निसर्ग चक्रीवादळ : कथा आणि व्यथा

Submitted by वावे on 8 June, 2020 - 10:34

३ जूनला ’निसर्ग’ या चक्रीवादळाचा तडाखा उत्तर कोकण किनारपट्टीला आणि पालघर, ठाणे, मुंबईला बसणार ही बातमी मी वादळाच्या एक दिवस आधी वाचली. मी जरी सध्या बंगळूरला रहात असले, तरी माझं मूळ गाव श्रीवर्धन तालुक्यातलं. अर्थातच त्यामुळे काळजी वाटली. आदल्या दिवशी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांचा एक व्हिडिओ बघितला, ज्यात त्यांनी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, प्रशासनाने काय खबरदारी घेतलेली आहे, याची चांगली माहिती दिली होती. पण खरं सांगायचं तर आत्तापर्यंतचा अनुभव असा, की अरबी समुद्रातून चक्रीवादळ येऊन कोकण किनारपट्टीला धडकणार अशा बातम्या कितीही आल्या तरी एक तर ते वादळ समुद्रातच सौम्य होतं, नाहीतर दिशा बदलून दुसरीकडे निघून जातं. त्यामुळे यावेळीही तसंच होईल असं वाटत होतं. पण तसं होणार नव्हतं.

दोन तारखेला रात्री वाचलेल्या बातम्यांनुसार साधारणपणे सकाळी अकरानंतर वादळ रायगडच्या किनार्‍याजवळ येणार होतं आणि त्याचा लँडफॉल होणार होता. लँडफॉल नेमका कुठे होणार आणि नेमका किती वाजता होणार याच्या माहितीत सतत बदल होत होते आणि ते साहजिकच आहे. २ तारखेच्या रात्री रत्नागिरी जिल्ह्यात वादळ पोचलं. आमचं गाव श्रीवर्धन तालुक्यात असलं तरी समुद्रकिनार्‍याला अगदी चिकटून नाही. समुद्र आणि गावाच्या मध्ये डोंगर आहे. शिवाय पूर्वेलाही डोंगर आहे. त्यामुळे आपल्या गावात वादळाचा परिणाम कमी होईल अशी आशा होती मनात. तीन जूनला दहा-साडेदहानंतर फोन आणि मोबाईल सेवा बंद झाली.

त्यानंतर टीव्हीवर वादळाच्या बातम्या पाहण्याशिवाय आणि ’श्रीवर्धन, दिवेआगरला वादळ धडकले’ अशा ब्रेकिंग न्यूज वाचून काळजी करण्याशिवाय दुसरा काही मार्गच राहिला नाही. मुंबईच्या सुदैवाने वादळ मुंबईला टाळून उत्तर महाराष्ट्राकडे गेलं. शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप्सवर चौकशी केली. कुणाचाच घरी फोन लागत नव्हता आणि त्यामुळे सगळेच काळजीत होते.

चार तारखेला श्रीवर्धनच्या, मुरुडच्या जवळच्या नातेवाईकांच्या/ओळखीच्यांच्या घरांच्या बातम्या इकडून तिकडून मिळायला लागल्या. जवळजवळ सगळ्यांच्या घरांची छपरं उडून गेल्यामुळे घरात पाणीच पाणी झालं होतं. फोन, मोबाईल चालू नसल्यामुळे माझ्या गावी थेट संपर्क होत नव्हताच आणि इतर कुणाकडूनही घरची काहीच बातमी कळत नव्हती, त्यामुळे केवळ अंदाज लावणं हेच हाती होतं. अशा वेळी मन चिंती ते वैरी न चिंती याचा प्रत्यय येतो. आपापल्या गावाची काहीच बातमी कुठूनच कळत नसल्यामुळे आमच्या गावातले आणि आजूबाजूच्या गावांतले, मुंबई-पुण्यात किंवा अन्य ठिकाणी रहात असलेले आम्ही सगळेजण अस्वस्थ आणि चिंताक्रांत झालो होतो. श्रीवर्धनजवळच्या मेटकर्णी भागातल्या एका महिलेच्या कोसळलेल्या घराची हृदयद्रावक बातमी टीव्हीवर दिसली. पण त्यापलीकडे जाऊन आमच्या भागातल्या, अंतर्गत भागातल्या बातम्या काहीच कळत नव्हत्या. असंख्य झाडं रस्त्यांवर पडल्यामुळे बरेच रस्तेही बंद होते. रिलायन्स जिओ सोडल्यास कुठल्याच मोबाईलला नेटवर्क नव्हतं, पण तेही फक्त श्रीवर्धन शहरातच आणि त्यातही वीजपुरवठा नसल्यामुळे कुणालाच मोबाईल चार्जिंगही करता येत नव्हतं.

चार तारखेला रात्री आणि पाच तारखेला दिवसभरात फेसबुकवरच्या आपला श्रीवर्धन नावाच्या ग्रुपवर श्रीवर्धन तालुक्यातल्या वाकलघर, रानवली, हरिहरेश्वर, धारवली, वाळवटी या गावांबरोबरच आमच्या गावाचेही काही फोटो पहायला मिळाले. काही व्हिडिओही होते. सगळ्या फोटोंमधून आणि व्हिडिओंमधून दिसत होता तो फक्त आणि फक्त विध्वंस! हे फोटो आणि व्हिडिओ नक्की कुणी काढले आहेत ते कळत नव्हतं. थेट काहीच बातमी न कळल्याने सहा तारखेला मुंबईपुण्यात राहणारे आमच्या परिसरातले बरेचजण गावाला गेले.

श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातल्या दांडगुरी, वाकलघर, खुजारे, आसुफ, कार्ले, वडवली, वांजळे, बोर्ला, देवखोल, धनगरमलई, नागलोली या आणि अशा कित्येक गावांमध्ये असंख्य घरांची छपरं या वादळाने उडवून नेली आहेत. आंब्याची, काजू-फणसाची जुनी झाडं मोडून किंवा मुळासकट उन्मळून पडली आहेत. या सगळ्या गावांमधली बहुतेक सगळी तरुण मंडळी मुंबईत नोकरी करतात. कष्ट करून, पैसे साठवून, प्रसंगी कर्ज काढून गावाकडचं मोडकळीला आलेलं जुनं घर पाडून नवीन घर बांधतात. अशा या घरांचं मोठं नुकसान या वादळाने झालं. लॉकडाऊनमुळे आधीच सगळ्यांच्या डोक्यावर नोकरीधंदा जाण्याची टांगती तलवार असताना हे नवीनच संकट आलं. श्रीवर्धन, दिवेआगर , हरिहरेश्वर आणि मुरुडसारख्या बागायती गावांमधल्या नारळ-सुपारीच्या अख्ख्या बागाच्या बागा अक्षरशः आडव्या होऊन पडल्या आहेत. यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या भागातल्या पर्यटन व्यवसायाला आधीच मोठा धक्का बसला होता. ते कमी म्हणून की काय, हे बागायतीचं प्रचंड नुकसान! अनेकांचं पोट या नारळ-सुपारीच्या बागांवर अवलंबून असतं. उन्हाळ्यात पाणी शिंपून तगवलेल्या सुपारीच्या बागा आणि वाडवडिलांनी लावलेली, आपण मशागत करून फळवलेली आंब्याकाजूंची झाडं मोडून पडताना पाहणं सोपं नाही.

वादळ आलं म्हणून पाऊस थांबला नाही. कोकणात मान्सून म्हणा, मान्सूनपूर्व म्हणा, पण पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. घरावरचं छप्पर वादळाने उडवून नेलेलं, पत्रे, कौलं, ताडपत्री, वेल्डिंगसाठी लागणार्‍या जनरेटर्सची, एवढंच नाही, तर घरात उजेडासाठी लावायला मेणबत्त्यांचीही टंचाई आणि या टंचाईचा गैरफायदा घेऊन वस्तूंचा आणि सेवांचा चढा भाव लावणारे दुकानदार आणि कारागीर! श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, अलिबाग, माणगाव तालुक्यांमधल्या जवळजवळ सगळ्या गावांमधलं हे चित्र आहे. शिवाय समोर पावसाळा उभा! कोकणात पाऊस नुसता पडत नाही, तर कोसळतो. अशा वेळेस सामान्य माणसांनी काय करायचं?

रायगड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी हे सक्षम आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत, ही एक नक्कीच दिलासादायक वस्तुस्थिती आहे. सरकारकडून जी काही नुकसानभरपाई मिळायची ती यथावकाश मिळेलच.

या चारपाच दिवसात मी आधी कधीही पाहिल्या नसतील इतका वेळ आणि इतक्या उत्सुकतेने मराठी वृत्तवाहिन्या पाहिल्या. चक्रीवादळ आलं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या बातम्यांचा नक्कीच ’बातम्या’ म्हणून उपयोग झाला. पण त्यानंतर ’मुंबईवरचा धोका टळला’ या बातमीने या वृत्तवाहिन्या जणू रिलॅक्स झाल्या. दुसर्‍या दिवशीपासून चक्रीवादळाने केलेल्या नुकसानाच्या बातम्या मागे पडल्या. तेच तेच व्हिडिओ परत दिसू लागले. तिसर्‍या दिवशी तर वटपौर्णिमा होती. त्या दिवशी चंद्रग्रहणही होतं. ’वटपौर्णिमेची पूजा करण्यात ग्रहणाची अडचण नाही’ अशा प्रकारची अत्यंत मौलिक आणि उपयुक्त माहिती आणि ठिकठिकाणच्या सुवासिनींनी मास्क बांधून वडाच्या झाडाची केलेली पूजा, कुणी घरी फांदी आणून पूजा केली, कुणी अजून कुठल्या प्रकारे केली, अशा सुरस आणि महत्त्वाच्या बातम्या देण्यात वृत्तवाहिन्या गर्क होत्या. पण श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांमधले बहुतेक सगळे अंतर्गत रस्ते सुरू झालेले असतानाही (NDRF आणि SDRF च्या जवानांनी प्रचंड कष्ट घेऊन हे रस्ते दोन दिवसात मोकळे केले) कुठल्याही मराठी वृत्तवाहिनीवर मी वर उल्लेख केलेल्या गावांमधली आणि इतरही असंख्य गावांची दृश्यं कधीच दिसली नाहीत. वृत्तवाहिन्याच नाही, तर आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईट्सवरही या कुठल्याच गावांचा उल्लेखही नाही. मोबाईल सेवा त्या भागात सुरू नसताना, घरची काहीच बातमी नसताना, आपल्या परिसरातली काहीतरी बातमी कळेल म्हणून उत्सुकतेने टीव्ही लावावा, तर तिथूनही काही बातमी कळत नव्हती. आता तर निसर्ग चक्रीवादळाचा उल्लेख होतोय, तो फक्त कोकणात होणार्‍या राजकीय नेत्यांच्या दौर्‍यासंदर्भातच.
राजकीय नेते, सरकार आणि प्रशासन त्यांची कामं करतच आहेत, पण या सगळ्या खेडेगावांची झालेली दुरवस्था इतक्या लवकर बदलणार नाहीये. अजून कमीतकमी महिना-दीडमहिना लागेल वीजपुरवठा सुरळीत व्हायला. घरांची छपरं होतीलही दुरुस्त, पण वर्षानुवर्षं ज्या झाडामाडांवर मेहनत घेतली, ती कोसळलेली झाडं परत उभी राहणार नाहीयेत. नवीन झाडं लावून त्याचं चांगलं उत्पन्न सुरू होण्यासाठी आठदहा वर्षं जावी लागतात. तोपर्यंत काय करणार हा मोठा प्रश्न आहे. असे प्रश्न सोपे नसतात आणि त्यांचं एकच एक असं उत्तरही नसतं.
वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रं ही अशा ’स्टोरीज’ चा कितपत पाठपुरावा करतात, अशी एक शंका या निमित्ताने मनात आली. आपल्याच गावात चक्रीवादळ आलं, म्हणून मी जिथून जशा मिळतील तशा बातम्या मिळवल्या. पण एरवी अशा कित्येक घटना, दुर्घटना घडतात, आपण कुठे त्या बातम्यांचा पाठपुरावा करतो ? वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रं नक्की कुठल्या निकषांवर आपल्या बातम्या निवडतात? त्यांच्याकडे प्रशिक्षित पत्रकार असतात, पत्रकार म्हणून मिळणारा माहितीचा ॲक्सेस असतो, रोज चोवीस तासांचा वेळ असतो, पण त्याचा ते खेड्यापाड्यातल्या बातम्या देण्यासाठी उपयोग करतात का? आणि जर करत नसतील, तर या बातम्या बाहेर येणार कशा? वादळ एका दिवसात, काही तासात संपलं, पण त्याचे परिणाम मात्र वर्षानुवर्षं मागे राहणार आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, हे सगळे वाचुन आणी फोटो बघुन खूप वाईट वाटले. देव बर्‍याच वेळा कोकणवासियांच्या सहनशीलतेची परीक्षा का घेत असतो तेच कळत नाही. वादळामुळे घरे, फळबागा उध्वस्त, तर लॉक डाऊन मुळे पर्यटन बंद. मग कष्ट करुन तरी किती करायचे. आता तरी सरकार ने कोकणाकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्येक वेळी त्यांचा कणखर बाणा, स्वाभीमानी वृत्ती याचे कौतुक करुन कोकणी माणसाला मदत दिली जात नाही, निदान आता तरी लक्ष दिले जावे.

प्रत्येक वेळी त्यांचा कणखर बाणा, स्वाभीमानी वृत्ती याचे कौतुक करुन कोकणी माणसाला मदत दिली जात नाही, निदान आता तरी लक्ष दिले जावे. >>> अगदी अगदी.

वावे, तुम्ही लिहीलेलं वाचून आतमध्ये तुटलं !हे सगळी झाडं आपल्या पोटच्या गोळ्या प्रमाणे वाढवलेली असतात. प्रत्येक झाडाशी आपल्या आठवणीही असतात. काही क्षणात ते डोळ्यापुढून होत्याचं नव्हतं झालं। कसं वाटलं असेल ह्याचा विचारच करू शकतो आपण.
वरती रश्मी नी म्हंटलय ते बरोबर आहे.

IMG-20200609-WA0008.jpg

नागलोली
IMG-20200609-WA0007.jpg

नागलोली

IMG-20200607-WA0030.jpg

दांडगुरी गावातील हायस्कूल

IMG-20200608-WA0067.jpg

आसुफ

ही सगळी गावं श्रीवर्धन आणि दिवेआगर यांच्या मधली, छोटी छोटी खेडेगावं आहेत.

वादळाने झालेल्या नुकसानीचे फोटो पाहिले. खूप वाईट वाटलं . माझेही गाव कोकण . तिथली हालत बघून जीव तुटला. सगळं पूर्ववत व्हायला वेळ लागले . बाकी वृत्तवाहिन्यांबद्दल काय बोलावे! जिथे टीआरपी तिथे ते लोक ..
हे वर्ष खरंच वाईट आहे असं मनात येतं . एकामागून एक संकट येतच आहेत .

श्री. वावे अतिशय विदारक घटना आहे ही. हा सर्व प्रकार खूपच वेदना देऊन गेला. निसर्गा पुढे नत्तमस्तक होण्या पलीकडे आपल्या हातात कांहीच नाही. टीवी वाल्यांच्या बातम्या ऐकून क्षणभर आम्ही पण चिंतेत पडलो होतो. कोकणी माणूस हा अतिशय उद्यमशील व कल्पक असल्या मुळे तो यावर देखील उपाय शोधेल व यातून चांगला मार्ग काढेल. अजिबात घाबरून जाऊ नका.

रश्मी Happy
सध्या तिकडे काही मदत पाठवता येईल का आणि कशी याबद्दल चाचपणी सुरू आहे आमची. प्रॉब्लेम असा आहे की लॉकडाऊनमुळे पत्रे वगैरे साहित्याची उपलब्धताही नाहीये. तिकडे वीज नाही आणि त्यामुळे जनरेटर्सची टंचाई आहे.

Sad वावे , हे इतक नुकसान झाल आहे हे खरच बातम्या वाचून लक्षात आलं नव्हत. तुमच्या लेखामुळ कळल. फार वाईट वाटलं.

वावे, खरच खूप नुकसान झालं आहे. हा लेख लिहून तुम्ही फार चांगले काम केले आहे.
वाढत्या तपमानामुळे अरबी समुद्राच्या पाण्याचे तपमान वाढते आहे. आधीही छोटी छोटी वादळे समुद्रात तयार व्हायची. पण आता मोठ्या वादळांची संख्या आणि वारंवारता वाढते आहे. गेल्या वर्षी अरबी समुद्रात पाच मोठी वादळे झाली. सुदैवाने त्यातील कोणतेही किनाऱ्यावर आले नाही. यंदा मात्र निसर्ग किनारपट्टीवर धडकले. ते ही जिथे बहुतांश लोकं निसर्गाला जपणारे त्याच्याशी जुळवून राहणारे आहेत अशा कोकणात. मुंबई थोडक्यात वाचली.
वातावरणबदलाचे हे असे चटके आता बसायला लागले आहेत तरी आपण त्या विषयावर काहीही ठोस पावले उचलत नाही आहोत Sad

वातावरणबदलाचे हे असे चटके आता बसायला लागले आहेत तरी आपण त्या विषयावर काहीही ठोस पावले उचलत नाही आहोत>>> +११११११
मी जेव्हा इंजिनीरिंगला होतो तेव्हा आमचे सर म्हणाले होते कि वातावरण बदलामुळे येणाऱ्या पुढच्या काळात हवामान परिस्थिती त्याचा उच्चांक गाठत जाईल.

"श्री. वावे अतिशय विदारक घटना आहे ही.>>>>>> त्या श्री नाही, सौ आहेत. "

माफ करा ह सौ.वावे . मी मा. बोलीवर नविन असल्या मुळे , माहीत नसल्या मुळे चुकून पुरुष ह्या समजुतीने लीहले आहे. मना पासून दिलगिरी व्यक्त करतो.

खुप वाईट वाटतंय कोकणचं बदललेल रूप पाहून... मी कधीच कोकणात गेले नाही पण सिनेमात, पुस्तकात आणि इथे मनिमोहोर यांचे कोकणाचे वर्णन करणारे सुंदर लेख वाचून कोकण समजला. प्रत्येक भारत भेटीत कोकण दौरा करायचे मनसुबे आखले होते पण ते रद्द करावे लागले.
कोकण परत बहरो आणि तिथली माणसं यातून लवकर सावरो अशी देवाजवळ प्रार्थना!

Submitted by Sanjeev Washikar on 10 June, 2020 - 12:40>>
काही हरकत नाही Happy श्री. किंवा सौ. काहीच संबोधण्याची गरज नाही.
नवीन प्रतिसादकांचे आभार. जिज्ञासा, हो, तापमानवाढ हे कारण माझ्याही वाचनात आलं.
मंजूताई, नक्की लिहीन.

वावे लेख लिहिल्या बद्दल आभार. त्यामुळे काय आक्रित घडलंय त्या परिसरात हे कळलंय तरी सर्वाना.

माझं बालपण अलिबाग ला गेलं असल्याने त्या परिसराबद्दल नेहमीच ममत्व वाटत आलं आहे आणि म्हणून हे वाचून काय वाटतय ते सांगणं शब्दातीत आहे.

आंबा, माड - पोफळी, ही झाडं खरीप पिकांसारखी एका मोसमात फळायला लागत नाहीत . आता जरी कलम वैगेरे मिळत असली तरी पाच दहा वर्षे लागतीलच फळ धरायला आणि त्यातून दोन पैसे कमाई व्हायला. हल्ली वाडीत होम स्टे वैगेरे मुळे ह्या भागात थोडी सुबत्ता आली होती पण आता वाडी च नसल्याने त्यातून ही काही कमाई होणं शक्य नाही. कोकणातला माणूस 25 वर्ष मागे फेकला गेला आहे ह्यामुळे.

योग्य ती मदत सर्व बाजूंनी मिळू दे कोकणवासीयांना आणि ह्यातून ते वर येऊ देत हीच सदिच्छा.

रच्याकने, वादळ जेव्हा आमच्या देवगड भागात होत तेव्हा ते किनाऱ्यापासून खूप आत असल्याने आमच्याकडे नाही नुकसान केलय ह्या वादळाने.

रच्याकने, वादळ जेव्हा आमच्या देवगड भागात होत तेव्हा ते किनाऱ्यापासून खूप आत असल्याने आमच्याकडे नाही नुकसान केलय ह्या वादळाने. >>> हो हेमाताई, नाहीतर आमचं गाव तडाख्यात सापडलं असत. समुद्र आहे ना गावात. खाडीभागात पण नुकसान झालं असते, एकंदरीत आपल्या सर्व भागात विदारक परिस्थिती निर्माण झाली असती.

वावे, हे सगळे वाचुन आणी फोटो बघुन खूप वाईट वाटले. देव बर्‍याच वेळा कोकणवासियांच्या सहनशीलतेची परीक्षा का घेत असतो तेच कळत नाही. वादळामुळे घरे, फळबागा उध्वस्त, तर लॉक डाऊन मुळे पर्यटन बंद. मग कष्ट करुन तरी किती करायचे. >>>> +१.

खूप वाईट वाटलं.

कोकणी माणूस जात्याच चिवट. पण हे वादळ मात्र सगळं घेऊन गेलं. उमेद आणायची तरी कुठून! पण तरी हेही संकट पचवून तो उभा राहील, पुन्हा नारळ-पोफळ उभी राहील, आंबा मोहरून येईल ..
हे लिहितानाही डोळे भरून येतायत खरं तर...

तीन वर्षांपूर्वी दिवेआगार ला गेलो होतो. केळकर काकूंकडे.
4-5 दिवसांखाली Abp maza वर सहज न्यूज बघताना केळकर काकूंची पूर्ण वाडी कोलमडलेली बघितली. वाईट वाटलं फार.
आम्ही त्या वाडीतून फेरफाटका मारला होता.
केळकर काका काकू सुखरूप आहेत हे बघून बरे वाटले.
वावे, तुमच्या कुटुंबियांना यातून बाहेर पडण्याचे बळ मिळो.

चक्रीवादळग्रस्तांना कशा प्रकारे मदतीचा हात देता येईल याविषयी वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यावर काही गोष्टी सुचल्या.
१. सध्या तातडीची गरज म्हणजे छपरासाठी लागणारं सामान - पत्रे, कौलं, इत्यादी.
२. वीज नसल्यामुळे वेल्डिंग वगैरे कामांसाठी जनरेटर्स
३. सौरऊर्जेवर चालणारे दिवे. (अंतर्गत भागात इतक्यात वीज येण्याची शक्यता नाही आणि हे दिवे नंतरही उपयुक्त ठरतील)
४. प्रचंड प्रमाणात आंबा, काजू, वड, इत्यादी झाडांच्या फांद्या पडलेल्या आहेत. त्या कापून त्यांचा काही उपयोग करता आला (फळ्या पाडून सुतारकाम वगैरे) तर त्याचे थोडेफार पैसेही तिथल्या नागरिकांना मिळतील आणि त्या फांद्याही उचलल्या जातील.
५. नारळ, सुपारी, आंबा, काजू,कोकम वगैरे कोकणी मेवा विकून मिळणाऱ्या उत्पन्नाचं अपरिमित नुकसान झालं आहे. ही नवीन झाडं लावून लगेच उत्पन्न मिळणार नाही. अशा वेळी एकदोन वर्षांत लगेच उत्पन्न मिळायला लागेल अशा प्रकारच्या पिकांची/ झाडांची योजना.

हा लेख वाचल्यावर विजय तेंडुलकरांच्या ‘परदुःख’ या लेखाची खूप आठवण झाली. तो सुमारे ५५ वर्षांपूर्वीचा आहे.
तेच कोकण. तसेच भीषण वादळ झालेले. मग तिथले एक गृहस्थ आता मुंबईत आलेत आणि इथली वृत्तपत्रे पाहताहेत. त्यात त्यांना कुठेही त्या वादळाच्या विध्वंसाची बातमी दिसेना. पण बहुतेक पेपरात ठळक मथळ्यात काय असावे? तर, जागतिक सौंदर्य स्पर्धेत विजेती झालेल्या बाईच्या ** आणि ***ची मापे अगदी चवदार रीतीने लिहिली होती.

ते पाहून हे गृहस्थ उद्विग्न झाले.
……

तेव्हा काय आणि आता काय,
तेच कोकण, तेच वादळ
तीच मुंबई, तीच पत्रकारिता
तशीच अनास्था.......

विंदा म्हणतात तसे:
तेच ते... तेच ते…….

https://www.villagesquare.in/2018/07/30/village-youth-in-western-ghats-e...

हा एक चांगला लेख सापडला वृक्ष पुनर्रोपणावरचा.
असं जर मोठ्या प्रमाणावर कोकणात करता आलं आणि जर झाडं जगण्याचं प्रमाण खरोखरच ८०% असेल तर खरंच खूप उपयोग होईल.

आंबा काजूसारख्या वृक्षांच्या खाली पडलेल्या मोठमोठ्या फांद्या कापून बाजूला करण्यासाठी जी चेन सॉ वापरतात त्याबद्दल कुणी काही माहिती देऊ शकेल का?

विनिता, लिंकसाठी धन्यवाद.
Stihl हाही चांगला ब्रँड आहे असं दुसऱ्या एका ठिकाणाहून कळलं.
पण नक्की उपयोग होईल ना, किंवा कुठलं मॉडेल घेतलं की चांगला उपयोग होईल, चालवायला कितपत सोपी असते वगैरे माहिती हवी आहे.
नवीन प्रतिसादकांचे आभार.
अजूनही आमच्या गावात आणि इतरही अनेक गावांमध्ये वीज आलेली नाही. काम चालू आहे पण इतक्या प्रचंड संख्येने विजेचे खांब पडले होते की लवकर सगळं पूर्वपदावर येणं कठीणच आहे. वीज नाही म्हणून फोन चार्ज करता येत नाहीत. त्यामुळे संपर्क नियमित नाही.
@कुमार१, Sad खरं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि त्यानुसार भरपाईच्या मंजुरीची कामे सुरू झाली आहेत. रायगड जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त आणि भयानक नुकसान झाले आहे.

>> Stihl हाही चांगला ब्रँड आहे असं दुसऱ्या एका ठिकाणाहून कळलं.
हो. I have worked for one of their competitor brands and even the sales teams would say we can’t make something to beat them in quality. You check model reviews online and what suit for your best need.
Sad to know all the stories Sad

Pages