फाटे फुटले.. मी अंदाज घेण्यासाठी उजवीकडे वळालो तर एकजण डावीकडे पुढे गेला.. उजवीकडची वाट डोंगराला वळसा घालणारी दिसल्याने नक्कीच ही प्रदक्षिणेची वाट असल्याचे लक्षात आले नि तिथुनच माघारी फिरलो.. डावीकडे गेलेल्या मित्राने ती वाट अजुन पुढे जात असल्याने तिथे येण्यास सांगितले.. एव्हाना आम्ही दुसर्‍या डोंगरावर आलो होतो नि तो नैसर्गिक पुल जवळ दिसत होता.. ढोपर्‍यापर्यंत वाढलेले सुकलेले गवत तुडवत आम्ही वाटेने जात होतो..
bunty.jpg जोरदार वाहणार्‍या वार्‍याने मात्र थकवा नि उष्मा जाणवत नव्हता ही जमेची बाजु होती.. काही क्षणातच आम्ही जवळपास त्या दोन कातळकड्यापैंकी एका कड्यावर पोहोचलो.. तिथुन एका बाजुस खाली पाहिले तर दुसर्‍या कातळकड्याच्या खांद्यावर विसावलेले गोरखनाथांचे मंदिर नजरेस पडले..
paaaaaaaait.jpeg
(फोटोत वरील वर्तुळात "पायर्‍या" नि खालील वर्तुळात "गोरखनाथ" मंदीर)

तेव्हा आम्ही गाठलेल्या उंचीचा अंदाज आला.. !
आजुबाजुस पाहिले नि आम्हाला एक वाट दिसली.. ती बघुन चकीतच झालो.. ती वाट नसुन चोरवाट निघाली.. त्या कड्याच्या चक्क पोटात खिंडार पाडुन पायर्‍या कोरलेल्या दिसल्या !!!
steps_0.jpg
आता मात्र नक्की झाले की ही वाट नक्कीच समोरच्या कड्यावर जात असावी नि आम्ही लगेच पायर्‍या उतरु लागलो.. अंदाजे वीस्-तीस पायर्‍या उतरत आम्ही त्या कड्याच्या पोटात गेलो.. तशी अरुंदच होती वाट पण प्रकाशाचा झोत खालपर्यंत येत होता..
kasle82.jpg
खाली पोहोचताच त्याच कड्याला खालच्या बाजुने अतिशय छोटे भगदाड पाडलेले दिसले.. ते बघताच आम्ही खुष झालो.. त्या छोटेखानी दरवाज्यातुन जाताना रांगत रांगत जावे लागले !
IMG_0283.jpg
एकेक करुन बॅग पुढे ढकलत आम्ही तिघेही त्या कड्याच्या खालच्या बाजुने बाहेर आलो नि समोरील दृश्य पाहुन "सह्ही" "च्यामारी" उद्गार बाहेर पडले.. कारण आम्ही चक्क त्या पुलावर आलो होतो नि तोच पुल आम्हाला त्या दुसर्‍या कड्यापर्यंत नेणार होता.. आम्हाला वाटलेही नव्हते की इथवर पोहोचु !!

------------------------------------------

आम्ही मोठ्या दिमाखाने मिरवत त्या पुलावरुन चालुन पुढे गेलो नि दुसर्‍या कड्यापाशी पोहोचलो ! नि अपेक्षेप्रमाणे इथेही त्या कड्याला छोटे भगदाड पाडले होते ! वाकुन पाहिले तर पायर्‍या दिसल्या !!!!
म्हणजे आता ह्या कड्यावरती जायला ह्या पायर्‍या ! व्वा काय सहि युक्ती वापरलीय !
लगेच आम्ही एकेक करुन आत शिरलो.. इथे मात्र अक्षरक्षः सरपटत आत घुसावे लागले !

-------------------------------------------
IMG_0296.jpg
या भगदाडावरती मोठा दगड ठेवला तर कोणाला कळणारही नाही इथे अशी वाट असेल.. पुन्हा तशाच रचनेच्या कोरलेल्या पायर्‍या !
IMG_02988.jpg
त्या चढुन आम्ही कड्याच्या पोटातुन चक्क डोक्यावरती आलो ! मागे वळुन पाहिले तर अविश्वसनिय वाटत होते सारे..

खुप आनंद झाला होता आतापर्यंतच्या वाटचालीबाबत !

आता पुन्हा आम्ही वाट शोधु लागलो.. नि पुढे जाउ लागलो ! आता मात्र आम्हालाही दुसर्‍या दिशेने ही वाट खाली नेउन सोडेल अशी आशा वाटु लागली होती.. त्याचवेळी आम्हाला सोडुन परतलेल्या मित्राची आठवण झाली.. नशिबाने फोन लागला तर महाराज पायथ्याशी पोहोचले होते नि आम्ही मात्र वेगळी उंची गाठली होती ! आम्ही अर्ध्यातासांत खाली उतरतो अशी भुलथाप ठोकली नि पुढे वाटचाल केली Proud

पुढे काहि अंतरावरच पुन्हा एक पाण्याचे टाके लागले ! एवढ्या कोपर्‍यात पण पाण्याचे टाके पाहुन आश्चर्य वाटले ! तिथुन पुढे गेले असता काही वेळातच अत्यंत निमुळत्या वाटेचे छोटेसे वळण लागले ! ते पार करताच चक्क छोटेखानी बुरुज लागला नि तिकडेच वाटेचा शेवट झाला ! तसे म्हणायला गेले तर इतर किल्ल्यांप्रमाणे बुरुज नव्हता पण कठडा भक्कम होता !

-----------------------

(आतापर्यंत आम्ही केलेली वाटचाल..)
आम्ही तिथेच फोटोशुट केले नि आजुबाजुचा परिसर न्याहाळत थोडा वेळ विश्रांती घेतली.. इथुनदेखील वाट असावी असे सारखे वाटत होते... एका ठिकाणी खाली वाकुन पाहिले तर खालच्या बाजुस किंचतसी वाट दिसली.. पण तिथे दोरी किंवा शिडीशिवाय जाणे अशक्य होते.. आम्ही इथुनच परतायचे ठरवले ! थोडी निराशा झाली होती खाली जायला वाट न मिळाल्याबद्दल ! पण आतापर्यंत जे अनुभवले ते अविस्मरणीय होते ! आतापर्यंत कलावंती, पेठ इथे अशा पायर्‍या पाहिल्या होत्या.. पण अशी चोरवाट अनुभवली नव्हती ! आमचा खर्‍या अर्थाने ट्रेक झाला होता.. ध्यानीमनी नव्हते असे काही बघायला मिळेल.. Happy

पण एका गोष्टीचे आश्चर्य वाटत होते ते इतिहासाबद्दल ! मी नेटवर माहिती काढली होती पण इथे असणार्‍या मंदिरांव्यतिरीक्त या वाटेचा कुठेच उल्लेख दिसला नव्हता ! ना कुण्या ट्रेकरने लिहिले होते ! (मी घरी गेल्यावर शोधण्याचा प्रयत्न केला.. पण कोणी बांधकाम केले याचा पत्ता लागला नाही.. त्यामुळे इतिहासही समजला नाही.. कुणाला माहित असल्यास जरुर सांगावे )

आम्ही पुन्हा तीच वाट धरली.. मला तर ते "सरपटत भुयारात शिरणे नि पायर्‍या चढुन जाणे" म्हणजे इतिहास अनुभवल्यासारखे वाटले.. Happy लवकरच आम्ही जिथे दोना वाटा फुटत होत्या तिथे पोहोचलो.. आता आम्ही जी वाट सोडली होती त्या वाटेने जाउ लागलो.. इथे माझाही अंदाज बरोबर निघाला.. ती डोंगराला वळसा घालणारी वाट होती.. ही वाट सुद्धा मस्त.. अगदी वणीसारखीच.. खालुन बघता कोणी म्हणणार नाही इकडुनही वाट असेल ! वाट संपता संपता पिवळ्यागुलाबी फुलांनी बहरलेले गवत लागले ! त्यांच्या सहवासात बसणे कोणाला नाही आवडणार ! Happy
fllfg9.jpg

थोड्यावेळेतच आमची प्रदक्षिणा पुर्ण झाली नि दहा मिनीटात सगळ्या पायर्‍या खाली उतरायचे असा ठराव मांडत घोडदौड चालु केली ! काय करणार, खाली असलेल्या मित्राला आता उतरतो म्हणत म्हणत सहज दोन तास घालवले होते ! Proud

ठरल्या वेळेत पायर्‍या संपवल्या नि परतीची वाट धरली.. पण अचानक एका वळणावर पाउलवाट दिसली जिच्याकडे सकाळी दुर्लक्ष झाले होते.. बाजुलाच असणार्‍या छोट्याश्या झोपडीतल्या सरबतवाल्याला विचारले तेव्हा कळले "गंगाद्वार" चे मंदीर जवळ आहे.. 'चढण नाहिये, पाच मिनीटावर आहे' असे त्याने म्हटल्यावर आम्ही पटापट तिकडे जाउ लागलो.. म्हटले आमची वाट बघत असलेल्या मित्राची हालत बेकार झाली असेल.. तसे पण ४ वाजत आले होते.. थोड्याच वेळेत आम्ही त्या पाउलवाटेने गंगाद्वारच्या मुख्य वाटेच्या मध्यावर येऊन पोहोचलो.. ही मुख्य वाट ७५० पायर्‍यांनी बांधुन काढली आहे.. पण आता त्या पायर्‍या चढायला जाम कंटाळा आला होता.. तसे पण वरती जाउन तेच 'गोमुख नि गोदावरीचे पाणी' दिसणार होते म्हणुन परतायचे ठरवले.. पण वरती बघितले असता त्या देवळाच्या समांतर रेषेत दुसरीकडे मंदीर होते.. चौकशी केली असता कळले १०८ शिवलिंगाची गुहा आहे..!! झाले, परतण्याचे कॅन्सल केले.. :)(त्र्यंबकेश्वर मंदीराकडुन येणार्‍या वाटेला दोन फाटे फुटतात.. एक सरळ जाते ती ब्रम्हगिरी पर्वतावर नि दुसरी उजवीकडे लागणारी पायर्‍यांची वाट गंगाद्वारकडे जाते.. तिथुनच मग १०८ शिवलिंगाची गुहा नि पुढे गोरखनाथची गुहा बघता येतात..)
आम्ही त्या मित्राला फोन लावुन वरती येण्यास सांगितले.. 'पाच मिनीटावर आहे' अशी थापही ठोकली.. पण तो हुशार होता म्हणुन पायर्‍या चढण्याआधीच कुणालातरी विचारले.. "दोन तास लागतील" म्हटल्यावर जागीच थांबला Proud

त्याने नकार दिल्याने आम्ही येतोच म्हणत चढायला लागलो.. पण पायर्‍या बाजुला ठेवुन डोंगरातल्या थोड्याश्या चढणीच्या आडवाटेने गेलो.. शॉर्टकटने या गुहेत प्रवेश करताना घोडा बनुनच जावे लागते.. पण आत बर्‍यापैंकी ५ जण बसु शकतील एवढी जागा आहे.. १०८ असणारी शिवलिंग फुलांच्या सजावटीमुळे काही नीटशी दिसु शकली नाहीत.. गौतमी ऋषींनी इथेच तपश्चर्या केली होती !
IMG_0335.jpg

गुहेतुन बाहेर आलो नि मनात आले गोरखनाथची गुहा पण बघुन येउया ! आता मात्र आम्हाला त्या मित्राची दया आली त्यामुळे तिथे जाण्याचे टाळले.. तिथुनच आम्ही पुन्हा पायर्‍यांच्या वाटेवर आलो नि 'नॉनस्टॉप खाली उतरायचे' असे ठरवून पुन्हा घौडदौड सुरु केली.. या घोडदौडीमध्ये एक स्टॉप लागलाच ''रामतीर्थ मंदिराजवळ''..

काहि मिनीटातच आम्ही खाली उभ्या असलेल्या मित्राला भेटलो नि त्याची विचारपुस केली Proud आम्हाला सगळे घाईघाईत आटपावे लागले म्हणुन लाखोली पण वाहिली.. तिथुनच मग आम्ही एका हॉटेलात Tea Time ला Lunch घेतला.. आम्ही त्र्यंबकेश्वर एस टी स्टँडला निघालो तेव्हा सगळ्या गल्लीबोळ्यात रस्ते धुवून रांगोळ्या काढणे चालु होते.. विचारले असता कळले त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त पालखी निघत होती.. नशिबाने आम्हाला निघता निघता पालखीचे देखील दर्शन झाले..

एकंदर आमचा सोमवार 'देवदर्शन नि ट्रेक' मध्ये गेल्याने खुप आनंद झाला होता.. आता इथे पुन्हा यायचे तर "हरिहर"च्या किल्ल्याचे निमित्त आहेच ! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेश शब्द नाहीत रे माझ्याकडे , अप्रतीम .
अरे लहानपणापासुन कितीतरी वेळा ब्रम्हगिरीवर गेलोय पण तु सांगितलेलं गुप्त मार्ग माहीतीचं नव्हते , तुझे आभार मानावे तेवढे कमीचं आहेत . Happy

ती वाट सहीच रे भिडु. Happy
एक बरय असल्या भगदाडातुन तुम्ही लोक आरामात जाउ शकलात.
माझ्यासारखे जातील अस वाटत नाय. Proud

दोन तीन वेळा गेलोय तिथे, पण हे असे काहीतरी तिथे असेल, असे वाटलेच नव्हते. जर नेटवर नसेल तर मायबोलीचा पहिला झेंडा म्हणायचा का ?

जबरदस्त x जबरदस्त!!...
सांभाळून कर रे बाबा!!

कसला रोमांचक अनुभव! नेहेमीप्रमाणेच मस्त लिहिलंय.. जसा ट्रेक एन्जॉय करतोस, तसं ते लिहिणंही एन्जॉय करतोस ना? Happy

काय एक एक अनुभव आहेत तुमच्याकडे. इतक्या वेळी तिथे गेले आहे पण असे काही असेल स्वप्नातही वाटले नाही. पुढल्या वेळी नक्की त्या भगदाडापर्यंत जाणार Happy

धन्यवाद मित्रमंडळी Happy
दिनेशजी.. पाउलवाटेचा माग काढतच तिथवर पोहोचल्याने नक्की सांगता येणार नाही.. Happy
पुनम.. हो, लिहीताना ट्रेकचा "रिकॅप" होतो Happy
नि कोणाला हा ट्रेक कठीण वगैरे वाटत असेल तर तसे काही नाहिये.. "जटा" मंदिराच्या मागून जाणारी पाउलवाट पकडावी, बाकीची माहिती वर दिल्याप्रमाणे.. फक्त अधुनमधून वाट कडेकडेने जाते तेव्हा थोडी काळजी घ्यावी.. तेव्हा कधी ब्रम्हगिरीवर गेलात तर ही चोरवाट चुकवू नका.. Happy

वरील वर्णनात एक फोटो टाकायचा राहुन गेला होता..
धर्मशाळेमागे असणारी पाण्याची टाकी (कुंड) -
drink7.jpg

यो Rocks ! Happy
झकास रे एकदम....ती गुप्तवाट लै भारी !

आणि सेकंड लास्ट फ़ोटोही झ्याक आलाय Proud

Yo Rocks चा Yo Columbus झाला की Proud

मी पण दोन वेळा गेलो आहे ब्रम्हगिरीवर... पण ते पावसाळ्यात त्यामुळे तू शोधलेल्या वाटेचा पत्ता दिसलाच नव्हता... बाकी सगळ्या गुहा आणि मंदिरे बघण्या सारखी आहेत... पुढल्या वेळी गोरखनाथ दर्शन नक्की... Happy

हरिहर फार दूर आहे भ्रम्हगिरीवरून.... बसगड - हरिहर असाही ट्रेक करतात... STने वाड्या मार्गे गेलात तर लवकर पोहचाल...

यो, मस्तच रे.. त्या वाटेच वर्णन वाचताना काही इंग्लीश सिनेमामधले प्रसंग आठवले. Happy सरपटुन जाणं वगैरे.. बरे फिरता कुठे कुठे. छान लिहिलं आहेस अन फोटोहि त्या प्रसंगानुसार खासच! Happy

अ ल टी मे ट........
त्या वाटेवर एकदा जायलाच हवं. मला वाटतं "संभाजी" च्या चरित्रात त्या गोरखनाथांच्या गुहेचा उल्लेख आहे कशातरी संदर्भात... पुन्हा वाचायला हवं.

हे असे पायर्‍या पायर्‍याचे बांधकाम, महाराष्ट्रात दुर्मिळ आहे. गुजराथमधे अश्या बावड्या असतात. शाहरुख राणि मुखर्जी च्या पहेली मधे अशी एक बावडी दाखवलीय.
छे, आजपर्यंत मारलेल्या फेर्‍या वाया गेल्या.

<<आम्ही ते पाणी पिल्यानंतर एका कोपर्‍यात "पाणी पिण्यास मनाई"चा फलक पाहिला.. हे मात्र विसंगत वाटले.. काही कळलेच नाही.>>च च च च. अहो त्या पाण्यात बारीक किडे आहेत. आम्ही पण गोदावरी तीर्थ एका बाटलीत घेतले तेंव्हा समजले.

बाकी तुम्ही पाहीलीत तेव्हडी ठिकाणे काही आम्ही पाहिली नाहित. सुरुवातच गंगाद्वारापासून केली. व तेथिल परिस्थीती पाहून परत आलो मात्र पांडव तिर्थ वगैरे गंगाद्वारादरम्यानची मंदीरे पाहिली.

Pages