बिथोवन(आणि मोझार्ट)-२

Submitted by बिथोवन on 20 June, 2020 - 00:55

बिथोवन(आणि मोझार्ट)-२

"मोझार्टचं घर कुठे आहे?" एका वाटसरूला मी विचारलं. 
" सरळ गेलास की सेंट कॅथेड्रल चर्च लागेल. त्याच्या बाजूला मोझार्टस्  व्हिएन्ना नावाची इमारत आहे, ते त्याचं घर".

"डांके" मी म्हणालो आणि चालू लागलो. सेंट कॅथेड्रलची उंचच उंच इमारत दिसू लागली आणि तीस चाळीस घोड्या गाड्या एका इमारतीसमोर दिसल्या. इथेच असणार तो.

मी बिचकतच आत पाऊल टाकले. प्रचंड मोठा हॉल. दोन तीनशे माणसं असावीत. सगळ्यांचा मोठा आवाज  हॉल मध्ये भरून राहिला होता     आणि त्यांची लगबग चालली होती.

मोझार्टला मी लगेच ओळखले. त्याची मोठी भित्तीचित्रे बॉनच्या चर्च मध्ये लावलेली होती त्यामुळे तो लगेच ओळखू आला. त्याच्याभोवती अमीर उमराव यांचा मोठा घोळका जमला होता. त्याची नजर माझ्याकडे गेली आणि 'हा कोण नवीन माणूस आहे ' असा विचार करत तो हसतच माझ्या जवळ आला. त्याने हात पुढे केला.

"मी बॉनचा लुडविग बिथोवन", मी त्याचा हात  हातात घेऊन माझी ओळख करून दिली.

मोझार्टचे डोळे विस्फारले. " ओह मिं गोट्ट..!" तो उद्गारला, "लुई बिथोवन".. असं अगदी आनंदाने म्हणत त्याने मला मिठी मारली.

"आत चल, माझ्या दिवाणखान्यात बोलू " असं म्हणत त्याने माझे हात धरले आणि जाता जाता एका नोकराला खाण्याचे पदार्थ आणायला सांगितले. आम्ही दिवाण खान्यात प्रवेश केला.

" बस् इथे" असं म्हणत त्याने एका मोठ्या खुरचीकडे बोटं दाखवले आणि तो माझ्यासमोरच्याच खुर्चीवर बसला. " तुझ्या संगीतरचनेच्या बातम्या येत असतात माझ्याकडे" तो म्हणाला, " छान कंपोज केलंय तू, तुझं ते गाणं, 'पोर्ट्रायल ऑफ अ गर्ल'  छानच आहे रे! आणि ते.. 'टू अँन इन्फंट..'  व्वा.... आणि काय काय केलंय सांग जरा.." 

" फार काही नाही पण आता पर्यंत  सी मायनरच्या नऊ वेरीएशन, पियानोच्या तीन सोनाटा, सी मेजर आणि ए मेजर मधली रोंडो,  डी मेजरची फ्युग, इ फ्लॅट ट्रायो आणि त्या मध्येच कन्सर्टो, पियानोच्या तीन क्वारटेट, मिन्यूए इ फ्लॅट मध्ये, आणि तू आता ज्यांचा उल्लेख केलास त्या दोन संगीत रचना" मी सांगितलं.

" बाप रे, एवढं सगळं? आणि ते बाखचं क्लवीकॉर्ड पण तू आत्मसात केलंय म्हणे.. खरंच मोठं काम केलंय तू" तो म्हणाला. तेवढ्यात खानसामा आत मध्ये आला. त्याच्या हातात काहीं खाद्य पदार्थ होते. त्याने ते समोरच्या तिपाई वर ठेवले.

" खायला सुरुवात कर, प्रवासात दमला असशील तू" तो उठत म्हणाला, " मी जरा पाहुण्यांकडे बघतो. तिथे कोपऱ्यात पियानो आहे तुला वाजवायला." असं म्हणत त्याने माझ्या पाठीवर थाप मारली आणि तो बाहेर गेला.

मोझार्ट! तीस एक वर्षाचा असावा आता. माझं काम मोठं म्हणतोय पण ह्याच्या नावावर पाचशेच्यावर रचना आहेत आता पर्यंत! सिंफनी, कोरस, सोनाटा, मार्चेज, ऑपेराज, कंसार्टो, चेंबर, सेरेनेड, ओरेटरीओ, सेक्रेड, कंटाटा, मॅसोनिक, चर्च ऑर्गन या सगळ्यात ह्याचा हातखंडा. आणि " अहा वी दिरेजा मामन, स की कॉज माँन तूर्मे" हे युरोपात गाजलेले गाणे ह्याने बारा प्रकारांनी वाजवलेय.

मोझार्टचे जे  लांबलचक नाव होते त्या नावाने त्याला हाका मारणे म्हणजे जिभेला व्यायाम.  त्या नावातील  योहान्स आणि खरिसोस्टोमस हे तर संत होते. आई आणि वडील त्याला 'वुफी' म्हणतात हे मला ठाऊक होतं. त्याचा जन्म १७५६ सालातल्या २७ जानेवारीचा. मोत्झार्टचे वडील लिओपोल्ड साल्जबर्गच्या दरबारात व्हायोलिन  असिस्टंट कंडक्टर. आई अना मारिया.  मोत्झार्टची मोठी बहीण नॅनल, त्याच्या पेक्षा चारच वर्षांनी मोठी,  पण व्हायोलिन छान वाजवते. ती  सुरेल गाते असं ही ऐकलं आहे. नॅनलचं खरं नाव मॅरीयन. तिचा आवाज गोड आहे हे कळल्यावर तिच्या वडीलांनी तिला संगीताचे धडे द्यायला सुरुवात केली. मोत्झार्टने पण शिकायचा हट्ट धरला. " जरा मोठा झाल्यावर तुला शिकवीन, तू लहान आहेस अजून"  असं वडिलांनी सांगितलं. नॅनलला संगीतात चांगलीच गती होती.एकदा ऐकलं, की ती जसंच्या तसं वाजवायची. नॅनलनं  पियानो वाजवायला सुरुवात केली की  मोत्झार्ट कुठे ही असला तरी धावत येऊन  दाराआड थांबायचा आणि ऐकत उभा राहायचा. दारा आडून लांब असलेल्या पियानोवर नॅनलची बोटं कुठे फिरताहेत हे त्याला दिसत नसूनही केवळ ती जे काही वाजवतेय, त्यातल्या स्वरांमधलं अंतर हा  लक्षात ठेवायचा आणि मग नॅनलचा पियानो सराव संपला, आणि ती उठून घराबाहेर खेळायला गेली की मोत्झार्ट मग पियानो वर  तिनं वाजवलेल्या कॉर्ड्स त्यानं लक्षपूर्वक ऐकलेल्या असल्यामुळे जसंच्या तसं वाजवायचा. तेंव्हा हा केवळ तीन वर्षाचा होता असं कळलं. लिओपोल्डनं शिकवलेलं प्राथमिक संगीत नॅनलनं आत्मसात केलेलं होतंच पण मोत्झार्टनंही ते घरातल्या सगळ्यांच्या नकळत अवगत केले होते, तेंव्हा त्याला अजून नीट काटा चमचा पकडायला येत नव्हता.

एके दिवशी असच मोत्झार्टनं पियानोचा ताबा घेतला आणि बजावण्यात तल्लीन झाला.  लिओपोल्ड आणि अॅना बाहेरून अंगणात आले तेंव्हा नॅनल बाहेर खेळत होती. पायऱ्या चढून ते आत गेले तसं त्यांच्या कानावर पियानोचे सूर पडले.  नॅनल तर बाहेर आहे आणि आत पियानो ' मी दिलेल्या धड्या बर हुकूम कोण वाजवतंय ' असा लिओपोल्डला प्रश्न पडला. जरा वेळ थांबून त्यांनी तो पियानो ऐकला आणि आत जाऊन मोत्झार्टला जेंव्हा त्यांनी वाजवताना पाहिलं तेंव्हा त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. कदाचित नॅनलनी शिकवलं असावं असं वाटून  त्यांनी नॅनलला हाक मारली आणि ती आल्यावर तिला त्याबद्दल  विचारलं. तिनं नाही म्हणून सांगितलं. आता मात्र ते चकितच झाले. आपल्या एवढ्याशा मुलाला जसंच्या तसं वाजवताना  पाहून आई वडील  दोघंही भारावले.

त्यानंतर मात्र लिओपोल्डनं मोझार्टला कधीही 
'तू अजून लहान आहेस, थोड़ा मोठा हो असं काहीही न म्हणता, त्याला नॅनलबरोबरच काही सोप्या आणि काही अवघड असे संगीताचे तुकडे ठरवलेल्या वेळेत पूर्ण करायचे अशा पद्धतीने शिकवायला सुरुवात केली. लिओपोल्डला आश्चर्याचा धक्का तेंव्हा बसला, जेंव्हा संगीताचे तुकडे बिनचूक आणि तेही ठरलेल्या वेळेत पूर्ण करत असताना मोत्झार्टनं छोट्या छोट्या चाली बांधायला सुरुवात केली. त्याचे वडील मग त्या चाली लिहून ठेवू लागले कारण न जाणो त्या चाली विसरल्या तर अमूल्य असा ठेवा हरवायचा. त्यांना नॅनल आणि मोझार्ट अशी दोन अनमोल रत्नं सापडली होती. आपल्या दोन्ही मुलांची संगीतातली प्रगती पाहून ते धन्य झाले होते.

एके दिवशी लिओपोल्ड आपल्या एका सहकाऱ्या समवेत संध्याकाळी घरात शिरला,तर लिओपोल्डच्या लिहिण्याच्या टेबलावर वरती चढून बसलेल्या मोत्झार्टच्या पुढ्यात बरेच कागद पसरलेले असून शाईच्या  दौतीत लेखणी बुडवलेली दिसली आणि मोझार्ट कागदावर काहीतरी लिहीत होता, हे ही दिसलं. लिओपोल्ड त्याच्या जवळ गेला तर त्याने पाहिले की मोझार्ट कागदावर रांगोळ्या सारख्या काहीतरी ठिपक्या काढतो आहे. त्याच क्षणी मोझार्टने तो कागद लिओपोल्डला दिला. ते पाहिल्यावर लिओपोल्डचे डोळे विस्फारले. "माईन गॉट"  तो उद्गारला. त्याचा सहकारी जोहान शॅटनर त्याच्या जवळ गेला आणि  त्यानेही तो कागद पाहिला. त्याचे ही डोळे विस्फारले. त्या कागदावर जी रांगोळी काढली होती ती चार-पाच वर्षांच्या मोत्झार्टनं लिहिलेली सोनाटाची एक धून होती, आणि ती ही अगदी नियमबद्ध रीतीने. लिओपोल्ड आणि जोहान तो कागद वाचत होते तोपर्यंत मोझार्टने पियानो उघडला आणि आताच लिहिलेली सोनाटाची धून वाजवायला सुरुवात केली. सगळं घर एकदम संगीतमय होऊन गेले आणि सर्व जण मंत्रमुग्ध होऊन डोळे मिटून ते संगीत ऐकू लागले. सोनाटा संपला आणि लिओपोल्डने मोझार्टला कडेवर उचलून घेतले. त्याची आई आनंदाने रडायला लागली. " वूफी.. वूफि.." असं म्हणत तिने त्याला हृदयाशी घट्ट कवटाळून धरले.

दुसऱ्या दिवसापासून लिओपोल्ड त्याला व्हायोलिन शिकवू लागला. व्हायोलिन शिकताना मोझार्ट बराच एकाग्र व्हायचा. लिओपोल्ड ने दिलेले धडे तो बारा तासात आत्मसात करायचा आणि पुढच्या धड्याची सुरुवात करायचा. लिओपोल्डकडे व्हायोलिन शिकायला विद्यार्थी येत असत.एकमेकांना पूरक अशा धून वाजवण्याचा व्हायोलिनचा एक प्रकार आहे, ज्यात एक वादक एक प्राथमिक धून वाजवतो आणि त्याला पूरक अशी धून दुसरा वादक वाजवतो. असे दोन विद्यार्थी एके दिवशी सराव करत असताना मोझार्टही तिथे त्याचे व्हायोलिन घेऊन पूरक अशी धून वाजवणाऱ्याच्या बाजूला बसला. वादनाची सुरुवात झाली आणि पूरक धून वाजवणाऱ्याच्या लक्षात आले की मोझार्ट ही जशीच्या तशी पूरक धून वाजवतो आहे. त्याने स्वतःचे वादन थांबवले आणि मोझार्टला त्याचे वादन चालू ठेवण्यास सांगितले. लिओपोल्ड आतल्या खोलीत ऐकत होता पण त्याला माहिती नव्हते की मोझार्ट पूरक धून वाजवतो आहे. लिओपोल्ड सहज बाहेर आला आणि त्याने ते दृष्य पाहिले तेंव्हा तो आश्चर्याने थक्क झाला. लिओपोल्डला बघताच मोझार्टने पूरक धून थांबवली आणि प्राथमिक धून आणि पूरक धून अशा दोनही धून त्याने वाजवून दाखवल्या. लिओपोल्डला आता उमगलं की मोझार्ट हा काहीतरी चमत्कार आहे.

मोझार्टचे वडील आणि माझे वडील यांच्यात समान गोष्ट एकच. दोघेही वादक. पण स्वभावात जमीन अस्मानाचा फरक. माझे वडील व्यसनी तर त्याचे दारूला हातही न लावणारे. मला वडील मारायचे तर त्याचे वडील त्याचे लाड करायचे.

मोझार्ट आता शाळेत जाऊ लागला. माझ्या सारखा तो सामान्य विद्यार्थी नव्हता. गणितात त्याची प्रगती अफाट होती आणि इटालियन भाषेत त्याने मोठा पल्ला गाठला होता. इटालियन तर यायलाच हवे. सगळया ऑपेरा इटालियन भाषेतच बनायच्या. मला तर इटालियन बोलतांना शब्द अडखळायचे आणि लिहिताना स्पेलिंग चुकायचे. मला डीस्लेक्सिया आहे असं ठरवून टाकलं होतं ना सगळ्यांनी...

दोन वर्षे गेली आणि १७६२ साली मोझार्टने एक मोठा जाहीर कार्यक्रम केला. त्यावेळी तो फक्त सहा वर्षाचा मुलगा होता. या कार्यक्रमाची चर्चा सर्व युरोपात झाली आणि मोझार्टला अफाट प्रसिद्धी मिळाली. हाच तो कार्यक्रम ज्या साठी वडिलांनी मला उपाशी ठेवले होते.

(क्रमशः)

Group content visibility: 
Use group defaults

मस्त झालाय हा भाग.
मोझार्ट ही दैवाचीच देणगी होती, आणि त्याला पूरक अशा गोष्टी त्याला कायम मिळत गेल्या, म्हणून तो अजरामर झाला.
बिथोवेन हा सामान्य म्हणून जन्माला आला, मात्र अनेक गोष्टी विरोधात असूनही त्याने जे मिळवलं, त्यामुळे तो अजरामर झाला.

छान भाग हा पण. मोझ्झार्तच्या जीवनावर आधारित अमादीअस चित्रपट बघितला आहे का? नसेल तर नक्कीच बघा, तुम्हाला नक्की आवडेल.

'आह, वू दिरेs ज मामा, स की कॉज मॉं तूरमॉं... ' Happy माझ्याकडे मोझ्झार्तच्या 2-3 सिम्फनी वाल्या कॅसेट आहेत खूप जुन्या. किती पारायण केली होती त्यांची Happy वडिलांचा उल्लेख आलाच आहे तर त्यांची (लिओपोल्ड) टॉय सिम्फनी माझी ऑल टाइम फेवरीट..

पाश्चात्य संगीत या या विषयातले दर्दी फक्त चार पाचच आहेत. संख्या खूप कमी असल्या कारणाने मी ही कथा माला बंद करीत आहे. मराठी लिहिण्यात बराच वेळ जातो आणि त्या मानाने वाचका पर्यंत ती गोष्ट पोहोचत नसल्या कारणाने मी हा निर्णय घेत आहे. पाश्चात्य संगीताच्या सुरुवातीपासूनचा काळ ते अगदी एल्विस प्रिस्ले, मायकल जॅक्सन, बीटल्स पर्यंत लिहिण्याचा मानस होता. असो. ज्या जाणकारांनी प्रतिसाद देऊन ज्ञानात अल्पशी पण मोलाची भर घातली त्यांचा मी ऋणी आहे. आभार आणि धन्यवाद.

बंद नका करू, बरेच वाचक (माझ्यासारखे), नुसतेच वाचनमात्र असतात. प्रतिक्रिया येत नाहीयेत म्हणून लिहिणं थांबवू नका please...

तुम्हाला लिखाणाबद्दल काही मदत हवी असेल तर मी मदत करतो... अगदी अँड्रॉइड मराठी voice typing sakat बाकीची माहिती सांगू शकेन

बिथोवन, तुम्ही चांगलं लिहिताहात. सुखी म्हणतात त्याप्रमाणे, प्रतिक्रिया न देता वाचणारे बरेच वाचक आहेत.

अरे प्रतिसाद येत नाहीत म्हणून लेख थांबवायचा प्रघात पडलाय का मायबोलीवर?
किप ईट इन क्लोज लूप. जे दर्दी असतील ते देतीलच प्रतिसाद!

मस्त विषय.
छान मांडणी आणि माहितीचे संकलन. धन्य तो गुरू आणि त्याचा शिष्य.

पाश्चात्य संगीत या विषयातले दर्दी फक्त चार पाचच आहेत. संख्या खूप कमी असल्या कारणाने मी ही कथा माला बंद करीत आहे. मराठी लिहिण्यात बराच वेळ जातो आणि त्या मानाने वाचका पर्यंत ती गोष्ट पोहोचत नसल्या कारणाने मी हा निर्णय घेत आहे.>>अरेरे.. पण योग्य निर्णय.