रानाईची गढी !!.. (पुढे चालु .. )
https://www.maayboli.com/node/75204
पूर्वभागाची लिंक वर दिली आहे , कोणाला वाचायची असल्यास ,
...कलात्मक रित्या सजवलेल्या असंख्य चांदिच्या वस्तू बघता बघता ती सुहृदच्या मागे अक्षरश: पळत होती , कारण त्याचं चालणं खूप झपाट्याचं होतं , खरं तर तिला प्रत्येक गोष्ट जवळून पाहायची होती पण सुहृद चं म्हणणं पडलं उद्यापासून निवांत बघ ,त्याच मोहिमेवर आलो आहोत आपण . नुसता आतला वाडा बघायला चार दिवस जातील , ते हि खरंच आहे म्हणा , पण उत्सुकता तिला स्वस्थ बसून देत नव्हती , पण अति उत्सहाच्या भरात चुकून आपण कुठे रेंगाळलो तर या प्रचंड वास्तूत हरवून जाऊ ,म्हणून शक्यतो ती त्याच्या मागे मागे रहात होती , अनेक दालनं पार करून ती दोघे एका प्रशस्त महालवजा खोलीत आली .
“या SSSSS “ समोर सुहृदच्या मातोश्री उभ्या होत्या .
सरदारांच्या रूबाबाबाला साजेसा साजशृंगार केलेल्या सुहृदच्या मातोश्री अत्यंत तरुण आणि देखण्या होत्या जेमतेम तिशीच्या वाटतील अशा . देवयानी विचारात पडली , तेवढ्या सेकंदात तिच्या मनात अनेक प्रश्न येऊन गेले ‘ एवढ्या लहान कशा दिसतात या ? हि सुहृदची खरी आई असेल ना ? की सावत्र ?, की संतूर मम्मी ?सुहृदमध्ये आणि हिच्यात काहीच कसं साम्य नाही ? मग सुहृद त्याच्या बाबांसारखा दिसत असेल का ?हिला कुठेतरी पाहिल्यासारखं का वाटतंय ? ’
सुहृदने ओळख करून दिली तशा त्या किंचित हसल्या , मनात आलेले असंख्य प्रश्न झटकून तीही मग आदब दाखवूनच हसली , “ अरे तुम्ही सहा -सात जण येणार होतात ना ? “.. बाईंच्या आवाजात खानदानी जरब आणि आदब होती .
“ हो माँ , आमचा अख्खा ग्रुप येणार होता पण बाकीच्यांचं ऐनवेळेस पोस्टपोन झालं , अजून दोन -तीन दिवस लागतील त्यांना यायला, फक्त ही आधी आली , कारण ही होस्टेल वर राहते ना , इथून तशीच तिच्या घरी पुण्याला जाणार होती म्हणून होस्टेल सोडून आली होती . म्हणून मग मीच तिला म्हणालो कि तू माझ्याबरोबर चल … “
““बरं कंठाजीराव आता फ्रेश व्हा , आणि लगोलग जेवणघरात या , आणि हो या सगळ्यांसाठी वाड्याच्या मागच्या बाजूच्या खोल्या आहेत ना, त्या आवरून ठेवायला सांगितल्या होत्या मी बाबू ला आणि शिवराम ला , यांना त्यातलीच एक खोली द्यायला सांगतो आम्ही हौसक्काना .”
“जी माँ “ सुहृद अगदी अदबीने खाली वाकत म्हणाला ,
ते दोघे खोलीच्या बाहेर पडले , “काय म्हणाल्या त्या तुला ? कंठाजीराव? “ खळखळून हसत देवयानी
विचारत होती , तोच समोर हौसाक्का उभ्या राहिलेल्या दिसल्या , देवयानीकडे बघत म्हणाल्या “चला ताई खोली दाखवते तुम्हास्नी , “ त्यांच्या आवाजात एकप्रकारची हुकूमत होती . तिला तो स्वर मुळीच आवडला नाही . तिच्या मनात येऊन गेलं .. लगेच काय खोलीत जायचं ? अजून काही पाहिलंच नाहीये ,तेवढ्यात सुहृदही झपाझप चालत लगेच पलीकडच्या बाजूने निघून गेला , तिला आश्चर्य वाटलं , ‘जाताना सांगायचं तरी याने निदान ‘
“बाकीची समदी मंडळी कवा येणार हायती ? “ जोडवे वाजवत चालताना हौसक्कानी तिला विचारलं
“येतील चार -पाच दिवसात “ खरं तर तिला खूप प्रश्न पडले होते , पण हौसक्काविषयी तिचे प्रथमदर्शनी मत काही चांगलं झालं नव्हतं , त्यामुळे लगेच काही अघळपघळ बोलायला नको त्यांच्याशी असा विचार करून ती त्यांच्या मागे गप्प चालत निघाली , थोड्याच वेळात त्या दोघी वाडयाच्या पाठीमागच्या बाजूला पोहोचल्या , तिथून जेवढी लांबवर नजर जाईल तिथपर्यँत फक्त हिरवंगार मैदान दिसत होतं , तिने आत येताना पाहिलेले बुरूजही दिसत नव्हते , खूप लांबवर असतील कदाचित , वरून दिसतील तिला वाटलं , गोल गोल लांबलचक दगडी जिना चढून दोघी वरच्या मजल्यावर आल्या , वरती प्रशस्त सज्जा होता , त्याच्या आवारात भला मोठ्ठा झोपाळा , त्यावर पांढरीशुभ्र बैठक , त्यावर त्याच रंगाचे दोन लोड , त्याच्यासमोर शोभिवंत ,पितळी पानाच्या डब्याचा साज लेऊन बसलेला एक शिसवीच्या लाकडाचा टेबल ,आणि एकमेकांना लागून असंख्य मोठं मोठ्या खोल्या , त्यातली कडेची खोली उघडत हौसाक्का तिला म्हणाल्या ,’”ताई सगळी आपलीच प्रॉपर्टी हाय , समदीकडं आपले पहारेकरी हैत , भ्यायचं कायबी कारन नाय , कोनीबी कायबी करनार न्हाय तुम्हास्नी, बिनघोर ऱ्हावा “
“मी कधी म्हटलं मी घाबरले ? “ तिने हौसाक्का ला प्रतिप्रश्न केला .
“ तसं न्हाई ,मघाशी कंठाजी सरदार पलीकड एकलंच निघून गेले तवा म्या बघितलं, तुम्हाला एकदम भ्या वाटलं , म्हनून सांगिटल ."
“ हिचं बरं लक्ष माझ्याकडे , “ देवयानी मनात म्हणाली. आणि काहीच न बोलता खोलीचं निरीक्षण करण्यात गुंतली . खोली स्वच्छ आणि नीटनेटकी लावून ठेवली होती , तिचा पुण्यातला ३ बेडरूमचा प्रशस्त फ्लॅट अख्खा बाल्कनीसकट मावला असता त्यात ,एवढी मोठी . त्याला साजेल असा वॉर्डरोब , आणि, सुंदर नक्षीचा आरसा असलेला पुरातन शिसवीच्या लाकडाचा ड्रेसिंग टेबल . तसाच अगदी त्याला मॅचिंग उंच आणि अतिभव्य बेड , शिवाय आता हे हौसक्काचं डोकं होतं कि आणखी कुणाचं माहिती नाही पण वर चढायला म्हणून बेडच्या खालीच एक छोटासा बसका स्टूलही होता .
“ताई आवरून खाली जेवणघरात या , तुम्हाला घ्यायला मी ‘मुकीला ‘ पाठवते धा मिनिटांत ,मुकी म्हणजे माझी धाकली लेक , तिला बोलता येत न्हाई , म्हून मुकीच नाव पडलं बघा तिचं “
“आई गं !..बिचारी … देवयानीच्या तोंडातून नकळत सहानुभूतीचे स्वर निघाले .
“या आवरून !.. “ हौसाक्का गेल्या , जाताना दार लावून गेल्या , ती हि मग उठली , तिचं सामान आधीच आणून नीट नेटकं लावून ठेवलेलं होतं , बॅग उघडून तिने वरच्यावर असलेला टॉवेल , साबण वैगेरे साहित्य काढलं आणि ती बाथरूम मध्ये जायला आत वळली , तोच एका स्त्रीची एकदम एक जीवघेणी किंकाळी तिला ऐकू आली, आणि तिचे पाय जागच्या जागीच थबकले !!!...
क्रमश :
छानच झाला हा ही भाग..
छानच झाला हा ही भाग..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडला.. उत्सुकता वाढलीये शेवट वाचुन! पुभाप्र!
छान. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
छान. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
उत्कंठावर्धक झालायं भाग...
उत्कंठावर्धक झालायं भाग...
हौसाक्का चा मोठा रोल असणार
हौसाक्का चा मोठा रोल असणार आहे असं वाटतंय. थोडीशी 'रिबेका'ची आठवण आली. बाकी छानच.
छान झालाय भाग.... पुढील भाग
छान झालाय भाग.... पुढील भाग लवकर येऊ द्या
भारी ,,, !!!
भारी ,,, !!!
मस्त ....
मस्त ....
मस्त. उत्कंठा खूप वाढली आहे
मस्त. उत्कंठा खूप वाढली आहे
छान आहे. पण नंबर द्या ना
छान आहे. पण नंबर द्या ना प्रत्येक भागाला. १,२,३...
वाह्! मस्तच.
वाह्! मस्तच.
छानच लिहिलं आहे....उत्सुकता
छानच लिहिलं आहे....उत्सुकता वाढली.
मला पण एकदम रिबेका ची आठवण आली.
छान झालाय हाही भाग
छान झालाय हाही भाग
बायदवे रिबेका काय प्रकरण आहे ?
वा, खुपच उत्कंठावर्धक वळणावर
वा, खुपच उत्कंठावर्धक वळणावर आणून दुसरा भाग संपवला. आता वाट बघण्या शिवाय दुसरे काय करणार.
खुपच छान
खूप छान, उत्कंठावर्धक.
खूप छान, उत्कंठावर्धक.
गढीचे वर्णन आवडले.
उगा कशाला घाबरविता लोकास्नी
उगा कशाला घाबरविता लोकास्नी
पु भा प्र
दोन्ही भाग मस्त!
दोन्ही भाग मस्त!
भारी
भारी
विसाव्या शतकातील एक लोकप्रिय
विसाव्या शतकातील एक लोकप्रिय लेखिका Daphne du Morrier हिची Rebecca या नावाची भयसंदेह कथा खूप वाचकप्रिय ठरली होती. त्यावर एक चित्रपटही निघाला होता.
Rebecca चा त्याच नावाने
Rebecca चा त्याच नावाने मराठी अनुवाद पण आहे... पण लेखक कोण ते जाम आठवत नाहीये...खूप पूर्वी वाचला होता.
खरंच.. रिबेका all time
खरंच.. रिबेका all time favoriteआहे...
अनुवाद - मंदाकिनी भारद्वाज
मूळ लेखक - Dafne du Morrier
धन्यवाद तिघांना
धन्यवाद तिघांना
वाचनाच्या बकेट लिस्ट मध्ये ही कादंबरी टॉपला ठेवतो आता.
धन्यवाद मंडळी !..शक्यतो लवकर
धन्यवाद मंडळी !..शक्यतो लवकर पुढचे भाग टाकण्याचा प्रयत्न करीन