मसालेभात

Submitted by सायो on 25 October, 2011 - 13:53
masalebhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त भात तेवढा मोजून घेते. बाकीचे सगळेच पदार्थ अंदाजे.
बासमती तांदुळ- एक वाटी तांदळाला साधारण दोन, सव्वा दोन वाट्या पाणी,
तोंडली- उभी चिरुन, मावेत, कुकरला वाफवून,
काजू- मूठभर तरी हवेतच,
गरम मसाला- २,३ लवंगा, २,४ मिरीचे दाणे, १ दालचिनी, १,२ तमालपत्र,
फोडणीतः जिरं, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्यांना उभी चीर देऊन, कढिपत्ता.
गोडा मसाला- १,२ टीस्पून,
मसालेभाताचा मसाला- साधारण पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, १,२ टे स्पून जिरं, तेवढेच धणे आणि लाल सुक्या मिरच्या- चवीप्रमाणे- हे सगळं खमंग भाजून ह्याची पूड करावी.
वरुन घालायला- भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर, आणि सढळ हाताने साजून तूप.

क्रमवार पाककृती: 

बासमती तांदुळ धुवून निथळत ठेवावेत.
मोठ्या पातेल्यात जरा जास्त तेल घेऊन त्यावर फोडणीचे जिन्नस घालून, काजू, गरम मसालाही परतून घ्यावा. त्यावर वाफवून घेतलेली तोंडली टाकून झाकण घालून वाफ येऊ द्यावी.
त्यावर निथळून घेतलेले तांदुळ परतावेत. मोजून पाणी घालावं. भात शिजत असताना मसालेभाताकरता केलेला मसाला, गोडा मसाला, मीठ घालावं.
वाढताना साजूक तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं घालून वाढावा.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी तांदुळाचा एकाला भरपूर, दोघांना जेमतेम होईल बहुतेक.
अधिक टिपा: 

ज्यांना तोंडली आवडत नसेल त्यांना बटाटे उभे चिरुन घालता येतील. तोंडली नसतील तर मी तसाही करते.
ह्याबरोबर टोमॅटोचं सार मस्त लागतं.

माहितीचा स्रोत: 
मसालेभाताच्या मसाल्याची कृती मुंबईमसाला.डॉट.कॉमवर मिळाली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही रेस्पि लिस्टवर त्यामानाने जास्त वेळ राहिली पण फायनली मागच्या आठवड्यात केली. शिळा मसालेभात आणखी यमी लागतो. मी तोंडली मावेत वाफवायचं एक लॉक न लॉक च्या सेटमधलं भांडं आहे त्यात दोन-तीन मिनिटं वाफवली आणि गोडा मसाला घालायला (की शोधायला) विसरले. बाकी कृती सेम. आता आमच्या घरी ही हिट्ट रेस्पि (आणि अर्थात बच्चेकंपनी फेम मब.)

एंजॉय.
masalebhatsayo.gif

वेका, मस्त दिसतोय म.भा.!
म वरून चालू होणार्‍या पदार्थांवर सायोचा कॉ.रा. लावायला हवा आता - मलई बर्फी, मसालेभात, माखनी!

योकु, आम्रखंड असावं, बाजूला पुरी दिसतेय.

आभार्स लोक.
म वरून सायोच नावं मा. सायो वगैरे घ्यावं का आता Wink
आमरस आहे गावावरून फ्रीज करून आणलेला त्यात थोडं दूध घालून मिक्सीला फिरवलाय. मंजुडी, अगं पापड आहे तो. (या पापड भाजण्याबद्द्ल एकदा युसायुसू वर मी डोकं खाऊन झालंय. नो वाँडर ती पुरी वाटतेय) लोणचं प्रविणचं आहे आणि हिरवी चटणी होती का काय ते आता आठवत नाही. काजू दिसतोय तेवढाच. आमच्याकडे अ‍ॅलर्जी पब्लिक असल्यामुळे काजू हा असा चालणार्^या पब्लिकच्याच ताटात Happy

आज मसालेभात करून पाहिला ह्या रेसिपि ने. फार छान झाला होता. तांदूळ उपसून दही-मसाल्याच्या मिश्रणात ३० मि ठेवले होते, मसालेभात तयार होत आला की साजूक तूप सढळ हाताने सोडले कडेने.
फक्त एक त्रास झाला (नेहमीच होतो) तमालपत्र पॅन मध्ये फोडणीत टाकले होते, नन्तर जेंव्हा तांदूळ टाकले आणि जरा वेळ परतले, तमाल-पत्रांनी त्रास दिला, त्यांनी बरेच तांदूळ बॉल सारखे पॅन बाहेर उडवून लावले, शेवटी मी, तमाल-पत्रानांच आउट केले. तुम्ही ह्या पानांना वेळीच कसा आवर घालता ?

पॅन उथळ आणि/किंवा तमालपत्रं मोठी होती का?
पुढच्या वेळी खोल भांड्यात तमालपत्राचे लहान तुकडे (कात्रीने कापता येतील) घालून जमतंय का बघा.

तमाल-पत्रांनी त्रास दिला, त्यांनी बरेच तांदूळ बॉल सारखे पॅन बाहेर उडवून लावले,>>>>>>> तमालपत्र धुऊन फोडणीत टाकले होते का?

पॅन उथळ आणि/किंवा तमालपत्रं मोठी होती का?
पुढच्या वेळी खोल भांड्यात तमालपत्राचे लहान तुकडे (कात्रीने कापता येतील) घालून जमतंय का बघा. >> हो दोन्ही होतं, पॅन उथळ आहेच आणि पानं ही भली मोठी होती, जवळपास वीतभर लांब. त्यामुळे च बहुधा, देठावर/ टोकावर उलथणं आलं की षटकार ठोकत होते, नेक्स्ट टाईम कातरूनच त्यांना तंबूत पाठवेन. धन्यवाद स्वाती.

तमालपत्र धुऊन फोडणीत टाकले होते का? >> नाही देवकी, ते नुसतेच kitchen paper towel नी पुसून घेतले होते आणि मग टाकले फोडणीत

IMG-20180607-WA0015.jpg

आज केला होता...कसली हिट रेसिपी आहे. एक्सट्रा म्हणजे प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे तयार मसाला ( गोडा+खोबर्‍याचा ) दह्यात मिक्स करून लावला आणि आलं आणि गुळ पण टाकला थोडा.... अगदी लग्नात खातो तशी झाली होती... मिस अळूची भाजी ... आता ती नंतर शिकेन...आताशा कुठे भात करायला जमलं ...

अगदीच बेसिक प्रश्न... १,२ टे स्पून जिरं, तेवढेच धणे.. हे टेबल स्पून का? असेल तर खूप जास्त नाही का होणार? मला दिलेल्या प्रमाणाच्या दुप्पट करायचा आहे.

बर्याच दिवसांपासून अशा मसालेभाताची रेसिपी शोधत होते.. छान रेसिपी.. करून बघेन..

मसालेभाताचा मसाला- साधारण पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, १,२ टे स्पून जिरं, तेवढेच धणे आणि लाल सुक्या मिरच्या- चवीप्रमाणे- हे सगळं खमंग भाजून ह्याची पूड करावी.>>>>>>>>>>~

बनवून ठेवली तर हि पूड किती दिवस टिकते?

आज ह्या रेसिपीने मसालेभात केला. एकदम मस्त झाला होता. तोंडली काजू घातल्यावर लहानपणीचा लग्नातला मसालेभात आठवला. अगदी तस्साच झाला होता.

Pages