मसालेभात

Submitted by सायो on 25 October, 2011 - 13:53
masalebhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

फक्त भात तेवढा मोजून घेते. बाकीचे सगळेच पदार्थ अंदाजे.
बासमती तांदुळ- एक वाटी तांदळाला साधारण दोन, सव्वा दोन वाट्या पाणी,
तोंडली- उभी चिरुन, मावेत, कुकरला वाफवून,
काजू- मूठभर तरी हवेतच,
गरम मसाला- २,३ लवंगा, २,४ मिरीचे दाणे, १ दालचिनी, १,२ तमालपत्र,
फोडणीतः जिरं, मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्यांना उभी चीर देऊन, कढिपत्ता.
गोडा मसाला- १,२ टीस्पून,
मसालेभाताचा मसाला- साधारण पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, १,२ टे स्पून जिरं, तेवढेच धणे आणि लाल सुक्या मिरच्या- चवीप्रमाणे- हे सगळं खमंग भाजून ह्याची पूड करावी.
वरुन घालायला- भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर, आणि सढळ हाताने साजून तूप.

क्रमवार पाककृती: 

बासमती तांदुळ धुवून निथळत ठेवावेत.
मोठ्या पातेल्यात जरा जास्त तेल घेऊन त्यावर फोडणीचे जिन्नस घालून, काजू, गरम मसालाही परतून घ्यावा. त्यावर वाफवून घेतलेली तोंडली टाकून झाकण घालून वाफ येऊ द्यावी.
त्यावर निथळून घेतलेले तांदुळ परतावेत. मोजून पाणी घालावं. भात शिजत असताना मसालेभाताकरता केलेला मसाला, गोडा मसाला, मीठ घालावं.
वाढताना साजूक तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं घालून वाढावा.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी तांदुळाचा एकाला भरपूर, दोघांना जेमतेम होईल बहुतेक.
अधिक टिपा: 

ज्यांना तोंडली आवडत नसेल त्यांना बटाटे उभे चिरुन घालता येतील. तोंडली नसतील तर मी तसाही करते.
ह्याबरोबर टोमॅटोचं सार मस्त लागतं.

माहितीचा स्रोत: 
मसालेभाताच्या मसाल्याची कृती मुंबईमसाला.डॉट.कॉमवर मिळाली.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म. भा.छान झाला होता.२ वाट्यांचा केला म्हणून अर्धी वाटी सुके खोबरे घातले,ते जरा जास्त झाले.

मसालेभातात चवीसाठी थोडा गूळ मात्र हवाच.
लग्नात करतात त्यात आचारी म्हणे जिलबीचा पाक टाकतात, ज्यामुळे चव आणि चमक येते.

अंजली अगदी बरोब्बर....फेटलेले दही घातले की मस्त चव येते.... माझीही हीच कृती आहे. पुण्यात घरी एक आचारी बाई मसालेभात करत होत्या तेव्हा पाहिले....त्यांनी कोरड्या खोबर्याचा एक छोटा तुकडा ( साधारण १.५इंच बाय १.५इंच, १०-१२ माणसांसाठी) गॅस वर धरून जाळला, कुटला आणि ती पूड भाताचे पाणी उकळताना त्यात घातली. मस्त स्मोक्ड फ्लेवर आला.

मी असा खोबर्‍याचा तुकडा जाळून मिरची, जिर्‍याबरोबर वाटून डाळिंब्यांच्या उसळीकरता लावते.
सशलचा फोटो पाहून मलाही करावा लागला दोन दिवसांपूर्वी.

सायो, खूप्पच टेस्टी रेसिपी दिलीस.. आई अश्शीच करायची पण मला अगदी आठवत नव्हती. धन्स!!

सर्वांचे म भा जोरदार दिस्ताहेत... स्लर्र्प!!

ह्या वीकेण्डला परत केला होता ह्याच रेसिपीने आणि संपदा च्या टिप्स् वापरून .. Happy

ह्यावेळी ज्ञाती ने दिलेलं प्रमाण वापरायचं डोक्यात आलं ..

>> २ वाट्या तांदूळ असेल तर १ वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी जिरे आणि पाव वाटी धणे चमचाभर तेलावर परतून मिक्सरमध्ये बारीक करुन घेणे तो मसाला वापरते.

तर ज्ञाती (आणि तिची मैत्रीण) हे प्रमाण माझ्या दृष्टीने फार जास्त आहे .. मी ह्या प्रमाणात केला पण ह्यातला १५-२०% टक्के तरी वगळला .. तसंच जीर्‍याचं प्रमाण ही फार जास्त आहे ..

हो सायो .. खूपच जास्त ..

आता त्या वगळलेल्या मसाल्याचं काय करावं कळत नाही ..

कालच वांग्याच्या भाजीला थोडा वापरला पण आता परत परत त्याच चवीचं किती काय काय खाणार?

सो ओव्हरऑल भातात हे मसाल्याचं प्रमाण जास्त आहे खूप आणि खुद्द मसाल्यात धणे जीरे ह्यांचही प्रमाण फार आहे ..

मी तरी हा मसाला करताना खोबर्‍याचं प्रमाण जास्त घेते जीरं, धण्यापेक्षा. मोजून असं नाही. अंदाजेच. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं तर मे बी १/३ वाटी धणे आणि जीरं प्रत्येकी. लाल मिरच्याही अंदाजेच.

आता त्या वगळलेल्या मसाल्याचं काय करावं कळत नाही ..>>> अगं टिकेल तो.. सुकं खोबरं, धने, जीरं भाजून पूड केलेली असेल तर अगदी व्यवस्थित दोन महिने तरी नक्कीच टिकेल. लगेच वापरून संपवायला हवा असं नाही.

विदर्भात जो मसाले भात करतात तो खूपच वेगळा करतात. आम्ही तोंडली नाही घालत. गोबी आणि हिरवे ओले वाटाणे घालतो. ही कृती पण छान आहे. खास करुन सशलने केलेला भात एकदम खावेश वाटतो आहे.

आलं किसून टाकायच्या ऐवजी आम्ही आले, कढीपत्ता, एखादी कमी ति़ख्ट हि. मि. आणि कोथिंबीर असे छोटेस्से वाटण पण घालतो दह्यात बाकी मसाल्याबरोबर. आल्याचा अन कढिपत्त्याचा वास मस्त येतो.

आज या रेसेपीने केला मसालेभात आमच्या गटगसाठी. थोडा मसाला आधीच तांदळाला लावून ठेवला होता. मस्त झाला भात.
परफेक्ट रेसेपी.

मी पण २ दिवसांपुर्वी केला होता. एकदम परफेक्ट रेसेपी.

आजपर्यंत जेंव्हा जेंव्हा केला तेंव्हा तेंव्हा सायोला दुवा देउन मनसोक्त खाल्ला आहे Happy

थॅन्क्स अल्पना, प्राची, आरती.
एक आमच्याकडेच काय तो विशेष आवडत नाही आणि मनापासून खाल्लाही जात नाही.

गोडा मसाला नाहीये माझ्याकडे. गेल्यावेळी करताना मी गोड्या मसाल्याऐवजी थोडासा काळा मसाला घातला होता. सध्या तो पण संपलाय. काय करता येईल?

मी पण केला होता याच रेसिपीने. मस्तचं झाला होता. घरात गोडा मसाला होता तरी घालायला विसरले होते पण वास आणि चव एकदम परफेक्ट. पण माझा मसालेभाताचा मसाला जास्त झाला होता. म्हणुन कदाचित तशीच चव आली.थोडा गूळ पण घातला होता. आता पुन्हा रविवारी करणारे तेव्हा फोटो टाकते.

सायो, धन्स. मस्त होतो. माझ्याकडे गोडा / काळा मसाला दोन्ही नाही आहे.
जे वर मसाले भाताचा मसाला आणि गरम मसाला दिला आहे तो दोन्ही एकत्र करून बारीक पावडर करते. गो. म. नाही आहे त्यामूळे नाही घालत. तरी टेस्टी होतो. Happy

masale bhat.jpg

आरती मस्तचं दिसतोय मसालेभात. ते लोणचं कसल आहे?
खरचं धन्यवाद सायो. माझी खुप आवडती डिश, पण मनासारखी चव काही जमायची नाही आता या रेसिपीने खुप छानचं जमतो मसालेभात.

Pages