भर उन्हाळ्यातली दुपारची वेळ होती. रणरणतं ऊन, तापलेला काळा कुळकुळीत डांबरी रस्ता, अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वाऱ्याच्या झळा ह्या टिपीकल उन्हाळ्यातच घडणाऱ्या बाबींनी जेरीस आणलं होतं. तिचं मन कासावीस होत होतं. जिकडे बघावं तिकडे रखरखाट नुसता! मध्येच एखादं हिरव्याकंच पानांच्या वैभवाने नटलेलं झाड दिलासा देऊन जाई. पण तेवढ्यापुरतं तेवढंच. तहान तर जन्मोजन्मी पाणी न प्यायल्यासारखी लागत होती. सतत घसा कोरडा पडत होता. जवळचं पाणीही संपत आलं होतं. जे होतं तेही गरम झालं होतं. कधी एकदा घरी पोचतेय आणि घटाघटा गार पाणी पितेय असं तिला झालं होतं. पण महामंडळाच्या बसेस वेळेत कुठल्या पोचायला? बस चुकायची असेल तेव्हा मात्र वेळेवर निघून जातात. पण आपण बसलो असताना नेमका उशीर करतात, हळूहळू जातात. मध्येच बंद काय पडतात. एक ना अनेक गोष्टी. पण आज काहीही करून लवकर घरी पोचलंच पाहिजे. एक बरंय, नशिबाने खिडकीची जागा मिळालीये. नाहीतर गर्दीत गरमीने जीव घुसमटतो. असं वाटत श्वासच घेऊ नये. वारं येत असलं तर श्वास कोंडतही नाही. गाडी लागण्याची शक्यताही कमी होते.
तिच्या विचारांचा ओघ गाडीच्या वेगाबरोबर पळत होता. गाडीच्या मागच्या बाजूला बसल्यामुळे तिला धक्के जरा जास्तच जाणवत होते. छोट्या छोट्या गावांना जोडणाऱ्या मोठ्या रस्त्यावरून प्रत्येक खड्ड्याची शरीराच्या हाडांना जाणीव करून देत महामंडळाची लाल परी धावत, छे धावत कसली, उडत होती. ती घाईघाईत गावाला जायला निघाली होती. त्यामुळे धड जेवण झालं नव्हतं. कडाडून भूक लागली होती. एखादे बरे स्टेशन आले कि काहीतरी चारीमुरी खाऊन घेऊ असा विचार करून ती गप्प राहिली होती. असंही तिच्याकडे थोडेसेच पैसे होते. ते खाण्यावर खर्च झाले तर घरी काय आणि किती देणार हा प्रश्न होता. तिने तिकिटाचेच पैसे कसेबसे जमवले होते.प्रत्येक रुपयाची किंमत तिच्यासाठी लाखमोलाची होती. ह्या गाडीला तिकीट कमी म्हणून एक्सप्रेस सोडून ती ह्या प्रत्येक स्टॉपवर थांबणाऱ्या बस मध्ये बसली होती. जरा जीवाला बरे वाटावे, उपाशी पोटी पित्त वाढून मळमळ होऊ नये म्हणून तिने वाऱ्याच्या उष्ण झळा सोसत खिडकीत बसणे पसंत केले होते. खिडकीच्या खिळखिळ्या तावदानांचा खडखड आवाज, वाऱ्याचा आवाज, गाडीच्या इंजीनाचा आवाज ह्या सगळ्यांनी त्या प्रवासाला एक लय प्राप्त करून दिली होती. बाटलीचे झाकण उघडून एक घोट पाणी प्यायली तशी तिला थोडी हुशारी आली. दुपारची वेळ असल्यामुळे बसमध्ये त्यामानाने गर्दी कमी होती. यातल्या त्यात हे एक बरं वाटलं तिला.
भरभर वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर तिचे केसही उडत होते. एका हाताने केस सावरत दुसऱ्या हातात तिची पिशवी घट्ट धरून ती बसली होती. स्वतःचे आयुष्य ह्या उन्हाळ्यातील दुपारच्या वेळेप्रमाणे आहे असे तिला वाटले. नुसता रखरखाट! अवचित येणाऱ्या पावसाच्या सरीची वाट पाहण्याचा अगतिकपणा किती दाहक असतो हे त्या आग सहन करण्याऱ्या उघड्या बोडक्या माळालाच माहित. तसंच झालंय. ह्यातून सुटका होईल का?
ह्या अशा विचारांनी ती अधिकच निराश झाली.
तिचं गाव दुष्काळी भागातलं. पाणीटंचाई कायमच पाचवीला पुजलेली. गावात शिक्षणाची सोय असली तरी त्या मानाने उद्योगधंदे कमी होते. ती बऱ्यापैकी शिकलेली होती. थोडंफार इंग्रजी येत होतं. त्याच्या बळावर तिने तालुक्याला एका खाजगी दवाखान्यात रिसेप्शनिस्टची नौकरी धरली होती. दवाखाना फार मोठा नव्हता. जेमतेम पगार मिळत असे. त्यात ती स्वतःचे खर्च भागवून कुटुंबासाठी बचत करत असे. खरेतर असं म्हाताऱ्या आई वडिलांना घरी सोडून तालुक्याला राहणे तिला परवडत नव्हते व आवडतही नव्हते. पण सध्यातरी उत्पन्नाचे दुसरे साधन मिळेपर्यंत तिला ही नौकरी करणे भाग होते.गावातच एखादा छोटासा व्यवसाय करावा असे तिच्या मनात होते. पण भांडवल उभे करण्यासाठी पैसे कुठून आणणार?
खरेतर तिच्या हातात कपडे शिवण्याची कला होती. स्त्रियांचे ड्रेसेस ती सुरेख शिवत असे. dress designer होण्याचे तिचे स्वप्न होते. पण त्या क्षेत्रात ती शिक्षण घेऊ शकली नाही. फॅशन क्षेत्रात तिचे डोके खूप चालत असे. नवीन काय ट्रेंड्स आलेत, कशाची फॅशन कुणाला चांगली दिसेल ह्या गोष्टी तिला सहज सुचत आणि जमत. साधा कुर्तासुद्धा ती सफाईदारपणे शिवत असे.
पण सगळ्यांचीच सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत. आपल्या अधुऱ्या स्वप्नांना उराशी बाळगत तिने वर्तमानातील वास्तव स्वीकारले होते. असंही काही दिवसात घरचे त्यांना जमेल तसं आणि वाटेल तसं तिचं लग्न लावून देणार होते. तिचा होणारा नवरा तिला एकदाच भेटला होता. त्या एकाच भेटीत तिच्याशी खूप तुसडेपणाने वागला. पण त्याला घरच्या सगळ्यांनी तिच्यासाठी आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं होतं. ती काही बोलूच शकली नाही. सगळंच आपलं प्रारब्ध असं समजून ती निमूटपणे समोर येईल ते स्वीकारत राहिली. स्वतःच आयुष्य रखरखीत असणार हे गृहीत धरलं की जास्त त्रास होत नाही असं तिला वाटत असे.
--------------------------------------------------------------
#killicorner
**किल्ली**
---------------------------------------------------------------
(क्रमशः )
भाग २ येथे वाचा : https://www.maayboli.com/node/74535
व्यक्तिरेखा छान फुलवली आहे.
व्यक्तिरेखा छान फुलवली आहे. पुभाप्र
@किल्ली छान लय पकडली आहेस,
@किल्ली छान लय पकडली आहेस, फ्लो मेंटेन कर. पुभाप्र
तिच्या विचारांचा ओघ गाडीच्या
तिच्या विचारांचा ओघ गाडीच्या वेगाबरोबर पळत होता.
>>> वाह... क्या बात...
स्वतःचे आयुष्य ह्या उन्हाळ्यातील दुपारच्या वेळेप्रमाणे आहे असे तिला वाटले. नुसता रखरखाट! अवचित येणाऱ्या पावसाच्या सरीची वाट पाहण्याचा अगतिकपणा किती दाहक असतो हे त्या आग सहन करण्याऱ्या उघड्या बोडक्या माळालाच माहित.
>>> बहुत खूब....
मस्त सुरुवात! पुभाप्र!!
मस्त सुरुवात!
पुभाप्र!!
मस्त सुरुवात ...
मस्त सुरुवात ...
कारुण्याची झालर असलेल्या ह्या कथेचा सुखान्त व्हावा अशी मनोमन प्रार्थना !
छान सुरुवात.
छान सुरुवात.
खुप छान सुरूवात.
खुप छान सुरूवात.
छान. पुभाप्र.
छान. पुभाप्र.
लाल 'एष्टी' बसमध्ये बसण्याचा
लाल 'एष्टी' बसमध्ये बसण्याचा क्वचित एखाद दुसरा लहानपणीचा अनुभव आहे, पण तुम्ही इतकं सुरेख वर्णन लिहिलं आहे की तो उन्हाळा, गरम पाण्याची चव, खडखड वाजणाऱ्या खिडक्या सगळं अनुभवल्यासारखं वाटलं. फार छान लेखनशैली आहे.
छान सुरुवात!
छान सुरुवात!
छान सुरुवात पल्लवी. शुभेच्छा.
छान सुरुवात पल्लवी. शुभेच्छा.
खुप खुप आभार
खुप खुप आभार
जुई, पाफा, प्राचीन, स्वाती२,मीरा, आसा, च्रप्स , अज्ञातवासी , अज्ञानी ,सिद्धि', Cuty
मस्त सुरुवात पुभाप्र
मस्त सुरुवात
पुभाप्र
खुप खुप आभार mr.pandit
खुप खुप आभार
mr.pandit
आजकल लोग मेरी तरह पाप बढाने
आजकल लोग मेरी तरह पाप बढाने लगे है!
(बादवे कुणीतरी ९९ करा रे, म्हणजे मला १०० गाठता येईल
झाले ९९
झाले ९९
झाले १००
झाले १००
किल्ली ताई, शेवटचा भाग कधी
किल्ली ताई, शेवटचा भाग कधी येणारे?? मी तेव्हाच सलग सगळे भाग वाचेन. :"तु तुच ती" कथेच्या अनुभवाची घट्ट गाठ बांधलेली बाहुली:
@अज्ञातवासी, तुझी पाप काढु का रे बाहेर?
अज्ञा, पाफा धन्यवाद
अज्ञा, पाफा धन्यवाद
मला बराच वेळ समजले नव्हते, हे 99 आणि 100 बद्दल .
मन्या ,
लिहितेय पुढचा भाग,लवकरच पोस्ट करेन
शेवटच्या भागाचं माहीत नाही, honestly, still developing the stoey
अज्ञा, पाफा धन्यवाद
अज्ञा, पाफा धन्यवाद
मला बराच वेळ समजले नव्हते, हे 99 आणि 100 बद्दल .
>>>>
शक्य आहे "दुपार-२" चा विचार करत असशील ना?
पुढचा भाग येऊ दे लवकर. त्यासाठी मेंदू दुखला तरी चालेल, पण "बोटं" नको दुखायला. :डोमा :
नक्की!
नक्की!
रच्याकने....
हा भाग सुंदर झालाय!
धन्यवाद मन्या
धन्यवाद मन्या