मध्यंतरी एकदोन दिवस दारुची दुकाने उघडल्यावर मद्यप्रेमी मंडळींनी किलोमीटरच्या रांगा लावून आपली दारुवरील निष्ठा प्रकट केली. माणसाची एखाद्या गोष्टीवर भक्ती असावी तर अशी. प्रेम असावे तर असे. माझ्या मित्रमंडळींमध्ये जी मद्याची भोक्ती मंडळी आहेत ती माझ्या व्यसनमुक्तीच्या कामाची मनसोक्त थट्टा करीत असतात. आणि आजवर मला त्या गोष्टीचा कधीही राग आलेला नाही. याचं कारण व्यसनामुळे उध्वस्त झालेली इतकी आयुष्यं पाहिलीत की आता या कामाच्या महत्त्वाविषयी माझ्या मनात तिळमात्रही शंका उरलेली नाही. त्यामुळे कुणी थट्टा केली किंवा वाद घालु लागलं तर त्यावर काही बोलण्याचीही मला गरज वाटत नाही. तर एकजण थट्टेने म्हणाला की या दारुसाठी लागलेल्या रांगामध्ये मी जाऊन समुपदेशन करीत असेन. मी ही थट्टेतच उत्तर दिलं की माझं काम दारु पिऊन झोकांड्या देत माणूस रस्त्यावर पडू लागला की सुरु होतं. तोपर्यंत मी कुणाच्या सुखाआड येत नाही.
या सार्यातील थट्टेचा भाग सोडला तर व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या बहुसंख्य माणसांना अगदी सुरुवातीला पूर्णपणे दारु सोडायची नसतेच असे माझे निरिक्षण आहे. व्यसनमुक्तीपथावर चालणार्यांची असंख्य मनोगतं ऐकल्यावर अतिशय जबाबदारीने मी हे विधान करीत आहे. थोडा भाबडेपणा बाजूला करून या समस्येकडे पाहिले तर काय दिसते? बहुतेकजण हे खालावलेल्या प्रकृतीमुळे दाखल झालेले असतात. बहुतेकजणांना स्वतःहून दाखल व्हायचं नसतं. अनेकांच्या संसाराचा खेळखंडोबा झालेला असतो. बायको सोडून जाण्याच्या मार्गावर असते. बरेचसे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले असतात. अनेकांना पिणे झेपतच नसते. शरीराला सोसत नाही. खिशाला परवडत नाही. कामावरून काढून टाकले जाते. घरातून आईवडील हकलून देण्याची भाषा सुरु करतात. या आणि अशा कारणांमुळे दाखल होणारेच खुप जण असतात. आपण व्यसनाच्या आधीन गेलोआहोत, त्याचे गुलाम झालो आहोत, त्यामुळे आपल्या आयुष्याची वाट लागली आहे. त्यामुळे निरपराध अशा आपल्या बायकामुलांचा, घरच्यांचा आपण छळ करीत आहोत. हे सारे अन्यायाचे आहे. हे सारे थांबले पाहिले म्हणून, मला दारु पूर्णपणे सोडायची आहे असा विचार करून स्वतःहून दाखल होणारा क्वचितच कुणी आढळेल.
या दाखल झालेल्या मंडळीमधल्या अनेकांना असे वाटत असते की जरा ही बिघडलेली तब्येत ठीक होऊ देत. मग आपण "लिमिट" मध्ये पिऊ. सर्व खेळखंडोबा झाल्यावरदेखिल अजूनही पहिले प्रेम हे दारुच असते. मग काही महिने व्यवस्थित राहिल्यावर मनात येतं इतके दिवस राहिलो मग एक पेग घ्यायला काय हरकत आहे? यानंतर मग प्रयोगशीलतेचे दिवस येतात. आणि त्याचा शेवट अर्थातच घमेलेभर दारु रिचवून पुन्हा उपचार केंद्रात जाण्यात होतो. दारुवरील प्रेम या विषयाचे पुरेसे गांभीर्य लोकांच्या लक्षात आलेआहे की नाही ठावूक नाही. त्यामुळे अनेक वर्षे सोबर राहिलेली भली भली मंडळी घसरत असतात.
कधीतरी असे वाटते समजा एखादी अशी मॅजिकल गोळी निघाली की ज्यामुळे भरपूर दारु पिऊनदेखिल शरीराला काहीही त्रास होणार नाही. तर बहुसंख्य व्यसनमुक्ती केंद्रे ओस पडतील असा माझा नम्र दावा आहे. कारण आपल्या व्यसनामुळे दुसर्या निरपराध माणसांना होणारा त्रास ही मुळी बेवड्यांची प्रायोरिटी नसतेच. व्यसनी माणूस हा इतका टोकाचा स्वार्थी असतो. व्यसनमुक्ती साधायची असेल तर हा दारुबरोबर सातत्याने चाललेला रोमान्स नाहीसा झाला पाहिजे असे मला वाटते.
अतुल ठाकुर
अतुल तुम्ही अतुलनीय काम करता,
अतुल ठाकुर तुम्ही अतुलनीय काम करता, सलाम तुम्हाला.
लेख आणि चर्चा दोन्ही छान.
+11 to Anju's response above.
+11 to Anju's response above.
समजा असा काही प्रॉब्लेम नसेल
समजा असा काही प्रॉब्लेम नसेल तरीही दारू पिणे वाईट / दारू सोडावी का?
माझे वैयक्यिक मत असे आहे की दारु पिणे वाईटच. कारण सोशल ड्रिंकिंग करणारेही कधी व्यसनी होतील सांगता येत नाही. शिवाय "लिमिट" मध्ये पिणार्यांचीही त्यावेळेपुरता काय अवस्था होते हे पाहिले आहे. हे विषाची परीक्षा घेणे आहे असे माझे मत आहे. पण यावर जास्त काही बोलता येणार नाही. मर्यादेत दारु प्यायले तर त्याचे आरोग्याला होणारे फायदे सांगणारी असंख्य मंडळी निघतील. दारु पिऊनही शंभर वर्षे तब्येत ठणठणीत आहे म्हणणारी माणसे असतील. त्यामुळे हे ज्याने त्याने ठरवावे. म्हणूनच लेखातच म्हटले आहे की आमचे काम सुरु होते माणूस दारु पिऊन गटारात लोळू लागल्यावर. त्या आधी त्याने काय करावे कसे सांगणार? आणि सांगुनही कुणीच ऐकत नाही हा अनुभव आहेच.
prashant255 अन्जू, असुफ प्रतिसादाबद्दल आभार!
येथे मी सध्या नक्की काय काम करीत आहे हे माहित असावं म्हणून सांगतो. समाजशास्त्रातील पिएचडीसाठी पुण्यातील मुक्तांगण हा केस स्टडी होता. तेव्हापासून या क्षेत्रात आहे. पिएचडी मिळाल्यावरदेखिल काम सोडावेसे वाटले नाही. तीन वर्षे मुक्तांगणचे द्वैमादिक "आनंदयात्री" चा संपादक होतो. सध्या पोस्ट डॉक्टरेटची तयारी सुरु आहे. एक संकेतस्थळ सुरु केले आहे त्यावर नियमितपणे व्यसनमुक्तीवर लेखन सुरु असते. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणार्या समुपदेशकांचा मुलाखती, सहचरींच्या कथातेथे प्रसिद्ध होत असतात. कुणाला याबाबत मदत हवी असल्यास काय करावे लागेल याबाबत माहिती देतो. योग आणि व्यसनमुक्ती या विषयावर काम करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
माझे अभिनंदन नको. ती पात्रता
माझे अभिनंदन नको. ती पात्रता नाही.
तुम्ही अभिनंदनाचे पात्र आहातच अतरंगी. कारण सिगारेट स्वतःहून सोडणे सोपे नाही. पण तुम्ही ते करून दाखवलेत.
अतुल ठाकुर, तुमच्या कार्याला
अतुल ठाकुर, तुमच्या कार्याला सलाम. अशा कामात असणाऱ्या माणसांना निराश करणारे कितीतरी प्रसंग येत असतील. निराशा सहन करायचं व्यसन असलेलेच लोक हे काम करू शकत असतील.
माझा मुलगा चोवीस वर्षांचा आहे. अद्याप दारू, सिगारेट, तंबाखूपासून लांब आहे. पण आता नोकरी मिळाल्यामुळे पैसे हातात येतात आणि स्वतंत्र राहतो आहे. त्यामुळे खूप काळजी वाटते. तरूण वय आहे. समजूतदार मुलांचाही भरवसा वाटत नाही.
खुप छान लेखन आणि कार्य अतुलजी
खुप छान लेखन आणि कार्य अतुलजी !
खरच छान लेखन फ्रॉम ग्रासरुट
खरच छान लेखन फ्रॉम ग्रासरुट लेव्हल.
मर्यादित दारू पिली तर तिचे
मर्यादित दारू पिली तर तिचे खूप फायदे असतात असा प्रचार पण केला जातो.
त्यामुळे दारू चे शरीरावर होणारे दुष्परिणाम दुर्लक्षित केले जातात आणि त्या मुळे अनेक लोक व्यसनी बनतात.
आसा. खुप खुप आभार
आसा. खुप खुप आभार
फ्रॉम ग्रासरुट लेव्हल.
सामो इतकं बोललात सारं काही मिळालं. आजवर आपलं काम ग्रासरूट लेव्हललाच असावं असं वाटत आलं आहे. कायम तसंच राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
prashant255 सहमत.
कटप्पा अभिनंदन पण स्वतःहून
कटप्पा अभिनंदन पण स्वतःहून असे सोडू शकणारे थोडेच असतात.
-->>> धन्यवाद अतुल सर .
Pages