अुजवी बाजू
जिव्हा जिज्ञासा (२)
जिव्हा जिज्ञासेच्या अुजव्या बाजूला बरेच गंमतशीर भक्ष्य आणि भोज्य पदार्थ आहेत तशीच पेयंही फार मजा आणणारी आहेत. वाटीतल्या पातळ पदार्थांत आमटी हा फार बहारदार पदार्थ आहे.सर्व चवींनी युक्त अशी आमटी - आअी मजेनं तिला जन्मसावित्री असंही म्हणायची कारण रोज 'चाहे कुछ भी हो जाए' असायलाच पाहिजे.
वाटीत आमटी म्हणजे जणू महाराणी.आमच्या गोखल्यांच्या घरातला राष्ट्रीय पदार्थ.मोहनच्या मते आमटी आमची बेळगावची मोठी आअी आणि अिन्नी दिवेकर यांचीच अव्वल दर्जाची, केवळ स्वर्गीय.तशी माझी आजीपण आमटी छान करायची पण तिचा नंबर जरा खाली होता.वर वर्णन केलेल्या मायलेकींनी पाण्याला फोडणी दिली तरी स्वादिष्ट होअील अशी करामत त्यांच्या हातात होती.आजीची कैरी घालून आमटी आणि अाअीच्या डाळमेथ्या , डाळवांगं,कटाची आमटी ज्यात ती थोडं तयार पुरण घालायची(आमटीसाठी वेगळी डाळ मुद्दाम शिजवायची कारण कट काढला तर पुरणपोळीची चव थोडी कमी होते म्हणून)त्याला मोहन आईनं आज आमटीचा 'कट' केलाय म्हणायचा आणि गोळ्यांची आमटी केवळ अप्रतिम असायच्या .जाता जाता काय आठवलं तर आजी कोणाकडे आमटी पातळ असेल तर त्याला 'ढमकढवळ' आमटी म्हणून मोडीत काढायची.पण आमटीचे किमान पन्नास प्रकार तरी असतील,जरा घटक पदार्थ बदलला की चव एकदम निराळी.घुटं मात्र मी खूप अुशीरा खाल्लं आणि ते अरुच्या हातचं रुचकर. शेंगोळेपण खूप नंतर खाल्ले.आअी कडधान्याचं कळण करायची मूग आणि चवळी विशेषतः. कडधान्य शिजवल्यावर वरच्या पाण्याचं ताक घालून वर तूप जिऱ्याची चरचरीत फोडणी.वाटी वाटी प्यायचो पण अर्थातच या सगळ्या बरोबर परत आमटी हवीच.याच पेय प्रकारात मोडणारी विविधं सारं. चिंचेचं,आमसूलांचं टोमॅटोचं,कैरीचं आणि फर्मास ताकाची किंवा सोल कढी! अगदी soulful!
सूप्सची भर जरा अुशीराची पण बापूंना फार आवडायची आणि परदेशी जाअुन आल्यावर जास्तच पण ते टोमॅटो आणि पालक यांच्यापुरतं मर्यादित राहिलं पण नंतर मुलं मामाकडे राह्यला जायची तेंव्हा संजय त्यांना त्यांचा सिनेमा पाहून झाल्यावर, मध्यरात्री लाल भोपळा ,बटाटा ,दूध आणि चीज घालून सूप करुन द्यायचा.सूपचं नावच मुळी मुलांनी Midnight Soup ठेवलं होतं.
नंतर ते मी केलं पण मुलांना पटलंच नाही कारण ते एकतर ते त्यांच्या मामानी केलं नव्हतं आणि मामाबरोबरची ती मजा तो अकाली गेल्यानं त्यांच्या आयुष्यातून कधीच विरघळली , पण त्यांच्या मनातून ती चव आठवणींसकट जपून ठेवली आहे त्यांनी खोल खोल मनात.ज्याला कधीच कोणी स्पर्श करु शकत नाही.असो
अुजव्या बाजूच्या वाटीत कधी अळूची भाजी!अितक्या निगुतीनं केलेल्या भाजीला मी कधीही फतफतं म्हणूच शकत नाही आणि कोणाला म्हणू देत नाही. पुणेरी लग्नात पंगतीत बसून अळूची भाजी खाणं हा सुंदर अनुभव असतो.आचारी त्यात जिलबीचा पाक घालतात म्हणे.त्याला सगळं जरा चढं लागतं.आअी ह्याच अळूची पीठ पेरुन गोळाभाजी फार सुंदर करायची. शिवाय अळूची देठी वगैरे करुन जराही वाया घालवायचा नाही हा कायमचाच दंडक! पालेभाज्यांचा विषय निघालाय म्हणून पालक वरण,ताक घालून केलेली पातळ भाजी आणि भात यांना विसरुन चालणार नाही.शेपू मुगाची डाळ घालून आणि अंबाडी तांदूळाच्या कण्या घालून बहरुन येते. साधं पिठलं, ताकातलं, झुणका..कोणी त्याला महिनाखेर म्हणोत आपण चापायचं..
अौरंगाबादला प्राचीच्या लग्नात खाल्लेली मुद्दा भाजी आणि मृणालची मेथीची घट्ट कोरडी भाजी.समुद्रमेथी आणि घोळ या भाज्या अरुनीच करायच्या !पोकळा लग्नानंतर कोल्हापूरला पाहिला , कपिलतीर्थहून पुण्यापर्यंत पेंड्याच्या पेंड्या वागवत आणला ,केला आणि खाल्ला आणि प्रकाशमामा करायचे तो अप्रतिम Baked पोकळाही पहिल्यांदाच खाल्ला पण केला मात्र नाही. लग्नानंतर पालक आणि आंबट चुक्याची गल्लत करुन आंबट चौक्यात टोमॅटो घालून ढाण आंबट भाजी करुन मी अेकदा बहारही अुडवली आहे ती आठवण ताजी आहे अजून. हे मात्र खरं की पालेभाज्या फार मनापासून कराव्या लागतात त्या फार शिजवून चालत नाहीत आणि मीठही चतुराईने घालावं लागतं.तसंच अुजव्या बाजूला वेगवेगळ्या अुसळीही असतात.मटकी, मसूर,हिरवे पिवळे मूग,चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाच्या वेळची हरभऱ्याची अुसळ आणि थंडीतली सोलाण्याची अुसळ केवळ अहाहा!आमच्या शेतावरून येणारे काळे पोलीस! आईसारखे फक्त जिरं खोबरं गोडा मसाला घालून जशी उसळ करायची तशी कोणीच करु शकणार नाही.
वेगवेगळ्या भाज्यात,कोरड्या भाज्यांचा सरदार म्हणजे अुकडलेल्या बटाट्याची भाजी.पण ती सुद्धा फार निगुतीनं करावी लागते बरं.नैवेद्याला करताना जरा चढ मिरची आलं आणि एरवी लसूण!पण तेल भरपूर घालून पाणी शिंपून उत्तम लागते. येरागबळ्याचं काम नाही ते. तशीच लाल भोपळ्याची लग्नी भाजी.काय थाट तिचा, खसखस, खोबरं,चारोळी घालून!बाखर भाजी भन्नाट लागते.वर्षा वहिनीच्या हातची हादग्याच्या फुलांची भाजी , आठवड्यातून निदान तीनवेळा अाअीला करायलाच लागणारी भेंडीची भाजी,गौरी गणपतीच्या नैवेद्याच्या वेगवेगळ्या भाज्या,कोणाच्या हातची फणसाची भाजी ..बापू करायचे तो बटाटा रस्सा बडीशेप घालून,संजय करायचा ती हिरव्या मसाल्याची चमचमीत मटार उसळ,कोणाचा अुंधियो... कोणाच्या हातचं खानदेशी वांग्याचं भरीत, सुकी भाजी ,ओली भाजी, उजव्या बाजूची यादी फार मोठी आहे.आपल्या आयुष्याला अितकं सुभग बनवते , अगदी किती घेशील दो कराने असं वाटण्याची परिस्थिती ..मला नेहमीच अाश्चर्य वाटतं की अितक्या विविध पाककृती कशा सुचल्या असतील आपल्या पूर्वजांना.कशाला डाळीचं पीठ,कशाला डाळ,कुठं कांदा कुठं लसूण,कधी खोबरं..घटक बदलला की चवीत केवढा तो फरक.अेकचं क्रिया असली तरी प्रत्येक भाजीचा प्रतिसाद संपूर्ण निराळा,प्रत्येक करणाऱ्या हाताची चव वेगळी.दोन भाज्या अेकत्र असतील तर चवीचा सोहळा आणखी वेगळा. तीच गोष्ट भाताची.ज्याच्या बरोबर मैत्री त्या त्या चवीचं आगळं वेगळं संमेलन..वरण भात,आमटी भात,दूध भात,तूपमीठ भात,साय भात,मेतकूट भात,दहीभात आअीच्या परिभाषेत दहीबुत्ती,अुसळ भात,मुगाची खिचडी कढी , मसालेभात, डाळिंब्याचा , पावट्याचा भात. प्रत्येक घराच्या आपापल्या परंपरेनुसार वयानुसार भाताशी , भाजीबरोबर बदलणारं नातं!मसालेही वेगळे....प्रत्येक घरची सुगरण बाअी , आअी, आजी परंपरा जपतानाच आपल्या हाताची अोळख त्यात मिसळणारच.
अाअीचा बहुतेक सगळा भर स्वतः केलेल्या गोडा अुर्फ काळा मसाल्यावर होता.खोबरं जाळून केलेला तो मसाला ताजा असताना केलेली भरली वांगी..कच्चा मसाला आणि खडा मसाला हे कधीतरी.पण गरम मसाला किचन किंग वगैरे नाहीच.मटार अुसळ करताना क्वचितच कधीतरी लसूण मिरची खोबरं कोथिंबीर मिळून ती हरा मसाला करायची (अिथं शब्दाची तोड योग्य ठिकाणी करण्याबाबत आग्रही असायची)..बाकी रोज कमीतकमी आणि साध्या गोष्टी वापरायची.अितक्या साध्या गोष्टींनी ती रोज चव ताटात आणायची.मला अिथं अेका मराठी लेखिकेचं, बहुदा शांता गोखलेंचं वाक्य आठवतं आहे की पदार्थाच्या कृतीत -साहित्यात पाच सहा पेक्षा जास्त पदार्थ असतील तर मी पान अुलटून पुढं जाते.अाअीसुद्धा किती कमी पदार्थात अतिशय रुचकर आणि सुग्रास अन्न रांधायची. भाजी कमीतकमी वेळा हलवायची भाजी मोडू नये म्हणून. अुगाच तेल सुटेपर्यंत भूनो वगैरे भानगड नाहीच आणि पोळी केवळ तीनदा पलटायची.अेकदा तव्यावर टाकल्या टाकल्या, मग अेक बाजू पूर्ण भाजून घ्यायची अन मग दुसरी तशीच..अितके साध्या मूलभूत गोष्टी अंगीकारल्यामुळे आयुष्य साधं सुलभ होतं. तिच्यासारखं! आणि तिच्यासारख्या तुमच्या माझ्या आया आजांनी त्यांचं जगणं त्यांच्या साध्यासाध्या गोष्टीतून समृद्ध केलं होतं.अन्न वाया न घालवता त्याचं रुप पालटून ज्याला sustainable life म्हणतात ते प्रत्यक्षात आणत राहिल्या.रोज स्वयंपाकघरातून सातत्यानी प्रयोगशील आणि प्रगतीशील होत्या त्या..
मुलांबरोबर Masterchef Australia पाहताना Marco Pierre White हा जगप्रसिध्द Chef म्हणाला You should cook to express and never to impress...आणि त्या दिवशी स्वयंपाक करताना मनात गोविंद गोविंद म्हणणारी अाअी अेकदम वेगळीच भेटली..तिचा शारीर वावर आता माझ्या अासपास नसला तरी अेखाद्या दिवशी डाळमेथ्या अशा जमतात की जणू तिनंच केल्यात, का तीच करते त्या माझ्या हातानी!मग अुजवी बाजू अशी जुळून येते.चार घास जास्त पोटात जातात . आपापल्या जनुकांप्रमाणे जेवा म्हणणारे आहारतज्ञ किंवा Food Rules मधे Michael Pollan म्हणतो तसं avoid the food which is advertised आणि do not eat the food which your great grandmother will not recognise as food आणि नुकतंच वाचण्यात आलं की आता in home dining restaurants ही नवीन craze आहे.या सगळ्याचं "सार" तेच आहे. we are coming back to Basics..आपली घरं ही प्रयोगशाळा होती आणि उत्क्रांत आनंदायतन होती हेच खरं!आहारशास्त्र न वाचता न शिकता ह्या ज्ञानी स्त्रिया आपल्या माणसांना रसना आणि आरोग्य देत राहिल्या, खऱ्याखुऱ्या अन्नपूर्णा बनून.आणि आयुष्याचं "सार"आपोआप शिकवत राहिल्या की, अापलं काम मनापासून , आनंदानं करणं आणि त्यात कालच्यापेक्षा मी आज अधिक चांगलं कसं करीन हे बघणं आणि तेही आनंदानी, स्वस्थचित्त राहून हीच खरी आयुष्याची अुजवी बाजू आहे!
आता शेवट जसा गोड व्हायला हवा तसा जिव्हा जिज्ञासेमध्ये पक्वान्नांनीच व्हायला हवा ,आणि तो तसाच होअील...
वाहवा! बहारदार आणि खुसखुशीत!
वाहवा! बहारदार आणि खुसखुशीत! आपल्या प्रतिज्ञेत म्हटलेल्या परंपरांचा पाईक होण्याची क्षमता यात ही क्षुधाशांती करण्याची कला पण परंपरा म्हणून यायला हवी!
हरा मसाला मध्ये शब्दांची योग्य तोड
वा वा! सुंदर हाही लेख. हरा
वा वा! सुंदर हाही लेख. हरा मसाला
हा ही लेख मस्तच.
हा ही लेख मस्तच.
सद्द्याच्य पंजाबी पदार्थाच्या
सद्द्याच्या पंजाबी पदार्थाच्या दुनियेत,अस्सल मराठमोळ्या पदार्थांची परत एकदा उजळणी झाली. डाळमेथ्याच वरण, गोळ्याची आमटी, पोकळ्याची तव्यावर परतलेली भाजी, अळवाचे गरगटे याची ओळख ,लोक विसरत तर चालले नाहीना. अस्सल मराठी पारंपारिक पदार्थांची आठवण करून देणारा लेख. खूप सुंदर.
नेहमीप्रमाणे सुंदर लेख.
नेहमीप्रमाणे सुंदर लेख.
हा ही लेख आवडला.
हा ही लेख आवडला.
छान लेख!
छान लेख!
नेहमीप्रमाणे हा ही सुंदर लेख!
नेहमीप्रमाणे हा ही सुंदर लेख!
आणि त्या दिवशी स्वयंपाक करताना मनात गोविंद गोविंद म्हणणारी अाअी अेकदम वेगळीच भेटली..तिचा शारीर वावर आता माझ्या अासपास नसला तरी अेखाद्या दिवशी डाळमेथ्या अशा जमतात की जणू तिनंच केल्यात, का तीच करते त्या माझ्या हातानी!>>>>>>> अगदी हा अनुभव मी मागच्या आठवड्यात घेतला. सध्याकाळात आठवड्यातून एकदाच भाजी आणतो. दोघच असल्यामुळे चालूनही जातं. भाजी नव्हती तर गोळ्याची आमटी केली. ह्यापूर्वी मी कधी केली होती आठवत नाही म्हणून चवही आठवत नव्हती माझ्या हाताची! आठवणीत होती ती फक्त आईच्या हाताची चव. पहिला घास घेतला अन काय वाटलं शब्दात सांगू नाही शकणार ...... ही मी केलीये की आईने ? इतकी तंतोतंत आईच्या हाताची चव कशी काय?
श्रीकृष्णानी सांदीपनी ऋषींकडे वर मागितला होता न की मला जन्मभर आईच्या हातच जेवण मिळो! अशीच आई कधीतरी येते न भरवून जाते.
तुझे सगळे लेख वाचते अन बहुतेक पोचपावती देते.
शेवटचा परिच्छेद तर खासच! एक विचारायचं होतं सावरकरांच्या पुस्तकात जशी लिपी (?) आहे तशी तू वापरतेस
उदा. होअील - होईल, अुजव्या - उजव्याच्या ऐवजी त्याचे काय कारण ?
मंजुताई मला खरंतर ती लिपी
मंजुताई मला खरंतर ती लिपी जास्त आवडते पण आत्ताच्या माझ्या app मध्ये ती सोय नाहीये, माझी आई अशीच लिहायची अ ची बाराखडी खऱ्या अर्थानी तीच आहे असं वाटतं मला!
हा ही लेख सुरेख. तुमच्या
हा ही लेख सुरेख. तुमच्या रुपाने मायबोलीला एक चांगली नवी लेखिका मिळाली आहे. व जुने पुणे त्या निमित्ताने परत अनुभवायला येते आहे. अजून लिहा. इथे जुन्या पुण्या च्या आठवणी असा पण एक बाफ आहे. तिथे ही लिहा.
मंजूताई, एवढे लक्ष गेले नाही
मंजूताई, एवढे लक्ष गेले नाही खरं! मला माहित नव्हते अशी लिपी आहे mhanun,tumachyamule कळले.
सुरेख लिहिलंय
सुरेख लिहिलंय
लिहीत रहा
पुढील लेखाच्या आणि त्यायोगे आठवणी ताज्या होण्याच्या प्रतिक्षेत...
काल मी रात्री झोपताना हे
काल मी रात्री झोपताना हे दोन्ही लेख एकदम वाचले. सॉलिड भूक लागली.
निदान पोटात पुन्हा आगडोंब उसळणार नाही.
पुन्हा एकदा जेवणं व्हायच्या जस्ट आधी वाचेन आणि मग केलं असेल ते खाईन
अवांतर - आअी वरुन आठवलं. लहानपणी माझ्या एक (बहुतेक) अनुवादित पुस्तक होतं त्यात अिटकु आणि पिटकु असे दोन उंदिर होते. यांचं बीळ ज्या घरात होतं तिथल्या छोट्या छोट्या गमती त्यात होत्या. त्या ही "अि" ची लिपी होती. मी हे पुस्तक अगदी दहावीच्या सुट्टीपर्यंत विरंगुळा म्हणून वाचलं. मग पुस्तकांची एक ट्रंक माळ्यावर गेली आणि काही पुस्तकं तिथेच राहिली. ते कसं गायब झालं याची दर्दभरी कहाणी इथे नको.
कुणाकडे ते अिटकु पिटकु चं पुस्तक पिडीएफ असेल तर प्लीज मला हवंय मुलांना वाचून दाखवायला.
असो मस्त लेख आहे. मला तुमची लिखाणाची ओघवती शैली आवडते.
दोन्ही लेख आवडले.
दोन्ही लेख आवडले.
धन्यवाद मंडळी, खूप छान वाटतंय
धन्यवाद मंडळी, खूप छान वाटतंय तुमचे प्रतिसाद वाचून...
मस्त लेख
मस्त लेख
सुंदर लेख! वाचून मला मावशी
सुंदर लेख! वाचून मला मावशी-आजीने केलेली भरल्या पडवळाची भाजी आठवली. आणि आजीने केलेला ताकातला चाकवत. आई भरपूर लसूण घालून हुलग्याचं माडगं करते, थंडीत मस्त वाटतं. माझे एक काका ओल्या मटारची उसळ करतात; कोथिंबीर, हिरवी मिरची, ओले मिरे, विड्याचं मघई पान याचं वाटण बनवून. यातले कुठलेच पदार्थ मला फारसे येत नाहीत याची रुखरुख आहे. (स्वयंपाकीण बाईला काढून टाकायला पाहिजे आणि एव्हरेस्टचे मसाले आणणं बंद केले पाहिजे).
बाकी हि "अि" ची लिपी आईकडे असलेल्या रुचिरा पुस्तकात आहे, लेखिका बहुतेक कमलाबाअी ओगले.