सायली राज्याध्यक्षांच्या फेसबुक पोस्टमधे ‘स्वामी’ चित्रपटाचा उल्लेख होता. तोपर्यंत हा चित्रपट बासू चॅटर्जींचा आहे हे माहीत नव्हतं. फक्त ‘पलभर में ये क्या हो गया’ हे आवडीचं गाणे यातलं आहे हेच माहीत होतं. याच चित्रपटावरून संजय लीला भन्साळीने ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट काढला असाही उल्लेख होता. त्यामुळे कुतूहल चाळवलं गेलं. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपट जरी ओटीटी असला तरी त्यातल्या बेसिक प्रिमायसेसमुळे आवडला होता. (एका व्यक्तीवर प्रेम असून मनाविरुद्ध दुसर्या माणसाशी लग्न झालेली व्यक्ती दुसर्या माणसाच्या चांगुलपणामुळे त्याच्या प्रेमात पडते.) या प्रिमायसेसवरून एका माजी सहकर्मचारीणीशी घातलेला माफक वादही आठवला. तिला वाटलेले की (बहूतेक शेवटच्या सीनमुळे) मंगळसूत्र आणि एकंदरीत भारतीय संस्कृतीमुळे नायिका तिच्या नवर्याकडे परत जाते.
बासू चॅटर्जींचा चित्रपट पाहून केस उपटायची वेळ येणार नाही याची खात्री. त्यामुळे पाहायला सुरूवात केली. क्रेडीट्समधे शरद्चंद्र चॅटर्जी यांच्या कथेवर आधारीत चित्रपट आहे हे वाचून बरं वाटले. उत्पल दत्त, शबाना आझमी, गिरीश कर्नाड, शशिकला वगैरे खणखणीत अभिनय करणारे लोक. तरीही सुरुवातीची काही मिनिटे चित्रपट पकड घेत नव्हता. नवर्याने फेसबुक वगैरे बघायला सुरूवात केलीही. अजून थोडा बघूया करत मी त्याला अख्खा रामलीला पाहणे भाग पाडले होते इत्यादी नकोशा आठवणींची उजळणी करून झाली. हळूहळू मात्र मी गुंतत गेले.
गोष्टही साधीसोपी.
मुलगी (शबाना) लहान असताना नवर्याचं निधन झाल्याने भावाच्या (उत्पल दत्त) आश्रयाला आलेली सुधा शिवपूरी (तीच क्यों की मधील अजरामर बा). विधुर-विनापत्य मामाची भाचीशी जमलेली गट्टी. भाचीचं नाव सौदामिनी (लाडाचं मिनी) आणि नावाप्रमाणे तेजतर्रार. ती बी. ए. करतेय (दूरस्थ असावं कारण काॅलेजमधे जाताना तर दिसत नाही.) वाचायला आणि वादविवाद घालायचा तिला आवडतं आणि मामालाही. गावातलाच एक मुलगा नरेंद्र कलकत्त्याला शिकतो. मामाशी गप्पा मारायला आणि त्याला पुस्तकं आणुन द्यायला नेहमी त्यांच्याकडे येतो. आणि हेच नेमके मिनीच्या आईला खटकतयं. कारण मामाच्या गप्पांच्या मैफिलीत मिनीलाही मुक्त प्रवेश आहे, नव्हे तर मामालाही अश्या मैफिली मिनीशिवाय अपूर्ण वाटतात. वयात आलेल्या मुलीच्या लग्नाची काळजी आईला लागून राहीलीय. मामा आणि मिनीच्या क्षितीजावर दूरदूरपर्यंत लग्नाचा विचार नाही. अर्थात नरेंद्र आणि मिनीची एकमेकाविषयी ओढ काही लपून राहीलेली नाही. आणि म्हणून कदाचित तिच्या आईचा तिचं लग्न लवकरात लवकर ठरवण्याचा अट्टाहासही वाढला आहे. त्यातून मिनीच्या आत्त्याने मिनीसाठी चांगले स्थळ सुचवलंय. अशातच एका अलवार क्षणी मिनी आणि नरेंद्र आपल्या मनीचं गुज एकमेकांना सांगतात आणि सुखस्वप्न बघण्यात रममाण होतात. मिनीच्या आईची कटकट थांबवण्यासाठी का होईन मिनीचा मामा आलेल्या स्थळाला भेटण्यासाठी त्याच्या गावी जातो. तो अर्थात मिनीला वचन देतो की तिच्या मनाप्रमाणेच होईल. मामा परत येतो तोच विकल अवस्थेत. परततानाच त्याला हार्ट अटॅक आलाय. मिनीला मात्र तो स्पष्ट सांगतो की तुला नरेंद्र आवडत असेल. पण तुझ्यासाठी घनःश्याम सुयोग्य आहे. मामा या दुखण्यातून वर येत नाही आणि त्याचे निधन होतं.
मिनीचं आता घनश्यामशी लग्न ठरलयं. पण ती हार मानण्यातली नाही. ती नरेंद्रला पत्र लिहून बोलवते. लग्नाच्या क्षणापर्यंत त्याची वाट पाहते.
आणि तो जेव्हा येत नाही तेव्हा हताश मनाने घनश्यामच्या ( गिरीश कर्नाडच्या) गळ्यात माळ घालून सासरी जाते. अर्थात ती घनःश्याम आणि एकंदरीत संसारापासून चार हात लांबच राहत असते. नाराज असेल पण तिची निरीक्षणशक्ती शाबूत आहे. घनःश्याम घरातील मोठा मुलगा आहे. जबाबदारीने सगळं सांभाळतोय. घरात सावत्र आई (शशिकला, दुसरी कोण) सावत्र भाऊ, सावत्र बहीण आणि वहिनी आहे. कर्तृत्ववान मोठा भाऊ असला तरी घनश्यामची त्या घरात उपेक्षाच होत असते. सावत्र भावाच्या शब्दावर झुलणारे घर घनश्यामच्या साध्या साध्या गरजाही पूर्ण करत नसते. हळूहळू घनश्यामच्या चांगुलपणामुळे मिनी त्याची काळजी घेऊ लागते. घनश्यामही मिनीची काळजी घेत असतो.
सगळं नीट मार्गी लागत असताना नरेंद्र तिच्या सासरी येतो. तो तिच्या दीराचा मित्र असतो. तिच्या गावचा मुलगा म्हणून घनःश्याम त्याचा योग्य पाहूणचार कर असं सांगून कामासाठी दुसर्या गावी जातो. मिनी त्याच्या समोरही यायला तयार नसते. तिच्या गावचा पाहुणा म्हणून घरातल्यांसमोर जुजबी बोलून मिनी बाजूला होते. पण मोका बघून नरेंद्र मात्र आपण तिच्यासाठी आल्याचे सांगतो. ती त्याला विरोध करत असताना सासू बघते. आणि गैरसमजातून दोषारोप करून भांडण होतं. आणि एका तिरमिरीत मिनी नरेंद्रबरोबर घर सोडते.
घर सोडल्यावर मात्र तिला घनश्यामचे तिच्यावरचं प्रेम आणि आपल्यामागे त्याची होणारी आबाळ हे सर्व आठवत असतं. नरेंद्रही बावचळलाय. मात्र सभ्य स्त्री म्हणून परतण्याचे तिचे मार्ग बंद झाले आहेत असं तिला आणि नरेंद्रला वाटत असतं. पण घनःश्याम येतो तिला परत नेण्यासाठी. And they lived happily ever after.
एखाद्या निवांत दुपारी फीलगुड चित्रपट पहायचा असेल तर नक्की बघू शकता.
काय आवडले?
सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.
संगीत - पलभरमे ये क्या हो गया, का करू सजनी सारखी गाणी ज्या चित्रपटात आहेत त्या विषयी अजून काय बोलावे?
दिग्दर्शन - चित्रपटात दाखवलेली नातेसंबंधाची वीण.
मामाला आपल्या भाचीच्या हुशारीचा अभिमान आणि त्याचवेळी तिचा स्वभाव पारंपारीक माणसाबरोबर/घरात घुसमटू शकतो ही जाणीव.
अधूनमधून टोमणे मारणारी पण उगीच छळ वगैरे न करणारी सासू. ती भलेही सावत्र मुलाकडे दुर्लक्ष करत असेल, पण त्याच्या कर्तृत्वावर तिचा विश्वास आहे.
स्वत:मधेच गुंग असलेला सावत्र भाऊ ज्यावेळी त्याची आई मोठ्या भावावर चूकीचे आरोप करते तेव्हा तिला अडवतो. तोच भाऊ सख्ख्या बहीणीवर तिचे लग्न जमत नाही म्हणून वैतागतो सुद्धा.
वहीनीची साडी हक्काने मागून घेणारी नणंद
एखाद्या काहीली करणार्या दुपारी “माझ्या खोलीत ये. माझ्याकडे विजेवर चालणारा फॅन आहे” सांगणारी जाऊ.
मामाच्या शेवटच्या इच्छेचा अनादर तर नाही करायचास पण आपले प्रेम नाही सोडायचंय अशा द्विधा मनस्थितीतली मुलगी
ही सगळी मंडळी नाॅर्मल आहेत, आपल्या आजूबाजूला असू शकतात.
काय आवडलं नाही?
मिनीच्या आईला नरेंद्र का खटकतोय हे कुठे स्पष्ट नाही.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्रचं उगाचच घातलेलं गाणे.
घनश्यामचे कॅरॅक्टर - अति सहनशील स्वभाव. नवपरीणित पत्नी लांब राहतेय पण हा माणूस का म्हणून विचारत नाही.
स्पाॅयलर अलर्ट:
बायकोचा माजी प्रियकर घरी आलाय आणि तू दुसर्या गावी निघून जातोस?
घनश्याम मोठा भाऊ असून
घनश्याम मोठा भाऊ असून त्याच्या आधी त्याच्या धाकट्या सावत्र भावाचं लग्न झालेलं असतं का? का?
>>घनश्यामचे कॅरॅक्टर - अति
>>घनश्यामचे कॅरॅक्टर - अति सहनशील स्वभाव. नवपरीणित पत्नी लांब राहतेय पण हा माणूस का म्हणून विचारत नाही.>>
लग्न ठरवताना सौदामिनीच्या मामांनी घनश्यामला नरेंद्र बद्दल सांगितलेले असते.
खुप सुंदर चित्रपट होता. गिरीश
खुप सुंदर चित्रपट होता. गिरीश कर्नाड ने जबरदस्त अभिनय केला होता. त्याचे शांत पणाने बोलणे, निरागस दिसणे. फारच नैसर्गिक वाटते. तितकाच दमदार अभिनय शबाना आझमी ने ही केला होता. या चित्रपटाचा शेवट फार सुंदर आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
हा खूप खूप सुंदर चित्रपट होता
हा खूप खूप सुंदर चित्रपट होता. एक क्लासिक म्हणूच शकतो.
छान लिहिलंय!
बिपीनचंद्र : घनश्यामचं दुसरं
बिपीनचंद्र : घनश्यामचं दुसरं लग्न असतं. त्याच्या प्रथम पत्नीचं निधन झालेलं असतं.
लग्न ठरवताना सौदामिनीच्या मामांनी घनश्यामला नरेंद्र बद्दल सांगितलेले असते.>>
ते ही मला फारसं पटलं नाही. एकतर मिनीने मामाला नीटसं काही सांगितलेलं नाही. जर तिची इच्छा मामाला माहीतेय तर तो दुसर्या मुलाशी लग्न ठरवणार नाही, नरेंद्रशी ठरवेल. किंवा हा मुलगा चांगला वाटतोय आणि भाचीचं लग्न त्याच्याशी व्हावे असं वाटतय तर त्या काळचा समाज लक्षात घेता ही गोष्ट त्याला सांगून खोडा का घालेल?
छान परीक्षण..चित्रपट पाहीला
छान परीक्षण..चित्रपट पाहीला नाही पण पाहावा लागेल असं वाटतयं..
"हम दिल दे चुके सनम" हा चित्रपट अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे यांच्या "वो सात दिन" ह्या चित्रपटावरून घेतला होता..
ह्या कथाबीजातून बहुतेक धडकन
ह्या कथाबीजातून बहुतेक धडकन सिनेमा स्फुरला असावा. शिल्पा शेट्टी वगैरे मंडळींचा.
धडकनबद्दलच लिहिणार होते.
धडकनबद्दलच लिहिणार होते. पूर्ण गोष्ट आठवत नाही पण छळणारी सावत्र आई आणि भावंडे असा भरपूर माल मसाला आहे त्यात. अर्थात सुनील शेट्टी म्हणजे आधीचा प्रियकर परत आला तरी त्याच्यासाठी अक्षय कुमारला कोण सोडेल
हा आहे का तूनळीवर बघते. गिरीश कर्नाड भयंकर आवडतात. नरेंद्र कोण दाखवलाय यात.
तूनळीवर आहे. नरेंद्रचा रोल
तूनळीवर आहे. नरेंद्रचा रोल कोणा विक्रमने केलाय.
मलाही धडकन आठवला.
मलाही धडकन आठवला.
पाहायला हवा हा पिक्चर.
कोणा विक्रमने???
कोणा विक्रमने???
ज्युलीसारखा गाजलेला चित्रपट आणि त्यातली गाजलेली गाणी त्याच्या नावे आहेत.

धागा चित्रपट या ग्रुपमध्ये
हा चित्रपट अर्धाच पाहिलाय. तोही मधलाच .
तुम्हाला हा चित्रपट आवडला तर बासु चटर्जींचाच अपने परायेही आवडेल. त्यातही बंगाली एकत्र कुटुंब, शबाना आझमी आणि पदराला लटकणारा चाव्यांचा जुडगा आहेत.
धागा चित्रपट या ग्रुपमध्ये हलवा कृपया
कोणा विक्रमने???
कोणा विक्रमने???
ज्युलीसारखा गाजलेला चित्रपट आणि त्यातली गाजलेली गाणी त्याच्या नावे आहेत. Happy Happy>> अगदी अगदी ह्येच लिवायला आल्ते. आद्य सिड्युसर विक्रम ला आम्ही कधीच विसरणार नाही. पुढचा सिनेमा लक्षात घेउनही. इथे ही तसाच काही उपद्व्याप करतो काय ही मला पिक्चर भर काळजी होती. गिरिश कर्नाड काय कम हाय काय. पण एक आहे मिनीचे विक्रम बरोबरचे सहजीवन जे घडू शकले असते त्यात व गिरीश कर्नाड बरोबर चा सभ्य प्रेमळ सुरक्षित संसार ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. एका स्त्रीला दोन्ही व इतरही ऑप्शनस गिल्ट फ्री अनुभवाय्चा हक्क आहे. गिरिश कर्नाडची व्यक्तिरेखा चित्रपटात अॅडल्ट आहे त्याचे स्थान मेंटेन करायची जबाबदारी त्याचीच की. ही गोंधळलेली नव वधू काय त्याला गृह सिं हासन प्राप्त करून देइल. असे वाटत नाही. एस्प शसिकला सासू असताना. सिक्वील यायला पाहिजे चित्रपटाचा.
गाणी लै भारी. येसुदास आवाज परफेक्ट वापरला आहे. मला ह्या सिनेमांमधले घर व आर्ट डिरेक्षन पण फार आवडते. एन आर आय लोकांसा ठी डिझाइन् केलेली भली मोठी चकचकीत सेट वाली घरे जुदाईतल्या श्रीदेवीच्या घरा सारखी वाटतात. निरुपयोगी. इतकी जागा कशाला लागते. ह्याचा लादी केर कोण करत असेल. व्याख्या विख्खी वुखू
अमा,प्रतिसाद लै भारी! ते काय
अमा,प्रतिसाद लै भारी! ते काय म्हणतात ना यू मेड माय डे वगैरे तसले वाटून राहिले बघा.
अमा मस्त लिहिलांय
अमा मस्त लिहिलांय
आद्य सिड्युसर ☺️☺️☺️☺️
ह्यातले गाणं खुप आवडतं,
ह्यातले गाणं खुप आवडतं,
पलभर मे ये क्या हो गया... पावसाळी वातावरणात अगदी गोड.
शबानाच्या त्या, तंत कॉटनच्या/ जामदानी बंगाली साड्या बंगाली पद्शतीने पण जराश्या अजागळ पद्धतीनेच.गुंडाळलेया , तिचे ते लाडात चालणं, स्वप्नात हरवून, आईलाच मीठी मारणं..
जुन्या आठवणी जागतात गाणं एकले की..
डिस्टन्स लेअरनिंग ला "दूरस्थ
डिस्टन्स लेअरनिंग ला "दूरस्थ " शब्द आवडला !
थोड विषयांतर करतोय, गंमत
थोड विषयांतर करतोय, गंमत म्हणून घ्या.
स्वामी या चित्रपटाच्या निर्मात्या जया चकवर्ती म्हणजेच त्या काळातील ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांच्या आई . गिरीश कर्नाड हे त्यांचे आवडते अभिनेता होते. हेमामालिनी यांनी त्यांच्याशी लग्न करावे आशी जयाजी यांची मनापासून फार इच्छा होती. त्या साठी त्यांनी गिरीश यांच्या बरोबर चर्चा देखील झाली होती मात्र हेमा मालिनी यांच्या धर्मेंद्र यांच्याशी असणाऱ्या प्रेम प्रकरणा मुळे ही गोष्ट गुलदस्त्यातच राहिली. आता कुणी कुणाला नाकारले कुणास ठाऊक.
परिक्षण छान!
परिक्षण छान!
विक्रम्,शबानाला उचलून साकव पार करतो तेव्हापासून सिनेमा परत पाहिला.हा सीन क्ष वर्षांपूर्वी किती हुरहुरता,तरल वाटला होता.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्रचं उगाचच घातलेलं गाणे.>>> सहमत.
घनश्याम मोठा भाऊ असून
घनश्याम मोठा भाऊ असून त्याच्या आधी त्याच्या धाकट्या सावत्र भावाचं लग्न झालेलं असतं का? का?>>
घनश्यामचे दुसरे लग्न असते हे.
वहीनीची साडी हक्काने मागून
वहीनीची साडी हक्काने मागून घेणारी नणंद>>
My fav प्रिती गांगुली
अमा : आद्य सिड्युसर विक्रम,
अमा : आद्य सिड्युसर विक्रम, इथे ही तसाच काही उपद्व्याप करतो काय ही मला पिक्चर भर काळजी होती. >>>
मला ह्या सिनेमांमधले घर व आर्ट डिरेक्षन पण फार आवडते. >>> खरंय. अतिशय नाॅर्मल घरं आणि वातावरण आहे.
झंपी : शबानाच्या त्या, तंत कॉटनच्या/ जामदानी बंगाली साड्या >>> अहाहा.
बाय द वे, ह्या बंगाली बायका असे दिवसभर केस मोकळे सोडून कशा काय वावरतात? घाम नाही का येत?