धडपड....... स्फुट

Submitted by अस्मिता. on 9 June, 2020 - 17:11

कसली आहे ही धडपड
कशासाठी आहे ही होरपळ
आयुष्यात राहिले आहे का आयुष्य
का तेच वेचायला नाही राहिला आहे वेळ !!

कारण सगळा काळ या धडपडीने ओरबाडला आहे
आपण एका गाडीत धडपडतोय
आणि आयुष्य बाजूच्याच गाडीतून समोरून निघून गेले
पहातच राहिलो , कळले सुद्धा नाही !!!

अंतहीन बोगद्यातल्या गाडीत अडकलेले हे जीवन
का मृत्यू आलेला नाही म्हणून त्याला जीवन म्हणायचे
का मृत्यूची वाट बघावी लागत नाही म्हणून
त्याला आयुष्य समजायचे !!

का या दिशाहीन, मार्गहीन, अंतहीन आणि अंध धडपडीला
संघर्षाचे प्रभावी नाव देऊन बघू
काय माहिती अहं सुखावेलही जरा वेळ
आणि अजूनही काय करू यासाठी

नंतर मग सकारात्मकतेचा खोटा बुरखा
पांघरून बघावा का काही क्षणं
निदान तेवढा वेळ तरी मी हवीहवीशी वाटेल सर्वांना
जमेल का बरं मला , का तिही एक धडपड होऊन जाईल !!

या अथांग धडपडीत उरते का काही
की रोज रात्री दमून डोळे मिटतात
तसेच एके दिवशी
या आयुष्याचे होईल !!

ही अविरत धडपड का होते आपली
कसले आहे हे अदृश्य ओझे
माझ्या अपेक्षा , मजकडून असलेल्या अपेक्षा
आकांक्षा, ध्येये , स्वप्ने छोटी मोठी !!

या अनेकानेक कामनांचे पोते
मी का वहाते आहे
का या अनिश्चित, अविश्रांत धडपडीकडून
कसली आशा आहे मला !!

की ही धडपड मला सुखान्त देणार आहे कधी
हे आयुष्य जर आपोआप चालणाऱ्या गाडीसारखे आहे
तर मला हे ओझे वाहून चालणे
गरजेचे आहे का खरेचं !!

का फेकून देऊन मोकळे होऊ ,
कर्तव्यं पार पाडायचीत.....ओझे नाही
मी ही होईन निवांत घटकाभर या यत्नांनी कदाचित
तेव्हाच जगता येईल ही औट घटकेची जिंदगी !!!

-----अस्मिता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर स्फुटलिहले आहे. सुरवातीला खरोखरच आपण एवढी पळापळ का करतो असे वाटते. "पण आज करत असलेला संघर्ष, उद्या आपली शक्ती बनणार आहे " हे वाचून मनाचा हुरूप आणखीन वाढतो. खुप सुंदर, लिहीत रहा.

स्फुट लिहिले छान आहे.
बाई दवे - मला थोडेसे निगेटिव्ह वाटले ओव्हरऑल.
संघर्ष करणे खूप महत्वाचे आहे.

अस्मिता तुम्ही लिहिलेला शब्द न शब्द मी अनुभवला आहे.. सगळे निभावताना तुम्ही स्वतःवर प्रेम करणं, स्वतःचे लाड करणं सोडू नका..यातनांमधून जाणाऱ्या तुम्ही एकट्या नाही आहात हे नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वराने प्रत्येकालाच त्याला झेपेल असे दुःखाचं ओझे डोक्यावर दिलेलच असते. ते नसते तर आपणच परमेश्वर असतो. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्हाला क्षण न क्षण समरसून जगण्याची कला सापडेल तेव्हा तुम्ही जिंकाल. अवघड आहे पण तुम्हाला नक्की जमेल.. Happy

नौटंकी, +2
स्फुट अतिशय आवडले. अनेक जण जात असतात या प्रवासातून. काही आधिदैविक आधिभौतिक आपत्ती आपल्याच वाट्याला का आल्या असे वाटते. खडतर वाटतो हा प्रवास, पण काही काळाने तोच रम्य वाटू लागतो. अरे इतके सगळे आपण कसे निभावले असे वाटून आपल्या कर्तृत्वावरचा विश्वास आणि आपला आत्मविश्वास दृढ होतो. हवे ते मिळवल्यानंतर त्यातली मजा गेली. ते मिळविण्याच्या धडपडीतच खरा आनंद असतो. आणि जे बदलणार नाहीय, ते शांतपणे स्वीकारावे. If you can't resist, then endure. हे थोडे कठोर वाटले तरी खरे आहे. शिवाय सांगणे सोपे पण आचरणे अतिशय कठीण हे तर आहेच. आणि धडपड अंध का बरे? तात्काळ यश येत नाही म्हणून? किंवा यश मिळतच नाही, मिळेल याची हमी नाही म्हणून? धडपड कधीच अंध नसते आणि व्यर्थही नसते. ते तुमचे कार्य किंवा सुकर्म असते आणि त्याचेच संचित बनणार असते. ती कर्मयोगातून साधलेली भक्ती आहे. ती थोडीच अंधभक्ती आहे? Bw
असो. पुन्हा एकदा, स्फुट आवडले.

सकारत्मकतेचा खोटा बुरखा>>> >> >>> हे अगदीच चपखल लिहिलंय..
खरंच मी माझ्या भोवती आशादायी वलय निर्माण करते. पण नैराश्येला आत तसच जपुन ठेवते. आठवणींच्या फुलांसारख हुंगत असते.. हा बुरखा फाडायलाच हवा.. अस वाटलं तुमच स्फुट वाचुन..
All the best.. अस्मिता..

कल रात्री एका मित्राशी अगदी याच विषयावर कितीतरी वेळ बोलणं चालू होतं. दीड तास तरी. त्याचा मतितार्थ मांडतोय :
अगदी सुरेख मांडलंय आदीश्री, म्हणजे अगदी आम्ही जे दीड तास बोललो ना, तेच.
भगवान दादांचा एक किस्सा आमच्या बोलण्यात होता. हा माणूस पैसा मिळाल्यावर 10 BHK फ्लॅटमध्ये सुद्धा गेला आणि परत चाळीतसुद्धा राहायला आला. शांतपणे.
आयुष्यात काही मिळवण्याची, किंवा सावरण्याची धडपड जरूर करावी, कितीतरी वेळा तर जीव काढावा इतकी, पण मिळालं नाही तर शांत बसावं. उगाच जीवाची घालमेल सुरू ठेवून उपयोग नाही.
आणि कधीकधी आयुष्य जगताना स्वतःचाही विचार करायलाच हवा, टू पृव समथींग ओर टू डू समथींग करताना टू हॅव मायथिंग असणं तितकंच महत्वाचं.
क्षणभर नकारात्मकता ही खीळ नसते, तो फक्त ब्रेक असतो स्वतःचा विचार करण्याचा, स्वतःविषयी, क्षमतेविषयी जाणून घेण्याचा आणि मुख्य म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याचा, की आता आराम कर, होईल सगळं नीट असं.
आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या गरजांची विभागणी करताना वर्क स्वत्वाचा कोपराही त्यात अतिशय उच्च गरज म्हणून ठेवलीच पाहिजे. स्वतःचच अवलोकन पुन्हा पुन्हा केलंच गेलं पाहिजे, स्वतःच्या गरजा आपण नीट भागवतो आहे का नाही, हे समजलं ना, तर आयुष्य जगायला उमेद मिळते.

संदर्भासाठी तुम्ही प्लिज Maslow's hierarchy of needs ही थियरी नक्की वाचा.

बाकी नौटंकी +३

सर्वांना खूप धन्यवाद... नैराश्य नाही आले आहे मला पण एखाद्या क्षण असतो त्यात ही धडपड व्यर्थ वाटते तेव्हा लिहीलेले आहे.
Sanjeev Washikar धन्यवाद.
कटप्पा धन्यवाद. एखाद्या नकारात्मक क्षणी लिहीलेले आहे. रादर सकारात्मक नसलेल्या क्षणी म्हणू शकतो.
धन्यवाद मंजूताई .
नौटंकी प्रतिसाद आवडला.
हीरा प्रतिसाद छान.
Cuty धन्यवाद.
मन्या धन्यवाद.
अज्ञातवासी खूप आभार . उमेद आहे Happy ! प्रतिसाद आवडला.
Maslow's Hierarchy of needs नक्की वाचेन .धन्यवाद.

खूप यशस्वी व आत्मविश्वास असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपल्या ध्येयाप्रती कुठला ना कुठला गोंधळ , अविश्वास वाटत असेल .....ते मी मांडायचा प्रयत्न केला आहे.
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

धन्यवाद अज्ञातवासी Happy
तुमच्या चार्टचे अवलोकन करत आहे.
*********
कुठलीही व्यक्ती चोवीस तास आनंदी आणि सकारात्मक राहूच शकत नाही त्याचीच ही क्षणीक व्यथा/चिडचिड आहे.
आणि विशेष म्हणजे हे प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेले असते.

तुम्ही मनाची एक अवस्था अगदी तंतोतंत शब्दात मांडली आहे,या विचारांमधून प्रत्येक जण जातो.मला खूप आवडले लेखन

माझा प्रतिसाद उपदेशात्मक वाटला असेल तर क्षमस्व. तुमचं आतापर्यंतचं मायबोलीवरचं मी वाचलेलं लेखन सकारात्मकच राहिलेलं आहे. एखादी क्षणिक भावना फक्त त्या क्षणाचं प्रतिनिधित्व करते, पूर्ण जीवनशैलीचं नाही हे खरंच.

अस्मिता, सॉरी, वाचून थोडा उशिरा प्रतिसाद देतेय, पण स्फुट खूप खूप आवडलं!
एक अनाहूत सल्ला देऊ का? राग मानू नका, पण ना, आपण स्वतःला वेळ देतोय, आपल्याला काही करण्याचा कंटाळा आलाय, हे लक्षात आल्यावर कधीही गिल्टी होऊ नका, फक्त तीही तुमची गरज आहे हे लक्षात ठेवा.
आपलं आयुष्य दुसऱ्या कुणाच्या आनंदावर निर्भर झालं, तर हळूहळू आपणच संपत जातो, आणि हे फार शेवटी लक्षात येतं. आपला स्वतःचा आनंद स्वतासाठी काहीतरी करूनच शोधायचा असतो. त्यात गिल्ट नसतं, आणि नसावं.
कॉलेजच्या फर्स्ट इयरला असताना एका अतिशय जवळच्या मैत्रिणीचा अपघात होऊन, ती सात आठ महिने बेडला खिळून होती. तिचे आई वडील दूर खेडेगावात राहायचे. त्यांना शहरात राहण्याचा तर जाऊ देत, पण जाण्यायेण्याचा खर्चही परवडला नसता. अशावेळी ती जबाबदारी मी स्वीकारली होती. अक्षरशः तिला भरवण्यापासून तर बेडपॅनपर्यंत सर्व मी करायचे, आणि यात खरंच आनंद व्हायचा. तिच्या प्रकृतीत होणारी सुधारणा बघून छान वाटायचं. पण हळूहळू स्वतःकडेच दुर्लक्ष व्हायला लागलं. ती चालू लागेपर्यंत मला काठी घ्यावी लागेल की काय, अशी अवस्था झाली.
म्हणून स्वानुभव सांगते. सर्वात पहिली प्रयोरिटी आपण स्वतः असायला हवं, कारण आपण आनंदी राहू तरच आनंदाने काही करू शकू

स्पुस्फुसुफुस्फुसुफुस्फुसुपपुस्फुसु्पुस्फुस ट
आवडले

एखादी क्षणिक भावना फक्त त्या क्षणाचं प्रतिनिधित्व करते, पूर्ण जीवनशैलीचं नाही हे खरंच. - हिरा, सहमत. आणि ती भावना त्या त्या वेळेला व्यक्त होऊ द्यावी.
अस्मिता यांचे वाक्य - कुठलीही व्यक्ती चोवीस तास आनंदी आणि सकारात्मक राहूच शकत नाही .... पण मला वाटते मुळातच आनंदी वा सकारात्मक राहणे हे ध्येयच असू नये. अन्यथा वेड्यासारखे ते साध्य करण्याची धडपडच आपल्याला त्यापासून दूर घेऊन जाते. आणि जगातले दुख अनुभवले नाही तर सुखाची किंमत तरी कोणाला कळणार आहे. कितीही टिपिकल वाटले तरी हेच फॅक्ट आहे.

अवांतर - पहिली ओळ टायपिंग मिस्टेकमुळे मजेशीर झाली आहे. राहू देतो. दुरुस्त करण्याच्या नादात का मजा घालवा Happy

स्फुट आवडलं...

आयुष्यात खुप फेजेस येतात कधी ब्राईट तर कधी डार्क.. कुठलीही फेज असली की त्याला सामोरं जाणं हे महत्वाचं.. आणि चांगलयं चाललं तर इंजोय करा बॅड पॅच चालू असेल तर संयम ठेवा...धिस शाल टू पास..

कुठलीही व्यक्ती चोवीस तास आनंदी आणि सकारात्मक राहूच शकत नाही त्याचीच ही क्षणीक व्यथा/चिडचिड आहे.
आणि विशेष म्हणजे हे प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेले>>> तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे.. प्रत्येकजण हे अनुभवत असतो.. आनंदात असताना मातू नये.. दुःखात असताना खचू नये.. हेच ह्यावरच औषध..

अस्मिता मला तुमची व्यथा माहीत आहे.. अशामध्ये नैराश्य येणं अगदीच स्वाभाविक आहे. ते स्विकारा. त्यात काहीही गैर नाही. वास्तवाचा स्विकार करणे अवघड आहे एक वेळ ते नाही स्विकारता आले तरी तरी तुमचं नैराश्य स्वीकारा. खूप बरे वाटेल. आणि फक्त वर्तमानाचा विचार करा. चालू क्षणामध्ये रहा. हे जमलं ना की गोष्टी खूप सोप्या होतील तुमच्यासाठी.. गरज पडली तर समुपदेशन करून घ्या. त्याचाही उपयोग होईल.

धन्यवाद kashvi, सामो, कटप्पा.
हीरा... अजिबात तसे वाटले नाही. तुमचे इतके सुंदर प्रतिसाद वाचले आहेत की गैरसमज होण्यास वावच नाही. Happy
महाश्वेता तुमचा अनुभव ....खरंच Hats off !
कुमार सर धन्यवाद.
धन्यवाद ऋन्मेष....प्रतिसादाशी सहमत !!
धन्यवाद अजय चव्हाण.
धन्यवाद नौटंकी Happy !
मी नेहमीच आनंदी असते... फार वेळ दुःखी रहाण्याचा स्वभावच नाही माझा. शिवाय I enjoy troubleshooting !! हे लिहिले त्या रात्री, डोके दुखत होते, झोप येत नव्हती. दिवसही चिडचिडीत गेला होता. लिहून झाल्यावर एकदम छान वाटले.
आता नेहमी सारखे प्रसन्न वाटते आहे. माझाही तोच मंत्र आहे...One day at a time Happy !

का फेकून देऊन मोकळे होऊ ,
कर्तव्यं पार पाडायचीत.....ओझे नाही.......हे मी मनाच्या ओझ्याबद्दल किंवा ताणाबद्दल (फेकून देण्याबद्दल) लिहिले होते स्वतःबाबत नाही. काही लोकांना नकारात्मक वाटले त्याबद्दल क्षमस्व !!
मला लिहिले की खूप मोकळे आणि प्रसन्न वाटते म्हणून अधूनमधून लिहीते.
प्लीज या स्फुटाला मानवी मनाच्या भावनिक आंदोलनाचे व्यक्त अव्यक्त समजा .
दुसरे अक्षरशः काही नाही. Happy
सर्वांचे खूप खूप आभार !!

मनाची अवस्था अशी होते कधी कधी, मी रीलेट करु शकते.

छान लिहीलंय.

सतत पावलोपावली लढाई लढणारे सकारात्मक नाही राहीले तर त्यांना ती लढाई कठीण नाही तर अशक्य असते पण कधीतरी असं वाटणार ना, संघर्ष तरी किती करणार, शेवटी मर्यादा असतात त्यावेळी कधी असं होतं, व्यक्त होता आलं तर जास्त चांगलं, त्यातून परत लढण्यासाठी उभं रहायचं बळ मिळतं.

मी प्रतिसाद सर्व नीट वाचले नाहीत अजून, वाचेन निवांत.

सगळ्यांनीच खूप छान लिहीलंय.
अस्मिता, छान लिहीलंय. ती क्षणीक अवस्था होती ती त्या भरात लिहली ... मोकळं होऊन बरं वाटत मलाही... ते मी माझ्यापुरतं लिहून ठेवते... ते फार विस्कळीत असतं.।
रुन्म्याचही पटलंय ....

कोणी जरी किती कांहीं म्हणत असला तरी क्षणीक निराशा येणे हा मानवी स्वभाव आहे आणि तो प्रत्येका च्या ठाई आहेच. त्यातच तो कायम रडत न रहाता, त्यातून यशस्वी पणाने बाहेर पडणे ह्याला आपण सकारात्मक स्वभाव किंव्हा positive attitude म्हणू. मनाची क्षणिक उद्वीग्नता म्हणजे ---ve attitude मुळीच नाही. परवाच्या लॉक डाऊन मध्ये घाबरून गेलेल्या एका दहा वर्षाच्या मुलीने आपल्या अपंग पित्याला दिल्लीतून मुळ गाव बिहार मध्ये जाण्यासाठी सायकलवर बसवून एक हजार किलो मीटरचा प्रवास केला. याची नोंद जगाला घ्यावी लागली. समाज्याच्या त्रासाला कंटाळून ताटी मध्ये जाऊन बसलेल्या आपल्या ज्येष्ठ भावाला"ताटी उघडा ज्ञानेश्वरा" म्हणून समजावणार्या बहिणी मुळे पुन्हा ज्ञानेश्वरीचे लिखाण चालू राहिले. अस्मिता यांनी हे क्षणिक भावनेतून लिहलेले स्फुट आहे , हि निराशा वगैरे कांहीं नाही.

नंतर मग सकारात्मकतेचा खोटा बुरखा
पांघरून बघावा का काही क्षणं>>>
ह्या थीमवर नेटफ्लिक्सवर 'Waiting' म्हणून एक सुंदर मूव्ही आहे.. पहा जमल्यास..
आणि लिहिलेलं आवडलं. Happy

>>>>>>>>समाज्याच्या त्रासाला कंटाळून ताटी मध्ये जाऊन बसलेल्या आपल्या ज्येष्ठ भावाला"ताटी उघडा ज्ञानेश्वरा" म्हणून समजावणार्या बहिणी मुळे पुन्हा ज्ञानेश्वरीचे लिखाण चालू राहिले. अस्मिता यांनी हे क्षणिक भावनेतून लिहलेले स्फुट आहे , हि निराशा वगैरे कांहीं नाही.>>>>>>>> समर्पक उदाहरण. अतिशय चपखल.

धन्यवाद अन्जूताई, धन्यवाद मंजूताई , धन्यवाद संजीव वाशीकर, धन्यवाद पाचपाटील आणि सामो Happy !

संजीव वाशीकर... प्रतिसाद अतिशय आवडला. खूप समर्पक आणि सुरेख उदाहरण. अगदी अगदी आले मनात.
पाचपाटील ...वेटिंग बघण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.

गंमत म्हणजे माझा मूड पुन्हा आनंदी झाल्याने मलाच या धाग्यावर यावे वाटले नाही Happy !
आज मात्र मी याकडे त्रयस्थपणे पाहू शकते , त्या एका क्षणात मला लिहावेसे वाटले आणि अगदी दहा मिनिटात सुचले सुद्धा.
अतिशय दुःखी आणि निराश असले असते तर आपल्याच भावनांकडे सजगपणे पहाता आले नसते आणि त्या व्यक्तही करता आल्या नसत्या हे ही खरे !
पण निराशा आणि नकारात्मकता दोन्ही अविभाज्य भाग आहेत आयुष्याच्या. त्या येत रहातात आणि जातही रहातात. जसे हेहि दिवस जातील दुःखाला लागू आहे तसे ते सुखालाही लागू आहेच की. त्यामुळे सुखालाही फार गृहीत धरू नये आणि दुःखाला घाबरून जाऊ नये हे माझे मत आहे. दोन्ही अवस्था पुनःपुन्हा येणार आहेत हेहि अध्याहृत आहेच !
सिद्धार्थ गौतमाला दुःखापासून जाणूनबुजून दूर ठेवले पण एका क्षणी त्यांनी जेव्हा इतरांचे दुःख पाहिले त्यांचे ह्रदय पिळवटून निघाले पण तिथेच सत् चित् आनंदाला शोधण्याच्या दुर्दम्य आकांक्षेचा अंकुर फुटला. म्हणून ते आवश्यक होतेच ,नाहीतर बुद्ध जगाला मिळाला नसता !! तो सुखोपभोगात रमलेल्या अनेक राजांसारखाच राहिला असता.

धन्यवाद Happy .

Pages