खेळ: भाग १

Submitted by अजिंक्यराव पाटील on 18 June, 2020 - 21:16

"३५०० फक्त?"
"हो, आणि हि अफरातफर अगदीच बेमालूम ठरली."
"ठीक आहे.. एक काम करा, जॉनीला याच्या मागावर पाठवा, एकूण एक रुपया कुठे खर्च होतोय ते बघा. जर सगळे पैसे चांगल्या कामासाठी वापरण्यात आले असतील तर बेलेकरला ३५०० ची पगार वाढ द्या.. आणि एकही रुपया चुकीच्या कामात आला तर मला कळवा." असे म्हणून दादाराव पाटील पुन्हा आपल्या आरामखुर्चीत स्वस्थ डोळे मिटून बसले. ३५०० खरे तर फार मामुली रक्कम होती, पण दादाराव पाटलांच्या लेखी एक एक रुपया फार महत्वाचा होता. असे असले तरी दादाराव कंजूस होते असे नाही. ह्याउलट त्यांच्यासारखा मालक लाभणे हे त्यांचे कामगार आपले भाग्य समजत असत. दादाराव पाटील मूळचे शेतकरी आणि त्यांचा सध्याचा मुख्य व्यवसाय देखील शेती हाच होता. शेतीच्या सोबतीने असणारे अनेक पूरक व्यवसाय त्यांनी उभे केले होते. त्यापैकीच एक म्हणजे मत्स्यपालन आणि त्याच व्यवसायात दिवाणजी असणाऱ्या बेलेकरने ३५०० रुपयांची अफरातफर केली होती. अफरातफर म्हणजे तरी कशी तर बेलेकरने कायम आपल्याकडूनच मत्स्यखाद्य घ्यावे अशी गळ घालून एका विक्रेत्याने ते ३५०० रुपये बेलेकरच्या हातात कोंबले होते, आणि बेलेकरने तेच पैसे जमा न करता आपल्या खिशात कोंबले होते. दादाराव पाटलांचा सेक्रेटरी कम मित्र असणाऱ्या सूर्यवंशीने हि बातमी त्यांना दिली होती. अर्थात जॉनीचे नाव ऐकून सूर्यवंशी हादरला होता कारण दादाराव जॉनीला आपल्या इतर सर्व धंद्यातून वेगळा ठेवत असत. तो खास माणूस होता. टार्गेट आयडेंटिफाय करणे, त्याचा दिनक्रम काढणे आणि दादारावांनी उडवलेल्या सुपारीची विल्हेवाट लावणे, हे त्याचे मुख्य काम होते... कारण दादाराव एक मोठे शार्प शूटर होते.

कर्जात जमीन गेल्यावर दादाचा बाप मुंबईला काम शोधायला आला तेव्हा दादु फक्त १६ वर्षांचा होता. तल्लख, चपळ आणि स्वाभिमानी दादूचा कुणाशीतरी खटका उडाला, दादुने आपल्या गलोलीने समोरच्याचे डोके फोडले आणि दादू पोचला पोलीसात. नेमके तेव्हाच इन्स्पेक्टर लाटकर ठाण्यात इन्चार्ज होते. कामगिरीवर निघालेल्या लाटकरांनी दादूला गाडीत बसवले. लहान मुलांना शक्यतो रिमांडला पाठवू नये ह्या विचाराचे ते होते. थोडेफार ठणकावून, समजावून सोडून द्यायचा विचार करून त्यांनी दादूला विचारले,
"गलोलीने डोके फोडलेस?"
"हो"
"तू त्याचं डोकं फोडिस्तवर तो काय झोपला होता का?"
"नाही, मी सकाळी ८ वाजता त्याच डोकं फोडलं, तो दुपारी २ ते चार साडेचार पर्यंत झोपतो आणि रात्री ११वाजेच्या आसपास"
"तुला हे कसं माहित?"
"भांडण झाल्यापासून पाळत ठेवली होती मी"
"किती दिवस?"
"झाले १० दिवस त्या गोष्टीला"
"एवढे दिवस का लावलेस?"
"३ दिवस त्याचा मग लावायला, १ दिवस बेत करण्यासाठी गेला."
"आणि बाकीचे दिवस?"
"वाट बघत होतो, त्याचं इतर कुणाशी भांडण होण्याची"
"ते आणि का?"
"डोकं फोडल्यावर माझ्यावर कुणी संशय घेऊ नये म्हणून"
"मग सापडलास कसा?"
"आमचं भांडण झालं ते भग्गीच्या डावावरून.. रेषेपलीकडे पाय टाकून तो पाच रुपये जिंकला म्हणून भांडलो. पण मला आज सकाळी समजलं कि ते पाच रुपये त्याने त्याच्या आईच्या औषधासाठी वापरले होते. वाईट वाटलं, आणि माफी मागायला गेलो तर त्याच्या बापाने पोलिसात आणून बसवला मला."
"त्याला आधी माहित नव्हतं का कि तू डोकं फोडलंय म्हणून?"
"नाही. मी दिसलोच नसणार त्याला तेवढ्या दुरून"
"केवढं होतं अंतर?"
"तुमच्या चौकीच्या मागच्या लिंबावर मी बसलो होतो, आणि तो पालिकेच्या संडासाच्या दारात."
जवळपास २०० मीटर! लाटकर मनात अंदाज लावत होते आणि त्यांनी काहीतरी निर्णय घेतला.

"बंदूक चालवली आहेस का कधी?"
"आबांनी पाखरे हुलायला छर्र्याची बंदूक आणली होती ती चालवलीय"
"आज मी एका दरोडेखोराला मारायला जातोय, ह्याच नाव आहे रंग्या. ह्याने आजवर ७ मुडदे पाडलेत. गेल्या दरोड्यात ह्याने व ह्याच्या साथीदाराने एका मुलीवर बळजबरी करून खून पाडला आहे. तू सांग ह्याला मारायचं का?"
"दहा वेळा मारायला पाहिजे"
"मारशील?"
"तुम्ही निस्तरणार असाल तर मारू कि!"

क्रमश:

-राव पाटील!

खेळ: भाग २: https://www.maayboli.com/node/75159

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अजिंक्यराव - आज बियर मध्ये कोकोनट रम आणि कॅनबेरी ज्यूस असा कॉकटेल बनवला आणि पिता पिता हि कथा वाचली... माहोल भाई...
असेच लिहत जा.. चियर्स...