कलिंगडाची गारेगार कुल्फी
अगदीच मिडलक्लास शीर्षक वाटत असेल तर आपण याला वॉटरमेलन पॉपसिकल्स असेही वाचू शकता.
----------
घरात पहिला फ्रिज किती साली आला आता नेमके आठवत नाही. पण माझे शालेय शिक्षण तेव्हा आटोपले होते एवढे आठवतेय. आमच्या लहानपणी खेळायला मोबाईल नव्हते, असे हल्लीच्या पोरांना आपण बरेचदा कौतुकाने सांगतो. माझे बालपण फ्रिजशिवाय गेले आहे. त्यामुळे थंड पाण्याचेही एक कौतुक होते. नुसता बर्फ चोखण्यातही एक नशा होती. किसलेल्या बर्फाच्या गोळ्यावर सरबत शिंपडले की त्या वयातला जगातला सर्वात भारी पदार्थ तयार व्हायचा. जो जवळपास तितक्याच चवीने रोजच खाल्ला जायचा. त्या गोळ्यावर बाटलीतले सरबत, जे दहापैकी नऊ वेळा कालाखट्टाच असायचे, ते शिंपडताना जेव्हा तो बर्फ संपृक्त अवस्थेत यायचा, तोपर्यंत आपल्या तोंडातले पाणीही त्या अवस्थेला पोहोचले असायचे. आणि मग तो थबथबणारा गोळा हातात घेत आता अजून एकही थेंब गळून वाया जाऊ नये म्हणून पहिलीच जोरदार घेतलेली चुसकी.. आहाहा!.. मित्रांच्या गप्पा त्या चुसकीनंतरच सुरू व्हायच्या.
मग एक तो चम्मच मिळायचा. कुस्करलेला बर्फ ग्लासात टाकून त्यात वरून ओतलेले सरबत. हे गोळ्यासारखे ओठांनी चोखून चोखून खायचे नसून चमचा चमचा तो सरबतमिश्रित बर्फ तोंडात ढकलून चावत चघळत खायचा असतो. म्हणून याचे नाव चम्मच.
पन्नास पैश्याला गोळा मिळायचा. एक रुपयाला चम्मच. एक रुपयाला सरबत देखील मिळायचे. आम्ही आठ आण्याचा गोळा घेऊन एक रुपयाचे सरबत घ्यायचो. आणि तो गोळा त्यात बुडवून बुडवून खायचो. लवकरच हा प्रकार ईतका हिट झाला की त्या भैय्याने स्वत:च गोळासरबत असा स्पेशल आयटम दोन रुपये लाऊन विकायला सुरुवात केली.
असो, विषयावर येऊया... तर कलिंगडाची गारेगार कुल्फी
उन्हाळा सुरु झाला की रोज रात्री बिल्डींगमध्ये कुल्फीवाला यायचा. पोराथोरांना सगळ्यांनाच हि कुल्फी आवडायची. ऐय कुल्फीssssय्य... अशी आरोळी ऐकली की बासरीवाल्याच्या मागे उंदरे जमावीत तसे लोकं घरातून बाहेर पडायचे आणि बघता बघता दादरावर कट्टा जमायचा. दक्षिण मुंबईतील जुन्या बिल्डींगमध्ये राहण्याची हिच मजा होती.
ईतरवेळी गोळ्याच्या नावाने नाक मुरडणारे घरचे मोठे लोक्स, हि कुल्फी दूधाची असते म्हणून स्वत:हून खाऊ घालायचे. हा दूधाचा फंडा पेप्सीकोल्यालाही लागू व्हायचा. पेप्सीकोला हे समजावे म्हणून लिहिले अन्यथा पेप्सीच म्हटले जायचे. हल्ली पेप्सी म्हटले की ते डब्बा बाटलीतले फसफसणारे पेय आठवते. तेव्हा पेप्सी म्हटले की विषय संपला. क्रिकेट खेळून झाल्यावर पेप्सी खाऊनच घरी जायचे हे कंपलसरी होते. तर आपल्या पोराने दूधाची पेप्सीच खावी असे घरच्यांना वाटायचे. पण कुठल्याही पोराला विचाराल तर त्याला त्याच्या निम्म्या किंमतीत मिळणारी सरबताची पेप्सीच चोखायला आवडायची. काल जेव्हा घरी कलिंगडाची कुल्फी बनवली तेव्हा सर्वात पहिले आठवली ती हिच पेप्सी. या पेप्सी आणि पॉपसिकल्स शब्दांचा आपसात काही संबंध असल्यास कल्पना नाही.
असो, विषयावर येऊया... तर कलिंगडाची गारेगार कुल्फी
तर फ्रिज घरात नसला तरी काकामामांकडे होता. सुट्टी पडली की आळीपाळीने एकेकाच्या घरी जाणे व्हायचे. तेव्हा भावंडांना हाताशी धरून रोजचाच हा उपक्रम असायचा. पाण्यात वा दूधात विविध प्रकारचे सरबत, फळांचे रस वा खाऊच्या गोळ्या पाण्यात विरघळवून तो द्रव पदार्थ विविध आकारांच्या पात्रात फ्रिजरमध्ये ठेवायचा आणि सेल्फमेड आईसक्रीमचा लाभ घ्यायचा. रोज आईसक्रीम केले नाही तर फ्रिजचे पैसे वसूलच होणार नाहीत हि माझी तेव्हा ठाम धारणा होती. फ्रिजचे माझ्यामते तेव्हा दोन आणि दोनच उपयोग होते. एक म्हणजे थंड पाणी किंवा बर्फ मिळते आणि दुसरे आईसक्रीम.
पुढे फ्रिज घरी आला तेव्हा मी कॉलेजला जाऊ लागलो होतो. नव्याचे नऊ दिवस म्हणून हे आईसक्रीमचे खेळ केले. पण तेव्हा त्यात मजा घ्यायचे वय उरले नव्हते म्हणा की भावंडांची सोबत नव्हती म्हणा. तितकीशी मजा कधी आलीच नाही.
आता मात्र लॉकडाऊन काळात कुल्फीपात्रांचा खजिना हाती लागला. सोबत तितकीच उत्साही पोरंही होती. त्यामुळे पुन्हा एकदा या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. सुरुवात आपल्या याच शीर्षकातील कलिंगडाच्या गारेगार कुल्फीने ...
पाकृ अगदी सोपी आहे. बहुतेकांना माहीत असेलच. तरीही औपचारीकता पुर्ण करतो -
१) कलिंगड छानपैकी कापायचा. मस्त छोटेमोठे तुकडे करून त्यातील बिया सुरीने अलगद काढून घ्यायच्या.
आमच्याकडे हे काम आईने केले.
२) मग ते तुकडे मिक्सर, ज्युसर आदि मशीनीत टाकून त्यांचा रस काढायचा. तो छानपैकी गाळून घ्यायचा आणि त्यात चवीनुसार मीठ, साखर टाकायचे.
आमच्याकडे हे काम बायकोने केले.
३) मग तो ज्यूस कुल्फीपात्रात भरायचा. संदर्भासाठी खालील फोटो बघू शकता. ते पात्र डीप फ्रिजरमध्ये ठेवायचे. एक बराच मोठा जीवघेणा काळ वाट पाहायची. सारखे फ्रिजचा दरवाजा उघडू नये हे सतत मनाला बजावत राहायचे. तरीही अधूनमधून उघडून चेक करत राहावे. त्याशिवाय मनाचे समाधान होत नाही. अखेर कुल्फी जमली असे वाटले की दांडीला पकडून खचकन खेचून बाहेर काढावी
आमच्याकडे हे काम पोरीने केले.
४) त्याचा छानपैकी फोटो काढून अपलोड करावा. माजघरातील पदार्थ जगभरात पोहोचवावा. आणि कुल्फी खाण्यातील आनंद द्विगुणित करावा.
आमच्याकडे हे काम.... अर्थात, मीच केले
५) मग काय, मस्त पेप्सीकोल्यासारखे चोखत चोखत खायची.
अरे हो,
आमच्याकडे हे काम सर्वांनी केले. पुन्हा पुन्हा केले. करतच आहेत. काय करणार, चव तोंडाला लागली की कंट्रोलच होत नाही
अवांतर - काकांनी काकूला कौतुकाने कवेत कोंडले कारण काकूंनी किचनमध्ये कलिंगड कापून कलिंगडाची कुल्फी केली
कु. ऋन्मेष
कुणाल कपुरच्या रेसिपीत
कुणाल कपुरच्या रेसिपीत मिंटसुद्धा आहे!
नमनाला घडाभर तेल चार
नमनाला घडाभर तेल चार ओळींच्या रेसपीसाठी अख्ख्या बालपणाच्या कथा ऐकवल्या
कलिंगड आईस कॅन्डी किंवा पॉपसिकल्स म्हणणं योग्य राहील. कारण माझ्या ज्ञानानुसार कुल्फी फक्त शेपला म्हणत नाहीत, तर कुल्फी दुधाचीच असावी लागते (याबद्दल खात्री नाही). ही बनवलेली कुल्फी शेपची आईस कँडी आहे.
यात कलिंगड ज्युसमध्ये थोडा लिंबू रस, मिंट आणि चाट मसाला घातला तर मस्त sweet n tangy चव मिळेल.
मस्त दिसतेय. आम्ही लहानपणी या
मस्त दिसतेय. आम्ही लहानपणी या कुल्फीपात्रात नुसता बर्फही बनवून खाल्लाय. कधीकधी साखरपाण्याचा बर्फ.
लिंबू रस चाट मसाला मिंट.. येस
लिंबू रस चाट मसाला मिंट.. येस आता सगळं टाकून बघण्यात येईल. कलिंगड मुबलक आहेत. दुधाचाही तुटवडा नाही ईथे. घरी दोनेक सरबत आहेत. रोज (गुलाब), ऑरेंज वगैरे, रसना टॅंण्ग्ग सारखे प्रकारही आहेत. ईथे काही आयड्या मिळाल्या तर पुढच्या वेळेला खाली जाईन तेव्हा ते सामान आणता येईल
मी काही नाही केले तर वावे म्हणतात तसे पोरं बर्फ चघळण्यातच धन्यता मानतील
कलिंगड आईस कॅन्डी किंवा
कलिंगड आईस कॅन्डी किंवा पॉपसिकल्स म्हणणं योग्य राहील.
>>>>
पण मराठीत काय बोलणार
कलिंगडाचा बर्फ
कलिंगडाचा बर्फ
मी काही नाही केले तर वावे
मी काही नाही केले तर वावे म्हणतात तसे पोरं बर्फ चघळण्यातच धन्यता मानतील Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष>>
सध्याच्या परिस्थितीत तब्येती सांभाळा.
कलिंगडाचा बर्फ
कलिंगडाचा बर्फ
>>>>
जर कुल्फी दुधाचीच हवी हा न्याय लावला तर बर्फही पाण्याचाच हवा
सध्याच्या परिस्थितीत तब्येती सांभाळा.
>>>
हो वीरू, धन्यवाद.
हे कोरोना प्रकरण सुरु झाल्यापासून मुलांना थंड आणि तेलकट काही खाऊ दिले नाही. स्पेशली खोकला होईल असे खाणे आम्ही सारेच टाळत आलोय. अजूनही टाळतो. फक्त आता थोडीशी बंधने शिथिल करून आईसक्रीमला अध्येमध्ये शिरकाव करू दिलेय. अर्थात आईसक्रीन खाल्ल्यावर लगेच नॉर्मल पाणी प्यायचे कटाक्षाने पाळतो जेणेकरून खोकल्याची शक्यता कमी होते.
मस्त!
मस्त!
पन्नास पैश्याला गोळा मिळायचा.
पन्नास पैश्याला गोळा मिळायचा. एक रुपयाला चम्मच. एक रुपयाला सरबत देखील मिळायचे. आम्ही आठ आण्याचा गोळा घेऊन एक रुपयाचे सरबत घ्यायचो. आणि तो गोळा त्यात बुडवून बुडवून खायचो.
>>>> कधीची गोष्ट आहे..... इतका स्वस्त ??
कधीची गोष्ट आहे..... इतका
कधीची गोष्ट आहे..... इतका स्वस्त ??
>>>
नेमके कुठले कितव्या वर्षी आता नक्की सांगता येणार नाही. पण नव्वदच्या दशकातले आहेत. मला माझ्या चौथीपासूनचे खाद्यपदार्थांचे भाव आठवतात. कारण शाळेतील स्कॉलरशिप एक्स्ट्रा क्लासेसमुळे त्यावर्षीपासून मला चांगला पॉकेटमनी मिळायला आणि माझे हे गोळा चम्मच आणि वडापाव खाणे सुरु झाले. सगळ्यात स्वस्त गोळा मी ५० पैश्यांचा खाल्लाय आणि वडापाव दोन रुपयांचा. मला वाटते २ रुपयाचा वडापावचा भाव बरच काळ स्थिर होता नव्वदच्या पूर्वार्धात
रोज (गुलाब), ऑरेंज वगैरे,
रोज (गुलाब), ऑरेंज वगैरे, रसना टॅंण्ग्ग सारखे प्रकारही आहेत >>>> दूध जर मुबलक असेल तर ते आटवून किंवा त्यात मिल्कमेड घालून घट्ट करा आणि मग रोज सिरप + गुलकंद घालून मस्त आईस्क्रीम होईल.
रसना आणि Tang असेल तर अजूनच मज्जा. या दोन्हीच्या आईस कॅन्डीज मस्त होतील. आम्ही लहानपणी अशाच कुल्फीच्या मोल्डमध्ये रसना ओतून खूप बनवल्या आहेत.
गोळा मि ही 1 रुपये , आठ अणे
गोळा मि ही 1 रुपये , आठ अणे चा खाल्लेला आहे... 80ज मध्ये जन्मलेल्या मुलांना हे 1 रूपयाचे गोळा चम्मच वगैरे माहित नाही हे कठिण आहे....
कुल्फी रेसिपी मस्त आहे आणि लहानपणी च्या आठवणी ही !
रुन्मेष तुझी पिल्ले गोड आहेत
रुन्मेष तुझी पिल्ले गोड आहेत दोन्ही....
मला वाटते २ रुपयाचा वडापावचा
मला वाटते २ रुपयाचा वडापावचा भाव बरच काळ स्थिर होता नव्वदच्या पूर्वार्धात>>>
८९ आणि ९० ला १ रुपया होता, ९१ ला सव्वा रुपया झाला.
दीड रुपया ९३ पर्यंत होता मग सरळ २ झाला बहुतेक.
लहानपणीच्या आठवणी जाग्या
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. पेप्सी खाणे खूप भारी वाटायचे तेव्हा. फक्त पेप्सी खायला पंधरा मिनिटे लांब चालत जावे लागायचे , तरी जायचो.
दोन्ही मुले मात्र खरंच गोड आहेत.
लहानपणीच्या आठवणी ताज्या
लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.. आमच्या वेळी दोन रूपयाला साधा गोळा आणि चमच गोळा चार रूपयाला होता ..
मस्त रेसीपी ऋन्मेऽऽऽष .. माझ्याकडे ते साचे नाहीत.. म्हणून म्हशीच्या घट्ट दुधात आणि थोड्या सायेत रूह अफ्जा, साखर, आणि सब्जा मिसळून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवतो..नंतर क्युब झाल्यावर काढून खातो.. छान लागतं...
दूध जर मुबलक असेल तर ते आटवून
दूध जर मुबलक असेल तर ते आटवून किंवा त्यात मिल्कमेड घालून घट्ट करा आणि मग रोज सिरप + गुलकंद घालून मस्त आईस्क्रीम होईल.
>>>>
करतो हे ट्राय. परवाच रोज सिरप आणलेय. आज सरबत केलेले. ते जास्त झाले म्हणून उरलेले लगेच या कुल्फीपात्रात लावले. ते गट्टम करून झाल्यावर दूधाचा प्रयोग करणारच होतो. प्लस आता आपण म्हटल्याप्रमाणे मिल्कमेडही बघतो. त्यानंतर ऑरेंज टॅनगचा नंबर
@ अजय चव्हाण, येस्स म्हशीचे दूध आणि सब्जा ट्राय करतो..
रुन्मेष तुझी पिल्ले गोड आहेत
रुन्मेष तुझी पिल्ले गोड आहेत दोन्ही....
धन्यवाद अनिश्का
80ज मध्ये जन्मलेल्या मुलांना हे 1 रूपयाचे गोळा चम्मच वगैरे माहित नाही हे कठिण आहे....
>>>>>>
हो निदान मुंबईमध्ये तरी तेव्हा वडापावसोबत हेच हिट होते. आतासारखे सतरा प्रकार नव्हते.
दीड रुपया ९३ पर्यंत होता मग
दीड रुपया ९३ पर्यंत होता मग सरळ २ झाला बहुतेक.
>>>>>
९६ सालीही दोनचाच होता.
आमची शाळा. दादरची किंग जॉर्ज नावाने ओळखली जाणारी राजा शिवाजी विद्यालय. शाळेबाहेरचा वडापाव शाळेईतकाच फेमस. जवळपास रोज खाणे व्हायचे. तो वडापाव दोन रुपयाचा होता आणि कॅन्टीनमध्ये नुसता वडा अडीच रुपयांचा होता. अर्थात कॅन्टीनचा वडाही क्लास होता. आणि तिसरा पदार्थ हॉटडॉग. जे आमच्या शाळेत शिकले त्यांनी मला तसा हॉटडॉग कुठे खायला मिळेल हे जरूर सांगा. पुन्हा तेवढ्यासाठी नवीन धागा काढत नाही.
त्याच काळात दादरच्याच श्रीकृष्णचा फेमस वडा चार रुपये होता.
दोन्ही मुले मात्र खरंच गोड
दोन्ही मुले मात्र खरंच गोड आहेत. > धन्यवाद
फक्त पेप्सी खायला पंधरा मिनिटे लांब चालत जावे लागायचे , तरी जायचो.
>>>
भारी आहे.
आमच्या तर खालच्या दुकानांमध्येच मिळायचे. पण एकदा भारत बंद असताना रस्त्यावर क्रिकेट खेळून झाल्यावर जवळची दुकाने बंद असल्याने या पेप्सीसाठी पंधरा मिनिटे तंगडतोड केलेली.
मस्त दिसतंय आईस्क्रीम,
मस्त दिसतंय आईस्क्रीम, भन्नाट.
पण कलिंगड कापलं की एवढा धीर नसतो आमच्याकडे त्यामुळे आम्ही खाऊन मोकळे होतो, त्या फोडीच मस्त गारेगार लागतात, तोंडात विरघळतात.
इतकी मेहनत आणि सर्व एकेक जबाबदारी घेऊन करणाऱ्या, पूर्ण family चं कौतुक वाटतं, विशेषतः आई, बायको, मुलीचं. त्यांची मेहनत आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तुमचंही कौतुक.
ऋन्मेष मी देखील किंग जॉर्ज चा
ऋन्मेष मी देखील किंग जॉर्ज चा विद्यार्थी . कसला विलक्षण
योगायोग ना .
पण कलिंगड कापलं की एवढा धीर
पण कलिंगड कापलं की एवढा धीर नसतो आमच्याकडे त्यामुळे आम्ही खाऊन मोकळे होतो,
>>>>>
हो, म्हणून जास्त कलिंगड आणली. आधी खाऊन घेतली पोटभर मग हा पुढचा उपद्व्याप केला
@ कटप्पा, कुठली बॅच?
मस्त रेस्पी.... पोरांसाठी
मस्त रेस्पी.... पोरांसाठी वेगळी काढून बाकीच्या प्रौढांच्या कुल्फीत थोडा वोडका घातला तर अजून मजा येईल....
दोन हजार चार . तुमची?
दोन हजार चार . तुमची?
रून्म्या रेसिपी आवडली पण
रून्म्या रेसिपी आवडली पण फारशी ह्या प्रकाराची आवड नाही. बर्फ का गोला प्रकार कधी खाल्ला नाही. ही पाक्रु गोळ्याची बहीण ! पोरं गोssssड आहेत तुझी..
बाकीच्या प्रौढांच्या कुल्फीत
बाकीच्या प्रौढांच्या कुल्फीत थोडा वोडका घातला तर अजून मजा येईल....
>>>>
दारूची कुल्फी बनते छान?
आमच्याकडे नवीन फ्रिज आलेला तेव्हा पेप्सी कोक थम्सप असे फसफसणारे पेय मी बर्फाच्या भांड्यात भरायचो. छान आंबटगोड भुसभुशीत क्यूब व्हायचे. जिभेला मस्त चरचरायचे चोखताना. पण आता तसली पेयं सोडून काही वर्षे झाली..
पोरं गोssssड आहेत तुझी..>>
पोरं गोssssड आहेत तुझी..>> धन्यवाद मंजूताई थोssssssडी बापावर गेलीत
बर्फ का गोला प्रकार कधी खाल्ला नाही.
>>>>
मग तहान कसे भगवायचा तुम्ही लहानपणी
हल्ली मॉलमध्ये मिळतो हा गोळा ५० रुपयात. शुद्ध सात्विक पाणी वापरून केलेला. तो ट्राय करू शकता. मी नाही कधी तो खाल्ला.
मी वालचंद सांगलीला असताना तिथे आम्ही मलाई गोळे खायला जायचो. सतरा प्रकारचे मिळायचे. आता आठवत नाहीत त्यांचे नावे आणि प्रकार. सोबत काही गुज्जू मित्र होते ते नेहमी जायचे. त्यांच्यासोबत आम्ही कधीतरी जायचो. मॉलमध्येही बरेच प्रकारचे आता मिळत असावेत.
@ कटप्पा मी ९६
पाकृ जेवढी भन्नाट आहे तेवढीच
पाकृ जेवढी भन्नाट आहे तेवढीच भारी लिहिली आहे, ह्याला लेख म्हणायला हरकत नाही .
असेच छान छान लेख येऊ द्यात बरं
घरातल्या कुल्फीपात्राचे उदघाटन ह्या रेसीपीने करीन आता
आणि हो, पोरं गोड आहेतच
कुणावर गेलीत ते आम्ही सौ अभिषेक ह्यांचा फोटो पाहून ठरवू
Pages