मसालेभात

Submitted by सायो on 25 October, 2011 - 13:53
masalebhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त भात तेवढा मोजून घेते. बाकीचे सगळेच पदार्थ अंदाजे.
बासमती तांदुळ- एक वाटी तांदळाला साधारण दोन, सव्वा दोन वाट्या पाणी,
तोंडली- उभी चिरुन, मावेत, कुकरला वाफवून,
काजू- मूठभर तरी हवेतच,
गरम मसाला- २,३ लवंगा, २,४ मिरीचे दाणे, १ दालचिनी, १,२ तमालपत्र,
फोडणीतः जिरं, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्यांना उभी चीर देऊन, कढिपत्ता.
गोडा मसाला- १,२ टीस्पून,
मसालेभाताचा मसाला- साधारण पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, १,२ टे स्पून जिरं, तेवढेच धणे आणि लाल सुक्या मिरच्या- चवीप्रमाणे- हे सगळं खमंग भाजून ह्याची पूड करावी.
वरुन घालायला- भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर, आणि सढळ हाताने साजून तूप.

क्रमवार पाककृती: 

बासमती तांदुळ धुवून निथळत ठेवावेत.
मोठ्या पातेल्यात जरा जास्त तेल घेऊन त्यावर फोडणीचे जिन्नस घालून, काजू, गरम मसालाही परतून घ्यावा. त्यावर वाफवून घेतलेली तोंडली टाकून झाकण घालून वाफ येऊ द्यावी.
त्यावर निथळून घेतलेले तांदुळ परतावेत. मोजून पाणी घालावं. भात शिजत असताना मसालेभाताकरता केलेला मसाला, गोडा मसाला, मीठ घालावं.
वाढताना साजूक तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं घालून वाढावा.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी तांदुळाचा एकाला भरपूर, दोघांना जेमतेम होईल बहुतेक.
अधिक टिपा: 

ज्यांना तोंडली आवडत नसेल त्यांना बटाटे उभे चिरुन घालता येतील. तोंडली नसतील तर मी तसाही करते.
ह्याबरोबर टोमॅटोचं सार मस्त लागतं.

माहितीचा स्रोत: 
मसालेभाताच्या मसाल्याची कृती मुंबईमसाला.डॉट.कॉमवर मिळाली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणली नाही, पहिल्यांदाच लिहिली. तेही रुनीने विचारलं म्हणून.
गटगतला फोटो कुणाकडे असल्यास टाका.

मस्त :). किंचीत गुळ घातला तर मस्त चव येते. भात शिजत आला की मोठा चमचा भरून दही फेटून घालायचं. आणि शिजल्यावर गॅस बंद करताना कडेनी तूप सोडायचं. मसालेदार, अगदी किंचीत आंबट-गोड अशी छान लागते चव.

मस्त हमखास कृती.

(पण बटाटा?! नो नो! वांगी, फ्लॉवर, मटार हे सगळं किंवा यांपैकी काहीही. ज्यात त्यात बटाटे घालणार्‍यांचा निषेध! :P)

भात शिजत आला की मोठा चमचा भरून दही फेटून घालायचं. आणि शिजल्यावर गॅस बंद करताना कडेनी तूप सोडायचं.>> +१

मस्तच पाकृ.

छान आहे रेसिपी, फोटो ?

(पण बटाटा?! नो नो! वांगी, फ्लॉवर, मटार हे सगळं किंवा यांपैकी काहीही. ज्यात त्यात बटाटे घालणार्‍यांचा निषेध!
<<< हो बटाटा शक्यतो पुलाव मटेरिअल :).
तोंडली पण चांगली लागतात मसाले भातात.

स्वाती, टण्या यातले योग्य शब्द जोडून वांगी फ्लॉवर भात करेल अता Proud

तोंडली वाफवून घ्यायचे माझ्या कधी लक्षात नाही आले मी नेहमी तोंडली फोडणीत टाकून शिजवत बसायचे आणि मग मसालेभाताच तंत्र बिघडायचे.

हो बटाटा शक्यतो पुलाव मटेरिअल>>> नाही नाही. बटाटा फक्त खिचडी मटेरीअल आहे. पुलावात चांगला लागत नाही. Happy

मस्त पाककॄती. अंजलीची टिप ही छान. नक्की करुन बघणार Happy

किती ते बटाट्याला घालूनपाडून बोलताय. तळलेला बटाटा पदार्थाला अगदी राजेशाही बनवतो. उभ्या तळलेल्या सळ्या,काचर्‍या,उकडून सात्विक भाजी, वडे, भजी, पराठे, थालिपीठ ते गोड हलवा,वड्यांसारखे पदार्थ. निबंध पाडता येईल बटाट्यावर.
अपवाद फक्त एकच- चिकन, मटणाच्या जागी बटाटा तुपात तळून, मसाल्यात घोळवून कसाही घातला तरी अळणी तो अळणीच Proud

<<< तोंडली वाफवून घ्यायचे माझ्या कधी लक्षात नाही आले मी नेहमी तोंडली फोडणीत टाकून शिजवत बसायचे आणि मग मसालेभाताच तंत्र बिघडायचे.

माझी आजी नेहमी तोंडली घालायची , पण न वाफवताच . मी सुद्धा तसंच करते , खरं म्हणजे आधी शिजवायची गरज नसते ( अगदीच पीठ होईल असं मला वाटतं ) . तोंडली अगदीच जून असतील तर ती उभी चिरताना जरा पातळ चिरायची , भातात सहज शिजतात . पण मसालेभात तयार झाल्यावर तोंडल्याच्या फोडी नीट दिसल्या पाहिजेत . Happy

स्वाती म्हणालीये तसं वांगं , फ्लॉवर , मटार त्याचबरोबर सिमला मिरची सुद्धा मस्त लागते . अर्थात हे सगळंच एकत्र नाही घालायचं Wink .

आणखी एक टीप :- तयार मसाला ( गरम+गोडा+खोबर्‍याचा ) दह्यात मिक्स करून तांदूळाला अर्धा तास तरी लावून ठेवायचा आणि मगच भात करायचा . मसालेभात यम्मी होतो Happy

<<< बटाटा हे फक्त वडा मटेरिअल आहे. बाकी पदार्थ उगाच आपले करायचे म्हणून..

है शाब्बास अन्कॅनी Proud

संपदा, दह्यात मिक्स करून लावून ठेवणे हा प्रकार मसालेभातासाठी नवीन कळला.. करून बघून सांगण्यात येईल (दिवाळी नंतर)

>>> खरं म्हणजे आधी शिजवायची गरज नसते ( अगदीच पीठ होईल असं मला वाटतं )>>> तीन चार शिट्ट्या नव्हेत, एखादीच पुरते. मावेत शिजवली तर एक साताठ मिनिटं.

तुझ्या पद्धतीने पुन्हा कधीतरी करुन पाहीन संपदा.

नानबा , ही ट्रिक माझ्या आजीने बरीच पूर्वी शोधलेली आहे . ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे, नक्की करून बघ Happy .

संपदा, दह्याचं नवीन कळलं पण आमच्याकडेही मसालेभाताचा मसाला निथळत असलेल्या तांदुळात मिसळून मुरवत ठेवतात काही वेळ Happy

अर्थात दही त्या मसाल्याची पेस्ट करण्याइतपतच हं , जास्त नाही .:)

अजून एक आठवलं , आजी साधारण अर्धा ईंच आलं सुद्धा घालायची . ह्या वरच्या मसाल्याच्या पेस्टमध्येच आलं बारीक किसून घालायचं . त्याचबरोबर गुळाचा अगदी बारीकसा खडा सुद्धा घालायची , अगदी नकळतच गोडवा यायला हवा म्हणून . Happy

मस्त!!! टीपा पण छान आहेत. क र णा र!!!! थोडेस्से भुतकाळात डोकावले असता असे आठवले की मी पण फ्रोजन तोंडली आधी न शिजवता मसालेभात केला व ती छान शिजली होती.

बटाटा हे फक्त वडा मटेरिअल आहे. >> हेच हेच्च लिहिणार होते आणि पराठे मटेरीअल पण. Happy ..
आम्ही तर बटाट्याला महागड्या हिर्‍यांचा दर्जा देतो. आणतच नाही. Proud
(अगदीच कासावीस होऊ घातले तर एखादा आणतो व पराठे करतो). Proud

एके ठिकाणी मसालेभातात दह्याऐवजी टोमॅटोच्या फोडी घातल्या होत्या आणि चक्क मस्त लागत होत्या.
मी वर दिलेल्या प्रमाणेच करते. दही आंबट नसतं बरेचदा, मग लिंबू पिळते.

सायो , मस्त रेसीपी.
पण मसाले भातात वांगी मस्ट आहेत. Happy

मी थोडाफार असाच करते मसाला भात. फक्त तु जे मसाला वेगळा करतेस (खोबर+मिरची इत्यादी) तो माझी काकु गोड्या मसाल्याबरोबर मिक्स करुन मला "मसाले भात मसाला" म्हणुन पाठवून देते. फ्रीज मध्ये छान टिकतो तो मसाला.

हा मस्त लागतो. मी तोंडली परतून घालते व कॅप्सिकम पण घालते. टोमॅटो सारा बरोबर अप्रतिम. आज करेंगा जी.

अजून एक टीप : फोडणी करून झाली की त्यातच गूळ घालावा आणि मग दाणे, तोंडली, बटाटा , मटार घालावे. गूळ फोडणीत घातल्यावर वेगळी चव येते.
आणि नैवेद्यासाठी नसेल तर कांदा उभा चिरून इतर भाज्यांबरोबर परतावा भात मस्त लागतो.

मी स्वातीच्या कृतीनुसार करते. तो पण मस्त होतो. अर्थात आमच्याकडे तोंडली "अलाऊड" नाहीत. Happy मटार/वांगी किंवा फ्लॉवर चालतो. बटाटा घालून कधीच केला नाही. मीपण मसालेभात करतात त्यात थोडंसं आलं किसून घालते.

मला शिळा झालेला मसालेभात खायला खूप आवडतो. छान लागतो शिवाय मसाल्याचा स्वाद मस्त येतो.

आज हा भात करून बघितला,
"मसाला दह्यात मिक्स" करून तांदुळाला अर्धा तास लाऊन ठेवला होता. अप्रतिम चव आली होती.

आई करतेच.. पण हा मसालाभात आणि लग्नाची पंगत असेच मनात समीकरण आहे. (मसालेभात, वांगी बटाटा चवळी भाजी, पंचामृत, साधा वरणभात, भजी, पुरी, जिलेबी, मठ्ठा, चटणी, लोणचे, बटाटा सुकी भाजी...... तारांबलं चद्रंबलं )

Pages