लहानपणी शिकारी प्राणी म्हटलं की फक्त वाघ, सिंह, लांडगा हेच यायचे. लहानपणीच्या गोष्टीतल्या वाघाभोवती जे गूढ वलय आहे ना, ते कधी संपतच नाही. मोठं झालं तरी. वाघाच्या कथा ऐकून ते उत्तरोत्तर अजून वाढत जातं. जंगलात जाऊन येणा-या लोकांचे व्याघ्र दर्शनाचे किस्से ऐकले की आपल्याला वाटतं ‘अरे, आपल्याला पण जायला हवं.’
जंगलात गेल्यावर सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते की ‘देवा, वाघ दिसू दे बाबा.’ हीच नव्हाळीची आशा घेऊन फिरताना वाघ दिसला की धन्य धन्य वाटायचं. नंतर कळालं की या एका वाघाच्या नादात आपण जंगलातल्या उत्तमोत्तम दृश्यांना मुकलो आहोत. वाघ तेच, तसेच, पिवळ्यावर काळे पट्टे. या दोन रंगांच्या नादात खूप रंगीत अनुभव सुटले. हा शहाणपणा यायला बराच काळ, बरेच वाघ आणि बरेच अनुभव नजरेसमोरुन जावे लागले.
पण जसा जसा जंगलांचा संबंध येत गेला तसं तसं समजायला लागलं की या दुनियेत बाकी पण भारी शिकारी भरपूर आहेत. एक एक भेटत गेले, ओळख सांगत गेले.
सर्वात आधी आयुष्यात आलेली ही शिकारी माशी, कुंभारीण. मी खूप वेळा हिला पाहिलं, नाकतोडा, अळी, रातकिडा, कोळी, काय काय शिकार करुन न्यायची. आता अशा वयात ही दिसली की त्यावेळी कशाचीही गंमत आणि कशाचाही खेळ वाटे. कधीतरी लहानपणीच्या अशा किड्यांच्या खेळांवर लिहिन म्हणतोय. तर त्यावेळी फुलपाखरांच्या मागं धावताना कुठंतरी गवतात अळी-किडा शोधणारी ही माशी दिसायची. गवताच्या काडीला घट्ट चिकटलेल्या एखाद्या रसरशीत अळीशी कुस्ती करुन तिला उडण्याच्या सरळ रेषेत बरोबर पकडून ही माशी न्यायची. तिच्या इतक्या सूक्ष्म मेंदूत वायूगतीशास्त्राचं ज्ञान अगदी अचूक होतं. तिच्या मागं पळत गेलं की मग दिसायचं की ती त्या अळीला कुठं घरात ठेवते. अशीच ही कुंभारीण कोइंबतूरजवळ दिसली रातकिड्याची शिकार करताना.
याला पाहिलं की मला पाथर्डी-डांगेवाडीच्या दूधवाल्यानं सांगितलेलं नाव आठवतं, ‘टंपूस’. शाळेत याचं नाव शिकवलं ‘प्रार्थना कीटक.’ याचे पुढचे पाय सतत देवाला प्राथना करीत असल्यासारखे जोडलेले. पण खरं तर हे याचं शिकारीचं अवजार आहे. चूपचाप बसून राहतो आणि टप्प्यात शिकार आली की झडपून उचलतो. याच्या पायांवरच्या उलट्या काट्यातून शिकारीची सुटका म्हणजे अशक्य. याचं ‘प्रेयिंग मॅंटीस’ हे इंग्लिश नाव पाहिलं की भाषेची वेगळीच गंमत दिसते. हे प्रेयिंग खरं तर praying असं आहे. पण हा गडी पक्का मांसाहारी शिकारी असल्यानं हे ‘Praying mantis’ लिहीलं काय आणि ‘Preying Mantis’ लिहीलं काय, दोन्ही नावं अचूक लागू पडतात. हा दिसला मला मुदुमलाईच्या जंगलात.
आणि ताडोबामध्ये दिसलेला हा. आधी देवापुढं नतमस्तक. ‘Praying mantis’ ‘प्रार्थना कीटक.’
तोच मग शस्त्र परजून बसलेला ‘Preying mantis’
पेंचच्या जंगलात कुठल्याश्या किड्याचा फन्ना उडवताना हा एक दिसला.
विंचू आता दुर्मिळ झाल्यागत. शहरातून हद्दपार. मला ५-७ अगदी पक्क्या आठवणी आहेत. एकदा असाच जेवण करुन खिडकीत बसलो. शाळेत जायला उठलो तर माझ्या पाठीमागे खिडकीच्या कोप-यात विंचू. एकदा नागझि-यात सकाळी उठलो, अंथरुण उचलून ठेवायचं म्हणून उशी उचलली, तिच्याखाली विंचू. एकदा मावशीच्या घरी झाड लावायला खड्डा करत होतो, त्यातली माती हातानं बाजूला करत होतो. अचानक खड्ड्याच्या तळाला काळी चमकदार वस्तू. काडीनं उकरलं तर इंगळी होती. जाऊ द्या. असे सारेच विंचू आता नाही लिहीत. हा एक मला कोईंबतूरला सापडला होता. त्याला मी खूप दिवस पाळला मग नंतर सोडून दिलं. माझ्या पाळीव प्राण्यांवर पण एक लेख लिहीन. : ) याच्या जाड-जूड नांग्या बघून धास्तावला असाल तर विंचवाबाबत एक मनोरंजक माहिती सांगतो, ‘ज्या विंचवाच्या नांग्या जाड, त्याला विष कमी.’ अर्थात हे ब्रह्मवाक्य नाही हं. जीवशास्त्रात कुठलीच गोष्ट पक्क्या नियमात बसवता येणार नाही असे अनुभव आल्यामुळं हा एक इशारा. आपल्याकडं कोकणात विंचू चावून पूर्वी लोक मरायचे. ते सारे विंचू सडपातळ नांग्यांचेच. आता राहवत नाही म्हणून जाता जाता सांगतो. विंचू चावून होणा-या मृत्यूंवर काहीही औषध नव्हतं. अगदी विदेशातसुद्धा लोक मरत होते. १९८०-८२ च्या आसपास डॉ. हिम्मतराव बावस्कर या जिद्दीच्या माणसानं यावर उपाय शोधला आणि जगभरात हे मृत्यू थांबले. यांची माहिती अवश्य वाचा. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3893953/
वडील वारल्याची तार हातात घेऊन त्यांनी रुग्णावर उपचार सुरु केले आणि त्या रुग्णाला वाचवलं. ‘डॉक्टरसाहेब सलाम.’
मुदुमलाईत एका मस्त दुपारी एक फुलपाखरु उडत आलं आणि छान बसलं गवताच्या पात्यावर. मी खूश. म्हटलं “आला रे माझा बाबू.” मी कॅमेरा घेऊन हळू हळू जवळ गेलो तर बाबू पळून गेला. असं २-३ वेळा झालं. एकतर अशा जंगलात बिबट कुठं टपला असेल, वाघ कुठून निघेल, कुठून हत्ती धावेल आणि कुठं अस्वल आरामाला पडलं असेल काही सांगता येत नाही. त्यामुळं चौफेर लक्ष ठेवूनच चालावं लागतं. नाहीतर आपण वाकून, लपत-छपत जाणार आयतेच बिबट्याच्या तोंडात मान द्यायला. आता ते फुलपाखरु दगडावर स्थिरावलं. मी हळू पुढं सरकलो आणि श्वाससुद्धा बंद करुन टाकला. इतक्यात उजव्या हाताच्या झुडपात हालचाल झाली अन काळानं डाव साधला. शिका-यानं झडप घालून नरडं आवळलं. माझं नाही हो, माझा नंबर लागायची कसली वाट पाहताय? त्या फुलपाखराला रॉबर फ्लायनं उडवलं होतं. हे पहा असं.
हे मी २-३ वेळा अनुभवलं आहे. असाच किस्सा पेंचमध्ये झाला. एक टॉनी राजा फुलपाखरू दिसलं. त्यानं बरंच घुमवलं. त्याचा फोटो अखेरीस मिळाला. तोवर अजून एक फुलपाखरू दगडावर मस्त ऊन खाताना दिसलं. बस. बाकी किस्सा अगदी वरच्यासारखाच. ही रॉबर फ्लाय खरंच उलट्या काळजाची दरोडेखोर आहे, अशा वाटमा-या करुन पोट भरते.
चपळ आणि शेपटीत जहरी काटा घेऊन फिरणा-या माशांचीसुद्धा शिकार होऊ शकते. जंगलात दोनच प्रजाती; शिकार आणि शिकारी. अशाच एका माशीची शिकार करून खाणारी रॉबर फ्लाय.
मधमाशीचा डंख कित्येकांनी अनुभवला असेल. पण ही रॉबर फ्लाय मधमाशीलाही पुरून उरते.
ही काय खाते याची यादी करण्यापेक्षा काय खात नाही याची यादी करणं सोपं होईल असं वाटतं. बघा ना या रॉबर फ्लायनं पेंचच्या जंगलात चक्क सिकाडाच उचलला.
रॉबर फ्लाय चक्क स्वकीयांनासुद्धा सोडत नाही. भूक लागली अन काही शोधता शोधता दुसरी रॉबर फ्लाय मिळाली तरी शिकार करुन खातात. वर्ज्य नाही. असाच हा कोळी. यानं बघा काय पराक्रम केलाय? आता कोण कोणाच्या अंगावर गेलं आगाऊपणा करून ते माहीत नाही. मी पोहोचलो तोवर पेंचच्या जंगलात ही तुंबळ लढाई सुरू झालेली होती. ‘दे दणादण, घे दणादण.’ दोघंही माघार घेईनात. माझा अंदाज होता काळा गडी भारी पडेल. दिसतच होता तसला. शिवाय त्याची तशीही ताकद बरी असते. पण हिरवा लिंक्स कोळी काळ्या जायंट वुड स्पायडरला वरचढ ठरला आणि अचूक डाव साधून त्याच्या छातीत विषदंत खुपसले. काळ्याचा प्रतिकार हळुहळू लुळा पडत गेला. असे किती अन कसे किडे त्यानं आजवर चापलून चिपाड करून टाकले असतील. आज दान उलटं पडलं.
कोळी भन्नाट शिकार करतात. कोण कशी तर कोण कशी करतो. वेळेवर जे मिळालं ते हडपलं. कोळ्यानं केलेली शिकार ही अनुभवायची गोष्ट आहे. पण एक विशेष, कोळी मेलेल्या किड्याला खाताना मला कधी दिसला नाही. अगदी एखादा जिवंत किडा जरी अगदी शांत मेल्यासारखा पडला तरी कोळी त्याला निरखून चक्कर मारुन निघून जाईल पण खाणार नाही. कष्टाचंच खाणार. आता हाच मेळघाटातला सिग्नेचर स्पायडर पहा. आणि हो; सिग्नेचर स्पायडर का म्हणे? याच्या जाळ्याच्या कोप-यांना फर्मास लफ्फेदार सही असते. बघा ना! मेळघाटातली नोव्हेंबरची थंडी. दुपार कलून गेली. मस्त बांबूच्या पानात दुपारभर झोपलेला हा रंगीला नाकतोडा काहीतरी भन्नाट किस्सा करायचाच म्हणून उठला. टणाटण उड्या हाणत निघाला. उंच, अजून उंच, अजून लांब. समोरच्या बिजा आणि धावड्याच्या मध्ये सुंदरसं जाळं विणून, कोप-यात सह्या मारून डुलकी काढणारी सईबाई कोळीण त्याला दिसली. सुंदर ढबदार पोट, सडपातळ हात-पाय. तो कोळणीच्या प्रेमातच पडला. ती हो म्हणाली तर तिला एक मऊ मऊ रेशमाचं स्वेटर विणून मागणार होता. म्हणजे त्याला रात्री कुडकुडत बसायला नको. मेळघाटातली थंडी ती. काय चेष्टा आहे काय राव! एक उडी त्यानं थेट तिच्या जाळ्यावरच घेतली. अहाहा! काय तो स्पर्श! ही मऊसूत गादी त्याची होऊ शकली असती. फक्त ती हो म्हणाली पाहिजे. तोवर ती आलीच. झंझावातासारखी आली. त्याच मऊ मऊ गादीवर तिच्या सडपातळ बाहूंमध्ये तिनं त्याला दिलेलं ते विषारी चुंबन. त्याच्या छातीत एक मरणकळ आली. तिनं शांतपणे त्याला रेशमी वस्त्रात गुंडाळलं अन स्वयंपाकघरच्या दिशेने आग्नेयेला टांगून ठेवलं. तिच्या आठही डोळ्यात आनंद. आज पार्टी. चार-सहा दिवसाचा बंदोबस्त झाला.
मी मघाशीच म्हटलं की प्रत्येक कोळ्याची शिकारीची पद्धत वेगळी. हा 'फनेल वेब स्पायडर' मेळघाटात सागवानाच्या बुडाशी जाळं विणून बसलाय पाहुण्याची वाट पहात. शेजारीच त्याची जाळीचीच गुहा. पण खबरदार. या गुहेकडे फक्त जाणारीच पावलं आहेत...... येणारं एकही पाऊल नाही. ही मरणगुहा आहे.
नेहमी ज्याचं नाव आपण 'रंग बदलणारा सरडा' म्हणून घेतो, तो हा. सगळेच सरडे पटापट रंग नाही बदलत याच्यासारखे. हा मात्र रंगांच्या खेळात वाकबगार. आणखी एक गंमत म्हणजे याचे दोन्ही डोळे दोन स्वतंत्र दिशांना फिरतात. म्हणजे एक पुढे पाहतो, तर एक मागे. एक खाली पाहतो, तर एक वर. आहे की नाही भारी? शिवाय जेवढी याची लांबी तेवढी लांब जीभ. सट्ट्कन किड्याचा वेध घेते. हा फोटो सेकंदाच्या ४००० व्या भागात काढला म्हणून जीभ बाहेर दिसली.
परांबिकुलमला एक्दम रस्त्यात दिसलेली ही हॅमरहेड वर्म्सची जोडी. असे विचित्र, एकदम परग्रहावरचे प्राणीच वाटतात. हळू हळू सरपटत जात राहतात आणि गांडूळ सापडलं की त्याचा फन्ना उडवतात. हे गांडूळांचे शत्रू. आपल्याकडं याचा एक प्रकार मी अनेकदा पाहिलाय. त्याचं असं कु-हाडीच्या पात्यासारखं डोकं नसतं. दिसायला गांडुळासारखाच, पण पांढरट पिवळसर आणि शरीराच्या दोन्ही बाजूंनी एक लाल रेघ तोंडापासून शेपटीपर्यंत जाते.
आपल्या परिचयाची असणारी ही गोम. अरेच्या, आठ एक दिवसांपूर्वीच्या माझ्या ‘रानातल्या चाव-यांमधून’ ही कशी सुटली? जाऊ देत. तर ही गोम. आता ही मला दिसली ती अशी. नेमकं काय झालं माहित नाही. या झाड बेडकाला निकाली डावानं चितपट करुन ही गोम त्याच्या उरावर बसली होती. बहुधा हे चुकून आमने-सामने झाल्यानं झालं असेल. शेवटी बेडूक झाडावर पळूनच गेला.
लहानपणीपासून हिची भिती. का म्हणे तर कानात जाते. आता जातही असेल म्हणा. पण गोम चावते चांगली. मेळघाटात एकदा असाच तापलेला उन्हाळा. तपमान चांगलंच ४७ पर्यंत पोहोचलं. पंखा फुल स्पीडवर. माफ करा. नुसता रेग्युलेटरच फुल स्पीडवर. पंखा घुंई - घुंई वाजून मला मानसिक बळ देण्याचं फक्त काम करत होता. ‘मी आहे, बरं का रे. बिलकूल गरम होणार नाही.’ रेग्युलेटर कितीही पीळला तरी हा ढिम्म ऐकत नव्हता.
‘रेग्युलेटरशी पीळ, अम्हां काय त्याचें’
मी अक्षरशः चड्डी-बनियनवर फरशीवर झोपलो. रात्री जेंव्हा डाव्या मांडीवर सटकन झटका बसला, मी खाडकन उठून टॉर्च पेटवला. मांडीखालून बोटभर जाड गोम वळवळत पळत होती. मोठी गांधील चावावी असं ते होतं. पुरलं म्हणा ३-४ दिवस.
आता तुम्ही मला हसाल. चक्क रानडुक्कर. हे कधी शिकारी प्राण्यात आलं बुवा? पण खरं सांगतो. रानडुकरं काय वाट्टेल ते खातात. सध्या मोह आणि टेंभरं झोडतायेत. मेळघाटात एकदा एक बैल रस्त्यावर मेला. दुस-या दिवशी मला दिसला तेंव्हा त्याच्यावर बिबट होता. भरल्या पोटानं तो बिबट हळू हळू बांबूची रांझी पार करत डोंगर चढून गेला. ३-४ दिवस गेले. एका रात्री एक मोठ्ठी काळी आकृति बैलाच्या कलेवराशी दुरुन दिसली. मला वाटलं, वाघ किंवा तरस अगदी नक्की. नाहीतर अस्वल तरी. सा-या अंदाजांचा फालुदा करत ते मोठ्ठंच्या मोठ्ठं रानडुक्कर निघालं. च्यायला, डुकरं केवढी बनवावीत काही प्रमाणच नाही. मला वाटतं हे डुक्कर बनवताना रेसिपीमध्ये माप होतं कपाचं आणि देवानं चुकून पेल्याच्या मापानं कच्चा माल घेतला. असो. आपला मुद्दा आहे ‘हे प्रकरण शिकारी आहे का?’ चक्क ही डुकरं आवाक्यात आलं तर हरीण, माकड, पक्षी, काय वाट्टेल ते रगडतात. हो. हो. कान्हात एकदा मोहाखाली चरता चरता रानडुकरं आणि चितळं अगदी खेळीमेळीनं होती. एका एकी त्यातल्या मोठ्या एकांड्यानं त्याचा लांबडा धारदार सुळा मारुन चितळ जागेवरच अर्धं-निम्मं फाडलं. मग ते आडवं तिडवं फाडून खाल्लं. अर्थात रानडुकरं असे उद्योग अत्यंत क्वचितच करतात म्हणून त्यांना सरसकट शिकारी नाही म्हणता येणार खरं. यांची शिकार म्हणजे पार्ट टाइम धंदा. कधीतरी अवचित.
नागझि-यात मला चावलेल्या असॅसीन बग विषयी मी मागं लिहिलं होतं. त्याचे अनेक प्रकार असतात. त्यापैकी हा एक मला सापडला कलक्कड मुंडनथुरई व्याघ्र प्रकल्पात. हा कीटकांमधला ‘अन्गुलीमाल’. शिकार केली की मृत किटकांचे अवयव स्वतःच्या शरीरावर चिकटवून ठेवतो. वाळुचे कण, काडी-कचरा चिकटवतो. हे त्याचं छलावरण.
पण सारेच असे नसतात. यात काही देखणे दिवेसुद्धा असतात. याच्यासारखे.
हा टायगर बीटल असाच. देखणा पण क्रूर. अतिशय रंगीत. एकदम तुरुतुरु धावताना हा तुम्हाला दिसेल. सेकंदभर म्हणून थांबत नाही. एकदा किडा, छोटा बेडूक, सरडा असं काही सापडलं की हा तुटून पडतो. याच्या नावातच याचा स्वभाव आला.
छोट्या किड्यांची वाट पहात एकाद्या छोट्या काडीवर हे असे चतुर बसतात. भुर्रकन हवेत एक भरारी मारुन काहीतरी पकडतात आणि गपागपा खातात. अनेकदा यांनी माशा आणि डास पकडलेलं मी पाहीलं आहे.
नागझि-यात तर एका चतुरानं एक मोठं फुलपाखरुच चक्क पकडलं होतं. यांच्याकडं ना विष, ना नांगी. हे नेहमी काही पकडलं की आधी डोकंच उडवतात. म्हणजे प्रतिकारच संपला. एखाद्या दिवशी नगरपालिकेनं औषध फवारून किडे मारले तर दिवसभर या काडीवर त्या काडीवर फिरून समजा हा उपाशी घरी गेला, तर चिडचिड करणार. मग बायकोनं याला, "माझं डोकं खाऊ नकोस हं." असं म्हणायची पद्धत यांच्यात असेल का???
पण शिका-याची शिकार व्हायला वेळ लागत नाही. एखादा किडा पकडायला चतुर हवेत भरारी मारतो. पण तुम्ही सुरूवातीला पाहिलेली रॉबर फ्लाय मात्र याला हवेतच झडपते. तिची चपळाई आणि विषारी डंखापुढं गरीब चतुराचं काही चालत नाही.
ही टाचणी. चतुराच्याच गुणांची.
ही एक रक्तपिपासू माशी. एका पावसाळी दिवशी एक वाळवी अनियंत्रित भिरभरत येऊन पडली. मी सहजच उत्सुकतेनं पाहिलं की बाबा काय झालं? असं कसं विमान खाली आलं? तर चक्क हे दिसलं. वाळवी जिवंतच तडफडत होती आणि ही माशी तिच्या उरात सोंड खुपसून जिवंतपणीच तिचा जीवनरस पिऊन घेत होती.
आणि या झाडमुंग्या. आपण घरात पाहतोच घरमुंग्यांच्या बाकी किड्यांसोबत लढाया. या झाडमुंग्यासुद्धा जंगलातल्या खतरनाक लढवय्या शिकारी आहेत. पान ढेकणाला ओढून घेऊन जाताना मला दिसल्या ताडोबात.
Amazing फोटो. अन लेखनही
Amazing फोटो. अन लेखनही सुरेख!! अन अफाट माहिती!!
झकास.
झकास.
एवढ्या नवनवीन जागांची नावं लिहिली आहेत दोन लेखांत - मेळघाट ते पेराम्बिकुलम ते थोलपेट्टी तर त्या रानांची उत्सुकता वाढली आहे.
मस्त लेख! आवडला.
मस्त लेख! आवडला.
जंगलात दोनच प्रजाती; शिकार
जंगलात दोनच प्रजाती; शिकार आणि शिकारी. →एकदम पटलं.
मस्त लेख... छायाचित्रे व
मस्त लेख... छायाचित्रे व माहिती दोन्ही जबरदस्त. लेख संपूच नये असे वाटायला लागले. तुमची निरीक्षणशक्ती अफाट आहे.
मस्तच. साधना ++++११११११
मस्तच. साधना ++++११११११
कधीही न पाहिलेले शिकारी. सरडा
कधीही न पाहिलेले शिकारी. सरडा जीभ प्रचि अफलातून.
मस्त फोटो. लेख पण आवडला.
मस्त फोटो. लेख पण आवडला.
सुंदर फोटो आणि माहिती!
सुंदर फोटो आणि माहिती!
लेखनशैली जबरदस्तच आहे...
लेखनशैली जबरदस्तच आहे...
माहिती व फोटो केवळ ग्रेटच...
अफाट निरीक्षण! लेख आवडला.
अफाट निरीक्षण! लेख आवडला.
वाईल्ड कोल्हापुर
वाईल्ड कोल्हापुर
मस्त लेख.
मस्त लेख.
भारी लेखन अन भारी छायचित्रे
भारी लेखन अन भारी छायचित्रे नेहमीप्रमाणे
मस्तच लेख
मस्तच लेख
प्रतिसादाबद्दल सर्वांना
प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
खुपच छान लेख !!
खुपच छान लेख !!
खुप छान माहीती ... अगदी
खुप छान माहीती ... अगदी सविस्तर अन सुंदर फोटोंसहीत !!
जबरदस्त लेखन व फोटो !
जबरदस्त लेखन व फोटो !
अप्रतिम लेख आणि सुंदर फोटोज..
अप्रतिम लेख आणि सुंदर फोटोज....
अजब!!! फोटो सुरेखच, लेखनशैली
अजब!!! फोटो सुरेखच, लेखनशैली अजुनच भन्नाट
माहितीपुर्ण आणि अभ्यासपुर्ण
माहितीपुर्ण आणि अभ्यासपुर्ण तरीही रोचक आणि मनोरंजक
धन्यवाद ह्या लेखाकरता.
अफलातून लेख ...
अफलातून लेख ...
इतकं बारकाईनं जंगल कधी बघितलं नव्हतं ...
फोटो खूप छान आहेत
फोटो खूप छान आहेत
अजब विश्वाची सफर घडवलीत.
अजब विश्वाची सफर घडवलीत.
सही!!
सही!!
फोटो व माहिती दोन्ही जबरदस्त
फोटो व माहिती दोन्ही जबरदस्त !